नेत्रदीपक यश, नामुश्कीजनक पतन!

30 Dec 2022 17:36:50
@राहुल गोखले। 9822828819
कोचर दांपत्य आणि धूत यांना सीबीआयने अटक केल्याने अधिक कसून चौकशी होईल आणि कदाचित या धूत-कोचर संगनमतातील आणखी सत्ये बाहेर येतील. न्यायालयात आता हे प्रकरण चालेल, यात शंका नाही. तपासाअंती काय सत्य बाहेर येते आणि न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे. तूर्तास या प्रकरणातील ज्या बाबी बाहेर आल्या आहेत, त्या मात्र गंभीर आहेत हे खरेच. यशाची आस असण्यात गैर काही नाही. मात्र त्याचा कैफ चढला की योग्य-अयोग्य, भले-बुरे यांच्यातील सीमारेषेचे भान राहत नाही. त्यातून अधिकार, सत्ता यांचाही उन्माद येतो आणि आपले सर्व गैरव्यवहार आणि गैरप्रकार हे त्या अधिकाराच्या आड दडपून जातील असा फाजील आत्मविश्वास निर्माण होतो. याचे पर्यवसान अखेरीस शिखरावरून होणार्‍या पतनातच होत असते.

ICI
 
आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर, त्यांचे पती दीपक आणि त्यापाठोपाठ व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयने नुकत्याच केलेल्या अटकेने केवळ बँक कर्ज घोटाळाच उघडकीस आला आहे असे नाही, तर विश्वस्ताची भूमिका बजावावी अशी अपेक्षा असणार्‍यांची नैतिकता आणि सचोटी किती तकलादू असते, याचाही प्रत्यय आला आहे. कोचर आणि धूत या दोघांनी आपापल्या क्षेत्रांत केलेली घोडदौड असंख्यांसाठी प्रेरणादायक होती. मात्र आता त्याच कथित प्रेरणा धाराशायी पडत असताना एकीकडे व्यवस्था आणि प्रक्रिया या अधिक पारदर्शक होण्याची, त्या व्यवस्थांवर देखरेख ठेवणार्‍या यंत्रणा अधिक सक्षम होण्याची गरज अधोरेखित होत आहेच, त्याचबरोबर दुसरीकडे उच्चपदस्थांपाशी नैतिकतेचे मूल्य असणे किती अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे, हेही स्पष्ट होत आहे. ज्या घोटाळ्यात सीबीआयने ही कारवाई केली आहे, त्यात बँक कर्ज घोटाळा हा गाभा आहे हे खरेच; मात्र मुळात असा घोटाळा करण्यामागे हव्यास हेही कारण आहे, हे दडलेले नाही. साध्याइतकाच साधनाचा विवेकदेखील महत्त्वाचा असतो, याकडे या प्रकरणाने पुन्हा एकदा अंगुलिनिर्देश केला आहे.
 
 
 
वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेले स्थान कोणालाही हेवा वाटावा असेच होते. राजस्थानच्या जोधपूर येथे जन्मलेल्या चंदा कोचर यांनी वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि 1984 साली त्या आयसीआयसीआय बँकेत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झाल्या. मात्र त्यांची कामगिरी अशी होती की बँकेच्या कोअर समितीच्या त्या सदस्य बनल्या. बँक प्रस्थापित करण्याची जबाबदारी या समितीकडे होती. कोचर त्यात सक्रिय होत्या आणि त्यामुळे त्यांना एकेक बढत्या मिळत गेल्या. 1998 साली कोचर या बँकेच्या सरव्यवस्थापकपदी नियुक्त झाल्या. बँकेच्या सर्वांत मोठ्या 200 ग्राहक कंपन्यांशी त्यांचा संबंध येत असे. 2007 ते 2009 या काळात त्या आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी होत्या आणि 2009 साली त्या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक झाल्या, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारिपददेखील त्यांच्याकडे आले. एकीकडे आयसीआयसीआय बँकेचा विस्तार होत असताना कोचर यांना जगभरातून बँकेचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळण्यासाठी मान्यता मिळत होती, त्यांना वाखाणले जात होते. सन्माननीय डी.लिट. देऊन कोचर यांना गौरविण्यात येत होते. 2011 साली त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. फोर्ब्सच्या सामर्थ्यवान महिलांच्या यादीत त्या सात वेळा झळकल्या आणि टाइम मासिकाच्या शंभर सामर्थ्यशाली महिलांच्या सूचीत त्यांनी 2015 साली स्थान पटकावले. तेव्हा ही सगळी वाटचाल या क्षेत्रात येऊ किंवा काम करू इच्छिणार्‍यांसाठी प्रेरणा देणारीच होती, यात शंका नाही.
 
