भारतमातेच्या वीरांगना स्वातंत्र्याची क्रांतिज्योत सुशीला देवी

31 Dec 2022 14:37:06
@सोनाली तेलंग
 स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण झालीत. असे म्हणतात की एखादी गोष्टी फुकट मिळाली की तिची किंमत कवडीमोल ठरते... स्वातंत्र्याचेही तसेच तर झाले नाही ना? हे सतत पडताळून पाहत राहायला हवे. या स्वातंत्र्यासाठी कितीतरी लोकांच्या रक्ताचे पाट वाहिले आहेत, कितीतरी घरे बांधण्याआधीच उद्ध्वस्त झाली आहेत. ह्या आंदोलनाला लहान-मोठा, उच्च-नीच असा भेदभाव माहीत नव्हता. ते सर्वव्यापी-देशव्यापी आंदोलन होते. या स्वातंत्र्य आंदोलनात पुरुषच नव्हे, तर स्त्रियाही आघाडीवर होत्या. मात्र फार थोड्या महिला स्वातंत्र्यसैनिक आपल्याला माहीत आहेत. अशाच काही अपरिचित, अज्ञात राहिलेल्या महिला क्रांतिवीरांचा परिचय करून देणारे पाक्षिक सदर ‘भारतमातेच्या वीरांगना’ सुरू करत आहोत. त्या लेखमालेतील ही पहिली गाथा.

vivek
दिल्लीतल्या चांदनी चौक येथील एका रस्त्याचं नाव ‘सुशीला मोहन मार्ग’ असं आहे. कुठल्याही मार्गाला एखाद्या व्यक्तीचं नावं दिलं जातं, त्या वेळी त्या व्यक्तीचं कार्य निश्चितच तेवढं मोठं असतं; पण काळाची पुटं आपल्या स्मृतीवर गडद होत जातात आणि कालांतराने सवयीचं होऊन आपण सहज विसरून जातो. अशीच एक वीरांगना क्रांतिकारक भगतसिंगांची दीदी सुशीला दीदी.
दि. 5 मार्च 1905 रोजी पंजाब येथे एका सैनिकी परिवारात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील सैन्यात डॉक्टर म्हणून कार्यरत होते. कवितेची जाण त्यांना उपजतच होती आणि त्या स्वत: फार सुंदर कविता रचायच्या, ज्यात प्रामुख्याने देशाभिमान, देशप्रेम, राष्ट्रप्रेम असे विषय असायचे. हे सगळं असलं, तरीही अजून प्रत्यक्ष क्रांतीला सुरुवात झाली नव्हती. जालंधरला विद्यालयीन शिक्षण घेताना तिथल्या तत्कालीन मुख्याध्यापिका शन्नो देवी आणि आधीच्या मुख्याध्यापिका लज्जावती ह्या स्वत: क्रांतिकारक विचारांच्या होत्या. त्यामुळे अभ्यासाबरोबरच क्रांतीचे पाठसुद्धा सहज गिरवले गेले.
 
 
vivek

 सोनाली तेलंग

देहरादून येथे एका हिंदी साहित्य परिषदेसाठी त्या आपल्या महाविद्यालयातर्फे गेल्या होत्या. तिथे लाहोरच्या क्रांतिकारक गटाशी त्यांची भेट झाली. पुढे कालांतराने त्या भगवतीचरण व्होरा आणि दुर्गादेवी व्होरा ह्यांच्या संपर्कात आल्या आणि एका क्रांतिकारक संघटनेचा भाग झाल्या. इथून त्यांच्या आयुष्याने वेगळं वळण घेतलं.
 
 
 
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात काकोरी रेल्वे लूट ही एक मोठी घटना होती. त्या क्रांतिकारकांना जेव्हा फाशी सुनावण्यात आली, तेव्हा सुशीला दीदींना त्यांच्या देशप्रेमाने आणि कर्तव्याने स्वस्थ बसू दिलं नाही. आता त्यांनी पूर्णवेळ स्वातंत्र्यचळवळीत जीव ओतून काम करायचं ठरवलं. एका स्त्रीला सगळ्यात जवळची गोष्ट म्हणजे तिचे दागिने. ह्या घटनेच्या वकिली कामासाठी त्यांनी आपल्या सोन्याच्या बांगड्या सहज देऊन टाकल्या. आपल्या मुलीचं इंग्रजांविरुद्ध बंड आपल्या नोकरीसाठी धोकादायक ठरू शकणार होतं, पण आपल्या वडिलांच्या ह्या विरोधाला न जुमानता त्या घराबाहेर पडल्या आणि दोन वर्षं आपल्या घरी परतल्या नाही. दोन वर्षांनंतर तेव्हाच परतल्या, जेव्हा त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपल्या सरकारी नोकरीला रामराम ठोकला आणि पूर्णवेळ स्वातंत्र्यचळवळीचं काम सुरू केलं.
 
