भारताची संरक्षक अग्नी मालिका

16 Dec 2022 16:03:18
@धनंजय जाधव
 
भारताने विकसित केलेले ‘अग्नी’ हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मध्यम ते आंतरखंडीय पल्ल्याचे असून या क्षेपणास्त्रांची मालिका ही भारताच्या संरक्षण क्षेत्रातील महत्त्वाचा प्रकल्प आहे. या मालिकेतील अग्नी-5ची चाचणी नुकतीच ओडिशाच्या किनारपट्टीवर घेतली जात आहे, तर अग्नी-6देखील लवकरच विकसित होईल. त्या निमित्ताने भारताच्या संरक्षण प्रांगणातील या तेजोमय ‘अग्नी’ मालिकेचा वेध घेणारा लेख.

agni
 
भारताने अग्नी क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर 1994मध्ये अमेरिकेने आपली ताकद वापरून, दबाव टाकून अग्नी क्षेपणास्त्राच्या पुढील चाचण्या स्थगित करण्यास भारताचे मन वळवले होते आणि भारताने 1995च्या शेवटी अग्नी क्षेपणास्त्राचा प्रकल्प औपचारिकपणे थांबवला होता. सर्वसमावेशक (थर्मोन्यूक्लिअर वॉरहेड्स) क्षेपणास्त्र चाचणी बंदी करारावर स्वाक्षरी करण्यासाठी अमेरिका आणि इतर राजकीय दबावापुढे भारत अखेरीस झुकला होता आणि ‘प्रकल्प अग्नी’ गुंडाळण्याचा निर्णय झाला, ज्याची सुरुवात 1996च्या शरद ऋतूत झाली. एवढा आंतरराष्ट्रीय दबाव असतानादेखील मार्च 1997मध्ये भारताचे पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी सर्व जगाला सूचित केले की, “भारत प्रोजेक्ट अग्नी क्षेपणास्त्र विकसनाचा कार्यक्रम सोडणार नाही.” पण दुर्दैवाने लगेचच जुलैमध्ये त्या वेळचे संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांनी परत पंतप्रधानांचे सर्व निवेदन नाकारले.
 
 
 
पण मार्च 1998मध्ये भारताचा टर्निंग पॉइंट आला आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे युतीचे नवीन सरकार सत्तेवर आले, जे उघडपणे अण्वस्त्र समर्थक होते. वाजपेयी सरकारने पदभार स्वीकारल्याबरोबर अमेरिकेचा दबाव झुगारून परत एकदा प्रोजेक्ट अग्नी सुरू करण्याचे आदेश दिले आणि अण्वस्त्र पर्यायासह सर्व पर्यायांचा स्वीकार आणि सराव सुरू करा, असे नवीन सरकारने जाहीर केले.
 
 
अग्नी क्षेपणास्त्र हे लांब पल्ल्याचे, अण्वस्त्रे नेण्यास सक्षम असणारे, पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. या मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र अग्नी-1 हे एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (lGMDP)अंतर्गत विकसित करण्यात आले असून 1989मध्ये याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि त्यानंतर याचे सामरिक महत्त्व लक्षात आल्यानंतर ह्या श्रेणीला IGMDPमधून वेगळे करण्यात आले. भारताच्या संरक्षण अर्थसंकल्पात हा एक विशेष प्रकल्पाचा दर्जा याला देण्यात आला आणि त्याच्या विकासासाठी पुरेसा निधी देण्यात आला. नोव्हेंबर 2019पर्यंत अग्नी मालिकेतील क्षेपणास्त्रे संरक्षण सेवेत वेळोवेळी समाविष्ट केली जात आहेत.
 
 
agni
 
अग्नी-1
 
 
सिंगल स्टेज सॉलिड प्रोपेलंटच्या 15 मीटर लांबीच्या 12 टन वजनी अग्नी-1 क्षेपणास्त्राचा पल्ला 700-900 कि.मी. असून, हे 1000 किलोचे (2,200 पौंड) पेलोड किंवा आण्विक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहे. या अग्नी क्षेपणास्त्रामध्ये दोन टप्पे असून एक कमी पल्ल्याचे व दुसरे मध्यम पल्ल्याचे आहे. तसेच हे क्षेपणास्त्र रेल्वेने अथवा रस्त्याने वाहून नेता येते. चांदीपूर येथील अंतरिम चाचणी तळावर 1989मध्ये याची पहिली चाचणी करण्यात आली होती. सध्या भारतीय लष्कराच्या स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे (SFCद्वारे) अग्नी-1चा वापर केला जातो.
 