 
ICI
 
धूत यांचीही घोडदौड अशीच प्रशंसेस पात्र ठरणारी होती. 1970च्या दशकात धूत यांच्या औद्योगिक साम्राज्याची पायाभरणी झाली. बजाज ऑटोच्या उत्पादनांचे वितरण करण्यापासून धूत यांनी सुरुवात केली. 1983 सालच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेने भारतात टीव्ही संचांच्या विक्रीला चालना मिळाली आणि धूत यांच्या व्हिडिओकॉनने त्यात उडी घेतली. 1985 साली व्हिडिओकॉनने टीव्ही उत्पादन प्रकल्प सुरू केला. भारतात रंगीत दूरचित्रवाणी संच पहिल्यांदा आणण्याचे श्रेयदेखील व्हिडिओकॉनकडेच जाते. नंदलाल माधवलाल धूत यांनी वर्षाला एक लाख रंगीत दूरचित्रवाणी संच उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले. वेणुगोपाल हे नंदलाल यांचे पुत्र. अभियांत्रिकी शाखेतून पदवीचे शिक्षण घेतलेले वेणुगोपाल धूत यांनी व्हिडिओकॉन समूहाला नवे आयाम दिले. मेक्सिको, इटली, पोलंड इत्यादी देशांत व्हिडिओकॉनची केंद्रे सुरू झाली. फोर्ब्सने भारतातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत वेणुगोपाल धूत यांचा समावेश केला होता. 2015 सालच्या यादीत ते 1.19 अब्ज डॉलर्स मालमत्तेसह 61व्या स्थानावर होते. मात्र कोचर काय किंवा धूत काय, दोघांच्या नावाला प्रतिष्ठेचे वलय असले, तरी त्यांच्या आर्थिक गैरव्यवहारांना तोंड फुटलेच आणि गेल्या काही वर्षांत याबद्दलच्या तपासाला वेग आला. यशस्वी असलेल्या कोचर आणि धूत यांच्या पतनाला सात-एक वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती. कदाचित याचे परिणाम काय होणार याचा अंदाज आल्याने कोचर यांनी आपल्यावरील संभाव्य कारवाई टाळण्यासाठी पळवाटदेखील काढून पाहिली. तथापि आता सीबीआयने कोचर दांपत्य आणि वेणुगोपाल धूत यांना अटक केल्याने आणि त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होणार असल्याने या प्रकरणाची तड आता लागेल, अशी अपेक्षा आहे.
 
 
 
