औरंगाबादेतील ‘भटका तांडा’

23 Feb 2022 12:25:55
भटकत असताना काहीतरी अप्रतिम असे दृष्टीस पडावे आणि ते आपल्यासारख्याच पागल भटक्यांना सांगावे, या हेतून ‘भटका तांडा’ सुरू झाला. मराठवाडा परिसरातील दुर्लक्षित स्थळांना जाणून घेणारा हा पर्यटनाचा एक वेगळा प्रयोग आहे, नव्हे, पर्यटनाची नवी चळवळ आहे. ती कोणत्याही भागात सुरू करता येऊ शकते व त्यातून मौल्यवान असा ऐवज हाती लागू शकतो.

sambhajinagar

‘भटका तांडा’ हा उत्स्फूर्तपणे जमा झालेला भटक्यांचा ग्रूप. कोरोना आपत्तीच्या नकारात्मकतेवर मात करण्यासाठी लोकांना घराबाहेर काढणे आवश्यक असल्याचे माझ्या तीव्रतेने लक्षात आले. औरंगाबादजवळपासची अप्रतिम निसर्गसंपन्न, ऐतिहासिक महत्त्वाची दुर्लक्षित स्थळे सामान्यांच्या नजरेस आणून देण्यासाठी, कोरोना आपत्तीचे निर्बंध पाळून खुल्यातली स्थळे यासाठी निवडली. फ्रेंच पर्यटक मित्र व्हिन्सेंट पास्किनेली गेली 7 वर्षे सातत्याने या मराठवाड्यात दर वर्षी 4 महिने येऊन राहतो. त्याला विविध स्थळे दाखवत असताना आपल्यालाच आपला परिसर माहीत नसल्याची तीव्र जाणीव झाली. मग त्यासाठी मी माहिती जमवणे चालू केले. दूरवरची प्रसिद्ध स्थळे थोडीफार माहीत असतात, पण जवळची मात्र पूर्णत: दुर्लक्षित असतात.
औरंगाबादपासून अगदी जवळ 25-30 कि.मी. परिसरांतील अशा 50 स्थळांची मी स्वत: यादीच केली. त्यानुसार आखणी सुरू केली. आम्ही फिरायचो आणि त्याची माहिती समाजमाध्यमांवर टाकायचो, ते वाचून असंख्य परिचितांनी ‘आम्हालाही घेऊन चला’ असा आग्रह धरला. त्या अनुषंगाने ही योजना सुरू झाली. ठरावीक प्रसिद्ध स्थळांना वगळून जवळची दुर्लक्षित स्थळे यासाठी निवडली. याला स्वाभाविकच ‘भटका तांडा’ असे नाव दिले. भटकत असताना काहीतरी अप्रतिम असे दृष्टीस पडावे आणि ते आपल्यासारख्याच पागल भटक्यांना सांगावे, हा यामागचा हेतू.


sambhajinagar

खडकेश्वर महादेव मंदिर, जामखेड

पहिली सहल औरंगाबादजवळच्या सातारा डोंगरातील कडेपठारावरील प्राचीन खंडोबा मंदिराला गेली होती. सातारा गावातील प्राचीन खंडोबा मंदिर सर्वपरिचित आहे, पण मूळ खंडोबा मंदिर कडेपठारच्या डोंगरावर आहे. डोंगराच्या कड्यावर पूर्वाभिमुख हे मंदिर असून समोर दरी आहे. हे ठिकाण फार निसर्गसंपन्न आहे. हे मंदिर यादवकालीन आहे.
 
दुसर्‍या सहलीसाठी वेरूळ येथील गणेश लेणी व जोगेश्वरी लेणी यांची निवड केली होती. जगप्रसिद्ध कैलास लेण्याच्या पाठीमागून या लेण्यांसाठी डोंगरातून पायवाट जाते. येळगंगा नदीचा उगम येथून होतो. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने दगडांमधून अप्रतिम असे आकार तयार केले आहेत. ही लेणी अतिशय दुर्लक्षित अशी आहे. पर्यटक सहसा इकडे फिरकत नाहीत. भटका तांडाच्या या सहलीला 100पेक्षा जास्त पागल भटक्यांनी सहभाग नोंदवला.


sambhajinagar
शेकटा बारव

तिसरी सहल शिवगड तांडा धबधबा, घारदोन सोमेश्वर शिवमंदिर, शेकटा बारव आणि शेंदूरवादा गणेश मंदिर मध्वमुनीश्वर आश्रम अशी गेली होती. औरंगाबादच्या अगदी जवळ घारदोन शिवारात हे प्राचीन शिवमंदिर उभे आहे. आठ दगडी खांबांनी तोलून धरलेला भव्य सभामंडप हे याचे वैशिष्ट्य आहे.
मध्वमुनीश्वरांचा शिवकालीन आश्रम असलेले ठिकाण म्हणजेच शेंदूरवादा. येथेच सिंदूरवदन गणेशाची स्वयंभू मूर्ती असून विठ्ठलाची प्राचीन अप्रतिम अशी देखणी मूर्ती आहे. मध्वमुनीश्वरांच्या आश्रमाचा परिसर नितांत देखणा आहे. खाम नदीच्या काठावरील या जागी आता दर त्रिपुरारी पौर्णिमेला मोठा संगीत महोत्सव व दीपोत्सव साजरा होतो.
याच शेंदूरवादाजवळ शेकटा या गावी भव्य अशी बारव आहे. गावकर्‍यांनी हिची स्वच्छता केली असून तिथे दर शिवरात्रीला दीपोत्सव साजरा होतो आहे.


