विध्वंसक बाँब हिमवादळ

विवेक मराठी    30-Dec-2022
Total Views |
@डॉ. श्रीकांत कार्लेकर । 9764769791
 
आर्क्टिक महासागरावरून येणार्‍या थंड हवेमुळे अमेरिका आणि कॅनडा या देशांना मोठा फटका बसला असून पाऊस, हिमवर्षाव आणि थंड वारे यामुळे सगळे जीवन विसकळीत झाले आहे. खराब हवामानामुळे देशभरातील अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. एकट्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये, बाँब चक्रीवादळामुळे 181,000हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. व्हर्जिनियात आणि टेनेसीमध्ये तर परिस्थिती आणखीनच बिघडली होती. हिमाच्छादित रस्त्यांची स्थिती ओहायो राज्याच्या लोकांसाठी घातक ठरली होती. परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जात आहे.
 

america
 
अमेरिकेत बाँब चक्रीवादळ (Bomb cyclone) म्हणजेच ‘हिमवादळामुळे’मुळे लाखो लोक प्रभावित झाले आहेत. आर्क्टिक महासागरावरून येणार्‍या थंड हवेमुळे अमेरिका आणि कॅनडा या देशांना मोठा फटका बसला असून पाऊस, हिमवर्षाव आणि थंड वारे यामुळे सगळे जीवन विसकळीत झाले आहे.
 
 
अमेरिकेत पश्चिम न्यूयॉर्कमध्ये या हिमवादळामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अमेरिकेत ठिकठिकाणी अन्य 25 मृत्यूंची नोंद झाली आहे. पश्चिम न्यूयॉर्कमध्ये मंगळवारी - म्हणजे 27 डिसेंबर 2022 रोजी नऊ इंच हिमवर्षाव होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला होता, त्याहीपेक्षा तो जास्त झाला आहे. या हिमवर्षावामुळे रस्त्यात अनेक लोक त्यांच्या कारमध्येच अडकून पडले होते. अमेरिकेत आत्तापर्यंत 3500पेक्षा जास्त विमान उड्डाणे रद्द करावी लागली होती.
 
 
यंदा आर्क्टिकवरून येणारी थंड हवा मेक्सिकोच्या खाडीवरून उष्णकटिबंधीय हवेमध्ये विलीन झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. बाँब चक्रीवादळ (bombogenesis) हे हिम चक्रीवादळ आहे. त्याला बाँबोजेनेसिस (Bomb cyclone) असेही म्हणतात. हे वेगाने विकसित होणारे वादळ आहे. 24 तासांत वातावरणाचा दाब किमान 24 मिलीबारने कमी झाल्यास हे वादळ येते. बाँब चक्रीवादळाबाबत शास्त्रज्ञांचा असा ठाम विश्वास आहे की बाँब चक्रीवादळ हे वेगाने वाढणारे वादळ आहे, ज्याच्या आगमनानंतर 24 तासांच्या आत हवेचा दाब सुमारे 20 मिलीबार किंवा त्याहून अधिक कमी होतो. जेव्हा ऊबदार हवेचे वायुपुंज थंड हवेच्या वायुपुंज्यांशी टक्कर देतात, तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते.
 
 
america
 
अत्यंत कमी वेळात हवेचा कमी दाब तयार होणारी स्थिती निर्माण होणे याला बाँब सायक्लोनची स्थिती असे म्हटले जाते. बाँब सायक्लोन सामान्य हिमवादळही असू शकते किंवा ते उष्णकटिबंधीय वादळही असू शकते.
 
 
 
सामान्यपणे वादळे ही समुद्रावर होतात. पण बाँब सायक्लोन वादळे जमिनीवरही प्रवेश करू शकतात किंवा किनार्‍याला धडकू शकतात. ती अत्यंत विध्वंसक असतात. या वेळी पाऊस आणि जोरदार वारे यामुळे हवेची दृश्यमानता कमी होते. ही स्थिती बाँब फुटल्यासारखीच असते, म्हणूनही यांना बाँब सायक्लोन असे म्हटले जाते.
 