 
अग्नी-2च्या तुलनेत अग्नी-1 क्षेपणास्त्र कमी खर्चीक, सोपे, अचूक आणि वाहतुकीस सोपे असून हे 1200 कि.मी.पर्यंत डागता येते.
 
 
agni
 
 
अग्नी-2
 
अडीच स्टेजच्या सॉलिड प्रोपेलंट इंजीनच्या 20 मीटर लांबीच्या, 18 टन वजनी अग्नी-2 क्षेपणास्त्राची पल्ला 2000-2,500 कि.मी. असून त्याचा व्यास एक मीटर आहे. हे 1000 किलोचे (2,200 पौंड) पेलोड किंवा आण्विक युद्धसामग्री वाहून नेण्यास सक्षम आहे. 9 ऑगस्ट 2012 रोजी स्ट्रॅटेजिक फोर्स कमांडद्वारे प्रशिक्षण सराव म्हणून यशस्वीरित्या याचे चाचणी प्रक्षेपण करण्यात आले. चीन आणि पाकिस्तानविरुद्ध एक विश्वासार्ह, भरवशाचे प्रतिबंधक म्हणून या क्षेपणास्त्राकडे पाहिले जाते. दोन टप्प्यांच्या ह्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचा मारक पल्ला 2,000 कि.मी. ते 3,000 कि.मी. आहे. भारताने 16 नोव्हेंबर 2019 रोजी ओडिशाच्या अब्दुल कलाम बेटावरून आण्विक युद्धसामग्री असलेल्या मध्यम पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-2ची पहिली चाचणी यशस्वीरित्या पार पाडली होती. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDOने) याची निर्मिती केली असून, भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे (BDLचे) उत्पादन आहे. याचा वेग 3.9 कि.मी./से. इतका आहे, तर याची मारक अचूकता 30-40 मी. इतकी आहे.
 
 

agni 
 
अग्नी-3
 
 
दोन स्टेज सॉलिड प्रोपेलंट इंजीनच्या, 17 मीटर लांबीच्या 48 टन वजनी अग्नी-3 क्षेपणास्त्राचा पल्ला 3,500-5,000 कि.मी. असून त्याचा व्यास 02 मीटर आहे. थर्मोबॅरिक वॉरहेड (200 किलोटन थर्मोन्यूक्लियर किंवा बूस्टेड फिशन) वाहून नेण्यास हे सक्षम आहे. ओडिशाच्या किनारपट्टीवरील व्हीलर बेटावरून 9 जुलै 2006 रोजी अग्नी-3ची पहिली चाचणी करण्यात आली, ती अयशस्वी झाली होती. त्यानंतर परत 12 एप्रिल 2007 व 7 मे 2008 रोजी अग्नी-3ची पुन्हा यशस्वी चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDOने) याची निर्मिती केली असून भारत डायनॅमिक्स लिमिटेडचे (BDLचे) उत्पादन आहे. याचा वेग 5-6 कि.मी./से. इतका आहे, तर याची मारक अचूकता 40 मी. इतकी आहे. तसेच हे 8 ु 8च्या टेलर लाँच पॅड (ट्रान्स्पोर्टर इरेक्टर लाँचर)वरून प्रक्षेपित करता येते, तसेच हे रेल्वेने वाहून नेता येते.
 
 
भारत या क्षेपणास्त्रामध्ये कमी विखंडन/फ्यूजन होणारी सामग्री (प्लुटोनियम/लिथियम ड्युटराइड) वापरून खूप मोठ्या अणुशक्तीचा वापर करू शकतो.
 
