पाणी आणि संगीत यांचा फार पूर्वीपासून मेळ आहे. समुद्राच्या लाटा, निरव शांततेतली त्याची गाज, दगडांच्या अडथळ्यामुळे होणारा नदीचा खळखळाट, अगदी भाकऱ्या खेळताना पाण्यावर उठलेले तरंग आणि त्यांचा नाद आपल्याला पूर्वीपासून माहिती आहे. पण या पाण्याचा वापर करून संगीतनिर्मिती करणारे कलाकार तुम्हाला माहिती आहेत का? त्यांच्या उपकरणाचं नावच आहे जलतरंग.
जलतरंग हे भारतातील फार जुनं वाद्य. परंतु या कलेला म्हणावी तेवढी लोकप्रियता मिळाली नव्हती. भारतातील काही जुने संगीतकार ही कला जपून होते. परंतु या वाद्याची मुख्य संगीतात, मैफिलीत म्हणावी तशी दखल घेतली जात नव्हती. या जलसुरांना जगभरातील संगीतप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम मिलिंद तुळाणकर यांनी केले.
मिलिंद यांना संगीताची ओढ लागली ती बालवयातच. आईच्या व वडिलांच्या अशा दोन्ही घरातून त्यांच्यावर संगीतसंस्कार होत होते. शिक्षणासाठी मिलिंद आपल्या आजोळी साताऱ्याला राहत. त्यांच्या आईचे वडील स्व. पंडित शंकरराव कान्हेरे जलतरंग वाजवीत. मिलिंद यांनी संवादिनीपासून आपल्या संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांची रसिकांसमोर पहिली मैफिल ते चार वर्षांचे असताना झाली. आजोबांनी यानंतर त्यांना जलतरंगवर लक्ष केंद्रित करायला सांगितले. त्यांना पं. नयन घोष, सितार वादक उस्ताद शाहिद परवेझ आणि तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचेही मार्गदर्शन मिळाले.
जलतरंग म्हणजे काय तर यामध्ये साधारण २.५ इंच ते 6.५ इंचाच्या वाट्या असतात. त्या विविध ध्वनी लहरी निर्माण करतात. त्यात पाणी भरून आपण थोड्याफार प्रमाणात सूर कमी जास्त करू शकतो. सर्वात लहान वाटीपासून मोठ्या वाटीपर्यंत सर्व वाट्या अर्धवर्तुळाकार कक्षेत आपल्या समोर मांडून त्यात गरजेइतके पाणी ओतून त्यावर चॉपस्टिक्स सदृश काड्यांनी विशिष्ट्प्रकारे आघात केल्यास सूर उमटतात. त्यास जलतरंग म्हणतात. मिलिंद यांच्याकडे असलेले बाउल हे ८५ वर्षे जुने आहेत. त्यांच्या आजोबांनीच वापरलेलेच बाउल ते अजूनही वापरत आहेत.
कॉलेजात असताना दुसऱ्या वर्षात त्यांनी घरी न सांगता रेडिओ अॅडिशन दिली. घरी न सांगण्याचे कारण एवढेच की आजोबांनी सांगितले जलतरंगावर अजून तुमचा हात बसलेला नाही पण मिलिंद यांना मात्र आत्मविश्वास होता. त्यावेळी एक रेकॉर्डिंग दिल्लीला पाठवावे लागे. त्यासाठी आजोबांनी तयारी करून घेतली त्या नंतर ते आकाशवाणी चे मान्यता प्राप्त जल तरंग वादक झाले व त्याचवेळी कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांना जलतरंग वादक म्हणून मान्यता मिळू लागली. त्यानंतर जालंधर येथील बाबा हरवल्लभ संगीत संमेलन, गोवा येथील अभिषेकी महोत्सव, फेज फेस्टिव्हल मोरोक्को या ठिकाणी काही मैफिली झाल्या जिथे त्यांच्या कलेला ओळख मिळाली. या दुर्मिळ वाद्याने त्यांना भारतात तसेच परदेशातील मैफिलींमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली. दुबई, अबुधाबी अशा शहरांत, मलेशिया, सिंगापूर, ऑस्ट्रिया, फ्रान्स, न्यूझीलंड. बेल्जियम. मोरोक्को, स्वीडन. इंडोनेशिया. स्वित्झर्लंड, जर्मनी, अमेरिका आणि कॅनडा या देशांत त्यांनी आपली कला सादर केली आहे. 'वेस्ट इज वेस्ट' या इंग्रजी तसेच tirumanam ennam nikah या तामिळ चित्रपटातही त्यांनी जलतरंग वादन केले आहे.
