तुलसी विवाह हिंदू संस्कृतीची आरोग्यदायक भेट

विवेक मराठी    04-Nov-2022
Total Views |
 @गीताग्रजा। 9420456918
  
भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे. कार्तिकी एकादशीला देव झोपेतून उठल्यावर तुळशी विवाह केला जातो. या पवित्र मुहूर्तावर देवाचे स्वागत केले जाते. तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन केले जाते व तुळशी विवाहाचा उत्सव केला जातो. याच दिवशी सार्‍या देवांनी तुळस व विष्णुस्वरूप शाळीग्राम यांचा विवाह लावला, म्हणून ही परंपरा चालू झाली.
 
tulashi
 
वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ अशी शिकवण असणार्‍या आपल्या भारतीय संस्कृतीत तुळशी विवाह खूप काही सांगून जातो. साधारणपणे तुळशीचे रोप झुडूप वर्गात मोडते. मंजिरी आल्यानंतर त्यांना खुडून कृष्णाला वाहिल्या जातात. हे झुडूप वर्षभर छान बहारदार असते. आषाढी एकादशीला वृंदावनात नवीन रोप लावण्याची प्रथा आहे. चतुर्मास्यात ते छान वाढते. कार्तिकी एकादशीला त्याला छान मंजिरी येतात. अशा उपवर तुळशीचे शाळीग्राम किंवा कृष्णाबरोबर लग्न लावले जाते. निसर्गातील तुळशीला कन्या समजून लग्न लावायचे आणि कन्यादानाचे पुण्य मिळवायचे, ही यामागील भावना आहे.
 
 

साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान

https://www.evivek.com/hindutva-granth/

 
 
पौराणिक कथा
 
 
राक्षस कुळात वृंदा नावाची मुलगी जन्मास आली. ती विष्णुभक्त होती. वृंदा उपवर झाल्यावर जालंदर नावाच्या राक्षसाशी तिचा विवाह झाला. वृंदा विष्णुभक्त तर होतीच, पण अत्यंत पतिव्रता स्त्री होती. तिची भक्ती व पातिव्रत्य याच्या जोरावर तिचा पती जालंदर विजयी होत गेला, तसतसा त्याचा गर्वही वाढत गेला. त्याने स्वर्गावर आक्रमण करून देवकन्यांवर अधिकार गाजवणे सुरू केले. देव क्रोधित व भयभीत होऊन विष्णूला शरण गेले. परंतु वृंदाचे सत्त्व भग्न पावल्याशिवाय जालंदराचा अंत होणार नाही, होणार नव्हता. भगवान विष्णूंनी जालंदरचे मायावी रूप धारण केले. जालंदर आला असे समजून वृंदा पूजा करीत असताना उठली. तिचे पातिव्रत्य नष्ट झाले. त्याचा परिणाम म्हणून जालंदरची शक्ती संपत गेली आणि तो युद्धात मारला गेला. वृंदाला जेव्हा हे कळले, तेव्हा तिचा राग अनावर झाला. “जन्मभर तुमची भक्ती करूनही तुम्ही माझ्याबरोबर असा दगडाप्रमाणे व्यवहार केला, म्हणून तुम्ही पाषाण व्हाल असा मी तुम्हाला शाप देते” असे वृंदा म्हणाली. या शापाने श्रीहरी पाषाण झाले. त्यास शाळीग्राम म्हणतात. जेव्हा सर्व देवांनी वृंदाची माफी मागितली व शाप मागे घेण्यासाठी याचना केली, तेव्हा शेवटी वृंदाने विष्णूंना माफ केले व जालंदरबरोबर सती गेली. वृंदाच्या राखेतून जे झाड येते, ते म्हणजे तुळस होय. भगवान विष्णूने तुळशीस वरदान दिले की तुळशीशिवाय मी कोणताही नैवेद्य ग्रहण करणार नाही व शाळीग्रामच्या रूपात तुळशीशी विवाह करेन. कालांतराने या तिथीला लोक तुळसी विवाह करतील व असे करणार्‍यांना सुख समाधान मिळेल.
 
 
tulashi
 
धार्मिक महत्त्व
 
 
* पद्मपुराणानुसार तुळशीचे दर्शन घेतल्याने पापांचा नाश होतो. स्पर्शाने शरीर पवित्र होते. तुळशीला नमस्कार केल्याने व पाणी घातल्याने मोक्षप्राप्ती होते.
 
 
* गरुड पुराणानुसार तुळशीची सेवा केल्याने पूर्वजन्मीच्या पापांचा नाश होतो.
 
 
* स्कंदपुराणानुसार तुळस कधीही शिळी होत नाही. देवाला शिळी फुले वाहत नाहीत, परंतु तुळशीपत्र कधीही वर्जित नाही.
 
 
* ब्रह्मवर्त पुराणानुसार तुळस मनुष्यासाठी कल्याणकारक पुत्र, धन देणारी, पुण्यदायक आहे. मृत्युसमयी तुळशी दल मुखात ठेवून पाणी घातल्याने मोक्षप्राप्ती होते. कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षातील द्वादशीस तुळशी व शाळीग्राम यांचा विवाह केल्याने विष्णू व लक्ष्मी प्रसन्न होतात.
 