परस्परांचे आर्थिक हितसंबंध जपताना आपल्या पदाचा, आपल्यापाशी असणार्‍या अधिकारांचा कसा गैरवापर केला जातो, याचे हे संपूर्ण प्रकरण म्हणजे एक जळजळीत उदाहरण आहे. चंदा कोचर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर सात वर्षांनी त्यांना अटक झाली आहे. कोचर दांपत्य आणि धूत यांनी परस्परांना आर्थिक लाभ होईल अशा क्लृप्त्या केल्या; मात्र त्यात बँकेचे नुकसान झालेच, शिवाय अधिकारांचे, बँकिंग नियमांचे आणि कायद्यांचे उल्लंघन झाले. वेणुगोपाल धूत यांचा वारू जोरदार धावत होता, तेव्हाच एका अर्थाने या घोटाळ्याचीदेखील बीजे पेरली गेली असेच म्हटले पाहिजे. मोबाइल हँडसेटच्या क्षेत्रात व्हिडिओकॉनने 2009च्या सुमारास पाऊल टाकले. मात्र तत्पूर्वीपासूनच धूत यांची यशस्वी वाटचाल सुरू होती. 1994पासून त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत आपली गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. आंध्र प्रदेशातील रेवा ऑइलफील्ड्समध्ये त्यांनी 25 टक्के भागीदारी विकत घेतली. भारताने 1990च्या दशकात आर्थिक उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात येऊ लागल्या. त्यात सॅमसंग, एलजी इत्यादी कंपन्या होत्या, तरीही व्हिडिओकॉनचे स्थान अबाधित होते. विशेषत: दूरचित्रवाणी संच आणि वॉशिंग मशीन या प्रकारांत व्हिडिओकॉनचे स्थान अव्वल होते आणि ग्राहकांची पसंतीदेखील व्हिडिओकॉनच्या उत्पादनांना होती. केल्व्हिनेटरसारखे काही ’ब्रँड’ अधिग्रहित करून व्हिडिओकॉनने बाजारपेठेत आपला दबदबा वाढविला. मोबाइल हँडसेटच्या क्षेत्रात त्यामुळेच व्हिडिओकॉनला ग्राहकांच्या पसंतीचा आणि विश्वासाचा लाभही झाला. तथापि याच विश्वासाला तडे जायला याच काळात सुरुवात झाली होती, असे सीबीआयच्या तपासानुसार आता दिसते.
 
 

ICI
 
व्हिडिओकॉनचा पसारा वाढत असला, तरी त्यासाठी आयसीआयसीआय बँकेकडून घेतलेल्या प्रचंड कर्जांमागे ते कर्ज देणार्‍याचाही लाभ करून देण्याचा कावा होता, असे दिसते. किंबहुना धूत आणि कोचर यांनी बँकेचा पैसा आणि तोही कर्जापोटी मिळालेला पैसा आपापल्या आर्थिक लाभासाठी कसा वापरला, याचे हे प्रकरण आर्थिक यशामागील नैतिकतेच्या अभावाचे विद्रूप दर्शन घडविते. न्युपॉवर रिन्यूएबल्स लिमिटेड (एनआरएल) या कंपनीची स्थापना 2008 साली झाली आणि त्या कंपनीत वेणुगोपाल धूत आणि सौरभ धूत यांच्याबरोबरच चंदा कोचर यांचे पती दीपक हेही संचालक मंडळावर होते. या सगळ्यांच्या आणि चंदा कोचर यांच्या संगनमताने बँकेच्या पैशाची अफरातफर करण्यात आली, असा आरोप आहे. सुमारे वर्षभरानंतर धूत यांनी एनआरएलच्या संचालकपदाचा राजीनामा दिला, मात्र त्याबदल्यात दीपक कोचर यांना लाभ करून दिला आणि आपले समभाग मात्र सुप्रीम एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या स्वत:च 2008 साली स्थापन केलेल्या कंपनीत स्थानांतरित केले. दीपक कोचर यांनीही कालांतराने आपले एनआरएलमधील समभाग सुप्रीममध्ये स्थानांतरित केले. साहजिकच सुप्रीम या कंपनीकडे एनआरएलची मालकी आली. मात्र धूत यांनी येथूनही राजीनामा दिला आणि आपले समभाग पिनॅकल या कंपनीत स्थानांतरित केले. ही कंपनी कोचर यांची होती. परिणामत: धूत यांनी एनआरएलमध्ये केलेल्या 64 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची मालकी अखेरीस दीपक कोचर यांच्याकडे आली. हा सगळा योगायोग नव्हे, तर हेतुपुरस्सर केलेले सगळे व्यवहार होते. अर्थात धूत यांनी कोचर यांना मिळवून दिलेले 64 कोटी रुपये हे काही दातृत्वाच्या भावनेतून नव्हते. त्याबदल्यात त्यांना आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटींची कर्जे मिळाली आणि ज्या काळात चंदा कोचर यांच्याकडेच आयसीआयसीआय बँकेचे नेतृत्व होते, त्याच काळात त्यापैकी मोठी कर्जे धूत यांना मंजूर झाली. आयसीआयसीआय बँकेकडून जी कर्जे देण्यात आली, त्यांची परतफेड धूत यांनी केली नाही. असे गुन्हे उघडकीस येण्यास वेळ लागतो. मात्र कधीतरी त्यांस वाचा फुटतेच. धूत यांना देण्यात आलेल्या कर्जाची परतफेड झाली नाही, तेव्हा हा विषय चव्हाट्यावर आला. कर्जाची रक्कम परत न आल्याने बँकेच्या अनुत्पादक मालमत्तेत (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट्समध्ये - एनपीएमध्ये)त्यांची गणना झाली.
 
