विहिरींतले राजवाडे शोधणारा तरुण

24 Feb 2022 15:10:31
पुष्करणी किंवा पायऱ्यांच्या विहिरी आज फारशा वापरात नाहीत. खरंतर या विहिरींचे स्थापत्य विलोभनीय आहे. त्यात वैविध्य आहेच त्याचबरोबर ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. कित्येक विहिरी तब्बल पाच ते सात मजली खोल आहेत. या दुर्लक्षित अस्सल ऐतिहासिक वारशाकडे लक्ष वेधलं गेलं ते दक्षिण मुंबईत राहणाऱ्या रोहन काळेचं.


1

पाणी साठवण्यासाठी विविध उपाययोजना प्राचीन काळापासून मानव करत आला आहे. जुन्या काळात बांधलेल्या विहिरी, तळी, धरणे आपल्याला आजही सर्रास वापरात असलेल्या पाहायला मिळतात. परंतु, त्या काळात बांधलेल्या पुष्करणी किंवा पायऱ्यांच्या विहिरी आज फारशा वापरात नाहीत. खरंतर या विहिरींचे स्थापत्य विलोभनीय आहे. त्यात वैविध्य आहेच त्याचबरोबर ऐतिहासिक वारसासुद्धा आहे. कित्येक विहिरी तब्बल पाच ते सात मजली खोल आहेत. या दुर्लक्षित अस्सल ऐतिहासिक वारशाकडे लक्ष वेधलं गेलं ते दक्षिण मुंबईत राहणाऱ्या रोहन काळेचं. व्यवसायाने मानव संसाधन क्षेत्रात काम करणाऱ्या रोहनचा इतिहासाशी संबंध तसा कमीच परंतु ध्येयाने पछाडल्यासारखे काम करत त्याने अवघ्या दीड वर्षात १६५० विहिरी शोधून काढल्या. यात उल्लेखनीय असे की, या पुष्करणीचा ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या गुजरात आणि राजस्थानपेक्षा महाराष्ट्रातील दगडी पायऱ्यांच्या विहिरींची संख्या जास्त आहे. तसेच यातील बहुतांश विहिरींचा शोध व साफसफाई गेल्या दीड वर्षातच झाली आहे. हे रोहन काळेच्या महाराष्ट्र बारव मोहिमेचे यश आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी या विहिरींना बारव म्हटले जाते. 
 
कामानिमित्त रोहन नेहमी गुजरातला जात असे त्यावेळी त्याने ४०-४५ बारवा पहिल्या होत्या. अशाच बारवा महाराष्ट्रातही असव्यात असा विचार करून त्याने गुगल मॅपवरून सॅटेलाईट व्ह्यू मध्ये झूम करून रस्त्यालगतच्या इंग्रजी ‘एल’ आकाराच्या बारवा शोधायला सुरुवात केली. एखाद्या गावात पुरेश्या बारवा मिळाल्या की आपल्या मोटरसायकलवरून एकट्यानेच प्रवासाला निघून त्याने बारवांना भेटी देण्यास सुरुवात केली. त्यानंतर बारवा पाहण्यासाठी त्याने चक्क आपली नोकरीही सोडली. त्याला कमी वेळात मिळतील तेवढ्या बारवांना भेटी द्यायच्या होत्या परंतु कोरोना काळात टाळेबंदी लागू झाल्याने म्हणावे तेवढे काम झाले नाही. रोहनला कळून चुकले होते की आपण एकट्याने काम करून सर्व बारवा शोधू शकत नाही. गावोगावच्या अनेक लोकांची त्याला मदत लागणार होती. याचे सर्व श्रेय लोकांना मिळायला हवे, तरच लोकांचा उत्साह वाढेल आणि तरच लोक नव्या बारवा शोधून काढतील, स्वच्छता करतील, पुनर्जीवित करतील.

1 
 
या मोहिमेसाठी लागणाऱ्या निधीसाठी कुणाचीही मदत न घेण्याचे रोहनने ठरवले. कित्येक वेळा असे होत असे की त्याच्या जवळचे पैसे संपत, राहायला किंवा एकवेळच्या जेवणासाठीही पैसे उरत नसत. अशावेळी आश्रमात, मंदिरात राहून दिवसाला एक वडापाव खाऊन रोहनने दिवस काढले. रोहनने या मोहिमेतून शोधलेली प्रत्येक बारव तिच्या प्रकारासहित आणि जमतील तेवढ्या फोटोंसहीत गुगल नकाशावर मोफत उपलब्ध करून दिली आहे. या ऐतिहासिक वारशाचे जतन व्हावे व लोकांपर्यंत पोहोचावे या हेतूने येत्या महाशिवरात्रीला या विहिरींत दीपोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्याने गावोगावच्या नागरिकांना केले आहे.
 
या विहिरींना विविध ठिकाणी विविध नावांनी ओळखले जाते. मराठवाड्यात त्यांना बारव म्हणतात तर विदर्भात बावडी म्हणतात, कोकणात त्याला घोडे बाव म्हणतात तर काही काही ठिकाणी तिला पुष्करणी म्हणतात. यात बरेच प्रकार आणि आकार आहेत. काही ठिकाणी साध्या इंग्रजी i आकाराच्या तर काही ठिकाणी L आकाराच्या विहिरी आहेत, बहुतेक विहिरी शिवपिंडीच्या आकाराच्या असून शिवमंदिराच्या आसपास सापडतात. काही विहिरी इंग्रजी N किंवा Z आकाराच्याही आहेत. ज्या विहिरीत उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या आहेत तिला 'नंदा'  म्हणतात तर जिला दोन बाजूंनी पायऱ्या आहेत तिला ‘भद्रा’ असे म्हणतात. तीन आणि चारही बाजूंनी पायऱ्या असणाऱ्या विहिरींना अनुक्रमे ‘जया’ आणि ‘विजया’ असे म्हणतात. काही विहिरी ५ ते ७ मजली खोल असून त्यात अख्खे राजवाडे कोरलेले आहेत. बारा मोटेची विहीर किंवा राणीची बाव अशी काही यांची उदाहरणे आहेत. रोहनच्या या मोहिमेत त्याने शोधलेल्या काही विहिरींत पूर्ण माती-गाळ भरलेला होता, गावकऱ्यांना आवाहन करून त्यांच्याकडूनच रोहनने या विहिरी स्वच्छ करवून घेतल्या.
 

1 
 
साधारण दीड वर्ष या मोहिमेसाठी मेहनत घेतल्यानंतर रोहनने पुन्हा नोकरी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु या काळात या मोहिमेतून बारवा , त्यांचं महत्व, कित्येक गावांना यातून लाभलेला हा ऐतिहासिक वारसा याबाबत मोठी जागृती निर्माण करण्यात रोहनला यश मिळाले आहे. अनेक गावकरी आता आपल्या गावातील पुरातन विहिरींबाबत जागरूक झाले आहेत. तरीही अजून १८ हजार ते १९ हजार विहिरी आपण शोधणे बाकी असून महाराष्ट्र बारव मोहिमेतून त्या नक्कीच शोधल्या जातील असा आत्मविश्वास रोहनला आहे. त्याच्या या कार्याला साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0