 
 
आपल्या मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून 1928 साली सुशीला दीदी कलकत्त्याला एक छोटीशी नोकरी करण्यासाठी आल्या. साँडर्स आणि स्कॉर्ट ह्यांच्या हत्येनंतर क्रांतिकारक भगतसिंग आणि दुर्गाभाभी दोघेही लाहोर सोडून कलकत्त्याला आले. सुशीला देवींनी तेव्हा त्यांच्या भूमिगत राहण्याची व्यवस्था केली. आपल्या कलकत्त्याच्या निवास काळात त्यांनी क्रांतिकारक महिलांचं संघटन केलं, ज्याचं नेतृत्व सुभाष चंद्र बोस करत होते. त्याअंतर्गत त्यांनी सायमन कमिशनला जोरदार विरोध केला. भगतसिंग ह्यांच्यावरील खटल्यासाठी पैसे गोळा करायचं कामसुद्धा ह्या संघटनेने केलं.
 
 

vivek
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या फाशीनंतर HSRAचे
नेतृत्व सुशीला देवींनी स्वीकारले
 
दिल्ली बाँबहल्ल्यानंतर भगतसिंग आणि इतर मोठे क्रांतिकारक अटकेत होते, त्याच वेळी व्हाइसरॉय इर्विन ह्यांना मारण्याचा कट रचला गेला. त्यांच्या प्रवासाची संपूर्ण माहिती काढायचं काम सुशीला दीदींनी पार पाडलं. त्या वेषांतर करून युरोपियन स्त्री झाल्या आणि इर्विन ह्यांच्या प्रवासाचा बारीकसारीक तपशील गोळा केला. दुर्दैवाने ही योजना सफल होऊ शकली नाही. सुशीलादेवी आपली नोकरी सोडून एका शीख मुलाच्या वेषात लाहोरला दाखल झाल्या. भगतसिंगांना तुरुंग तोडून बाहेर काढायच्या कामात स्वत:ला जुंपून दिलं. हत्यारं गोळा करणं, पैसा जमा करणं, माहिती गोळा करणं, निरोप्याची कामं करणं अशी सगळी जय्यत तयारी केली. एका बाँब परीक्षणाच्या वेळी दुर्दैवाने भगवतीचरण व्होरांना वीरमरण आलं आणि ही योजना थांबवावी लागली.
 
 
 
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव ह्यांच्या फाशीनंतर, तसंच चंद्रशेखर आझाद ह्यांच्या मृत्यूनंतर HSRAला (Hindustan Socialist Republican Associationला) मोठा झटका बसला, पण सुशीला देवींनी आपल्याकडे नेतृत्व घेतलं आणि अनेक क्रांतिकारक योजना करत राहिल्या. त्यांना अटक झाली, पण दिल्ली पोलिसांकडे कुठलंही ठोस कारण नसल्यामुळे त्यांना सोडावं लागलं. नंतर वकील श्याम मोहन ह्यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1942 सालच्या भारत छोडो आंदोलनातसुद्धा त्यांनी आणि त्यांच्या पतीने सक्रिय सहभाग नोंदवला. त्यात त्यांना 6 महिन्यांचा सश्रम कारावास झाला. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सुशीला देवींनी स्वत:ला समाजकार्यात लोटून दिलं. हस्तकला शाळा उघडून महिलांना त्यात निपुण करणं, त्यांना रोजगार मिळवून देणं, दलित वस्त्यांमध्ये काम करणं असं त्या शेवटच्या श्वासापर्यंत करत राहिल्या. त्यांनी देशसेवेचं जे व्रत हाती घेतलं होतं, त्याला 13 जानेवारी 1963 रोजी पूर्णविराम मिळाला.
 
 
 
आपलं नाव इतिहासाच्या गडद रंगात लपून जाईल किंवा अमर होईल ह्याची पर्वा न करता शेवटच्या श्वासापर्यंत घेतलेला ’वसा’ न उतता न मातता निभावणार्‍या ह्या देवीला समस्त भारतीयांकडून मानाचा मुजरा.
Powered By Sangraha 9.0