चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासमितीच्या बैठकीत काय ठरले त्यापेक्षा तिथे काय घडले, जे अनेकांना दिसले ते महत्त्वाचे आहे. बैठकीत गलवान खोर्यात भारतीय सैन्याबरोबर झालेल्या या चकमकीचे दृश्य दाखवण्यात आले. चीनच्या (आणि तेही शी जिनपिंग यांच्या) ‘बहादुरी’ची फुशारकी मारण्यासाठी इतरही काही ध्वनिचित्रफिती होत्या, त्यात गलवान चकमकीच्या दृश्याचा समावेश करण्यात आला होता. त्यात भारतानेच ही कुरापत काढून चीनच्या हद्दीत घुसखोरी केली, असे सांगायलाही कमी करण्यात आले नाही.
आपल्यापैकी बहुतेक वाचकांना आठवत असेल की, शी जिनपिंग चिनी कम्युनिस्ट पक्षात संकटात सापडले असल्याच्या बातम्या काही काळापासून येत होत्या. मग त्यांचा वारस कोण असेही विचारले जात होते. त्यांचा वारस कोणीही नाही, असे स्पष्ट होताच मधल्या काळात शी कुठेतरी गायब झाल्याच्या बातम्या दिल्या गेल्या. सप्टेंबरमध्ये ते कझाकस्तान आणि उझ्बेकिस्तान यांना भेट देऊन आल्यावर त्यांनी स्वयं-संसर्गरोध म्हणून स्वत:ला समाजापासून दूर ठेवले असण्याची शक्यता आहे, अशाही बातम्या प्रसिद्ध झाल्या. चिनी पोलादी पडदा इतका भक्कम आहे की, त्यातून काही झिरपत येणे अंमळ अवघडच. तरीही पश्चिमी माध्यमे बातम्या देतच राहिली. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासमितीची बैठक जवळ आली, तेव्हा शी यांना कोणताही धोका नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या आणि तेच खरे होते. आपल्याला जे घडावेसे वाटते ते असे सहजासहजी घडतेच असे नाही. तरीही प्रश्न उरतोच, तो असा की समजा, शी सत्तेवरून गेलेच, तर त्यांच्या वारस त्यांच्यापेक्षा महाभयानक नसेलच कशावरून? म्हणजे पुन्हा संकट वाढण्याचाच धोका जास्त. सांगायचा मुद्दा असा की, शी जिनपिंग हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदी आणि चीनच्या अध्यक्षपदी पुन्हा निवडले गेले. चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासमितीची बैठक दर पाच वर्षांनी एकदा भरते आणि तीत नेतेपदावर शिक्कामोर्तब केले जाते. तसे ते या बैठकीत केले गेले. विरोधात एकही मत नाही! विशेष म्हणजे या महासमितीच्या विसाव्या बैठकीसाठी काही खास निमंत्रित होते, त्यात ची फबाओ याची निवड करण्यात आली होती. हा ची कोण? असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण तो एक सर्वसाधारण शिपाई आहे, तोही पीपल्स आर्म्ड पोलिसांमधला एक शिपाई. तो गलवान खोर्यात भारतीय सैन्याबरोबरच्या चकमकीत सहभागी झाला होता. या चिन्यांना झटापटीत भारतीय सैनिकांनी अक्षरश: मागे पाय लावून पळायला भाग पाडले होते. त्या वेळच्या त्या चकमकीत चीनच्या म्हणण्यानुसार चार चिनी मारले गेले आणि 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झाले. भारतीय सैन्याने 38 चिन्यांची प्रेते चिनी सैनिक नेत असल्याचे पाहिले आहे आणि त्याहीपेक्षा अधिक चिनी जखमी झाले. दि. 5 जून 2020 रोजी गलवान खोर्यात ही चकमक झाली.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या महासमितीच्या बैठकीत गलवान खोर्यात भारतीय सैन्याबरोबर झालेल्या या चकमकीचे दृश्य दाखवण्यात आले. चीनच्या (आणि तेही शी जिनपिंग यांच्या) ‘बहादुरी’ची फुशारकी मारण्यासाठी इतरही काही ध्वनिचित्रफिती होत्या, त्यात गलवान चकमकीच्या दृश्याचा समावेश करण्यात आला होता. त्यात भारतानेच ही कुरापत काढून चीनच्या हद्दीत घुसखोरी केली, असे सांगायलाही कमी करण्यात आले नाही. हा चकमकीचा प्रकार स्थानिक म्हणजे ‘लोकल’ असल्याचे सांगण्यात आले. म्हणजे भारतानेच आपल्या भागावर हल्ला केल्याचा त्यांनी लावलेला अर्थ. याचा मी काढलेला अर्थ असा आहे की, या गलवान खोर्यात चीनला जी अद्दल घडली, तिचा चीनला विसर पडलेला नाही. हा ची म्हणजे महासमितीच्या बैठकीसाठी पीपल्स लिबरेशन आर्मीमधल्या निवडलेल्या 304 प्रतिनिधींपैकी एक. म्हणजे तो आहे चिनी कम्युनिस्ट पक्षाचा एक सदस्य. त्याला का निवडले? तर तिथे गलवान खोर्याच्या चकमकीची एक ध्वनिचित्रफीत त्यांना दाखवायची होती. त्यात