यात्रा उत्तरेकडील तीर्थक्षेत्रांची

16 Dec 2022 14:41:26
 @ विलास आराध्ये 
सा. विवेकच्या वतीने डिसेंबर 2021मध्ये ‘लोकनेता ते विश्वनेता’ हा मा. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र नीतीवर प्रकाश टाकणारा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला होता. या ग्रंथाची उल्लेखनीय नोंदणी करणार्‍या प्रतिनिधींसाठी अयोध्या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा 10 ते 17 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार म्हणून आम्हाला कळविले. मुंबईच्या ‘श्री दत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स’ यांनी या संपूर्ण यात्रेचे आयोजन केले होते. चित्रकूट-प्रयागराज-अयोध्या असा प्रवास ठरला होता. आमच्या सांगण्यावरून त्यात काशी आणि गया ही आणखी दोन ठिकाणे जोडली आणि 10 ऑक्टोबर रोजी सकाळी लोकमान्य टिळक टर्मिनसहून अयोध्या एक्स्प्रेसने आम्ही चित्रकूटकडे रवाना झालो.
 

yatra
  
11 ऑक्टोबर रोजी माणिकपूर येथे उतरून आम्ही चित्रकूट येथे पोहोचलो. मनात प्रचंड उत्साह होता. तशी माझी चित्रकूटला ही तिसरी भेट. श्रद्धेय नानाजी देशमुखांच्या प्रथम मासिक श्राद्धदिनी 1000 विवेक वाचकांसोबतची ती प्रथम भेट. प्रभू श्रीराम 14 वर्षांच्या वनवासकाळातील साडेअकरा वर्षे जेथे राहिले, तीच परमपावन भूमी चित्रकूट. स्नान, भोजन उरकल्यानंतर चित्रकूट दर्शनासाठी निघालो. अनेक पर्वत, वृक्षवेली आणि जंगल-नद्या यांमुळे ही भूमी नितांतसुंदर आणि रमणीय अशी दृष्टोत्पत्तीस पडते. सर्वप्रथम कामदगिरी पर्वताचे दर्शन घेतले. मंदिरात स्थित मूर्तींपैकी एक कामदनाथांची असून दुसरी प्रभू श्रीरामांची आहे. याच पर्वताच्या छत्रछायेखाली प्रभू श्रीरामांचे वास्तव्य होते. श्रीराम-भरतभेट येथेच घडली होती. गाइड माहिती देत होता, ती ऐकतच अनसूया मंदिरात पोहोचलो. तेथे वरुणराजाने हजेरी लावली. पावसात भिजत भिजत मंदिराचे दर्शन घेतले. अतिशय प्रसन्न वाटले. तेथून परतीच्या मार्गावर गुप्त गोदावरीचे दर्शन घेऊन नानाजी देशमुखांनी उभे केलेल्या दीनदयाळ शोध संस्थानच्या ठिकाणी पोहोचलो. 11 ऑक्टोबर हा नानाजींचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्या ठिकाणी एका भव्यदिव्य प्रदर्शनाचे आयोजन केले होते.
 

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.
संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.
सवलत मूल्य 160/- ₹

https://www.vivekprakashan.in/books/rss-spirit/

संध्याकाळचे सात वाजले होते. आम्ही प्रदर्शनाचे एकच दालन पाहिले, त्यालाच सुमारे अर्धा तास लागला. गंगा आरतीस उपस्थित राहिलो. रात्रीचे भोजन घेण्यासाठी मातुश्री जैदेवी आनन्दराम जैपुरिया स्मृती भवन, चित्रकूट पण उत्तर प्रदेशात जावे लागले.
12 ऑक्टोबर रोजी सकाळी सर्व आन्हिके उरकून प्रयागराजकडे निघालो. प्रयागराजला गंगा-यमुना-सरस्वती (गुप्त) त्रिवेणी संगमावर पोहोचलो. त्या पवित्र संगमात स्नान केल्यानंतर गंगाकिनारी वेणीदानाचा कार्यक्रम झाला. यात जहागिरदार, दुखंडे आणि देशपांडे या दांपत्यांचा पुनर्विवाह सोहळा आणि वेणीदान कार्यक्रम संपन्न झाला. हास्यविनोदाने कार्यक्रमात रंगत वाढत होती. त्यानंतर दुपारचे भोजन घेऊन नेहरू नक्षत्रालय, आनंद भवन (पं. नेहरूंचे निवासस्थान) आणि स्व. इंदिरा गांधींचे निवासस्थान पाहिले. दोन्ही ठिकाणी या दोन्ही पंतप्रधानांच्या ‘स्मृती’ छायाचित्रांच्या आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून जपल्या आहेत. यानंतर अयोध्येच्या दिशेने आमच्या प्रवास सुरू झाला.
 
