समाजाच्या प्रयत्नातून पारंपरिक बियाणे संवर्धन

विवेक मराठी    19-Nov-2022
Total Views |
@जुई पेठे
2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. भारताला भरडधान्यांचा मोठा वारसा लाभला आहे. पारंपरिक शेती पद्धतीचे आणि पारंपरिक बियाणांचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पारंपरिक बियाणे संवर्धन यासह शेती विषयांत महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या सेवा संस्थांचा परिचय करून देत आहोत.

krushi
 
सातपुड्याच्या दुर्गम भिल्ल गावांत पीक कापणीचा हंगाम दिवाळीच्या आसपास सुरू होतो. कापणी करून शेत रिकामे झाले की त्यामधील पिकांचे अवशेष, उगवलेले गवत काढून तिकडे खळ तयार केले जाते. मळणीचे काम सुरू करण्याअगोदर खळ्याची पूजा होते. या पूजेत साफ केलेल्या पालापाचोळ्याचा ढीग रचतात, त्यावर शेण-पाणी-मातीचा थर देऊन या ढिगाची पूजा करून त्याचेसुद्धा आभार मानतात. परिसरातील जीवजंतू-पालापाचोळ्याशी इतका समरस होणारा हा जनजाती समाज!
 
 
 
यांची शेती पद्धतीसुद्धा स्वत:च्या कुटुंबाबरोबरच जनावरांची, जमिनीची काळजी घेते. शेतकर्‍यांना धान्य, जनावरांना चारा-वैरण आणि शेताला खत असे सर्वच यातून मिळते. स्थानिक भौगोलिक-जैविक परिस्थिती व उद्भवू शकणार्‍या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन, परिसराच्या क्षमता व मर्यादा यांचे भान राखून माणूस, जनावरे व जमीन यांचे पोषण करणारी, वर्षानुवर्षाच्या अनुभवांवर उभी राहिलेली ही एक अद्भुत व्यवस्था आहे.
 
 
‘रीड्स’ ही संस्था महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण अशा विविध राज्यांमध्ये स्थानिक संस्था-संघटनांना नैसर्गिक संसाधन आधारित उपजीविकांच्या बळकटीकरणासाठी शास्त्रीय व तांत्रिक सहकार्य करते. या विषयात जल-जमीन-जंगल-पशुधन हे सर्वच विषय अंतर्भूत आहेत. परंपरागत शेती ही या सर्व संसाधनांची काळजी वाहणारी व्यवस्था असल्यामुळे शेती हा रीड्सच्या कामातील एक महत्त्वाचा आयाम आहे. पारंपरिक बीज, स्थानिक सेंद्रिय निविष्ठा व भूमीसुपोषण हे रीड्सच्या शेतीविषयक कामातील प्रमुख focus आहे.
 
 
krushi
 
शाश्वत धारणाक्षम शेती
 
 
पारंपरिक शेती पद्धतीत भरड धान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, इ. अनेक पिके एकत्रितपणे लावली जातात. दुष्काळ, ढगफुटी, गारपीट, वादळ, पूर, याच्यामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाले तरी इतर पिके तग धरून राहतात. माणसांच्या आणि जनावरांच्या पोटाला पुढील वर्षी आधार देतात.
 
 
 
नवीन शास्त्रीय अभ्यासानुसार या पद्धतीला मिश्र पीक पद्धती (mixed cropping system) असे म्हटले जाते. पिकांच्या मुळांची व फांद्यांची रचना, जमिनीची सुपीकता, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, वार्‍याचा वेग या सर्व संसाधनांचा पुरेपूर वापर या पद्धतीत होतो. एका पिकाचे अवशेष हे दुसर्‍या पिकासाठी संसाधन किंवा पोषण म्हणून काम करते. अनेक प्रकारच्या वनस्पती शेतात विखुरल्या असल्यामुळे रोग-किडींचा प्रादुर्भाव मर्यादित राहतो. (ETL - economic threshold level.) विविध पिकांमधील सहसंबंधांमुळे मिश्र पीक पद्धती अधिक स्वयंपूर्ण असते व यात बाहेरच्या संसाधनांची आवश्यकता कमी भासते.
 