त्याने आपल्या गेलेल्या सहकार्यांबद्दलही गळा काढला. त्यांचा विसर आपण पडू देऊ शकत नाही, असे त्याचे म्हणणे. शी जिनपिंग यांनी कम्युनिस्ट पक्षाच्या दोन हजार तीनशे प्रतिनिधींसमोर भाषण करण्यापूर्वी शी यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी जे काही गुणगान करणारे कार्यक्रम झाले, त्यापैकीच ही एक ध्वनिचित्रफीत. म्हणजे आपण असेही म्हणू शकतो की चिनी कम्युनिस्ट पक्षाला भारताची चांगलीच धास्ती वाटत असली पाहिजे. चित्रफित गलवानच्या चकमकीविषयी होती आणि त्या चकमकीत भाग घेणारा तिथे उपस्थित होता, यापलीकडे त्याला फारसा अर्थ नव्हता. त्याचा सत्कारबित्कार झाला नाही, हे विशेष. अर्थात सत्कार आणखी वेगळा काय असतो ते पाहायची गरज नाही. हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत प्रारंभीच्या ध्वजसंचलनामध्ये चिनी संघाचे नेतृत्वच या चीकडे देण्यात आले होते. जी चकमक स्थानिक असल्याचे चिनी मानतात, त्या चकमकीत भाग घेणार्या एका शिपायाकडे चिनी संघाचे नेतृत्व देण्यात आल्याचे पाहून भारताने या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार टाकला होता आणि त्याविषयी आपल्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत आपली नापसंतीही व्यक्त केली होती. चीनला या प्रत्येक गोष्टीचेही राजकारण कसे करावेसे वाटते, ते या एका प्रसंगावरून स्पष्ट झाले.
या महासमितीच्या बैठकीत काय ठरले त्यापेक्षा तिथे काय घडले, जे अनेकांना दिसले ते महत्त्वाचे आहे. या बैठकीसाठी निमंत्रितांच्या पहिल्या रांगेत चीनचे माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे माजी महासचिव हू जिंताओ बसलेले होते. कार्यक्रम अजून सुरू व्हायचा होता, पण त्यांना दोघा कार्यकर्त्यांनी ‘तुमची जागा इथे नाही’ असे सांगितले. त्या पलीकडे शी जिनपिंग बसलेले होते. आधीच्या चयांग जमिन यांच्या राजवटीने शिथिल केलेली काही नियंत्रणे हू जिंताओ यांनी परत लागू केली होती. त्या वेळी त्यांना ती आवश्यक वाटत असली पाहिजेत. अर्थात त्यांना तिथून निघा, असे सांगण्यामागे हे काही कारण नव्हते. त्या वेळी हा निर्णय घेताना हू जिंताओ यांच्या दोन उपाध्यक्षांमध्ये एक शी जिनपिंग हे होते. म्हणजे त्यांची त्यास संमती होती, असाही त्याचा अर्थ होतो. अशा एका पूर्वसुरीला आपल्या जागेवरून उठवायचा हा भोचकपणा ज्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिला, त्यातही शी होते. आपण ज्यांच्या जागी नियुक्त झालो आहोत, त्यांना आपल्या जागेवरून हलवायचा प्रसंग हा खरे तर अपमानास्पद मानायला हवा; पण चिनी कम्युनिस्टांच्या एकूणच कार्यपद्धतीत हा अपमानबिपमान मानला जात नसावा आणि कदाचित तो त्यांचा सन्मान राखण्यात आला असावा, असे मानले गेले असेल तर त्यात आश्चर्य मानायचे कारण नाही. हा प्रकार झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यासंबंधीचे दृश्य न्यूज एशियावर सर्वप्रथम दाखवले गेले. दहा वर्षांपूर्वी आपणहोऊन ज्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला, ते हू आपल्यासमोर ठेवण्यात आलेल्या कागदपत्रांच्या अधिकृतपणाविषयी शंका उपस्थित करत होते, हे अनेकांच्या नजरेतून सुटलेले नाही. त्यानंतरच त्यांना तिथे जागा नसल्याचे सांगण्यात आले. यासंबंधी शिन्हुआ या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत त्यांची तब्येत बरी नसल्याने ते बैठकीपूर्वी निघून गेल्याचे म्हटले होते. विशेष हे की, या प्रकारानंतर त्यांचे चिरंजीव हू हाइफेंग यांचे नावही चीनच्या अधिकृत माहितीतून हटवण्यात आले. ज्यांना त्यांच्या जागेवरून हलवले, ते हू पुढल्या महिन्याच्या 21 तारखेला आपल्या वयाची ऐंशी वर्षे पूर्ण करीत आहेत. या सगळ्या बातम्या लक्षात घेतल्या, तर एक गोष्ट निश्चित आहे की पडद्यामागे काही ना काही घडते आहे आणि तिथे सर्व काही सुरळीत नाही. चीनच्या भिंतीमागे बरेच काही दडलेले असते, मात्र ते घडून गेल्यावर काही दिवसांनी जगाला कळत असते, म्हणूनच याही विसाव्या काँग्रेसविषयी आपल्याला पुढेमागे अधिकृतपणे माहीत होईल.
