राजा कालस्य कारणम्

07 Nov 2022 12:47:21
 3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2022 या अंकात प्रकाशित झालेला. ‘सर्वयुक्त भारत’ हा लेख वाचून अनेक वाचकांनी या विषयावर अधिक विस्ताराने लिहावे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे या विषयावर एक छोटी लेखमाला सुरू करत आहोत. हा या लेखमालेतील पहिला लेख.
 
 indian politics issues   article writing ramesh patange
 
महाराष्ट्राचे राजकीय वातावरण खूप खराब झालेले आहे, या बाबतीत वरिष्ठ राजनेत्यांपासून ते चहाची टपरी चालविणार्‍या चहावाल्यापर्यंत सर्वांचे एकमत आहे. असे राजकीय एकमत होणे ही अद्भुत किमया समजली पाहिजे. आणि या किमयेचे किमयागार महाराष्ट्रातील सगळे नामवंत राजनेते आहेत. केवळ दोघा-चौघांची नावे घेण्यात काही अर्थ नाही. सर्वांनी मिळून राजकीय वातावरण अत्यंत खराब करून टाकलेले आहे. एकमेकांवर आरोप करताना आतापर्यंत साप, कुत्रा, गाढव, गधा, तलवार अशा असंख्य शब्दांचा वापर मुक्तपणे झालेला आहे. एक वरिष्ठ राजकीय नेता म्हणतो की, एवढी वाईट राजकीय परिस्थिती महाराष्ट्रात मी कधी पाहिली नव्हती. परिस्थिती निर्माण करणारेच हे म्हणतात, हे विशेष.
 
 
 
महाभारताच्या शांतिपर्वात भीष्म आणि युधिष्ठीर यांचा प्रदीर्घ संवाद आहे. ‘शांतिपर्व’ हे राजधर्मावर भाष्य करणारे पर्व आहे. युधिष्ठीराने पितामह भीष्मांना विचारले की, “काळ राजाचा कारण असतो की, राजा काळाचा कारण असतो?” भीष्म पितामहांनी त्याला जे उत्तर दिले, ते अतिशय प्रसिद्ध आहे. सुभाषितासारखे ते वापरले जाते.
 
 
‘कालो वा कारणं राज्ञो राजा वा कालकारणम्।
 
इति ते संशयो मा भूद राजा कालस्य कारणम्॥’
 
 
(भीष्म युधिष्ठिराला म्हणतात,) ‘काळ हा राजाला कारण होतो की राजा हाच काळाला कारण होतो, याविषयी तू संशयात पडू नको. कारण, राजा हाच काळाला कारण आहे.’
 
 
या सुभाषितातील राजा या शब्दाचा अर्थ कोणता करायचा? सिंहासनावर बसलेला राजा हा अर्थ लोप पावला आहे. राजा म्हणजे राज्यकर्ते आणि राज्यकर्ते म्हणजे आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी सर्व मंडळी येतात. भीष्माचार्यांच्या शब्दात सांगायचे तर, ही राज्यकर्ती मंडळी काळ निर्माण करण्यास कारणीभूत होतात. काळ याचा अर्थ आताची परिस्थिती. आताची राजकीय परिस्थिती अत्यंत कलुषित आहे आणि तिला जबाबदार हे सर्व राजमंडळ आहे.
 
 
 
आपला समाज राजसत्तेवर पूर्णत: अवलंबित नसल्यामुळे अत्यंत खराब राजकीय परिस्थितीचे परिणाम त्याच्या जीवनावर फार खोलवरचे होत नाहीत. याचे श्रेय आपल्या पूर्वजांना दिले पाहिजे. त्यांनी आपला समाज स्वायत्त आणि स्वयंनिर्णय करणार्‍या तत्त्वांवर उभा केला. गणेशोत्सवापासून जे सण आले, त्या प्रत्येक सणात आपल्याला याचे दर्शन घडलेले आहे. मुस्लीम बांधवांचा ईद सणदेखील येऊन गेला, नुकतीच दिवाळी साजरी झाली. या दिवाळीच्या दिवशी मी दादरला गेलो होतो. तीस वर्षांहून अधिक काळ मी दादरला जात आहे, परंतु या दिवाळीची गर्दी आयुष्यात प्रथमच बघितली. लोकांमध्ये एवढा प्रचंड उत्साह होता. एक सरकार गेले, दुसरे आले आणि ज्यांचे सरकार गेले त्यांचे फटाके रोजच फुटत होते, ज्यांचे सरकार आले तेही फटाक्यांना फटाक्यांचेच उत्तर देत होते, पण सामान्य माणूस मात्र दिवाळीच्या खरेदीत मग्न होता. तो आपल्या व्यवहाराने राजनेत्यांना सांगत होता, ‘तुम्ही तुमची दिवाळी साजरी करा, आम्ही आमची दिवाळी साजरी करत आहोत.’
 