 
अग्नी-4
 
दोन स्टेज सॉलिड प्रोपेलंट इंजीनच्या 20 मीटर लांबीच्या 17 टन वजनी अग्नी-4 क्षेपणास्त्राचा पल्ला 4,000 कि.मी. असून त्याचा व्यास 02 मीटर आहे. थर्मोबॅरिक वॉरहेड (250 किलोटन थर्मोन्यूक्लियर किंवा बूस्टेड फिशन) वाहून नेण्यास हे सक्षम आहे. हे क्षेपणास्त्र हलक्या वजनाचे असून यात री-एंट्री हीट शील्डसह पेलोड मॉड्यूल आहे, तसेच यात क्वांटम लीपचा वापर करण्यात आला आहे. ह्या क्षेपणास्त्रामध्ये उच्च दर्जाची विश्वासार्हता प्रदान करण्यासाठी क्षेपणास्त्र प्रणाली आधुनिक आणि कॉम्पॅक्ट एव्हिऑनिक्सने सुसज्ज आहे. स्वदेशी रिंग लेझर गायरोस्कोपवर आधारित अशी उच्च अचूकता असलेली इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टिम आणि मायक्रो नॅव्हिगेशन सिस्टिम (MIGIS) प्रथमच एकमेकांबरोबर गायडन्स मोडमध्ये यशस्वीरित्या यात ऑपरेट करण्यात आली आहे. एव्हिऑनिक्स आर्किटेक्चरसह उच्च कार्यक्षमतेचा संगणक, हाय स्पीड कम्युनिकेशन बेस आणि संपूर्ण डिजिटल नियंत्रण प्रणाली ही लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी क्षेपणास्त्राला नियंत्रित आणि मार्गदर्शन करते, त्यामळे हे क्षेपणास्त्र अत्यंत अचूकतेने लक्ष्यापर्यंत पोहोचते. लाँचरेंज रडार आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणाली ह्या क्षेपणास्त्राच्या सर्व पॅरामीटर्सचा मागोवा घेतात आणि निरीक्षण करतात. हे 8 ु 8च्या टेलर लाँच पॅड (ट्रान्स्पोर्टर इरेक्टर लाँचर)वरून प्रक्षेपित करता येते, तसेच हे रेल्वेने वाहून नेता येते.
 
 
अग्नी-5
 
 
थ्री-स्टेज प्रोपल्शन सिस्टिमच्या 17.5 मीटर लांबीच्या, 50 टन वजनी अग्नी-5 क्षेपणास्त्राचा पल्ला 5,000 कि.मी. असून त्याचा व्यास 02 मीटर आहे.
 
 
अग्नी-5 क्षेपणास्त्र अण्वस्त्रांनी सज्ज असलेले 1.5 टन पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने हे विकसित केलेले असून हैदराबादच्या प्रगत प्रणाली प्रयोगशाळेने उत्पादित केले आहे. अग्नी-5मध्ये रिंग लेझर गायरोस्कोपचा - म्हणजेच आरएलजी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतात बनवलेल्या या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अगदी अचूकतेने लक्ष्यभेद करते. ओडिशाच्या किनार्‍यावरील व्हीलर बेटावरून 19 एप्रिल 2012 रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 08:07 वाजता अग्नी-5ची पहिली चाचणी करण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी झाली.
 
 
 
या क्षेपणास्त्राचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात वापरण्यात आलेले मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेइकल (MIRV) तंत्रज्ञान. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ह्या क्षेपणास्त्राने एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला करता येतो, एकाच वेळी अनेक ठिकाणी शेल फायर करता येतात, अगदी वेगवेगळ्या लक्ष्यांवर हल्ला करता येतो, तसेच एकाच वेळी वेगवेगळ्या देशांवर हल्ला करता येतो. चीनच्या डोंगफेंग-31अ या क्षेपणास्त्राला भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राकडून कडवी टक्कर मिळत आहे, कारण चीनचे उत्तरेकडील शहर हार्बिनदेखील अग्नी-5च्या पल्ल्यामध्ये येते, जे चीनच्या भीतीचे सर्वात मोठे कारण आहे.
 
