@डॉ. अरुणचंद्र शं. पाठक । 9309859826
औरंगाबाद येथील वेरूळ, या परिसरातील दौलताबाद, मूळच्या देवगिरीचे वैभव मोठे आहे. तेथील पाणीपुरवठा व्यवस्था, वेगवेगळ्या पातळीवरील जलाशय या सर्वांची एकत्रित नोंद घेतली गेली, तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा बनवला, संग्रहालयाची वास्तू स्वतंत्रपणे उभारली, यादव काळात निर्माण झालेल्या जवळपास चारशेहून अधिक शिलालेख व ताम्रपट यांपैकी निवडक शिलालेखांचा परिचय पर्यटकांना करून दिला, त्यांच्या प्रतिकृती उपलब्ध झाल्या, निवडक मंदिरासारख्या वास्तू व मूर्तिशिल्पांच्या प्रतिकृती निर्माण केल्या व पारंपरिक वास्तुवैभवाची ओळख होईल असे काही या परिसरात उभे करण्याचे प्रयत्न सुरू केले, तर पर्यटनाला चालना मिळेल.
औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यात असलेले देवगिरी हे औरंगाबादपासून 15 किलोमीटर व राष्ट्रकूटांचे प्रमुख केंद्र असलेल्या वेरूळपासून (जेथे कैलास लेणे निर्माण झाले) 14 किलोमीटर अंतरावर आहे. देवगिरी हे स्थान पहिल्या-दुसर्या शतकात सातवाहनाची राजधानी असलेल्या प्रतिष्ठान (पैठण)पासूनही जवळ आहे. या दोन्ही सत्तांच्या काळात देवगिरीचे भौगोलिक अस्तित्व कायम होते. देवगिरी हे दहाव्या-अकराव्या शतकाच्या सुमारास एक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. सहा-सात मोठाली कुंडे आणि जलाशय व किमान दहा ते पंधरा देवालये या ठिकाणी होती. यापैकी तीनतरी जैन मंदिरे होती. किल्ल्यामध्ये आज भारतमाता मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेली वास्तू आहे. पूर्वी ती वास्तू जुम्मा मशीद या नावाने ओळखली जात असे. परिसरातील मंदिरे आणि त्यांचे स्तंभ व घटकावशेष यांचा उपयोग करून ही वास्तू बांधली गेली. या मंदिरांच्या सभोवताली आचार्य, भाविक व पुजारी यांची वस्ती होती, तसेच यात्रेकरूंसाठी बांधलेल्या धर्मशाळाही येथे होत्या. साधारणपणे राष्ट्रकूटांच्या उत्तरकाळात तेथे असलेला डोंगर लक्षात घेऊन आजच्या देवगिरी किल्ल्यात हिंदू व विशेषत: शैव पंथीयांच्या व जैन पंथीयांच्या लेण्यादेखील कोरल्या गेल्या. आज देवगिरी किल्ल्यात असलेल्या या गुंफा आपणाला पाहता येतात. तसेच या परिसरात भांगशी या नावाने ओळखल्या जाणार्या डोंगरमाथ्यावरसुद्धा काही लेणी खोदली गेली. या क्षेत्रात यात्रेकरूंचे सतत येणेजाणे होते. जवळच असलेले घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग व हा परिसर गजबजलेला असे. यात्रेकरूंच्या जोडीनेच बरेच व्यापारीदेखील येथे जमा होत असत. शिवाय दक्षिणोत्तर असलेल्या एका हमरस्त्यावर हे केंद्र असल्यामुळे व्यापार व विविध उद्योग वाढतच गेले. देवगिरी ही एक संपन्न नगरी झाली. संपन्नता आल्यावर पाठोपाठ यादवांनी सन 1190च्या आसपास येथे आपली राजधानी वसवली. सध्याच्या महाकोटाच्या क्षेत्रातच ही वैभवसंपन्न अशी यादवकालीन नगरी उभी होती. नगरीभोवती सध्याच्या तटबंदीच्या जागी शुष्कसंधी पद्धतीने - म्हणजे चुन्याशिवाय नुसत्या दगडांत बांधलेली तटबंदी होती. तत्कालीन पद्धतीप्रमाणे या तटबंदीचे बुरुज चौकोनी आकाराचे होते. बाहेरच्या बाजूने वाहणार्या नैसर्गिक ओढ्याचा उपयोग खंदकाप्रमाणे होत असे.