जलतरंगाचा सर्वात जुना उल्लेख वात्स्यायनाच्या कामसूत्र ग्रंथात पाहायला मिळतो. पाण्याने भरलेल्या विविध पेल्यांत संगीताचे जल-तरंग निर्माण करून सूरनिर्मिती केली जात असे. तसेच याचा उल्लेख मध्ययुगीन संगीत पारिजात या ग्रंथामध्येही करण्यात आला होता, ज्यामध्ये या वाद्याला घन-वाद्य असे म्हंटले आहे. जल-तरंगला मध्ययुगीन काळात जल-यंत्र जल तंत्री वीणा देखील म्हटले जात असे चित्रपट संगीत मध्ये देखील या वड्याचा भरपूर वापर केला गेलेला आहे. पंख होते तो उड आती रे.. मधु बन मे राधिका नाचे रे… . अशी अनेक उदाहरणे देता येतील. तसेच कृष्णावर कविता लिहिणाऱ्या कवींनीदेखील या साधनाचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे.
संवादिनी, संतूर, तबला तसेच त्यांची ओळख असलेले जलतरंग याचा वापर फ़क़्त मैफिलीत आपली कला सादर करण्यासाठीच मिलिंद तुळाणकर करत नाहीत तर आपल्या संगीताचा वापर करून ते संगीत थेरपी देतात. abnormal home, ‘आपलं घर’, ‘मानव्य संस्था’ यासारख्या संस्थ्यांच्या माध्यमातून अनाथ, एड्स बाधित तसेच विशेष मुलांसाठी ते काम करतात. कर्करोगग्रस्तांनाही आपल्या संगीताची जादू ऐकवून आपलं दुखणं काही काळ विसरायला मदत करतात. संगीत उपचारांसाठी नियामितपणे सिप्ला परिहार सेवा केंद्र तसेच दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात सेवा देतात. तसेच संगीत उपचारांसाठी ‘हिलिंग जल’ ही CD टाइम्स म्युझिक कंपनी कडून प्रकाशित झालेली आहे.
कोरोना काळात तुळाणकर, मिलिंद कुलकर्णी आणि पं. रामदास पळसुले यांच्या एकत्रित प्रयत्नातून एक स्तुत्य उपक्रम साकार झाला . ज्यांचा उदरनिर्वाह केवळ संगीतावर आधारित आहे व ज्यांच्याकडे मिळकतीचे दुसरे साधन नाही त्यांना काही प्रमाणात मदत करण्यासाठी ‘साथ’ नावाच्या उपक्रमाची सुरुवात केली. ज्यांना मदत देण्याची इच्छा आहे तसेच ज्यांना मदत हवी आहे अशांना एकमेकांशी जोडून दिले. काही कलाकार अमेरिकेतील बे एरिया महाराष्ट्र मंडळात आहेत, त्यांच्याशी संपर्क करून अमेरिकेतून निधी जमा करून तो रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी भारतातील कलाकारांपर्यंत पोहोचवला.
त्यांना सूरमणी पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, अश्विनी जप्तीवाले स्मृती पुरस्कार, लयानुभूति पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांनी आजवर अनेक देशातील व परदेशी वादकांबरोबर जुगलबंदी सादर केली आहे, तसेच त्यांनी अनेक जाहिरातींसाठीही काम केले आहे. येवले अमृततुल्य चहा, ब्रिटानिया गुड डे बिस्कीट आणि टायटन यासाठी वादन केले आहे. त्यांच्या अनेक सीडी व्हीसीडी प्रसिद्ध झाल्या आहेत. TEDx या आंतरराष्ट्रीय मंचावरून त्यांनी अनेक वेळा Ted Talks या कार्यक्रमात जलतरंग विषयीचे सप्रयोग भाषण केले आहे. मिलिंद तुळाणकर यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि स्वरसाधनेसाठी साप्ताहिक विवेककडून अनेक शुभेच्छा!