एक सच्चा देशभक्त, सामाजिक जाण असणारा समर्थ अभिनेता

विवेक मराठी    30-Nov-2022
Total Views |
@रवींद्र देव  9822098053
नाटक-दूरदर्शन, मालिका-चित्रपटांद्वारे कलारसिकांच्या मनावर अधिराज्य गजवणार्‍या विक्रम गोखले यांचे नुकतेच निधन झाले. सिनेक्षेत्रातील स्पॉटबॉयपासून अभिनेत्यांची ते व्यक्तिगत चौकशी करत, अडीअडचणीच्या वेळी त्यांना आर्थिक मदत करत. संस्कार भारती कोकण प्रांताचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले होते. आपल्या व्यग्र जीवनातूनही संस्कार भारतीचे काम तन्मयतेने पाहिले. संस्कार भारतीचे काम पाहताना त्यांच्या बाबतच्या आठवणींना उजाळा देणारा लेख...
 
vivkram gokhale
 
चार दशकांहून अधिक काळ नाटक-दूरदर्शन मालिका-चित्रपटांद्वारे कलारसिकांच्या मनावर अधिराज्य करणारे महानायक आदरणीय विक्रमजी गोखले यांना दि. 26 नोव्हेंबर 2022 रोजी देवाज्ञा झाली. त्या दिवशी मी मुंबईला निघालो आणि विक्रम गोखले गेले ही बातमी कळली. अनेकांनी नेहमीप्रमाणे नीट माहिती न घेता, व्हॉट्सअ‍ॅपवरून त्यांना श्रद्धांजली वाहून मोकळे झाले. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधील एका विकृत पत्रकाराला तर फारच घाई झाली होती. ’मी किती शहाणा आहे’ हे दाखविण्यासाठी त्या पत्रकाराने तातडीने फेसबुकवर प्रतिक्रिया दिली - ‘विक्रमजी कसे महान नट होते, परंतु त्यांचे वाचन कमी होते, ते संघिष्ट होते त्यामुळे हिंदुत्ववादी कसे होते’ वगैरे वगैरे. खरे तर अत्यंत दु:खद असा तो प्रसंग. नाटक, मालिका आणि चित्रपटातील त्यांच्या भूमिका डोळ्यासमोर सतत येत होत्या. मन मानायला तयार नव्हते. त्यांनी केलेल्या एकेक भूमिका अफाट होत्या. मिळालेल्या भूमिकांमध्ये ते आपला जीव ओतायचे. मी बघितलेला त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे ‘एबीसी अँड डी’. ते जायच्या आदल्या दिवशी त्यांची पत्नी व त्यांनी केलेली परांजपे बिल्डर्स ‘अथश्री’ या प्रकल्पाची चित्रफीत बघितली. अप्रतिम भूमिका.. ते अभिनय करत आहेत असे कधीही वाटायचे नाही, इतकी सहजता होती. अभिनय त्यांच्या रक्तातच होता. शरीराच्या हालचाली, चेहर्‍यावरचे हावभाव सगळे हृदयाला स्पर्श करून जायचे.
 
 
 
वडील अभिनेते स्व. चंद्रकांत गोखले
 
 
चंद्रकांतजींकडून मिळालेला अभिनयाचा वारसा आणि संस्कार विक्रमजींनी सार्थ केले. स्व. चंद्रकांत गोखले हे फार मोठे नट तर होतेच, तसेच स्वातंत्रलढ्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांवर निस्सीम भक्ती. स्वातंत्र्योत्तर झालेल्या युद्धांतील हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना ते दर वर्षी आर्थिक मदत करत. त्या काळात चित्रपटांपासून उत्पन्न फार मिळत नसे. मिळालेल्या पैशातून कुटुंबाची गरज भागवून कमीत कमी गरजा ठेवून त्यांनी तो बँकांमध्ये गुंतविला. त्यातून येणार्‍या व्याजातून ते हुतात्म्यांच्या कुटुंबीयांना मदत करत असत. एका अभिनेत्याने समस्त समाजासमोर हा फार मोठा आदर्श ठेवला. अन्य कलाकारांवर केलेला किती मोलाचा संस्कार आहे हा! आणि त्याची कोठेही प्रसिद्धी कधीही केली नाही. सरकारकडून कधीही मदतीची अपेक्षा केली नाही. उलटपक्षी बँकांचे व्याजदर कमी झाले म्हणून रिक्षाऐवजी ते बसमधून प्रवास करायला लागले. पूंजीत जमा होणार्‍या व्याजाला धक्का लागू नये यासाठी हा सगळा खटाटोप.
 
