सामाजिक, वैचारिक शब्दसाधनेची चाळिशी

07 Dec 2022 18:30:54
‘हिंदुत्वाचा सामाजिक भाष्यकार’ असा महाराष्ट्राला रमेश पतंगे यांचा परिचय आहे. त्यांचा विपुल लेखनातून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची घडण झाली आहे. त्याच्या निवडक पुस्तकाचा परामर्श घेणारी साहित्य संगिती चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम्मध्ये संपन्न झाली. शरणकुमार लिंबाळे, डॉ. सदानंद मोरे, गिरीश प्रभुणे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या साहित्य संगितीचा व रमेश पतंगे यांच्या वैचारिक वाटचालीचा आढावा घेणारा लेख.
 
vivek
 
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. आपल्याला फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वारसा लाभला आहे. महात्मा फुले यांनी तयार केलेल्या सामाजिक सुधारणेच्या कृती आराखड्यानुसार आजही आपल्या सामाजिक व वैचारिक चळवळी चालतात. या तिन्ही महापुरुषांनी आपल्या जीवनात सर्वांना जोडण्याचे काम, सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे काम केले. असा आपला सामाजिक व वैचारिक इतिहास आहे. मात्र आज फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावाने चालणार्‍या चळवळी खर्‍या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार वारसा पुढे नेतात का? हा संशोधनाचा विषय आहे. वर उल्लेख केलेल्या महापुरुषांना आदर्श मानून किंवा त्यांच्या नावाने संस्था, संघटना चालवून कोणते परिवर्तन घडवले जाते? असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. मागील तीस-चाळीस वर्षांपासून सामाजिक जीवनाचे जे चित्र आपल्या समोर आहे, ते पाहिले तर फुले-शाहू-आंबेडकर पुन्हा नव्याने समजून घेतले पाहिजेत, असे प्रकर्षाने वाटते. आणि ते कसे समजून घेणार? महात्मा फुले यांना अपेक्षित एकमय समाज कसा निर्माण होणार? राजर्षी शाहूंना अपेक्षित असणारा जातिभेदमुक्त समाज कसा निर्माण करावा? डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असणारा राष्ट्रीय समाज कसा निर्माण होणार? असे अनेक प्रश्न मागील तीस-चाळीस वर्षांपासून उग्र रूपात पुढे येत आहे. साधारणत: 1980नंतरचे सामाजिक वातावरण डोळ्यासमोर आणले, तरीही आपला समाज महापुरुषांनी दाखवलेल्या दिशेने जात नाही, हे लक्षात येते. मंडल आयोग, नामांतर लढा, रिडल्स इत्यादी प्रकरणांमुळे समाज विखंडित होत गेला आणि त्याच काळात या महापुरुषांनी दिलेले सर्वांना जोडण्याचे सूत्र रमेश पतंगे आपल्या लेखनातून अधोरेखित करू लागले. सामाजिक समरसता मंचाची वैचारिक भूमिका मांडताना आणि भविष्याचा वेध घेत रमेश पतंगे यांनी गेल्या चाळीस वर्षांत सत्तरपेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. महत्त्वाचे अनेक ग्रंथ संपादित केले आहेत. ‘हिंदुत्वाचा सामाजिक आशय मांडणारा भाष्यकार’ म्हणून रमेश पतंगे यांची ओळख आहे.
 
 
 
रमेश पतंगे संघस्वयंसेवक आहेत. त्यांनी आणीबाणीचा कारावास भोगला आहे. समरसता मंचाच्या माध्यमातून काम करताना ‘बंधुभाव हाच धर्म’ ही मध्यवर्ती कल्पना समोर ठेवून त्यांनी फुले यांचा भावंडभाव आणि डॉ. आंबेडकर यांची बंधुता कृती-विचार-लेखनातून अधोरेखित करण्याचे काम रमेश पतंगे यांनी केले आहे. तशा अर्थाने रमेश पतंगे हे स्वान्त सुखाय लेखक नाहीत. हिंदुत्वाचा सामाजिक आशय अभिव्यक्त करण्यासाठी ते लेखन करत असतात, त्याचप्रमाणे भविष्यकाळाचा वेध घेत समाजाला दिशा देण्यासाठी त्यांची लेखणी कार्यरत असते. समरसतेचे भाष्यकार असणार्‍या रमेश पतंगे यांच्या निवडक अठरा पुस्तकांवर चर्चा व भाष्य करणार्‍या, मुलाखतीच्या माध्यमातून रमेश पतंगे यांचा वैचारिक प्रवास समजावून सांगणार्‍या साहित्य संगितीचे आयोजन चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम्मध्ये 28 व 29 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. या साहित्य संगितीची संकल्पना पद्मश्री गिरीश प्रभुणे यांची होती. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी साहित्य संगितीचे उद्घाटन केले. आपल्या भाषणात रमेश पतंगे यांच्या साहित्याचा व सामाजिक वाटचालीचा आढावा घेताना ते म्हणाले, “पतंगे, प्रभुणे यांनी समरसता चळवळीतून समाज जोडण्याचे काम केले. जातीपेक्षा बंधुता महत्त्वाची मांडली. जातीअंत व्हावा म्हणून आम्ही इतकी वर्षे लढत राहिलो. आता लक्षात येते की आमची दिशा चुकीची होती. जाती संपणार नाहीत, त्या राहतील, जातभाव कमी झाला पाहिजे, हे आता आम्हाला कळते आहे. पतंगे यांनी हे चाळीस वर्षांपूर्वी ओळखले. सर्वांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे, ही त्यांची भूमिका आज सर्व जण मान्य करत आहेत. आज संगितीच्या माध्यमातून रमेश पतंगे यांचा वैचारिक, साहित्यिक प्रवास येथे मांडला जातो आहे. अशा उपक्रमांची गरज होती.”
 