लोकमान्य टिळकांनी पाहिलेली स्वप्नं आणि आजचा भारत या विषयी चिकित्सक लेखांचा संग्रह असलेला शतसूर्याचे तेज – लोकमान्य टिळक पुस्तक आहे.
फक्त ३१५ रुपयांत
या नगरीच्या परिसरातील डोंगरांत खोदलेल्या गुंफांचा काळ बारावे शतक असा निश्चित करता येतो. या शतकाच्या शेवटी यादवांची राजधानी येथे आली व ती शंभर वर्षे टिकली. या शंभर वर्षांत नगरीची भरभराट झाली. येथे मंदिरे, प्रासाद यांची निर्मिती झाली व संपन्नता इतकी आली की ती इतरांच्या डोळ्यांत येऊ लागली (म.श्री. माटे, देवगिरी - दौलताबाद येथील पुरातत्त्वीय संशोधन, नागपूर, 1987, पृष्ठ 26.) आपण या नगरीचे राजे व्हावे ही महत्त्वाकांक्षा यादव घराण्यातील सर्वांनाच होती. आपल्या चुलत्याकडून राजसत्ता मिळवण्यासाठी रामचंद्रदेव यादवाने केलेल्या प्रयत्नांची सुरस कथा औरंगाबाद ताम्रपटात उपलब्ध आहे. या राजाचे कौतुक श्री ज्ञानदेवांनीसुद्धा केले आहे.
पेथड देवाचे प्रयत्न
या प्रतिष्ठित राजधानीमध्ये जिन मंदिर असावे, असा पेथडदेव (संस्कृतमध्ये पृथ्वीधर, पृथ्वीभट्ट) याने विचार केला. हा परमार राजाचा अमात्य. पेथडदेव व त्याचा मुलगा झंझ हे जयसिंग परमार (इ.स. 1261-1280) व भोज (द्वितीय) या राजांचे मंत्री होते. पेथडदेवाचे वडील देदासाह व्यापारानिमित्त विद्यापूर (गुजरातमध्ये) स्थायिक होण्याआधी काही काळ देवगिरीमध्ये व्यापारानिमित्त राहत असत. उपाश्रय बांधण्याचे काम चालू असताना जैन मुनी व महावीर यांच्याविषयी आपली भक्ती प्रदर्शित करण्यासाठी त्यांनी 1.2 मण केशर बांधकामात वापरल्याची आख्यायिका आहे. देवगिरीत जैन मंदिर बांधावे ही आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी यादवांचा प्रधान अमात्य हेमाद्री उर्फ हेमाडपंत यास पेथडाने विनंती केली. पण दरबारातून अनुमती मिळवण्यासाठी व हेमाडपंताचे मन वळवण्यासाठी त्याने परमारांच्या राज्यात ॐकारेश्वराच्या वाटेवर नर्मदेकाठी यात्रेकरूंसाठी हेमाद्री सदावर्त या नावाने अन्नछत्र उभारले. देवगिरीला परतलेले यात्रेकरू हे सदावर्त सुरू केल्याबद्दल हेमाद्रीची स्तुती करू लागले. हेमाद्रीने या गोष्टीचा शोध घेतल्यानंतर या दोन मंत्र्यांची काही कामानिमित्त भेट घेतली व हेमाद्रीने पेथडदेवाला आपल्या नावाने सुरू केलेल्या या सत्कृत्यामागचे कारण विचारले. पेथडदेवाने मूळ भूमिका स्पष्ट केल्यावर हेमाद्रीने जिन मंदिर बांधण्यासाठी भूमी उपलब्ध करून दिली व त्याने ‘अमुलिक विहार’ या नावाने वर्धमान स्वामींचे मोठे मंदिर उभारले (अ.प्र. जामखेडकर, पुरासंचय, पुणे 2016, पृ. 215-216.) यांच्या सत्कृत्याविषयीचे पुरावे उपलब्ध असून पेथडदेवाने भारताला 78 तीर्थक्षेत्री जिन प्रतिमायुक्त चैत्यालये बांधली होती. हे कथानक देवगिरीच्या संदर्भातच घडले असावे, असे येथील पुरातत्त्वीय पुराव्यांवरून वाटते.