 


vivkram gokhale
 
 
विक्रमजींशी माझी पहिली भेट
 
 
संस्कार भारती कोकण प्रांताच्या कलासाधक संगमाच्या समारोपाच्या कार्यक्रमात त्या वेळचे प्रांत अध्यक्ष नटश्रेष्ठ प्रभाकरपंत पणशीकर होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर पंतांनी शब्द टाकला. विक्रमजींनी कोकण प्रांताचे अध्यक्षपद स्वीकारले. व्यासपीठावर कलेच्या, साहित्याच्या क्षेत्रातील सर्व थोर कलावंत मंडळी होती - सुलोचनाबाई, पेंढारकर, प्रभाकर पणशीकर, यशवंत देव, विकास सबनीस, प्रदीप भिडे, पद्मजा फेणाणी, वासुदेव कामत, पं. उल्हास बापट आणि विक्रम गोखले. पंतांनी विक्रमजींचे नाव घेतले, “यापुढे आता विक्रम गोखले हे कोकण प्रांत अध्यक्ष म्हणून माझ्यानंतर कार्य बघतील.”
 
 
व्यासपीठावरील अनेकांचे सत्कार झाले, त्यात मी केंद्रीय पदाधिकारी म्हणून विक्रमजींच्या हस्ते माझा सत्कार झाला. त्यांचे ते हास्य आणि माझ्या पाठीवरचा हात आजही आठवतो, जणू काही गेली 25-30 वर्षे आम्ही ओळखतो, असा सुंदर भाव त्यांच्या चेहर्‍यावर होता. आज मला खूप समाधान वाटते की संस्कार भारतीमुळे अशा थोर कलावंतांचा मला आशीर्वाद मिळाला. पुढे आम्ही कोकण प्रांताच्या बैठकांमध्ये अनेकदा भेटलो.
 
 
vivkram gokhale
 
अध्यक्षपदासाठी ज्या वेळी पंतांच्या सांगण्यावरून संस्कार भारती कोकण प्रांताचे कार्यकर्ते त्यांच्या चित्रीकरण स्थळावर गेले, तेव्हा त्यांनी संस्कार भारतीचे काम समजून घेतले. संस्कार भारतीच्या अपेक्षा, संस्थेची कार्यपद्धती, निधी कसा जमवितात, सभासद शुल्क किती? शंभर रुपये सांगताच प्रथम स्वत:च्या खिशातून त्यांनी सभासदाचे शुल्क भरले. चित्रीकरणामधील सर्वांनी बोलाविले आणि संस्कार भारतीची माहिती देऊन सर्वांना सभासद व्हायला सांगितले. जवळजवळ 30 जणांचे तीन हजार रुपये सभासद शुल्क म्हणून जमा झाले.
 
 
आपली संस्कृती, देश, समाज याविषयीची त्यांची तळमळ यांचा संवादातून प्रत्यय यायचा. संस्कार भारतीने काय करणे अपेक्षित आहे, या संदर्भात ते नेहमी मार्गदर्शन करत असत. संस्थेच्या बैठकीतील त्यांच्या मनमोकळ्या संवादातून मी त्यांचा साधेपण अनुभवला आहे.
 