आता थोडे मागे वळून पाहू या. सगळ्यांचे राजकीय पितामह माओ झेडाँग हयात असताना त्यांनाही आपल्याला सत्ता गमवावी लागणार, अशी भीती वाटत असे. अगदी मृत्युशय्येवर असताना त्यांनी लिऊ श्याओ ची यांना बोलावून घेतले, पण त्यांना काही बोलता येईना, म्हणून ते थांबले. आपल्याविरोधात कोणी काही कारवाया करतो आहे किंवा काय, असे त्यांना वाटत राहायचे. 1971मध्ये माओ यांच्या तब्येतीविषयीच्या बातम्या येऊ लागल्या आणि त्यातच लिन बिआओ आणि लिऊ श्याओ ची हे आपल्याविरोधात गेले आहेत आणि त्यांचे कारस्थान आकाराला येण्याची चिन्हे दिसत आहेत, हे माओंच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या सुरू केल्या. तिकडे झाऊ एनलाय (आपल्याकडे त्यांचा उच्चार आधीपासून चौ एनलाय असा चुकीचा केला जात होता. तसे ते माओत्से तुंग यांच्या नावाच्या उच्चाराबाबतही होते.) यांनी कोरियन युद्धानंतर एकदमच पवित्रा बदलला आणि आपल्याला शांततापूर्ण सहजीवन हवे असल्याची बतावणी सुरू केली. आपल्याला पश्चिमेशी चांगले संबंध हवे असल्याचे झाऊ सांगू लागले. 1954मध्ये जिनिव्हा परिषद आणि 1955ची बांडुंग परिषद यांनी झाऊ यांना जागतिक पटलावर एक स्वतंत्र स्थान देऊ केले. 1972मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या घडवून आणलेल्या भेटीने अमेरिका, तैवान, सोविएत युनियन, भारत, कोरिया आणि व्हिएतनाम याविषयीच्या भूमिकांचा नव्याने शोध घेतला जाऊ लागला. मात्र त्याआधीच्या काळची एक गोष्ट सांगितली जाते, ती अशी की सोविएत युनियनचे पंतप्रधान निकिता ख्रुश्चोव्ह यांच्याकडे अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर यांनी मागणी केली की, चीनकडे अमेरिकेच्या पकडलेल्या दोघा वैमानिकांना सोडून देण्यासाठी त्यांनी रदबदली करावी. हे दोघे वैमानिक अमेरिकेसाठी हेरगिरी करत होते, असा आरोप होता. त्याच वेळी ख्रुश्चोव्ह यांनी चीनकडे त्यांनी भारतावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. चीनने भारतावर हा हल्ला करण्याची काहीही आवश्यकता नव्हती, असे आपले मत त्यांनी चीनकडे व्यक्त केले. तेव्हापासून चीनला सोविएत युनियनविषयी संशय वाटू लागला. भारत आणि चीन यांनी आपल्यातले वाद मॅकमहॉन रेषेला मान्य करून मिटवावेत, असेही त्यांनी चीनला सांगितले. त्यावर माओ उसळले आणि त्यांनी ख्रुश्चोव्ह यांना “तुमचा या प्रकरणाशी काय संबंध?” असा सवाल केला. माओ यांच्या दृष्टीने तैवानविषयी अमेरिका जी भूमिका घेत आली आहे, त्यापेक्षाही भारताविषयीची त्यांची भूमिका काकणभर अधिकच विषारी होती. चीनने कधीही मॅकमहॉन रेषा मान्य केलेली नाही, त्या देशास त्यांना ती मान्य करायला सांगणे हा अधिकच अधिक्षेपाचा प्रकार होता. एका कम्युनिस्ट देशाने आपल्याला खाली मान घालायला लावल्याचा समज त्यांनी करवून घेतला. तेव्हापासून सोविएत युनियनबरोबरचे चीनचे संबंध