झोपडपट्टीतील मुलांना शिक्षणाची गोडी लावणारे विजय शिवले

19 Feb 2022 12:34:24
दारिद्र्य सोसणारी माणसे ही स्वाभाविकपणे सतत आर्थिक विंवचनेत असतात. मुलांचे भवितव्य, त्यांचे शिक्षण याबद्दल येथील सर्वच पालकांच्या मनामध्ये आस्था आणि जागृती असतेच असे नाही. वरच्या इयत्तेमध्ये जाताना नापास होणाऱ्या मुलांचे प्रमाण मोठे असते. विजय शिवलेंची अभ्यासिका सुरु केल्यानंतर पहिल्याच दिवशी फ़क़्त १० मुलांनी उपस्थिती दर्शवली.

1 

घरासमोरून वाहणारी गटारं, कुठेही साचून राहिलेलं सांडपाणी, गलिच्छ गल्ल्या आणि अस्ताव्यस्त बांधलेल्या झोपड्या. या अशा वस्तीत चक्क अभ्यासिका सुरु करून शिक्षणाबद्दल फारशी उत्सुकता नसलेल्या मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम पुण्याजवळील येरवडा, विश्रांतवाडी परिसरातील जयप्रकाशनगर येथे राहणाऱ्या विजय शिवले यांनी केले.
 
आर्थिक परिस्थिती बेताची त्यामुळे दहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर विजयला नोकरीची नितांत गरज होती. त्यावेळी व्हॉईड व्हिजन ऑफ इंडिया या संस्थेने झोपडपट्टीतील मुलांना शिकवण्यासाठी एक अभ्यासिका सुरु केली होती. १९९२ साली मासिक पगार १०० रुपये मिळणार होते म्हणून ती नोकरी विजयने स्वीकारली आणि मुलांना शिकवणे कठीण आहे हे हळूहळू लक्षात येऊ लागले.
 
दारिद्र्य सोसणारी माणसे ही स्वाभाविकपणे सतत आर्थिक विंवचनेत असतात. मुलांचे भवितव्य, त्यांचे शिक्षण याबद्दल येथील सर्वच पालकांच्या मनामध्ये आस्था आणि जागृती असतेच असे नाही. वरच्या इयत्तेमध्ये जाताना नापास होणाऱ्या मुलांचे प्रमाण मोठे असते. विजय शिवलेंची अभ्यासिका सुरु केल्यानंतर पहिल्याच दिवशी फ़क़्त १० मुलांनी उपस्थिती दर्शवली. मुलांना शारीरिक स्वच्छतेशी संबंधित लहानसहान गोष्टींपर्यंत सगळंच सांगावं लागे. सकाळच्या अभ्यासिकेच्या वेळी मुले अंघोळ न करता येत, त्यांना तिथेच अंघोळ घातली जात असे. घरून अंघोळ करून आलो तर थंड पाण्याने अंघोळ करावी लागत नाही हे मुलांना समजून येईपर्यंत अभ्यासिकेचा हा अंघोळ घालण्याचा कार्यक्रम चालू होता.
 
काही दिवसांनी संस्थेने ही अभ्यासिका बंद करण्याचे ठरविले. झोपडपट्टीतच शिकून मोठ्या झालेल्या विजय शिवले यांना अभ्यासिका बंद होऊ नये असे वाटत होते. यावेळी त्यांना पैशाची कमतरताही नव्हती, आपल्या आनंदासाठी आणि मुलांच्या भल्यासाठी ते अभ्यासिकेत शिकवण्याचे काम करत. विजय यांनी सुरुवातीला घेतलेल्या श्रमांचे परिणाम दिसले होते व अभ्यासिकेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत होता. पहिल्या बॅचमधील १० मुलांपैकी २ मुले पास झाली. त्यात नेहमीच नापास होणाऱ्या एका मुलाचा समावेश होता. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना अभ्यासिकेत पाठवण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या वर्षी पालकांनी स्वतः अभ्यासिका सुरु होण्याबाबत विचारणा केली व त्या वर्षी तब्बल २५० मुलांनी अभ्यासिकेत नोंदणी केली.
 