 
 
जहांगीर कलादालनातील माझ्या चित्रकला प्रदर्शनाचे निमंत्रण त्यांना उशिरा मिळाले. एक दिवस त्यांचा मला फोन आला, ‘’मी विक्रम गोखले बोलतोय. मला तुझ्या प्रदर्शनाचे निमंत्रण आज एक आठवडा उशिराने मिळाले.” प्रदर्शनाविषयी आपुलकीने चौकशी केली. त्यांची ही सहजता माझ्या मनावर खोलवर रुजली.
 
 
vivkram gokhale
 
कलावंत आणि सामाजिक भान
 
 
त्यांच्या वडिलांप्रमाणे ते आपल्या क्षेत्रातील स्पॉटबॉयपासून ते अभिनेत्यांची व्यक्तिगत चौकशी करत, अडीअडचणीच्या वेळी त्यांना आर्थिक मदत करत, त्यांचा इन्श्युरन्स करून घेण्यावर जोर असे. ’आपण आणि आपले काम’ एवढ्यापुरते ते कधीही जगले नाहीत. कलावंताने समाजाभिमुख असले पाहिजे, कलावंत समाजामुळे मोठा होतो याची जाणीव आपण कलावंतांनी ठेवली पाहिजे याचे त्यांनी नेहमीच भान ठेवले. कला वेगळी आणि समाज वेगळा असे त्यांनी कधीही होऊ दिले नाही.
 
 
समाजकारण, राजकारण त्यांना कधीही वर्ज्य नव्हते. केंद्र वा राज्य सरकार असो, आपली भूमिका ते अत्यंत ठामपणे मांडत. मी सरकारविरुद्ध बोललो तर त्याचा माझ्या व्यवसायावर किंवा प्रतिष्ठेवर काही परिणाम होईल का? पुरस्कारांवर परिणाम होईल का? याची तमा न बाळगता देशहिताचे काय आहे? त्यांची विचारांची स्पष्टता पक्की होती. कधीही पूर्वग्रहदूषित किंवा कोणताही गैरसमज मनात न ठेवता कलेशी अत्यंत प्रामाणिक राहून ते आपला विचार बोलून दाखवत.
 
 
 
 
पुण्यातील कट्टा
 
 
पुण्यात आजही अनेक ठिकाणी कट्टे जमतात. नाटक किंवा चित्रपट चित्रीकरण संपल्यानंतर विक्रमजी या कट्ट्यांवर हजेरी लावत असत. कट्ट्यावरील गप्पांमधून विक्रमजींना अभिनयासाठी कॅरेक्टर्स मिळत असत. त्यांची बोलण्याची लकब, हालचाली, आवाज, विषय यातून त्यांच्या अभिनयाला अनेक विषय मिळत. कलावंत हा समाजातूनच येतो, तो काही आकाशातून पडत नाही; परंतु देवाने त्याच्यामध्ये सर्वसामान्यांपेक्षा एक जास्तीचा कलावंताचा गुण टाकलेला असतो, तो समाजाच्या मनोरंजनाबरोबरच कलेच्या माध्यमातून प्रबोधन, समाजजागृती, सशक्त समाज, अभिरुचिसंपन्न समाजनिर्मितीसाठी कार्यरत असतो, हे त्यांचे मत होते. राजाश्रय नसल्यामुळे कलाकारांच्या जीवनात अनेक चढ-उतार येत असतात. स्वाभिमानी असल्यामुळे तो कधीही समाजापुढे हात पसरत नाही. तो त्याच्या कलेच्या माध्यमातून तो त्याचे हक्काचे पैसे घेतो, असे ते नेहमी म्हणत.
 
 
राज्याच्या सांस्कृतिक रितीनीतीमध्ये
विक्रमजींचे मोलाचे मार्गदर्शन
 
राज्याची सांस्कृतिक रितीनीती काय असावी या संदर्भात शासनाने 2015 साली कलासंस्थांकडे व काही ज्येष्ठ कलाकारांकडे व्यक्तिगत विचारणा केली. संस्कार भारतीकडेही तसे पत्र आले. साहजिकच कोकण प्रांताचे अध्यक्ष पंत पणशीकरजी, विक्रमजी, मार्गदर्शक चित्रकार सुहास बहुळकर, वासुदेव कामत, प्रमोदजी पवार, सुलभा देशपांडे, रेखा कामत, विठ्ठल उमप यांच्या मार्गदर्शनाखाली काही कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्रातील अनेक अनुभवी, चिंतक सुप्रसिद्ध कलाकारांनी विचारविनिमय करून सांस्कृतिक रितीनीती तयार केली आणि शासनाकडे पाठविली. तसेच विक्रमजींनी राज्य सरकारला सांस्कृतिक रितीनीतीसंदर्भात एक प्रस्ताव पाठविला. यासंबंधी शासनाने एक पुस्तिका छापली. परंतु ती आमलात आणली गेली नसली, तरी सांस्कृतिक रितीनीतीसंदर्भातील एक चांगली पुस्तिका या निमित्ताने तयार झाली.
 