 
 
अग्नी-5 क्षेपणास्त्र वापरण्यास अतिशय सोपे असून ते कुठेही वापरले जाऊ शकते, मग ते रेल्वे, रस्ता असो वा हवाई. ते देशाच्या कोणत्याही कानाकोपर्‍यात तैनात केले जाऊ शकते आणि युद्धाच्या वेळी कोणत्याही पृष्ठभागावरून हे डागता येते, एवढेच नाही, तर अग्नी-5च्या प्रक्षेपण प्रणालीमध्ये कॅनिस्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. यामुळे हे क्षेपणास्त्र सहज कुठेही नेले जाऊ शकते, ज्यामुळे आपण आपल्या शत्रूच्या अगदी जवळ जाऊ शकतो. अग्नी-5 क्षेपणास्त्राच्या यशामुळे भारतीय लष्कराची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे, कारण 5,000 किलोमीटरचा लक्ष्यभेदी पल्लाच नाही, तर ते अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (ICBM) असलेले संपूर्ण जगात फक्त 5 देश अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन आणि भारत हेच आहेत.
 
 
अग्नी-5 - प्रमुख वैशिष्ट्ये -
 
 
भारत आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (खउइच) क्लबमध्ये सामील होईल. अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन आधीच अशा क्षेपणास्त्रांनी सज्ज आहेत.
 
 
अग्नी-5 क्षेपणास्त्र अप्रतिमरित्या लक्ष्याचा वेध घेते. पाच हजार किलोमीटरचे अंतर अवघ्या वीस मिनिटांत कापून, दीड मीटरइतक्या अचूकतेने लक्ष्य टिपते.
 
 
अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे भारताच्या सामरिक रणनीतीमध्ये मोठा बदल घडणार आहे. या क्षेपणास्त्रामुळे अमेरिका वगळता संपूर्ण आशिया, आफ्रिका आणि युरोप भारताच्या कक्षेत आला आहे.
 
 
एकदा सोडलेले हे क्षेपणास्त्र थांबवता येत नाही. हे बुलेटपेक्षा अधिक वेगाने धावते आणि 1000 किलोचे अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.
 
 
हे भारताचे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून वॉरहेडवर एक टन वजनाचे अण्वस्त्र वाहून नेण्यास हे सक्षम आहे.
अग्नी-5 ह्या एकाच क्षेपणास्त्रामधून अनेक अण्वस्त्रे सोडण्याच्या तंत्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
 
 
अग्नी-5 क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करून भारत लहान उपग्रह अवकाशात सोडू शकेल, एवढेच नाही, तर शत्रूचे उपग्रह नष्ट करण्यासाठीही त्याचा उपयोग करू शकतो.
 
 
पंतप्रधानांच्या आदेशानंतरच हे क्षेपणास्त्र डागले जाईल. भारत ह्या क्षेपणास्त्राला ’शांती शस्त्र’ (शांतीचे शस्त्र) म्हणत आहे.
या 17 मीटर उंचीच्या क्षेपणास्त्रामध्ये अप्रतिम तंत्राचा वापर करण्यात आला आहे. हे क्षेपणास्त्र तीन टप्प्यांत डागले जाईल. पहिले रॉकेट इंजीन त्याला 40 कि.मी. उंचीवर नेईल. दुसर्‍या टप्प्यात ते 150 कि.मी.पर्यंत जाईल आणि तिसर्‍या टप्प्यात ते 300 किलोमीटरपर्यंत जाईल. एकूणच ते 800 कि.मी. उंचीवर पोहोचेल.
 
 
 
भारताकडे आतापर्यंतचे सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र अग्नी-4 आहे, जे 3,500 किलोमीटरपर्यंत मारा करते, तर अग्नी-5 हे 5,000 किलोमीटरपर्यंत मारा करेल.
 
 
अग्नी-पी
 
 
दोन स्टेज रॉकेट मोटर थर्ड स्टेज सॉलिड प्रोपेलंट इंजीनचे हे 10.5 मीटर (34 फूट 5 इंच) लांबीचे, 11 टन वजनी क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला 1,000-2,000 किलोमीटर आहे. त्याचा व्यास 1.15 मी. (3 फूट 9 इंच) आहे. थर्मोबॅरिक वॉरहेडचे वजन 1,500 किलो आहे. यात रिडंडंट मायक्रो इनर्शियल नॅव्हिगेशन आणि डिजिटल कंट्रोल सिस्टिमसह रिंग लेसर गायरो इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टिम असून याची मारक अचूकता 10 मी. आहे. टेलर लाँच पॅड (ट्रान्स्पोर्टर इरेक्टर लाँचर)वरून प्रक्षेपित करता येते, तसेच हे रेल्वेने वाहून नेता येते.
 