sambhajinagar

चौथ्या सहलीसाठी अंबड तालुक्यातील खडकेश्वर महादेवाचे 1000 वर्षे जुने प्राचीन शिवकालीन मंदिर, डोणगाव येथील शुभ्र पांढर्‍या संगमरवरातील 1000 वर्षांपूर्वीचा मौ. नुरूद्दीन दर्गा, निसर्गरम्य ठिकाणी असलेले गुंफेतील जांबुवंत मंदिर, तलवाडा येथील डोंगरावरील 400 वर्षे त्वरिता माता मंदिर अशी सुंदर ठिकाणे निवडली होती.

खडकेश्वर महादेव मंदिर हे मूर्तिस्थापत्याच्या व मंदिरस्थापत्याच्या अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे. गावकर्‍यांनी चांगल्या पद्धतीने या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे.

sambhajinagar

जोगेश्वरी लेणी, वेरूळ

भटका तांडाची पाचवी सहल अजिंठा डोंगरातील वेताळवाडीचा दुर्लक्षित किल्ला आणि रुद्रेश्वर लेणी येथे आयोजित केली होती. तरुणांनी रिमझिमत्या पावसात या सहलीचा मनमुराद आनंद लुटला. रुद्रेश्वर लेणीतील गणेशमूर्ती महाराष्ट्रातील प्राचीन, भव्य अशी मूर्ती आहे. 2000 हजार वर्षांपूर्वीची इतकी मोठी गणेशमूर्ती कुठेच नाही. साडेसहा फूट उंचीची ही मूर्ती अभ्यासकांकडूनही उपेक्षित राहिली आहे. मुळात अशी काही उपेक्षित, दुर्लक्षित स्थळे प्रकाशात आणणे हाच तर भटका तांडाचा उद्देश राहिला आहे.
भटका तांडा या संकल्पनेत शाश्वत पर्यटन मध्यवर्ती आहे. त्यानुसार स्थानिक रोजगारनिर्मिती, स्थानिक सण-उत्सव-परंपरांची ओळख, लोककलांना व लोकसंगीताला प्रोत्साहन असे पैलू येतात. भटका तांडाच्या सर्व लोकांना स्थानिक लोकांनी चहा-नाष्टा दिला. ही मंडळी या ठिकाणी येणार्‍या सर्व पर्यटकांची उत्साहाने सोय करतात, ही फार महत्त्वाची बाब आहे.
मराठवाड्यातील आणि नंतर महाराष्ट्रातील प्राचीन स्थळे पाहण्यासाठी आम्ही कोरोना आपत्ती निर्बंध पूर्णपणे उठण्याची वाट पाहतो आहोत. ते उठल्यावर या सहलींचे नियोजन परत केले जाईल.


sambhajinagar

भटका तांडा ही पर्यटनाची चळवळ आहे. तुम्ही सगळे यात सामील होऊ शकता. आपआपल्या गावातील, शहरांतील भटकंतीप्रिय पागलांना गोळा करा आणि भोवतालचा प्रदेश धुंडाळून काढा. खूप काही महत्त्वाचा ऐवज तुमच्या हाताला लागू शकतो.
प्रत्येक वेळी 50-100 लोकांना घेऊन जाणे शक्य नसते, म्हणून 10-15 भटकंतीप्रेमींचे गट करून एका दिवसाच्या सहली आजूबाजूला काढता येणे सहज शक्य आहे. एक दिवसाच्या मुक्कामाची तयारी असेल, तर भरपूर भाग पाहता येऊ शकतो.
 
आता अशा सहलींचे व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर टाकणे सहज शक्य आहे. खूप हौशी तरुण आता हे काम चांगल्या पद्धतीने उत्साहात करत आहेत. प्रत्येक गावातील अशा उत्साही तरुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्या व्हिडिओंचा प्रसार केला पाहिजे. समाजमाध्यमांवर अशा स्थळांची छायाचित्रे, व्हिडिओ टाकून खूप चांगल्या पोस्ट्स लिहिल्या जात आहेत. त्यांचीसुद्धा दखल घेतली पाहिजे. प्राचीन गढ्या, वाडे यांवरही काही भटके हौशीने लिखाण करत आहेत. त्यांना भेट देऊन व्हिडिओ करत आहेत.



sambhajinagar
 
‘भटका तांडा’ हा पर्यटनाची संकल्पना विस्तारण्याचा प्रयोग आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे - नव्हे, सर्वांनी यावे म्हणूनच हा उपक्रम सुरू केला आहे.
Powered By Sangraha 9.0