 
 
बाँब चक्रीवादळ (Bomb cyclone) हा शब्द पहिल्यांदा 1940च्या सुमारास वापरला गेला. उन्हाळ्याव्यतिरिक्त व चक्रीवादळाच्या नेहमीच्या हंगामात न येणार्‍या या वादळांची तीव्रता प्रभावीपणे सांगण्यासाठी हा शब्दप्रयोग केला गेला. कमी दाब विकसित होण्याच्या प्रवेग दराचा (Velocity rateचा) परिणाम असणार्‍या बाँबोजेनेसिस (bombogenesis) प्रक्रियेतून अशी वादळे तयार होतात. बाँब चक्रीवादळ सामान्यत: फक्त हिवाळ्यातच येते, पण हिवाळ्याव्यतिरिक्त इतर ऋतूतही ते येऊ शकते. पूर्व युनायटेड स्टेट्स, युरोप आणि आशिया यांसारख्या प्रदेशात मध्य-अक्षांशांमध्ये बाँब चक्रीवादळ हा प्रकार सर्वात सामान्य वादळ प्रकार आहे.
 
 

america
 
या वर्षी अमेरिकेत ख्रिसमसच्या सुट्टीत लोक मजा करण्याचा विचार करत होते, परंतु या बर्फाच्या भयंकर वादळामुळे त्यांना घरातच राहावे लागले. उपलब्ध माहितीनुसार बाँब चक्रीवादळामुळे 14 लाखांहून अधिक घरांची वीज गेली. तसेच थंडी आणि तापमानात झालेली घट यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला. वादळामुळे झाडे उन्मळून वीज तारांवर पडली आणि त्यामुळे वीजप्रसारणावरही मोठा परिणाम झाला.
 
 
 
 
अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्य मोंटानामध्ये किमान तापमान -45 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते. या चक्रीवादळामुळे अमेरिकेच्या मध्यवर्ती राज्यांच्या तापमानातही घट नोंदवण्यात आली. नॅशनल वेदर सर्व्हिसने नोंदवले की डेस मोइन्स, आयोवा येथे तापमान -38 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले होते, ज्यामुळे 5 मिनिटांपेक्षा कमी वेळेत हिमबाधा होऊ शकते. म्हणजे एखादी व्यक्ती खुल्या हवेच्या संपर्कात आली, तर ती हवा त्या व्यक्तीला 5 मिनिटांत गोठवू शकते. यामुळे त्या व्यक्तीची बाह्य त्वचा मृत होऊ शकते.
 
 
 
मिनेसोटा, आयोवा, विस्कॉन्सिन व मिशिगनचा जवळपास सर्वच भाग दाट हिमाच्छादित झाला होता. ईशान्येकडील अनेक राज्यांत बर्फ वितळून अचानक पूर आला. नागरिकांना हिवाळ्यातील वादळाचा इशारा देण्यात आला होता. तसेच उपायही सुचवले होते. हवामानतज्ज्ञांनी सांगितले की या कडाक्याच्या थंडीत कोणीही बाहेर पडल्यास त्याला काही मिनिटांतच ‘हिमबाधा’ होण्याचा धोका असतो. खराब हवामानामुळे देशभरातील अनेक उड्डाणे रद्द करावी लागली. एकट्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये, बाँब चक्रीवादळामुळे 181,000हून अधिक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. व्हर्जिनियात आणि टेनेसीमध्ये तर परिस्थिती आणखीनच बिघडली होती. हिमाच्छादित रस्त्यांची स्थिती ओहायो राज्याच्या लोकांसाठी घातक ठरली होती. परिस्थिती सामान्य होईपर्यंत लोकांना घरातच राहण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जात होते. न्यूयॉर्कच्या गव्हर्नरने तर शहरात आणीबाणीची स्थिती जाहीर केली, कारण तापमान -45 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे तेथील थंडी असह्य झाली होती.
 
 
america
 
हवेचा सामान्य दाब सुमारे 1010 मिलीबार असतो. परंतु अमेरिकेत हा वातावरणाचा दाब 1003 मिलीबारवरून 968 मिलीबारपर्यंत घसरला. हा दाब जेवढा कमी होईल, तितकेच मोठे हिमवादळ निर्माण होते. अमेरिकेत हा दाब 35 मिलीबारने घटला होता. त्यामुळे अतिशय कमी वेळात वेगाने या वादळाची तीव्रता वाढली. हवामानतज्ज्ञ याला ‘विस्फोटक बाँबोजेनेसिस’ म्हणतात. परंतु हवेचा हा दाब घटण्याची इतरही अनेक कारणे असतात.
 