 
 
अग्नी-पी किंवा अग्नी-प्राइम (अग्नी फायर) हे मध्यम पल्ल्याचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO)द्वारे लष्करी दलांच्या ऑपरेशनल सेवेमध्ये अग्नी-1 आणि अग्नी-2 क्षेपणास्त्रांचे उत्तराधिकारी म्हणून विकसित केले जात आहे. मॅन्युव्हरेबल रीएंट्री व्हेइकल (MaRV)बरोबर सुधारित प्रोपेलंट, नॅव्हिगेशन आणि गायडन्स प्रणालीच्या स्वरूपात यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. हे अग्नी-3सारखे दिसत जरी असले, तरी याचे वजन निम्म्याने कमी करण्यात आले आहे. अग्नी-पी हे आता जुन्या पिढीच्या क्षेपणास्त्रांची - पृथ्वी, अग्नी-1 आणि अग्नी-2 यांची जागा घेईल.
 
 
अग्नी-6 - (क्लासिफाइड)
 
 
 
आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे नाव आधीपासूनच सूर्य असून याचे सांकेतिक नाव अग्नी-6 हे आहे.
 
 
 
चार स्टेज सॉलिड प्रोपेलंट इंजीनचे हे 20 मीटर लांबीचे, 55 टन वजनी क्षेपणास्त्र असून त्याचा पल्ला अभूतपूर्व असा 8,000-12,000 किलोमीटर (4,971-7,456 मैल) इतका आहे, त्याचा व्यास 02 मी. आहे. तसेच यात गायडन्स सिस्टिम रिंग लेझर गायरोस्कोप - इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टिम आणि इनर्शियल स्टीअरिंग सिस्टिम आहे. तसेच हे 8 ु 8च्या टेलर लाँच पॅड (ट्रान्स्पोर्टर इरेक्टर लाँचर)वरून प्रक्षेपित करता येते. रेल्वेने, रस्त्याने आणि पाणबुडीतून ते वाहून नेता येते. भारतीय नौदलाच्या INS अरिहंतसाठी याची पाणबुडी आधारित आवृत्ती तयार करण्यात आली आहे, म्हणजेच हे पाणबुडीवरूनही डागता येऊ शकते, तिचा कमाल मारक पल्ला 6,000 किलोमीटर असणार आहे आणि तीन टन वॉरहेड पेलोड वाहून नेण्यास सक्षम असेल.
 
 
agni
 
2011मधील भारतीय हवाई दलाचे प्रमुख मराठमोळे मार्शल प्रदीप वसंत नाईक यांनी भारत सरकारला केलेल्या सूचनेमुळे, भारत सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव असतानाही (भारत क्षेपणास्त्र टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजीमचा (MTCRचा) 2016पर्यंत सदस्य होता.) अग्नी-6च्या निर्मितीच्या दिशेने पाऊल टाकले होते, त्यामुळे त्या वेळचे भारतीय हवाई दलाचे प्रमुख मार्शल प्रदीप वसंत नाईक यांना अग्नी-6 क्षेपणास्त्राचे सर्व श्रेय जाते. मार्शल प्रदीप वसंत नाईक हे चीफ ऑफ स्टाफ कमिटीचेही प्रमुख होते. त्यांनी सांगितले होते की, “भारताने 10,000 कि.मी. किंवा त्याहून जास्त पल्ल्यासाठी ICBM कार्यक्रम सुरू केला पाहिजे. एखाद्या देशाचे प्रभावक्षेत्र वाढत असताना त्याचे प्रादेशिक संदर्भ तोडणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे कोणत्याही देशाची प्रादेशिक रचना नाही. परंतु भारताला स्वतःच्या क्षेत्राची आवश्यकता आहे.” त्यानंतर 20 जून 2011 रोजी इंडियन डिफेन्स न्यूजने ‘भारत आणि 10,000 कि.मी. ICBMs'ची’ या शीर्षकाचा एक लेख प्रकाशित केला होता, ज्यामध्ये असे म्हटले आहे की भारत आपल्या सामरिक क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढविण्याचा गंभीरपणे विचार करत आहे आणि संरक्षण मंत्रालय संरक्षण महासंघाबरोबर यावर काम करत असून आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र  (ICBM)  10,000 कि.मी. अंतरावरील लक्ष्य गाठण्यास सक्षम असावे. ICBMच्या विकासाचे आंतरराष्ट्रीय परिणाम होऊ शकतात आणि त्यामुळे या प्रस्तावावर अंतिम निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) घेईल, तसेच या प्रस्तावावर भारत सरकार अत्यंत गंभीरपणे विचार करत आहे.
 