 
रमेश पतंगे यांचा एकूण लिखाणाचे तीन विभागांत वर्गीकरण करता येईल - समरसता चिंतन, राष्ट्रीय चिंतन आणि समकालीन समस्यांची उत्तरे. पतंगे यांच्या साहित्याचे एकच समान सूत्र आहे, ते म्हणजे सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे. अशा साहित्यातील निवडक अठरा पुस्तके या साहित्य संगितीमध्ये चर्चिली गेली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी पतंगे यांनी विपुल लेखन केले आहे. त्यातील ‘संघर्ष महामानवाचा’, ‘सामाजिक न्याय आणि डॉ. आंबेडकर’, ‘राष्ट्र उभारणी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या तीन पुस्तकांवर चर्चा झाली. त्यानंतर अब्राहम लिंकन, बुकर टी वॉशिंग्टन व मार्टिन ल्युथर किंग या तीन महापुरुषांनी केलेल्या कार्यातून इथल्या समस्यांना उत्तरे कशी शोधली आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न झाला. रमेश पतंगे यांनी वैचारिक लेखन केले. त्यांची आत्मकथनेही सामाजिक संदर्भांनी नटलेली आहेत. ‘मी मनू आणि संघ’, ‘अंगुस्तान ते लेखणी’, ‘समरसतेचा वाटसरू’ या तीन पुस्तकांतून रमेश पतंगे यांनी आपल्या वाटचालीचा लेखाजोखा मांडताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका स्पष्ट केली आहे. या तीन पुस्तकांतून रमेश पतंगे यांनी संघविचार, हिंदुत्व व सामाजिक ताणेबाणे यांचे वर्णन केले आहे.
 
 
 
संविधान या विषयांवर रमेश पतंगे गेली दहा वर्षे सातत्याने लिखाण करत असून संविधान विषयावर आतापर्यंत सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यापैकी ‘आपण व आपले संविधान’, ‘आपले मौलिक संविधान’, ‘आपले संविधान - मूल्यविचार, तत्त्वज्ञान, ध्येयवाद’ या तीन पुस्तकांवर चर्चा झाली. आपली संस्कृती सनातन आहे, ती लोककथा, नीतिकथा, बोधकथा यामधून विकसित होते. ‘कथामृत’, ‘कथा लोकप्रज्ञेच्या’, ‘सांस्कृतिक भारताच्या लोककथा’ या तीन पुस्तकांवरही या साहित्य संगितीमध्ये चर्चा झाली. त्यानंतरच्या सत्रात ‘गांधी समजून घेताना’, ‘तथागत आणि श्रीगुरुजी’, ‘लिंकन ते ओबामा’ या तीन पुस्तकांवर चर्चा झाली. वर उल्लेख केलेल्या सर्व पुस्तकांवर मांडणी करणारे वक्ते हे चाफेकर शाळा, गुरुकुलम्मधील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते, वकील होते. रूढ अर्थाने ते कसलेले वक्ते किंवा समीक्षकही नव्हते. पण रमेश पतंगे पुस्तकातून काय सांगत आहेत हे या सर्वांनी समजून घेतले होते, त्यामुळे त्यांनी केलेली मांडणी समीक्षेच्या पलीकडे गेली आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे सूत्र अधोरेखित झाले.
 
 
डॉ. सदानंद मोरे यांनी या साहित्य संगितीचा समारोप केला. आपल्या भाषणात ते म्हणाले, “रमेश पतंगे हे संघविचाराचे आधुनिक भाष्यकार आहेत. अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली अनेक जण कार्यहानी करतात. या पार्श्वभूमीवर रमेश पतंगे यांनी समतोल राखला आहे. विचारवंत आणि कार्यकर्ता या दोन्ही आघाड्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वैचारिक घडणीचे मागील पंचवीस वर्षांचे ते साक्षीदार आहेत.” सदानंद मोरे यांनी आपल्या भाषणात संघाच्या वैचारिक वाटचालीचा आढावा घेताना त्यातील पतंगे, प्रभुणे यांचे योगदान अधोरेखित केले. “संघासारख्या मोठ्या संघटनेला एकाच विषयावर काम करण्यासाठी तयार करणे ही अवघड गोष्ट असली, तरी ती रमेश पतंगे यांनी व्यवहारात आणली आहे. त्यांनी केलेल्या लिखाणामागे विशेष भूमिका आहे, आपल्या सहकार्‍यांना, कार्यकर्ता बंधूंना सजग करण्यासाठी पतंगे लिहीत असतात” असेही सदानंद मोरे यांनी उद्गार काढले.
 
 
संगिती म्हणजे सोबत बसून चर्चा करणे. तथागत गौतम बुद्धांनी धम्म संगिती आयोजित करून आपला विषय सर्वदूर पोहोचवला होता. चिंचवड येथील समरसता पुनरुत्थान गुरुकुलम्ने रमेश पतंगे साहित्य संगिती आयोजित करून रमेश पतंगे यांनी गेल्या चाळीस वर्षांत केलेल्या साहित्याला मानवंदना देतानाच त्याचे वेगळेपण आणि आवश्यकता अधोरेखित केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0