देवगिरीवर अचानक झालेल्या अलाउद्दीन खिलजीच्या स्वारीत (इ.स. 1294) त्याला अनपेक्षित यश आले. यानंतर मलिक कफूरने 1307 साली व मुबारक खिलजीने 1318 साली या नगरीवर आक्रमण केले. कुतुबुद्दीन मुबारक याने हरपाल देवाचा पराभव केला. येथे यादव राजवट संपली. मलिक कफूरच्या नंतर आलेला अलाउद्दीनचा मुलगा मुबारक खिलजी याने सगळी नगरी ताब्यात घेतली आणि येथील मंदिरे नष्ट करून सन 1318मध्ये जुम्मा मशीद बांधली. याच वेळी देवगिरीचे नाव बदलून ‘कुवतुल इस्लाम’ असे ठेवले. त्यानंतर मुहंमद तुघलकाने आपली राजधानी येथे हलवली आणि गावाचे नाव ‘दौलताबाद’ असे ठेवले. अमीर खुस्रो याने याविषयीचे रसभरीत वर्णन करून ठेवले आहे. मिठापासून हिरेमाणकांपर्यंत सारे काही येथे मिळत असे.
रामचंद्र यादवाच्या पराभवानंतर अलाउद्दीनने खंडणी म्हणून 8,500 किलोग्रॅम सोने, 100 किलोग्रॅम मोती, 30 किलोग्रॅम इतर मौल्यवान रत्ने, 14,000 किलोग्रॅम चांदी आणि रेशमी कापडाचे 1,000 तागे इतकी प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली. यावरून यादवांच्या वैभवाची कल्पना येते. (राज्य गॅझेटिअर, मध्ययुगीन कालखंड, पृ. 19.) यादव कालखंडावर डॉ. नरसिंह मूर्ती, डॉ. श्रीनिवास रित्ती, डॉ. मो.ग. पानसे, ब्रह्मानंद देशपांडे या विद्वानांनी व अशा अनेकांनी काम केले आहे. ज्ञानदेवांनी रामचंद्राचा उल्लेख करताना गोदावरीच्या खोर्यात असलेल्या राजवंशाची नोंद घेऊन-
तेथ यदुवंश विलासु। जो सकळ कला निवासु।
न्यायाते पोशी। क्षितिषु श्री रामचंद्र॥
असे म्हटले आहे. यादव काळ हा धार्मिक, सांस्कृतिक व आर्थिक दृष्टीने वैभवाचा काळ होता. या काळात ज्ञानेश्वर, नामदेव, चोखामेळा, जनाबाई यांच्यासारख्या संतांची मांदियाळी नांदत होती. स्वत: रामचंद्रदेवाची निष्ठा पंढरीच्या विठ्ठलावर होती आणि एका शिलाशासनात तो स्वत:ला पंढरी फडप्रमुख म्हणवून घेतो. याच वेळी महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी, खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य, ‘मिताक्षरा’ या ग्रंथाचे लेखक श्री विज्ञानेश्वर यांची प्रतिभा सर्वत्र जाणवत होती. यादवांचे सेनानी व अमात्य हेमाद्री यांनी ‘चतुर्वर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला. यादव शैलीच्या मंदिर कलेला प्रोत्साहन दिले. श्री बोपदेव याच्यासारखा पंडित व खोलेश्वरसारखा सेनानी संपूर्ण दक्खनमध्ये पराक्रम गाजवत होते. परिणामी तत्कालीन अन्य सर्व सत्ता काहीशा वचकूनच होत्या. यादवांच्या र्हासानंतर देवगिरीच्या किल्ल्यावर खिलजी, तुघलक, बहामनी, निजामशाही, मोगल, असफजाही (हैदराबादचा निजाम) व मराठे या सर्वांनी अधूनमधून सत्ता प्रस्थापित केली.