 
 
गुन्ह्याला एकदा वाचा फुटू लागली की संबंधित अनेक गैरव्यवहार उघडकीस येण्याचे पेवच फुटते. या बाबतीतदेखील तेच झाले. व्हिडिओकॉनचा बाजारपेठेतील दबदबा कमी होत होता. विशेषत: 2-जी घोटाळ्यानंतर व्हिडिओकॉनला बराच फटका बसला होताच. पण आयसीआयसीआय बँक कर्ज प्रकरणामुळे धूतदेखील अडचणीत येऊ लागले होते. चंदा कोचर यांच्याभोवतीदेखील संशयाचे ढग गडद होऊ लागले होते. व्हिडिओकॉन उद्योग समूहातील कंपन्यांना 3250 कोटींची कर्जे मिळण्यात कोचर यांचा वाटा होता, हे उघड होऊ लागले आणि कोचर यांच्यावर आपल्या अधिकारांच्या गैरवापराचे आरोप होऊ लागले. वास्तविक ही कर्जे 2012च्या सुमारास देण्यात आली, मात्र 2017पर्यंत ती ‘एनपीए’मध्ये गेल्याने त्यावर चर्चा सुरू झाली. त्यातच याही माहितीची भर पडली की आयसीआयसीआय बँकेची सर्वाधिक ‘एनपीए’ ही बँकेचे नेतृत्व कोचर यांच्याकडे असतानाच्या काळातच झाली आहेत. तेव्हा बहुधा परिणामांचा अंदाज आल्याने असेल, पण चंदा कोचर यांनी 2018 साली दीर्घ रजेवर जाण्याचा प्रस्ताव बँकेला दिला आणि मुदतपूर्व निवृत्तीसाठी अर्ज केला. मात्र बँकेला या सगळ्याची दखल घ्यावीच लागली आणि या सगळ्या प्रकरणाची, 2009 ते 2018 या काळातील व्यवहारांची चौकशी आणि तपास करण्यासाठी बँकेने 2018 सालच्या मध्यात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती श्रीकृष्ण यांची समिती नेमली. या समितीने कोचर यांच्यावर ताशेरे ओढले. चंदा कोचर यांनी वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी बँकेच्या आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले, कायदे आणि नियम धाब्यावर बसविले, रिझर्व्ह बँकेचे नियम पायदळी तुडविले असा ठपका ठेवला. हे आरोप गंभीर होते आणि साहजिकच कोचर यांनी राजीनामा दिला असला, तरी त्याऐवजी त्यांना बडतर्फ करून त्यांना निवृत्तीपोटी आणि त्यांच्या कारकिर्दीच्या काळातील आर्थिक लाभ मिळू नयेत, असा बँकेने निर्णय घेतला. दंडविधानातील तरतुदींच्या अनुषंगाने सीबीआय या सगळ्या प्रकरणाचा तपास करीत होतीच. श्रीकृष्ण समितीच्या या अहवालामुळे आपल्याला धक्का बसला आहे असे सांगत चंदा कोचर यांनी आपल्याला बडतर्फ करण्याच्या निर्णयाला - म्हणजेच अप्रत्यक्षपणे श्रीकृष्ण समितीच्या अहवालाला न्यायालयात आव्हान दिले. मात्र तेथेही कोचर यांच्या पदरी निराशाच आली, याचे कारण कोचर यांच्याकडून प्रमादच तसा घडलेला होता.
 
