जगातला मोठा लोकशाही देश असलेल्या भारताला कोविडसारखी महामारी हाताळण्यात आलेले यश आणि देशाभोवती पोलादी भिंती उभारलेल्या कम्युनिस्ट चीनला कोविडशी मुकाबला करण्यात आलेले अपयश.. हे दोन्ही जगासमोर आहे. आता ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकारामुळेे - व्हेरिएंटमुळे चीनमध्ये जी घबराट पसरली आहे, त्या पार्श्वभूमीवर भारत-चीनने केलेली कोविडची हाताळणी पुन्हा एकदा चर्चेचा विषय होत आहे.
आत्ता चीनमध्ये ओमायक्रॉनच्या ज्या नव्या व्हेरिएंटमुळे घबराट निर्माण झाली आहे, त्याला त्याचा संसर्गाचा वेग आणि प्राणघातक ठरण्याची त्याची शक्यता यापेक्षाही कारणीभूत आहे ते चीनमध्ये निरुपयोगी ठरलेले लसीकरण व चिनी सरकारची झिरो कोविड पॉलिसी. चीनने सगळ्यात आधी कोविडवरची लस तयार केली. त्याला जागतिक आरोग्य संघटनेने तत्परतेने मान्यताही दिली. असे असले, तरी ती लस अतिशय निकृष्ट दर्जाची होती, हे आता सिद्ध झाले आहे. देशांतर्गत तयार झालेली लस परिणामकारक ठरत नसतानाही चीनच्या राज्यकर्त्यांनी बाहेरील देशांमधून लस मागवली नाही. परिणामी कोरोनाशी लढण्याची क्षमता नागरिकांमध्ये विकसितच झाली नाही. राज्यकर्त्यांचा हा हटवादीपणा नागरिकांच्या जिवाशी खेळ ठरला.
याबरोबरच, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथे राबवण्यात आलेली झिरो कोविड पॉलिसी - अर्थात, लोकांच्या मिसळण्यावर घालण्यात आलेली बंदी. एका मर्यादेपर्यंत अशी गृहबंदी ही गरज होती. पण तो काही कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. आरोग्यदृष्ट्याही नाही आणि व्यावहारिकही नाही. तरीही चिनी राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ हे धोरण अवलंबले आणि त्यासाठी स्वत:ची पाठही थोपटून घेतली. वास्तविक समाजात असे मिसळण्यातून संसर्गजन्य आजाराशी लढण्याची समूहाची प्रतिकारशक्ती - ‘हर्ड इम्युनिटी’ विकसित होत असते. हेदेखील अप्रत्यक्षपणे होणारे लसीकरणच. पण चीनमध्ये मात्र झिरो कोविड पॉलिसीच्या हट्टापायी समूह प्रतिकारक्षमता विकसितच झाली नाही. त्याचाही परिणाम नागरिक भोगत आहेत.
या झिरो कोविड पॉलिसीने दीर्घकाळ घरात डांबल्या गेलेल्या चिनी नागरिकांनी या डिसेंबर महिन्यात राज्यकर्त्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर आवाज उठवला, निदर्शने केली, तेव्हा सरकारने निर्बंध शिथिल केले, मात्र तेही ओमायक्रॉनची नवी लाट उंबरठ्यावर असताना. तात्पर्य - कोविडच्या विषाणूपेक्षा गेल्या तीन वर्षांतले चिनी सरकारचे अविचारी निर्णयच त्या देशासाठी (आणि जगासाठीही) अधिक घातक ठरले आहेत. तीन वर्षांनंतर आत्ता कुठे जगाच्या अर्थव्यवस्थेचे गाडे रुळावर येत असताना हे आव्हान समोर उभे ठाकले आहे.
या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केला असता, आपल्याकडे काही काळासाठी लादण्यात आलेली गृहबंदी टप्प्याटप्प्याने हटवण्यात आली. त्यासाठी सरकारी पातळीवरून अतिशय विचारपूर्वक व कालबद्ध नियोजन करण्यात आले. ठप्प झालेले सामाजिक व्यवहार हळूहळू सुरू झाले आणि त्याचा फायदा समूह प्रतिकारशक्ती विकसित होण्यात झाला. म्हणूनच गतवर्षी जेव्हा कोविडचा ओमायक्रॉन हा व्हेरिएंट प्राणघातक ठरला, तेव्हा भारतीय नागरिक मात्र त्याचा मुकाबला करू शकले. याला जोड होती ती अतिशय प्रभावी लसनिर्मितीची आणि मोठ्या प्रमाणावर झालेल्या लसीकरणाची. त्यासाठी सरकारी पातळीवरून करण्यात आलेली जनजागृती हेदेखील उल्लेखनीय म्हणावे असे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे भारताने कोविडचा यशस्वी सामना केला. सरकारच्या अचूक नियोजनाला जनतेने दिलेला समंजस प्रतिसाद, यातून हे घडले.
आता आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाची गती पहिल्या व्हेरिएंट्सपेक्षा जास्त आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र तो किती प्राणघातक आहे, ते आत्ता लगेच ठरवता येणार नाही. तो चीनसाठी धोकादायक आहे म्हणून आपण घाबरून न जाता, आपण आवश्यक तेवढी दक्षता जरूर घेऊ. या वेळीही सरकारी धोरणांची समंजस पाठराखण करून आपली जबाबदारी पार पाडू. मात्र याला आणखी एक जोड लागेल, ती म्हणजे प्रसारमाध्यमांची आणि समाजमाध्यमांचीही. या विषयावर अतिशय जबाबदारीने वृत्तांकन केले जायला हवे. सगळ्यांच्या आधी बातमी देण्याच्या कैफात आपण खातरजमा करून घेत आहोत ना, याकडे लक्ष द्यावे. आपल्या देशाने आतापर्यंत कोविडशी अतिशय यशस्वी मुकाबला केला आहे, याची आठवण ठेवावी. आणि जनजागृतीच्या नावाखाली आपण समाजात घबराटीचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण करू नये. समाजमाध्यमांत प्रभाव असणार्यांनीही या विषयावर लिहिताना जबाबदारीने व्यक्त होणे गरजेचे.
आपली अफाट लोकसंख्या, त्याच्या व्यस्त प्रमाणात उपलब्ध असलेल्या सोईसुविधा या पार्श्वभूमीवर आतापर्यंत भारताने कोविडशी अतिशय उत्तम लढा दिला आहे. जगाने अभ्यास करावा, अनुकरण करावे असे काम आपण या विषयात केले आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
यापुढेही आपण या महामारीशी यशस्वी लढा देऊ इतका विश्वास या तीन वर्षांच्या लढ्याने दिला आहे. त्याला सर्व घटकांनी साथ दिली, तर यापुढील आव्हानेही यशस्वीपणे परतवून लावता येतील.