बर्याच अंतरावरून दिसणारा देवगिरीचा सगळ्यात प्रेक्षणीय भाग म्हणजे देवगिरीचा डोंगर. हा डोंगर उत्तरेला व पूर्वेला असलेल्या डोंगररांगांपासून थोडासा तुटून निघालेला आहे. याची उंची 200 मीटर असून शिखर दक्षिणेस आहे. येथून उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने उतरत नजर येऊन ठेपते ती या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या खड्या दरडीवर! साधारण 30 मीटर उंच अशी ही दरड डोंगराचा बराच भाग तासून सरळ उभी आहे. त्याच्या पायथ्याशी 10 मीटर रुंद व 15 मीटर खोल असा खंदक सर्व बाजूंनी खणलेला आहे. खंदक आणि उभी दरड यांच्यामुळे हा डोंगर सभोवतालच्या जमिनीपासून पार फटकून निघालेला आहे. खंदक ओलांडून डोंगराच्या पायथ्याशी जाणे जवळपास अशक्य आहे. अशा तर्हेने जमिनीवरच एक बेट तयार करण्याची किमया भारतात अन्यत्र कोठेही साधलेली नाही. डोंगराचा माथा सपाट पठारासारखा नाही. त्यावर चारपाच टप्पे दिसतात. प्रत्येक टप्पा आकाराने लहान होत जातो. सगळ्यात वर चौकोनी आवार व तोफेचा बुरुज आहे. त्याखाली त्याच आकाराचे बंदिस्त आवार दिसते. तेथे बारादरी नावाने ओळखला जाणारा महाल आहे. महालाचा खालचा भाग साधारणपणे 6 मीटर उंचीवर असल्याचे दिसते. प्रत्यक्षात डोंगरमाथा सपाट करून घेण्यासाठी घातलेला हा भराव आहे. बारादारीच्या लगत ‘अंधारी’ या नावाने ओळखला जाणारा भुयारी मार्ग आहे. ही अंधारी म्हणजे डोंगराभोवती जी दरड कापली आहे, तेवढीच उंची चढून डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी केलेला भुयारी रस्ता आहे. खडकात पाया खोदून तयार केलेला हा मार्ग आहे. निम्म्यापर्यंत वर गेल्यानंतर समोर तीन रस्ते दिसतात. कोणत्या रस्त्याने वर जावे हे समजत नाही. सभोवार संपूर्ण काळोख असतो. त्यामुळे या मार्गाला भुलभुलैय्या असेही नाव आहे. तुम्ही चुकलात तर सरळ खंदकात पडू शकता. दुसर्या बाजूने डोंगरातच खणलेली एक खोल गर्त (खड्डा) आहे आणि फक्त तिसर्या बाजूने वर जाता येते. सगळ्यात वर आडवा लोखंडी सरक दरवाजा आहे. भुयारात धूर करून वर येणार्या आक्रमकांचा मार्ग रोखून धरता येतो. खंदक, दरड, भुयारी मार्ग यांच्या जोडीला दरडीपासून 3-4 मीटर उंचीची एक दगडी तटबंदी डोंगरावर बांधली आहे. बुरुज, टेहळणी नाके या सर्वांमुळे हा किल्ला भुईकोट व डोंगरी किल्ला यांच्या एकत्रित समीकरणातून उभा आहे. तीन भव्य, मजबूत तटबंदी म्हणजे कोट आहेत. त्यात अंबर कोट हा विस्तीर्ण असून सबंध गावाला कवेत घेतो. डोंगरालगत असलेल्या खंदकापर्यंत जाण्यापूर्वी अंबर कोटानंतर महाकोट आहे. या महाकोटाची तटबंदी दुहेरी आहे. ती पार केल्यानंतर काल कोट लागतो. त्यालाही काही ठिकाणी दुहेरी तटबंदी आहे. ही भेदून पुढे जाऊ शकलात तर डोंगर तासून तयार केलेला 15 मीटर रुंदीचा खंदक आहे.