खालावले. ख्रुश्चोव्ह चीनच्या दौर्यावर असताना त्यांनी आपल्याला हे सुनवावे, याचा त्यांना अधिक राग आला. दुसर्या दिवसापासून ख्रुश्चोव्ह यांनी माओ यांच्याशी चर्चा सुरू ठेवली, तरी त्यांची धुसफुस चालूच होती. दरम्यान ख्रुश्चोव्ह यांनी ‘शंभर फुले उमलू द्या’ या घोषणेवर टीका केली. ‘ग्रेट लीप फॉरवर्ड’वरही ते बोलले. माओ यांना ते रुचणारे नव्हते. आणि जाता जाता ख्रुश्चोव्ह यांनी आपण चीनला अधिक मदत देऊ शकत नसल्याचे माओंना सांगितले. त्यानंतर सगळेच चित्र बदलले होते.
हे सर्व सांगायचे कारण असे की चीनचे तसे काहीच खरे नसते. शी जिनपिंग यांनी या खेपेच्या महासमितीत केलेल्या 104 मिनिटांच्या भाषणात अमेरिकेचा अनेकदा उल्लेख केला. अमेरिकेच्या ‘इंडो-पॅसिफिक’मधल्या ‘प्याद्यां’चा उल्लेख केला आणि अर्थातच तैवानचा उल्लेख करून सांगितले की, हा आमचा अंतर्गत प्रश्न आहे आणि तो कसा सोडवायचा ते आम्ही ठरवू. शी यांची चीनच्या अध्यक्षपदी तिसर्यांदा निवड झाली, ती ऐतिहासिक होती, असे बहुतेकांनी म्हटले आहे; पण दोन वेळच्या अध्यक्षपदाचे बंधन गेल्या खेपेला उधळून लावण्यात आले आणि तेव्हा ते तहहयात अध्यक्ष बनले असल्याचे माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते, त्याविषयीचा उल्लेख आता या बैठकीत कोणीही केला नाही. त्याचा या माध्यमांनाही सोयीस्कर विसर पडलेला आहे. आपली स्मृती तात्पुरती असते, ती ही अशी. या खेपेला त्यांची फेरनिवड झाली हे खरे, पण म्हणजेच ते तहहयात राहिलेले नाहीत, हेही तितकेच खरे. तहहयातपणाचे भूत त्यांच्या मानगुटीवरून त्यांच्याच राजकीय मंडळाने उतरवले आहे, असाही त्याचा अर्थ. थोडक्यात चिनी राजकारणाच्या पोटात आधीपासून काहीतरी शिजत होते हेही तितकेच खरे. आपल्या भाषणात शी यांनी आपण ‘बळाचा वापर करणार नाही असे आश्वासन देऊ शकत नाही’ असे जे म्हटले ते त्यांच्या विरोधकांसाठी होते, असे म्हटले तरी चालेल. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्या भाषणात ‘सुरक्षा आणि सुरक्षितता’ हे शब्द 89 वेळा वापरले, याचा अर्थ त्यांना नाही म्हटले तरी पुढल्या पाच वर्षांत काय होईल याची चिंता वाटत असली पाहिजे, असा घेता येतो. सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाच्या चीनमध्ये कंपन्या उभ्या करून आणि अधिकाधिक गुंतवणूक करून ज्यांनी चीनला मोठे केले, त्या अमेरिकेने आता आपल्या कंपन्यांवर बंधने घालून चीनला दणका देऊ केला आहे. तो किती काळ टिकतो ते पाहायचे, पण अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी शी यांच्या ‘प्रवचना’नंतर घेतलेला हा निर्णय आहे आणि त्याचे थोडक्यात वर्णन करायचे तर हे वेगळ्या प्रकारचे ‘युद्ध’ सुरू करून चीनला उत्तर दिले जाणार आहे. चीनने गलवान सोडा, आपल्या उशाखाली काय ठेवले गेले आहे ते आता पाहायची आवश्यकता आहे आणि हाच चीनला दिला गेलेला ‘संदेश’ आहे.