 
 
एकीकडे व्हिडिओकॉनची घसरण सुरू होती आणि दुसरीकडे आयसीआयसीआय बँकेचे नेतृत्व केलेल्या चंदा कोचर याही एकामागून एक अडचणीत सापडत होत्या. धूत यांनी केलेल्या विविध गुंतवणुकीचा परतावा अपेक्षाभंग करणारा होता. हजारो कोटींची कर्जे आणि महसूल मात्र त्या प्रमाणात नाही, अशा व्यस्त प्रमाणातील या गणितामुळे व्हिडिओकॉनची अधोगती होऊ लागली. त्यातच आयसीआयसीआय बँक कर्ज प्रकरणाचा तपास सुरू झाल्याने धूतदेखील संशयाचा भोवर्‍यात सापडले. आर्थिक वर्ष 2022मध्ये आयसीआयसीआय बँकेने तब्बल 42 हजार कोटींची कर्जे निर्लेखित (राइट ऑफ) केली आहेत, अशी माहिती नुकतीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत दिली. बँकेच्या या स्थितीत कोचर यांचाही वाटा आहे हे नाकारता येणार नाही. सीबीआयने धूत आणि कोचर दांपत्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला होताच. सक्तवसुली संचालनालयाने (ईडीने)देखील तपास चालविला आहे आणि त्याच संदर्भात गेल्या महिन्यात ईडीने धूत यांची चौकशी केली होती. ईडीच्या तपासातून अनेक खळबळजनक सत्ये बाहेर येत आहेत. व्हिडिओकॉन समूहाच्या मालकीच्या सदनिकेत कोचर वास्तव्याला होत्या इत्यादी माहिती बाहेर येत आहे. कोचर यांनी अनेक बाबी आयसीआयसीआय बँकेपासून दडवून ठेवल्या, हेही स्पष्ट होत आहे.
 
 
 
आता कोचर दांपत्य आणि धूत यांना सीबीआयने अटक केल्याने अधिक कसून चौकशी होईल आणि कदाचित या धूत-कोचर संगनमतातील आणखी सत्ये बाहेर येतील. न्यायालयात आता हे प्रकरण चालेल, यात शंका नाही. धूत यांनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शविली आहे, अशीही वृत्ते आहेत. अर्थात अशा वावड्या उठत राहतात. मात्र तपासाअंती काय सत्य बाहेर येते आणि न्यायालय काय निर्णय देते, हे पाहणे महत्त्वाचे. तूर्तास या प्रकरणातील ज्या बाबी बाहेर आल्या आहेत, त्या मात्र गंभीर आहेत हे खरेच. यशाची आस असण्यात गैर काही नाही. मात्र त्याचा कैफ चढला की योग्य-अयोग्य, भले-बुरे यांच्यातील सीमारेषेचे भान राहत नाही. त्यातून अधिकार, सत्ता यांचाही उन्माद येतो आणि आपले सर्व गैरव्यवहार आणि गैरप्रकार हे त्या अधिकाराच्या आड दडपून जातील असा फाजील आत्मविश्वास निर्माण होतो. याचे पर्यवसान अखेरीस शिखरावरून होणार्‍या पतनातच होत असते. धूत काय किंवा कोचर काय, त्यांच्या नेत्रदीपक यशाची परिणती अशा नामुश्कीजनक पतनात होईल अशी अपेक्षा कोणीही केली नसेल.
 
 
Powered By Sangraha 9.0