 
 
पारंपरिक पीक पद्धतीत स्थानिक खाद्यसंस्कृती, हवामान, जमीन, पाण्याच्या उपलब्धता अशा सर्व बाबींचा विचार केला जातो. अशा मिश्र लागवडीसाठी शेतकर्‍यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप पिकांची विविध वाणे तयार केली व पिढ्यानपिढ्या सांभाळून ठेवली.
 
 
परिसरातील काही वैशिष्ट्यपूर्ण वाण
 
 
ज्वारीचे वाण -
 
 
हलक्या जमिनीत, लवकर तयार होणारी स्वादिष्ट ‘ओहवी जुवार’.
 
 
स्थानिक देवता ‘देवमोगरा’ हिची लाडकी, पांढरीशुभ्र, गोड चवीची, टपोर्‍या दाण्यांची, रोगप्रतिकारक ‘दूधमोगरा जुवार’.
 
 
लाल रंगाची, चिकट, पापडांसाठी योग्य, पीठ पुष्कळ दिवस चांगले राहू शकणारी ‘चिकणी जुवार’.
 
 
हलक्या जमिनीत येणारी, पक्ष्यांना खाता न येणारी ‘पाखरी जुवाई’.
 
 
उंच वाढणारी, चांगला चारा निर्माण करणारी, गोड दाणे असलेली, ‘जेखराळी माणिजुवाई’. या ज्वारीचे एकदा उत्पन्न काढून पुन्हा खोडवा घेता येतो.
 
 
krushi
 
मक्याचे वाण -
 
 
हलक्या जमिनीत येणारा मोठ्या दाण्यांचा मका ‘वोडा डोडा’.
 
 
दुष्काळ व अन्नतुटवडा असताना लवकर परिपक्व होणारा, रंगीत मका ‘ओहवा राअता डोडा’.
 
 
भाजीपाल्याचे वाण -
 
 
सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवण क्षमता असणारा, लहान आकाराचा, लाल भोपळा ‘साकियो कोयलो’.
 
 
होळीच्या पवित्र नृत्यात पाळण करणार्‍याच्या कमरेला बांधले जाणारे सुरईच्या आकाराचे दुधी भोपळे - ‘तुंबाडे’.
भगरीचे प्रकार -
 
 
अतिपावसात पिके कुजून गेली, तर जमीन पुन्हा तयार करून भाद्रपदामध्ये लावता येणारा, दवाच्या ओलाव्यावर वाढू शकणारा ‘मोर’ हा भगरीचा प्रकार.
 
 
हिवाळ्यात पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी चारा व धान्यासाठी वापरली जाणारी ‘पादी’ नावाची भगर.
 
 
बियाणे निर्मितीचा भारतीय वारसा आणि सद्य:स्थिती
 
 
अशा प्रकारच्या अनेक वाणांना नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम गावांमधील जनजाती शेतकर्‍यांनी पिढ्यांपिढ्या राखून ठेवलेल्या आहेत. कमी-अधिक प्रमाणात देशभरातील जनजाती शेतकर्‍यांचे असेच योगदान आहे. देशभरातील अनेक पारंपरिक वाणांच्या निर्मितीचे, संगोपनाचे व संवर्धनाचे श्रेय त्यांना जाते.
 