आपला समाज राजनेत्यांवर किंवा राजसत्तेवर पूर्णपणे अवलंबून नसला, तरी समाजजीवनात राजसत्तेचे महत्त्व अतिशय मोठे असते. महाभारतात भीष्म सांगतात की “सर्व धर्मांत राजधर्म श्रेष्ठ आहे. राजधर्माच्या आश्रयाने सर्व धर्म राहत असतात.” हा राजधर्म काय आहे, याचे अतिशय तपशीलवार विवरण शांतिपर्वात केलेले आहे. राजा प्रजाहितदक्ष असावा, प्रामाणिक असावा, प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करणारा असावा, खुशालचेंडू नसावा, सचोटीने वागणारा असावा, न्यायनिवाडा करणारा असावा, आपल्या वर्तणुकीने सर्वांमध्ये विश्वास निर्माण होईल अशा प्रकारे त्याचा व्यवहार असावा. भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात, “तो राजा सर्वोत्तम, ज्याच्या राज्यात प्रजा निर्भयपणे राहते, ज्याप्रमाणे पित्याच्या घरात मुले आणि मुली अत्यंत निर्धास्तपणे राहत असतात.” केवढा मोठा आशय भीष्माचार्यांनी सांगितलेला आहे. राज्य करणारे आणि राज्य करण्याची वाट बघणारे असे दोघेही जेव्हा सर्व विवेक बाजूला ठेवून कलह करत राहतात, तेव्हा प्रजा राजारूपी पित्याच्या घरात अपत्याप्रमाणे कशी राहणार?
 
 
ज्या राज्यात सतत कलह चालू आहेत, त्या राज्यात सुख-शांती राहू शकत नाही. राजकीय कलह घराघरातही जातात. एखादा शक्तिशाली पक्ष फुटतो, तेव्हा काय होते? पक्षाचे अनुयायी फुटतात. काही इकडे, काही तिकडे जातात. कालचे मित्र आजचे विरोधक होतात. घरातही दोन तट पडतात. राजकीय भांडणे विकोपाला केव्हा जातात? राजनेते रस्त्यावर उतरून एकमेकांची डोकी कधीच फोडत नाहीत, शर्ट फाडत नाहीत, ते काम पक्षाचे अनुयायी करतात. त्यांची माथी भडकवली जातात. त्यांच्यात अशांतता निर्माण केली जाते. त्यांच्या मनामध्ये विद्वेषाची ज्योत जागविली जाते. या सर्वांमुळे राजकीय वातावरणाबरोबरच सामाजिक वातावरणदेखील कलुषित होत जाते. जिथे अशांतता आहे, कलह आहे, अशा ठिकाणी राहू नये, असा पितामह भीष्मांचा आदेश आहे. का राहू नये? तर अशा ठिकाणी आपले घरदार, आपली संपत्ती, आपली मुलेबाळे, घरातील स्त्रिया यांच्या संरक्षणाची काहीही हमी नसते. या स्थितीला आपण अजून गेलेलो नाही, पण वातावरण असेच राहिल्यास उद्या जाणार नाही, असे छातीठोकपणे म्हणता येत नाही.
 
 
या सर्व परिस्थितीचा विचार करता वेगवेगळ्या पक्षातील राजनेत्यांनी आणि रोज वेगवेगळ्या सभांत भाषण करणार्‍या आमदार-खासदारांनी आपल्या राजधर्माचा विचार केला पाहिजे. आपण लोकशाही राज्यव्यवस्थेत राहतो. त्यामुळे एकमेकांच्या विचारांचा विरोध करणे हे लोकशाहीचे एक अंग ठरते. लोकांना आपला विचार समजावून सांगणे आणि सत्तेवर असल्यास आपण काय करीत आहोत, हे लोकांसमोर मांडणे आवश्यकच असते. सत्तेवर नसलेल्या मंडळींनादेखील आपला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. विकासाचा आमचा कार्यक्रम कोणता असणार हे मांडण्याचेही त्यांना स्वातंत्र्य आहे. अशा स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना संसदीय भाषेचा वापर करणे, कोणावरही कसलीही व्यक्तिगत टिप्पणी न करणे, छोटा पप्पू, मोठा पप्पू, तिसर्‍या दर्जाच्या सिनेमात काम करणारी नटी, भ्रष्टाचारासाठी जेलवारी करून आलेला नेता, अशा प्रकारे कोणाचे वाभाडे काढू नयेत. आपल्या स्तुतिपाठकांकडून टाळ्या मिळविण्यासाठी त्याचा उपयोग होता, परंतु जेवढ्या टाळ्या देणारे असतात, त्याहून अधिक असली वक्तव्ये न आवडल्यामुळे शिव्या घालणारे असतात, हे सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे.
 
 
 
सत्तेवर बसल्यामुळे कोणी मोठा होत नाही आणि तो लोकांच्या स्मृतीत दीर्घकाळ राहतो, असेही नाही. महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यापासून किती मुख्यमंत्री झाले आणि त्यांची नावे कोणती, त्यांच्या मंत्रीमंडळातील मुख्य दोन-तीन खात्यांचे मंत्री कोण होते? असा प्रश्न जर विचारला, तर शंभरापैकी नव्व्याण्णऊ टक्के लोकांना त्याची उत्तरे देता येणार नाहीत, हे शाश्वत सत्य लालगाडीतून फिरणार्‍या सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे. लोकसत्तेवर कोणाचे अधिराज्य राहाते? चक्रवर्ती राजगोपालाचारी हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, अतिशय विद्वान होते. रामायण आणि महाभारताच्या कथा त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिल्या, ही दोन्ही पुस्तके इंग्लिश साहित्यातील लेणी समजली जातात. हे राजगोपालाचारी म्हणतात, “अत्यंत सहजपणे ज्या देशावर सत्ता गाजविता येईल, असा भारत सोडून दुसरा देश जगात नाही. तुम्हाला परंपरांना आवाहन करता आले पाहिजे. भूतकाळातील सगळे राजे - उदा., जनक आणि श्रीराम हे आजही जिवंतच आहेत. ते आपल्या हृदयावर सत्ता गाजवितात. मी गव्हर्नर जनरल नाही, श्रीराम हे गव्हर्नर जनरल आहेत.”
 
 
Powered By Sangraha 9.0