यानंतर शिवले यांनी ज्या झोपडपट्टीत ते लहानाचे मोठे झाले तिथे ‘सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प’ नावाने अभ्यासिकेची सुरुवात केली. या संस्थेची स्थापना मे, २००० मध्ये झाली. पहिल्या महिन्यात त्यांनी २१५ मुलांचे व्यक्तिमत्व विकासाचे शिबीर घेतले. त्यानंतर सुमारे २०११ मुलांनी प्रवेश नोंदवले. पाच रुपये नाममात्र शुल्क आकारून अभ्यासिका वर्ग सुरू झाले. त्यापैकी सुमारे ८३० विद्यार्थी त्या अभ्यासिकेतून शिकले. अभ्यासिकेसोबातच त्यांनी महिलांचे बचत गट स्थापन केले. विजय यांनी नोकरी सोडून आपला पूर्ण वेळ सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाला देणे सुरु केले.
 
विजय शिवले यांनी कार्यक्षेत्र मानलेल्या रहिवाशांमध्ये शिक्षणाचा अभाव दिसून येतो, आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष तसेच बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याने कौटुंवबक समस्या जाणवतात. किशोरवयीन मुलींची लवकर लग्न होतात. अजाणत्या वयातच गरोदरपण लादलं जातं. वास्तविक या भागातील मुलांमध्ये बुद्धिमत्ता आहे परंतु तिला चालना न मिळाल्याने तसेच योग्य दिशा न दिल्याने ही मुले अभ्यासात मागे पडतात असे निरीक्षणास आल्याने सुराज्य सर्वांगीण विकास या संस्थेची स्थापना केल्याचे विजय शिवले म्हणतात. आज त्यांचे ३२ अभ्यावर्ग, १२ संस्कार वर्ग, १६ किशोरी प्रकल्प, ३९ महिला बचत गट कार्यरत आहेत. त्यांच्या अभ्यासिकेत शिकून मोठी झालेली मुले आता इतर मुलांना शिकवण्याचे काम करत आहेत. अनेक मुलांनी आपल्या आयुष्यात मोठी कामगिरी केलेली आहे. निर्मला नारायणकर नावाची अभ्यासिकेत शिकलेली मुलगी पॅरीसमध्ये सॉफ्टवेअर कंपनीत काम करते. आरती भोसले या एमएसडब्ल्यू पूर्ण करून आता झोपडपट्टीतील मुलांसाठी कार्य करत आहेत.
 
या कार्यासाठी विजय शिवले यांना स्वर्गीय नामदेवराव घाडगे पुरस्कार २००४, क्रांतिवीर लहूजी साळवे विकास परिषद पुरस्कार, जनहित प्रतिष्ठान पुरस्कार २००६, धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती पुरस्कार २००८, स्वर्गीय मोहनराव गोवंडी पुरस्कार २००९, जनसेवा पुरस्कार २००९, जनसेवा सहकारी बँक पुणे, समर्पण पुरस्कार २०१०, भारत विकास परिषद, पुणे, सेवा पुरस्कार २०११, पुणे विकास प्रतिष्ठान, पुणे, युवा अस्मिता पुरस्कार २०१२, आनंदवन, ओंकार न्यास पुरस्कार २०१४, सामाजिक समरसता मंच पुरस्कार २०१५, पुणे, केशव सृष्टी पुरस्कार २०१६, उत्तन, मुंबई, सामाजिक कर्तृत्व गौरव पुरस्कार २०१६, आनंद ट्रेडर्स, पुणे, लायन्स क्लब (international) २०१८, असे अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
 
विजय शिवले हे आज पूर्णवेळ वंचितांसाठी काम करीत आहेत. सामाजिक कार्याचा अखंड वसा घेतलेल्या शिवले यांना पुढील कार्यासाठी साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा.
Powered By Sangraha 9.0