 
 
बियाणे निर्मितीमधील इतका उज्ज्वल वारसा असूनही दुर्दैवाने सद्य परिस्थितीत भारतातील बहुतांशी बीज संशोधनाचा दृष्टीकोन अतिशय एककल्ली व संकुचित आहे. अधिक उत्पादन देणार्‍या, सिंचन-रसायनांना चांगला प्रतिसाद देणार्‍या वाणांच्याच निर्मितीची चढाओढ लागून राहिली आहे. स्वाभाविकच पीक पद्धतींच्या शिफारशीदेखील अशाच प्रकारे केल्या जातात. यातून शेतीच्या उत्पादन खर्चात बेसुमार वाढ होते. हा खर्च बियाणे, विविध रासायनिक निविष्ठा, मशागतीची अवजारे यामध्ये विभागला आहे. बाहेरून खरेदी केलेल्या संसाधनावर शेतकर्‍याचे अवलंबित्व वाढत चालले आहे. मोनोकल्चर / एक पीक पद्धतीचा विस्तार होताना दिसतो. खर्चाचा ताळेबंद बसवण्यासाठी शेतात एकाच प्रकारचे पीक, किंबहुना एकाच वाणाचे पीक घेतले जाते. यातून शेतकरी कुटुंब आपली अन्नसुरक्षा गमावतात. तसेच चारा, कडबा, खत हेदेखील मिळत नाही. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे नुकसान झाले किंवा रोग-किडींचा प्रादुर्भाव झाला, तर त्या हंगामात संपूर्ण नुकसान होऊन शेतकर्‍यावर उपासमारीची वेळ येते. आर्थिक गुंतवणूक भरमसाठ असल्यामुळे अनेक वेळा शेतकरी कर्जबाजारी होऊन जातात.
 
 
दृष्टीकोन विकासाची स्वाभाविक प्रक्रिया
 
 
या परिस्थितीबाबत सर्व शेतकरी अनभिज्ञ आहे असे मात्र नाही. अक्कलकुवा तालुक्याच्या पहाडी भागात ‘मोलगी परिसर सेवा समिती’ नामक स्थानिक जनजाती शेतकर्‍यांची संघटना आहे. ‘योजक - सेंटर फॉर रिसर्च अँड स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट’च्या मार्गदर्शनातून ते आपल्या परिसराचा अभ्यास व धारणाक्षम विकासाची प्रक्रिया करत आहेत. मागील काही वर्षांत सातपुड्यातील पावसाचे स्वरूप बदलले आहे, तो उशिरा सुरू होऊन पार नोव्हेंबरपर्यंत लांबतो, असे त्यांनी अनुभवातून नोंदवले आहे. अशा परिस्थितीत दाणे भरण्याच्या काळातील पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिशवीबंद हायब्रीड ज्वारीचे खूप नुकसान होते. धान्य तर हाती लागत नाहीच, तसेच हायब्रीड ज्वारी उंचीने कमी असल्यामुळे यातून जनावरांच्या चार्‍याचीही व्यवस्था होऊ शकत नाही. मात्र या बदललेल्या पर्जन्यमानात ‘दूधमोगरा’ हे पारंपरिक वाण 8-10 फूट उंची गाठते, त्याचे कणीसदेखील हायब्रीड ज्वारीपेक्षा मोठे आणि दाणे टपोरे असतात. कणीस मोकळे व सैल असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी अडकून राहत नाही व बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव टळतो. पारंपरिक दूधमोगरा ज्वारी लावण्याकडे शेतकर्‍यांचा पुन्हा एकदा कल वाढला आहे.
 
 
 
हवामान बदलाच्या या काळात पारंपरिक वाणांचे महत्त्व वाढत जाणार, हे तर उघडच आहे. दुर्दैवाने आधुनिकीकरणाच्या ओघात अनेक स्थानिक वाणे नोंदणी होण्याअगोदर लोप पावली आहेत. पारंपरिक वाणांच्या नोंदणीचे काम मोठ्या स्तरावर तातडीने सुरू होणे अतिशय गरजेचे आहे. योजकच्या मार्गदर्शनातून ‘रीड्स’ व कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या मदतीने सुजाण सामाजिक संघटनांनी पारंपरिक वाणांची सहभागीय नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. या नोंदणीमध्ये अधिकाधिक समाजघटकांना सहभागी कसे करून घेता येईल, यावर भर असतो. अशा प्रकारच्या लिखित नोंदींमुळे या पारंपरिक ज्ञानाचे अधिकार - - Intellectual Property Rights (IPR) जनजाती समाजाकडे राहायला मदत होईल. महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळाने या नोंदणी कार्यक्रमाची दखल घेऊन, या माहितीचे पुस्तकस्वरूपात प्रकाशन केले.
 