 
 
विचारांशी कधीही तडजोड केली नाही
 
 
विक्रमजींनी खरे तर अनेक हिंदी, मराठी नाटकांमध्ये, दूरदर्शन मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये मोठमोठ्या अभिनेत्यांबरोबर प्रमुख भूमिका वठविल्या. त्यात त्यांनी केलेल्या भूमिकांमुळेही त्या मालिकांची, चित्रपटांची, नाटकांची उंची वाढली आणि त्यांनी केलेल्या भूमिका लोकांच्या आजही स्मरणात आहेत. एवढा सुप्रसिद्ध नट, परंतु त्यांनी मूळ हिंदुत्वाची विचारधारा कधीही सोडली नाही. ती विचारधारा ते स्वत: जगले. त्यांनी त्या विचारधारेचा आग्रह धरला नाही किंवा ती कुणावर लादली नाही. चर्चा, संवाद किंवा अनौपचारिक गप्पांमधून ते आपला विचार मांडायचे.
 
 
कुरुक्षेत्रातील योद्धा
 
 
कुरुक्षेत्र येथे संस्कार भारतीचा अखिल भारतीय कलासाधक संगम होता. आदल्या दिवशी विक्रमजी आले. त्यांचा दुसर्‍या दिवशी वाढदिवस होता. त्यांना तत्कालीन मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा फोन आला, ‘’उद्या तुमचा वाढदिवस आहे. आम्हाला तुम्ही महाराष्ट्रात हवे आहात.” त्यांनी मला सांगितले की मुख्यमंत्र्यांनी बोलविले आहे, तर काय करू? मग आम्ही आदल्या दिवशी रात्री देशभरातून आलेल्या नाट्यक्षेत्रातील सुमारे 150 जणांना विक्रमजींबरोबर बसविले. प. महाराष्ट्र प्रांताची नाट्यविधा संयोजिका कु. रश्मी देव हिला त्यांची मुलाखत घेण्यास सांगितले. त्या वेळी त्यांनी पाच प्रश्नांना जी उत्तरे दिली, जे मार्गदर्शन केले, त्याची किंमतच होऊ शकत नाही. यावरून विक्रमजींचा या क्षेत्रातील अनुभव, चिंतन केवढे आहे याची अनुभूती माझ्यासकट सर्वांनीच घेतली. त्यांचे हे वैशिष्ट्यच होते, ते कधीही हातचे राखून ठेवायचे नाही. जे काही आपल्याकडे आहे ते संपूर्ण द्यायचे. त्या दिवशी कुरुक्षेत्रातील रणांगणावर त्यांच्या मुलाखतीने जणू काही रणांगण जिंकल्यासारखे वाटत होते.
 
 
राष्ट्रीय कार्यशाळा
 
 
संस्कार भारतीच्या माध्यमातून तीन दिवसांची नाट्य-चित्रशिल्प व प्राचीन कला या तीन कलाविधांची राष्ट्रीय कार्यशाळा रवींद्र नाट्य मंदिर परिसरात आयोजित केली होती. त्या वेळेस अभिनेते प्रमोदजी पवार नाट्यविभाग प्रमुख होते. अनेक सत्रे होती, त्यात अभिनय या विषयाचे दीड तासाचे सत्र कोकण प्रांत अध्यक्ष विक्रमजी गोखले यांना घेण्यास सांगितले होते. नाट्यक्षेत्रात काम करू इच्छिणार्‍या देशभरातील तरुण कलावंतांना जवळपास तीन तास उभे राहून त्यांनी मार्गदर्शन दिले व त्यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवून घेतले. एवढा मोठा अभिनेता एवढा वेळ आपल्या सान्निध्यात राहतो आणि सर्व काही देतो.. सर्वांना अभिनयाची ही पर्वणी होती.
 