 
इतर वादळांप्रमाणेच, भिन्न तापमानाच्या वायुपुंजक्यांची (Air massची) धडक झाल्याने ‘बाँब चक्रीवादळ’ निर्माण होते. जेव्हा थंड व कोरडी हवा उत्तरेकडून खाली सरकते व उष्ण कटिबंधातून येणारी उष्ण व दमट हवा वरच्या दिशेने सरकते, तेव्हा उष्ण हवा झपाट्याने वाढून, दमटपणामुळे ढग तयार होतात. त्यामुळे हवेचा दाब घटतो. त्यामुळे या कमी दाबाच्या केंद्राभोवती घड्याळाच्या उलट दिशेने फिरणारे वादळ (Anticyclone) विकसित होते. उष्ण वारे मोठ्या प्रमाणात या वादळाच्या परिभ्रमणात खेचले जाऊन वर्तुळाकार पद्धतीने फिरून वरच्या दिशेने बाहेर पडतात. जेव्हा हे वारे चक्रवातात आत खेचले जाण्याऐवजी अधिक प्रमाणात बाहेर पडतात, तेव्हा हवेचा दाब आणखी घटतो. विशेषत: उत्तर ध्रुवीय वार्‍यांचे पुंजके हे सध्या अमेरिकेत येत असलेल्या या वार्‍यांप्रमाणे थंड असतील (उदाहरणार्थ - 23 डिसेंबर रोजी मोंटानाचे तापमान उणे 45 अंशापर्यंत घसरले होते), तर हवेतील तापमानातील हा फरक या प्रक्रियेला पोषक ठरतो अन वादळ जलद गतीने प्रबळ होत जाते.
 
 
 
 
कॅलिफोर्निया विद्यापीठातील हवामानशास्त्रज्ञ डॅनियल स्वेन यांनी सांगितले की, ‘बाँब चक्रीवादळे’ ही संपूर्णपणे नेहमीच्या चक्रीवादळांप्रमाणे नसतात. बाँब चक्रीवादळांत चक्रीवादळांसारखी वैशिष्ट्ये असू शकतात. अतिवेगवान वारे, मुसळधार पाऊस आदी वैशिष्ट्ये या वादळांतही आढळतात. नेहमीची चक्रीवादळे सामान्यत: उष्णकटिबंधीय भागात निर्माण होतात. त्यासाठी सागरातील तुलनेने उष्ण पाणी पोषक ठरते. म्हणूनच अमेरिकेत जेव्हा उन्हाळ्यात किंवा शरद ऋतूच्या प्रारंभी समुद्राचे पाणी जास्त उष्ण असते, तेव्हा चक्रीवादळे निर्माण होतात. मात्र, याउलट बाँब चक्रीवादळांना अशा उष्ण सागरी पाण्याची गरज भासत नाही. ही वादळे सागरासह भूप्रदेशावरही निर्माण होतात. सामान्यत: ही वादळे शरद ऋतूच्या अखेरीस किंवा वसंत ऋतूच्या प्रारंभी येतात. या काळात उष्णकटिबंधीय वार्‍यांचा ‘आर्क्टिक’ प्रदेशातून येणार्‍या थंड हवेशी संपर्क आल्यावर ही बाँब चक्रीवादळे तयार होतात.
 
 
 
बाँब चक्रीवादळांमुळे मुसळधार पावसाची किंवा हिमवृष्टीची, किनारपट्टीवर पुराची शक्यता असते. तसेच ते वार्‍याचे प्रबळ झोत निर्माण करतात. इतर शक्तिशाली वादळांप्रमाणेच या वादळांचा प्रभाव असतो. मात्र, ‘बाँब चक्रीवादळे’ खूप कमी वेळात शक्तिशाली बनतात. त्यांच्या या वेगवान आगमनाने नागरिकांना प्रतिबंधक उपाययोजना करण्यास किंवा आश्रय घेण्यास फारशी उसंत मिळत नाही. हाच या वादळांचा सर्वांत मोठा धोका आहे. या वर्षी अमेरिकेतील ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात धडकलेल्या एका बाँब चक्रीवादळाने तब्बल दोन फुटापर्यंत हिमवृष्टी केली होती. 2019मध्ये पॅसिफिक नॉर्थवेस्ट भागात आलेल्या अशाच एका वादळात वार्‍यांचा वेग प्रतितास 170 कि.मी. होता.
 
 
अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान सेवेने (NWSने) व्यक्त केलेल्या अंदाजानुसार अमेरिकेच्या काही भागांत या सप्ताहाच्या अखेरपर्यंत उणे 45 ते उणे 56 अंश सेल्सियस तापमानापर्यंत पारा घसरण्याची आणि वादळ तीव्र होण्याची शक्यता आहे!