 
 
दि. 13 ऑक्टोबर रोजी सकाळी अयोध्या नगरी पाहण्यासाठी निघालो. सर्वप्रथम शरयू नदीचे दर्शन घेतले. वरुणराजाने चांगले मनावर घेतल्याने नदी दुथडी भरून वाहत होती. मातेचे दर्शन घेत असतानाच चार-पाच फूट लांबीचा एक विषारी साप आमच्या पायापर्यंत पोहोचणार होता, परंतु एका व्यक्तीने प्रसंगावधान राखत त्याला पाण्यात ढकलले. आम्ही सर्व जण घाबरलो होतो. दर्शनानंतर परत निघालो. पुढचे ठिकाण नवीन होत असलेले राममंदिर पाहणे आणि रामलल्लाचे दर्शन घेणे. तिकडे जात असताना नव्यानेच निर्माण केलेला लता मंगेशकर चौक पाहण्यात आला. महाकाय अशी वीणा उंचावर ठेवून अतिशय सुंदर पद्धतीने या चौकाची निर्मिती केली आहे.
 
 
yatra
 
रामलल्ला मंदिराकडे जात असतानाच राममंदिर निर्माण कार्यशाळेस आम्ही भेट दिली. तेथे राममंदिर उभारणीसाठीच्या दगडी खांबांची निर्मिती आणि नक्षीकाम पाहण्यास मिळाले. मन प्रसन्न झाले. आम्ही पुढे जात असताना संभाजीनगर येथून सेवाव्रती म्हणून मंदिर बांधकामात लक्ष घालण्यासाठी गेलेले जगन्नाथ गुळवे आणि जगदीशजी आफळे यांची भेट झाली. गुळवे यांनी आम्हाला मंदिर निर्माणाबाबतची इत्थंभूत माहिती दिली. मंदिराचा 40 फूट इतका पाया घेतला असून तो पूर्णपणे भरल्यानंतर सुमारे 16 फूट उंच जोत्याचे काम झाले आहे. सुमारे 300 मजूर रात्रंदिवस काम करत आहेत. ‘’जानेवारी 2024मध्ये मंदिर सर्वांसाठी खुले होईल” असे ते म्हणाले. गुळवे यांनी आमचा निरोप घेतला व ते पुढील कामासाठी गेल्यानंतर आम्ही रामलल्लाचे दर्शन घेतले. दर्शन घेत असतानाच 6 डिसेंबर 1992च्या स्मृतींनी मनात गर्दी केली. ढाचा उद्ध्वस्त केला, त्या घटनेचे मी व माझी पत्नी दोघे जण आणि जहागिरदार दांपत्य साक्षीदार होतो. त्या वेळी केलेली ‘कारसेवा’ फलद्रुप होताना दिसत होती.
 
 
 
मनोभावे रामलल्लाचे दर्शन घेऊन पुढे ‘दशरथ महाल’, ‘हनुमानगढी’ आणि सीताजीकी रसोईचे दर्शन घेतले. अ‍ॅड. माधवराव भोसले, सुभाष आंबट, दिलीप देशपांडे आणि प्रदीप निकम यांची यात्रा अयोध्येपर्यंतच असल्याने ते परतीच्या प्रवासासाठी लखनऊकडे जाण्यास निघाले. त्यांना प्रेमळ निरोप देऊन आम्ही उर्वरित 11 जणांनी वाराणसीच्या दिशेने प्रवास सुरू केला. पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांनी काशी विश्वनाथाचे मंदिर भव्यदिव्य केल्याचे दूरदर्शनवर पाहिल्यापासूनच या शहराबद्दलचे आकर्षण खूप वाढले होते. दि. 14 ऑक्टोबर रोजी सकाळी सर्वप्रथम काशी विश्वनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. 1992 साली या विश्वनाथाचे प्रथम दर्शन घेतले होते, तेव्हा छोट्या गल्ल्यांमधून गेल्याचे आजही आठवते. आता या मंदिराचा आमूलाग्र कायापालट केला आहे. गंगाघाटापासून ते मंदिरापर्यंत एक छानसा कॉरिडॉर बांधला असून मंदिर अतिशय प्रशस्त केले आहे. या शिवतीर्थाला ज्ञानवापी म्हणतात.
 