 
सामाजिक महत्त्व
 
 
हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांनी मिळून सृष्टी निर्माण केली. त्यामध्ये ब्रह्मा विधाता आहे, विष्णू संचालक, तर महेश संवर्धक आहे. यामध्ये विष्णू सृष्टीचे संचालन करतो म्हणजे संसार आपण कशा प्रकारे करावा यासाठीचे रूपक म्हणून विष्णू आहे. रामावतार व कृष्णावतार यात कसे वागावे हेच विष्णूने सांगितले आहे. चतुर्मास्यात आपण विविध व्रतवैकल्ये करत असतो. त्या वेळी ईश्वराच्या समीप जाण्याचा प्रयत्न करत असतो. साधारण ऐहिक सुखापासून आपण अलिप्त राहतो. देवशयनी एकादशीस विष्णू निद्रिस्त होतात. देवउठनी किंवा प्रबोधनी एकादशीस - म्हणजे कार्तिकी एकादशीस देव उठतात. त्या वेळी लक्ष्मीचे प्रतीक म्हणून तुळस व विष्णूचे प्रतीक म्हणून शाळीग्राम किंवा कृष्ण यांचे लग्न लावले जाते व पुन्हा सांसारिक गोष्टींकडे लक्ष देण्यास सुरुवात केली जाते. यानंतरच घरातील मुलांच्या विवाहाचे मुहूर्त ठरवले जातात.
 
 
रूढी-परंपरा
 
 
भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे. कार्तिकी एकादशीला देव झोपेतून उठल्यावर तुळशी विवाह केला जातो. या पवित्र मुहूर्तावर देवाचे स्वागत केले जाते. तुळशीच्या माध्यमातून देवांना आवाहन केले जाते व तुळशी विवाहाचा उत्सव केला जातो. याच दिवशी सार्‍या देवांनी तुळस व विष्णुस्वरूप शाळीग्राम यांचा विवाह लावला, म्हणून ही परंपरा चालू झाली. या तिथीची आठवण म्हणून दर वर्षी हा विवाहसोहळा होतो. त्यामुळे घरात मांगल्याचे, आनंदाचे वातावरण असते. यामुळे वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी, शांती लाभते अशी श्रद्धा आहे.
 
 
वैज्ञानिक महत्त्व
 
 
तुळस नॅचरल एअर प्युरिफायर आहे. तुळस दिवसा बारा तास ऑक्सिजन सोडते व रात्री कार्बन डाय-ऑक्साइड सोडते. तसेच तुळस पहाटे उच्छ्वासातून 003% ओझोन वायू सोडते. त्यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून बचाव होतो. या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत 5 कढझप सेरॉटोनीन (छर्शीीेीींरपीाळीींंशी) स्रवते. त्यामुळे ती व्यक्ती दिवसभर प्रसन्न व आनंदी राहते. घरातील गृहिणी प्रसन्न व आनंदी राहावी यासाठी पहाटे तुळशीभोवती सडा-रांगोळी घालावी, पूजा करून प्रदक्षिणा घालावी, ही रीत आहे. दर वर्षी विवाहविधी केल्याने पुन्हा तुळस पूजली जाते, म्हणून हा विधी करावा असे सांगितले आहे.
 

tulashi 
 
आयुर्वेदिक महत्त्व
 
 
हिक्का कासविषश्वास पार्श्वशुलविनाशन:।
 
 
पित्तकृत कफवातघ्न:।
 
सुरस: पुतिगंध:। चरकसूत्र स्थान।
 
 
उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांत तुळस उपयोगी असते. पित्त वाढवणारी तुळस दुर्गंधीनाशक आहे.
 
 
* तुळशीची पाने दाताने चावू नयेत. यात मर्क्युरी (पारा) असल्याने दातांसाठी चावणे हानिकारक आहे, म्हणून नैवेद्यात पान ठेवतात व नैवेद्य जंतुघ्न करतात.
 
 
* तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. कफघ्न असल्याने फुप्फुसांची कार्यक्षमता वाढवते.
 
 
* जिर्‍याबरोबर पाने वाटून चाटून घेतल्याने अतिसारात फायदा होतो. वरून गरम पाणी प्यावे.
 
 
* अँटीबॅक्टेरियल असल्याने तुरटीत मिसळून जखमेवर लावल्याने आराम मिळतो.
 
 
* तुळस तणावविरोधी गुणधर्माची आहे. नियमित सेवनाने शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
 
 
* तणावामुळे कारण नसताना खाण्याची सवय लागते, त्यामुळे वजन वाढते. तुळशीच्या सेवनाने हे कमी होते. वजन वाढण्यापासून सुटका मिळते.
 
 
* नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते.
 
 
* मायग्रेन, डोकेदुखीत पुदिन्याची पाने व तुळशीचे पाने सकाळी घेतल्याने त्रास कमी होतो.
 
 
अशा प्रकारे भारतीय संस्कृती मध्ये व परंपरे मध्ये तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर मग, या वर्षीपासून तुळशी विवाह वेगळा दृष्टीकोन ठेवून साजरा करू या व आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी तुळशीची मदत घेऊ या. आरोग्य हेच उत्तम धन व निरोगी शरीर हीच समृद्धी आहे. तर या बहुगुणी तुळशीच्या सान्निध्यात राहून आपले जीवन सुखसमृद्धीने भरू या.