 
 
अग्नी-6 हे एक आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अग्नी क्षेपणास्त्राची ही नवीनतम आणि अत्याधुनिक आवृत्ती असून, भारतीय सशस्त्र दलांच्या वापरासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेद्वारे (DRDO) विकसित केले जात आहे. याच्या डिझाइनचा टप्पा पूर्ण झाला असून, आत ते हार्डवेअर डेव्हलपमेंटच्या टप्प्यात आहे. अग्नी-6मध्ये स्वतंत्रपणे लक्ष्यभेद करण्यासाठी अनेक री-एंट्री व्हेइकल, तसेच मॅन्युव्हरेबल री-एंट्री व्हेइकल (MARV) असणे अपेक्षित आहे. या क्षेपणास्त्रामध्ये 10 चखठत वॉरहेड वाहून नेण्याची क्षमता असू शकते आणि त्यांचा पल्ला 8,000 कि.मी. ते 12,000 कि.मी.पेक्षा जास्त असू शकतो. मात्र डीआरडीओने या क्षेपणास्त्राच्या पल्ल्याबद्दल पुष्टी करण्यास नकार दिला आहे. अत्यंत सहजतेने वाहतूक करण्यायोग्य असे हे क्षेपणास्त्र असणार आहे आणि ते सहजपणे कुठेही तैनात केले जाऊ शकते. पाणबुडी आणि जमिनीवरील आधारित प्रक्षेपकांमधून याला डागता येणार आहे. मे 2008मध्ये भारतीय शास्त्रज्ञांनी यासाठी लागणारे Path-breaking तंत्रज्ञान विकसित केले असून त्याचे पेटंटही घेतले आहे. ह्या क्षेपणास्त्राच्या रॉकेटच्या ब्लंट नोज कोनमध्ये क्रोमियम-आधारित विशेष असा लेप त्यावर लावल्याने क्षेपणास्त्राला ठरवून दिलेला पल्ला पार पडणे शक्य होते. हा लेप रिअ‍ॅक्टिव्ह-अ‍ॅब्लेटिव्ह कोटिंग म्हणून काम करतो, ज्यामुळे रॉकेटच्या ब्लंट नोजवर एक पातळ कमी घनतेचा वायूचा थर बनतो, त्यामुळे सुपर-हीटेड गॅस लेयर ड्रॅग 47%ने कमी करतो, तसेच यामुळे त्याच्या स्वनातीत (हायपरसॉनिक) वेगामध्ये 40% वाढ होते.
 
 
 
ह्या क्षेपणास्त्राच्या रेंजिंग आणि कॅलिब्रेशनच्या चाचण्या सातत्याने सुरू असून हे तंत्रज्ञान भविष्यातील पुढील अग्नी क्षेपणास्त्राच्या श्रेणींमध्ये ह्या उपयोजनांचा समावेश केला जाईल.
 
 
 
 
 
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख व्ही.के. सरस्वती यांनी 9 फेब्रुवारी 2013 रोजी सांगितले होते, “भारत हा अग्नी क्षेपणास्त्रांचा प्रकल्प बंद करणार नसून, तशी भारताची कोणतीही योजना नाही आणि यापुढेही भारत अग्नी मालिकेतील नवीन क्षेपणास्त्रे बनवतच राहणार आहे.” या ‘अग्नी’मालिकेच्या रूपाने भारत आपली संरक्षणसिद्धता आणखी मजबूत करत आहे.
Powered By Sangraha 9.0