 
विना दैन्येन जीवनम्। अनायासेन मरणम्॥
देहान्ते तव सायुज्यं। देहि मे पार्वतीपते॥
 
 
सूर्य जसा एकाच स्थानी राहून संपूर्ण पृथ्वी प्रकाशित करतो, तद्वतच आशुतोष महादेव पवित्र काशी क्षेत्रात राहतात व तिन्ही लोकांतील भक्तांना आपल्या आशीर्वादरूपी किरणांनी प्रफुल्लित करतात. सनातन संस्कृतीची आणि श्रद्धेची राजधानी म्हणजे काशी. वाराणसी, आनंदकानन, महास्मशान, बनारस या नावांनी ही काशी नगरी ओळखली जाते. अशा या नगरीतील विश्वनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिरातून बाहेर पडताना मशीद दृष्टोत्पत्तीस पडली. ती तिथे असण्याचा सल मनात आहे. ‘श्रीराम मंदिराप्रमाणेच विश्वनाथाचे मंदिरही या विळख्यातून मुक्त होईल’ हा आशावाद मनात ठेवून बाहेर पडलो.
 
 
 
आमच्या टूर मॅनेजर लता हंजनकर यांच्या परिचयातील श्रीराम कस्तुरे शास्त्री यांच्या निवासस्थानी जाऊन आम्ही पिंडदानादी विधी पूर्ण केला. गंगाघाटावर जाऊन गंगेचे दर्शन घेतले. खूप पाऊस पडल्याने गंगा दुथडी भरून वाहत होती. त्यानंतर भोजन करून दुपारी वाराणसीच्या ‘शिरपेचातील अर्वाचीन तुरा’ असलेले ‘काशी हिंदू विश्वविद्यालय’ पाहण्यासाठी गेलो. महामना पंडित मदन मोहन मालवीय यांनी 1916 साली या विद्यापीठाची स्थापना केली. देशात आधुनिक शिक्षणाला आपल्या सांस्कृतिक परंपरा जोडल्या पाहिजेत, या हेतूने या विद्यापीठाची संकल्पना जन्माला आली. प्राचीन भारतीय ज्ञान, विज्ञान परंपरा आणि आधुनिक शिक्षण यांचा संगम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात केला गेला. याच विद्यापीठात मालवीयजींनी लाल बहादुर शास्त्री यांना नि:शुल्क शिक्षण दिले होते. असे म्हटले जाते की, मालवीयजी यांनी एकेक पैसा जनतेकडून जमा करून विद्यापीठाची स्थापना केली. त्यांच्या इंग्लिश नावातील तीन अक्षरे घेतली, तर चचच अशी होतात. लोक त्यांना चेपशू चरज्ञळपस चरलहळपश असे म्हणतात. विद्यापीठाचा परिसर खूप मोठा असून त्या प्रांगणात महादेव विश्वनाथाचे भव्य असे ‘बिर्ला मंदिर’ आहे. मंदिराचे दर्शन घेताना आणि विद्यापीठ पाहताना ऊर अभिमानाने भरून आला. त्यानंतर उर्वरित वेळेत हनुमान मंदिर, दुर्गामाता आणि सत्यनारायण मंदिरांचे दर्शन घेऊन भगवंताचे दर्शन घेतले. सत्यनारायण मंदिरातील चलतचित्रांची संकल्पना विशेष वाटली.
 