 
परिसरात बाइफ (BAIF)सारख्या संस्थेनेदेखील ज्वारी, मका इ. वाणांची नोंदणी केली आहे.
 
 
जिवंत वाण
 
 
वाणांचे संवर्धन करणे म्हणजे ते साठवून ठेवणे एवढेच नसते. बदलत जाणार्‍या हवामान परिस्थितीत स्वत:च्या जनुकीय घडणीत अनुकूलन करत राहण्याची संधी बियाणाला मिळत राहण्यासाठी त्यांची योग्य हंगामात पेरणी होणेदेखील तितकेच आवश्यक आहे. नैसर्गिक अनुकूलनाबरोबरच योग्य निवड संस्कारांमधून बियाणाची कणसे निवडली जाणे, त्यांची योग्य साठवणक होणे व पेरणीपूर्वी योग्य बीजप्रक्रिया करणे हे सर्वच महत्त्वाचे असते. या सर्व प्रक्रियेतूनच दुर्गम भागातील शेतीला climate resilience प्राप्त होईल.
 
 
या दृष्टीकोनातून मोलगी परिसरात एकलव्य आदिवासी विकास मंडळाच्या वतीने कंजाला येथे मेराली जैवविविधता केंद्र या नावाने पारंपरिक बियाणांचा संग्रह केला आहे. यामध्ये ज्वारीची 62, भाताची 25, मक्याची 3, चवळीची 18, वालपापडीची 22 वाण नोंदवली गेली आहेत. ती शेतकर्‍यांना वेळोवेळी पुरवली जातात.
 
 
तात्पर्य
 
 
स्थानिक जनजाती समाजाचे कुलदैवत ‘देवमोगरा देवी’सुद्धा कृषिदेवता आहे. तिच्या दर्शनासाठी जाताना सोबत भात-ज्वारी-मका बीज घेऊन जाण्याची पद्धत आहे. मातेच्या मंदिरात मोठ्या कणग्यांमध्ये आपापला बियाणांचा चढावा जमा केला जातो. दर्शनासाठी तीन राज्यांमधील भिल-मावची-पावरा-तडवी समाज येतो व कणग्यांमध्ये बियाणे जमा करतो. परत फिरताना या कणगीतील मूठ-मूठ धान्य प्रसाद म्हणून माघारी नेले जाते. घरच्या बियाणांत ते मिसळून पुढील हंगामात त्याची पेरणी करतात. आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने जनुकीय वैविध्यातून बियाणाला स्थैर्य व तग धरून राहण्याची क्षमता वाढते. अशा परांपरांमुळे या दुर्गम भागातील समाज व त्यांची शेती दीर्घकाळ टिकून राहिली आहे.
 
 
 
स्थानिक परिस्थितीला अनुकूल परंपरागत बियाणे हा आपल्या देशाचा मोठा वारसा आहे. शेती व बियाणे विषयातील भारतीय शेतकर्‍यांच्या उन्नत ज्ञानाचे हे द्योतक आहे. या वारशाचा योग्य मान राखणे आवश्यक आहे. ही बियाणे व त्यांच्याशी जोडलेले पारंपरिक ज्ञान संकलित करणे, त्याचे संरक्षण, संवर्धन करणे, शेतकर्‍यांनी ते पेरत राहणे हेच या ज्ञानपरंपरेचे आधुनिक पूजन ठरेल.
 
 
लेखिका रीड्स, महाराष्ट्र संस्थेच्या प्रकल्प समन्वयक आहेत. तसेच भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या PPVFR Authorityच्या सदस्य आहेत.
 
 
jui.pethe@reedsbharat.org