संत एकनाथांचे गुरू जनार्दन स्वामींची ध्यानगुंफा व पादुका
त्यानंतर अंधारी लागते. या सर्व रचनेमुळे हा किल्ला दक्षिण भारतातील एक अजस्र, दुर्गम, उत्तुंग व अजिंक्य किल्ला मानला गेला, हे साहजिकच होते. किल्ल्यात असलेल्या वास्तूंचा विचार केला, तर महाकोटालगतची सरस्वती विहीर, कचेरी विहीर या बारवा प्रारंभिक यादव काळातील आहेत. हत्ती हौदालगतचे भारतमाता मंदिर हे अनेक हिंदू मंदिरांच्या अवशेषांवर उभे आहे, हे सहज लक्षात येते. चांदमिनारनंतर एक हेमाडपंती मंदिर असावे अशी आयताकार आकाराची वास्तू आहे. याबरोबरच देवगिरी टेकडीच्या माथ्यावर जनार्दन स्वामींची समाधी व पादुका आहेत. हे जनार्दन स्वामी म्हणजे संत एकनाथांचे गुरू. बारादारीला समांतर असलेल्या यादव काळात खोदलेली लेणी, पेशवे काळात बांधलेले गणेश मंदिर, भुयारी मार्ग, खंदक व दरड या परिसरातच असलेल्या शैव व जैन लेणी हे यादव व यादवपूर्व काळातील अवशेष म्हणून दाखवता येतात. नंतरच्या कालखंडात निजामशाही महल, मुघल राजप्रासाद, चांदमिनार, किल्ल्याच्या समोरच असलेला शाही हमाम, काही अंतरावर असलेला रंगमहाल हे व असे इतर अवशेष पर्यटकांचे आकर्षण आहेत. किल्ल्यातच असलेल्या एका वस्तुसंग्रहालयासारख्या जागेत अनेक खंडित मूर्ती व वास्तूंचे घटकावशेष ठेवले आहेत. आज किल्ल्याचे नामांतरण देवगिरी असे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील वेरूळ, या परिसरातील दौलताबाद, मूळच्या देवगिरीचे वैभव, तेथील पाणीपुरवठा व्यवस्था, वेगवेगळ्या पातळीवरील जलाशय या सर्वांची एकत्रित नोंद घेतली गेली, तज्ज्ञांच्या मदतीने एक आराखडा बनवला, संग्रहालयाची वास्तू स्वतंत्रपणे उभारली, यादव काळात निर्माण झालेल्या जवळपास चारशेहून अधिक शिलालेख व ताम्रपट यांपैकी निवडक शिलालेखांचा परिचय पर्यटकांना करून दिला, त्यांच्या प्रतिकृती उपलब्ध झाल्या, निवडक मंदिरासारख्या वास्तू व मूर्तिशिल्पांच्या प्रतिकृती निर्माण केल्या व पारंपरिक वास्तुवैभवाची ओळख होईल असे काही या परिसरात उभे केले, तर पर्यटक व अभ्यासक मुद्दाम येथे थांबतील, काही हातांना काम मिळेल व पर्यटनाला चालनादेखील मिळेल. या दृष्टीने घोषणेपलीकडे जाऊन आपल्याला काही करता येईल का, हे पाहावे लागेल.