 
विक्रमजींच्या सत्रानंतर डॉ. कल्याणी हर्डिकरांचे भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावर सचित्र व्याख्यान होते. विक्रमजींना हे कळल्यानंतर ते म्हणाले की “मी या सत्रात पूर्णवेळ थांबणार आहे” आणि अक्षरश: विद्यार्थी म्हणून त्यात ते सर्वांबरोबर सहभागी झाले. प्रश्नोत्तराच्या वेळी त्यांनीही कल्याणीताईंना प्रश्न विचारले. सत्र संपल्यानंतर त्यांनी बोलून दाखविले की खूप नवीन माहिती मिळाली. नुकतेच प्रकाशित झालेले कल्याणीताईंचे भरतमुनींवरचे पुस्तकही त्यांनी भेट म्हणून विक्रमजींना दिले. कल्याणीताईंच्या विषयाच्या मांडणीवर विक्रमजी खूपच प्रभावित झाले होते.
 
 
काहीतरी चांगले, सशक्त देण्याची सतत तळमळ
 
विक्रमजी पुण्यात कायमचे वास्तव्य करायचे म्हणून आले. त्यांनी सुप्रसिद्ध चित्रपट-नाटक अभिनेते सुनील बर्वे यांच्यावर संस्कार भारती कोकण प्रांताची जबाबदारी सोपविली. पुण्यात आल्या आल्या त्यांनी संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून “मी आलोय, एखादी कार्यशाळा घेऊ” म्हणाले. हात प्लास्टरमध्ये होता, तरीही त्यांनी अभिनेते, दिग्दर्शक, लेखक योगेशजी सोमण यांच्याबरोबर बसून दिवसभर तरुणांची अभिनय कार्यशाळा घेतली. माझ्याकडे असलेला या क्षेत्रातील अनुभव येणार्‍या तरुण पिढीला दिला पाहिजे, ही सतत तळमळ असायची.
 
 
दिलेला शब्द पाळला
 
मला आठवतेय, माझ्या धाकट्या भावाच्या एका जाहिरातीत त्यांनी काम केले. त्या वेळी त्यांची शारीरिक स्थिती नाजूक होती. परंतु एकदा ते काम स्वीकारलेय ना, शब्द दिलाय ना, वेळ दिली आहे ना, मग तडजोड नाही. प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू असताना वायरीत पाय अडकून ते पडले. हाताला प्लास्टर घातले. तरीही त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले. दिलेला शब्द पाळला. कलेच्या क्षेत्रात ही माणसे उगाच मोठी नाही झाली. हिमालयाएवढ्या त्यांच्या अभिनयाला आणि विचारांच्या प्रगल्भतेला मनापासून प्रणाम.
 
 
 
मी स्वत:ला भाग्यवान समजतो. अशा थोर कलावंताचा मला सहवास मिळाला. त्यांचे विचार व मार्गदर्शन ऐकता आले. त्यांच्याबरोबर फोटो काढावा, त्यांची सही घ्यावी असे मला कधीही वाटले नाही, कारण ते जणू काही कुटुंबातीलच ज्येष्ठ सदस्य होते. असे त्यांचे आचरण आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी अनुभवले.
 
 
 
आज विक्रमजी आपल्यात नाहीत, परंतु त्यांनी उभ्या केलेल्या भूमिका समाजाला व नवोदित कलाकारांना सतत प्रेरणा देतील. त्यांनी वेळोवेळी मांडलेले राष्ट्रीय व कलाक्षेत्रातील विचार सर्वांनाच कायम मार्गदर्शक राहतील. कलावंत जातो, परंतु त्याची कलाकृती अजरामर होते. आदरणीय विक्रमजींनी अत्यंत भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो.
 
 
रवींद्र देव
संस्कार भारती
9822098053