 
yatra
 
15 ऑक्टोबर रोजी सकाळी वाराणसी शहराच्या बाहेर 5 कि.मी. अंतरावर सारनाथ येथील बुद्धभूमीला भेट दिली. बुद्धप्राप्तीनंतर सात आठवड्यांनी गौतम बुद्धांनी वाराणसीतील सहाध्यायी कौंडिण्य, भद्रजित, बाण्ण, महानाथ आणि अश्वजित यांना आपल्याला मिळालेले ज्ञान, धम्मबोध - धम्माचा उपदेश केला. तेथेच पहिले धम्मचक्र प्रवर्तन झाले. तेथे अशोकाचा चतुर्मुख सिंहस्तंभ आहे. भगवान बुद्धाचे मंदिर आहे. धम्मेख स्तूप आहे. चौखंडी स्तूप आणि गंधकुटी नामक विहार आहे. अशोकापासून कनिष्क राजापर्यंत सर्वांनी हे तीर्थक्षेत्र विकसित केले. मात्र परदेशी आक्रमकांनी काशीप्रमाणेच येथील वास्तूचीही नासधूस केली. मात्र तेथील अवशेषावरून तत्कालीन भव्यतेची कल्पना येते.
 
 
 
येथील दर्शनानंतर बिहारमधील बोधगयेकडे आमचा पुढील प्रवास सुरू झाला. सायंकाळी तेथे पोहोचलो. बोधगया येथे 2300 वर्षापूर्वीचे 180 फूट उंचीचे मंदिर पाहिले. सुंदर रंगसंगतीने मंदिर अतिशय विलोभनीय दिसत होते. याच ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली. त्या ठिकाणी आम्ही सर्व जण 10 मिनिटे ध्यानस्थ बसलो. बोधी वृक्षाचे दर्शन घेतले.
 
 
yatra
 
 
दि. 16 ऑक्टोबर रोजी सकाळी बोधगया येथील जपान आणि थायलंड शैलीतील बुद्धमंदिरे पाहिली. शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना या मंदिरातून पाहण्यास मिळाला. तेथून पुढे गयेला गेलो. तेथे विष्णुपद मंदिरात अभिषेक केला आणि दर्शनासाठी मंदिरात गेलो. तेथे दर्शनापूर्वीच पंड्यांनी पैसे टाकण्याचा आग्रह केला. त्यांच्या या वर्तनाविरुद्ध आवाज उठवावा, म्हणून तेथील कार्यालयात जाऊन रितसर तक्रार नोंदविली. नंतर फाल्गु नदीचे दर्शन घेतले. शेजवलकर गुरुजींकडे घरी जाऊन भोजन केले. प्रसाद खरेदी केला आणि वाराणसीच्या दिशेने प्रवास सुरू कला.
 
 
17ला सकाळी उठून परतीच्या प्रवासाची तयारी सुरू केली. सकाळी 8 वाजता विश्व हिंदू परिषदेचे एक कार्यकर्ते 11 व्यक्तींना दोन वेळा पुरेल एवढा पोळीभाजीचा डबा घेऊन आले. त्यांची ती प्रेमळ भेट घेऊन रेल्वे स्टेशन गाठले. काशी ते एलटीटी एक्स्प्रेस बरोबर 10:30 वाजता स्टेशनबाहेर पडली.
 
 
 
या संपूर्ण प्रवासात लता हंजनकर यांनी टूर मॅनेजर म्हणून उत्तम भूमिका निभावली. रवीजी कराडकर, दुखंडे दांपत्य, पुण्याचे सुधीर देशपांडे दांपत्य, राजीव जहागिरदार दांपत्य, मी व माझी पत्नी आणि मुंबईतून पल्लवी पाटील असे आम्ही सहभागी झालो होतो. 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता रेल्वे एलटीटी स्थानकात पोहोचली आणि सुखद स्मृतींसह यात्रा पूर्ण झाली. मला स्वत:ला चिकनगुनिया झाला होता, खूप अशक्तपणा होता आणि त्यातच अयोध्येत पाय मुरगळला, तरीही प्रभू रामाच्या कृपेने ही यात्रा आनंदाने पार पडली. सा. विवेकला खूप खूप धन्यवाद!
 
 
देवगिरी प्रांत पालक,
सा. विवेक
Powered By Sangraha 9.0