सर्व काही सत्ततेसाठी...

19 Nov 2022 15:38:12
 
 
congress
गांधीजी रामभक्त होते आणि नेहरू-सोनिया काँग्रेस रामविरोधी होते. अयोध्येत राममंदिर कसे उभे राहाणार नाही यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. अशी काँग्रेस हिंदू प्रिय होणे शक्य नाही. राहुल गांधी यांचे सल्लागार त्यांना योग्य सल्ला देत नाहीत, असा याचा अर्थ झाला. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ए.के. अँथोनी यांनी काँग्रेस पराभूत का होते, याचा अहवाल दिला होता. त्यात त्यांनी असे म्हटले की, काँग्रेस हिंदू विरोधी आहे असे हिंदू जनतेला वाटते. राहुल गांधी यांनी तो अहवाल वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे त्यावर मनन-चिंतन करायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक हा राजकीय घाट्याचा धंदा हे त्यांना निवडणुकांत फटके खाल्यानंतर लक्षात येईल. 
 
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात चालू असताना राहुल गांधी यांनी सावरकरांवर काही आरोप केले, ते आरोप सर्व वर्तमानपत्रांतून आलेले असल्यामुळे त्यातील केवळ दोन-तीन वाक्यच आपण इथे घेऊया...
 
 
‘स्वातंत्र्यवीर सावरकरांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आल्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीपत्रे लिहायला सुरुवात केली होती.’ ‘देशविरोधी कृत्ये करण्यासाठी इंग्रजांनी सावरकरांना साथ देण्यास सांगितले आणि त्यांनी त्यानुसार इंग्रजांना मदतदेखील केली.’
 

 

साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान

 

 

https://www.evivek.com/hindutva-granth/

 


 

 
 
राहुल गांधी यांनी बाळासाहेबांची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि उद्धव सेना यांना एक समान कार्यक्रम दिला. या बद्दल त्यांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. गेल्या जूनपासून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भोवतीच राजकारण फिरत आहे. शिवसेना फुटली आहे आणि दोन्ही शिवसेनांवरून राहुल गांधी यांचा निषेध केला आहे. पुढे काय घडेल हे बघावे लागेल.

congress
 
सावरकर यांच्यावर राहुल गांधी यांचे आरोप नवीन नाहीत. गेले आठ-दहा वर्षे सातत्याने हे आरोप ते करीत असतात. आरोप झाले की त्याचे खंडन सावरकरांची भक्तमंडळी करत असतात. राहुल गांधी यांना खंडनाची गरज नाही. सावरकरांचे माफिनामे चुक की बरोबर हा विषयदेखील नाही. सावरकर कसे बरोबर होते हे पटवून देण्याचाही विषय नाही. हे एक राजकारण आहे आणि ते नीट समजून घ्यायला पाहिजे.
 
 
राहुल गांधींची अशी वक्तव्ये वाचल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, राहुल गांधी बावळट आहेत का? मुर्ख आहेत का? त्यांना सावरकर समजलेच नाहीत का? असले सर्व प्रश्न एकाअर्थाने निरर्थक आहेत. राहुल गांधी मुर्ख नाहीत, बावळटदेखील नाहीत आणि फार विचारपूर्वक सावरकर हा विषय त्यांनी घेतला आहे आणि त्या मागचे त्यांचे राजकारण आहे. ते कोणते राजकारण आहे?
 
हे सत्तेचे राजकारण आहे. 2014 साली काँग्रेसची सत्ता केंद्रातून गेली. राहुल गांधी यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न धुळीला मिळाले. 2019 साली त्याची पुनरावृत्ती झाली आणि 2024 साली पुन्हा तेच घडणार आहे. जे अटळ आहे, ते रोखण्यासाठी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ चालू आहे. त्यांनी दोन भूमिका घेतल्या आहेत. एक नैतिक आणि दुसरी वैचारिक. सर्वांना प्रेमाने जोडायचे आहे, ही नैतिक भूमिका आहे. संघ, भाजपा आणि सावरकर यांचा विरोध ही वैचारिक भूमिका आहे. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची वैचारिक भूमिका मुख्यत: हिंदू विरोधाची होती. तुष्टीकरणवाद, जातवाद ही त्यांची दोन अंगे होती. तुष्टीकरणवादाने काश्मीरला वेगळा दर्जा देणारे 370 कलम आले. समान नागरी कायदा नाकारला गेला. जातवादामुळे वेगवेगळ्या जातींचे अस्मिता राजकारण सुरू झाले. परराष्ट्र व्यवहारात हातात भिकेचेकटोरे घेऊन जगाला नैतिक उपदेशामृत पाजणे, हा विषय सुरू झाला. काँग्रेसी समाजवादामुळे सरकारीकरण, प्रशासकीय भ्रष्टाचार आणि विकासाचा दर साडेतीन टक्के झाला. देशाची औद्योगिक ऊर्जा मारली गेली.
 
 
भाजपा आणि नरेंद्र मोदी यांनी 180 कोनात देश वळविला. आता विकासाचा दर सात-आठ टक्के असतो. तुष्टीकरणाला मुठमाती देण्यात आली. काशी कॉरिडॉर आणि अयोध्येतील राममंदिर ही त्याची दोन ज्वलंत उदाहरणे आहेत. 370 कलम काढून टाकण्यात आले. तिहेरी तलाख बंद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता लवकरच धर्मांतरविरोधी कायदा होईल. याचा अर्थ नेहरूंची विचारधारा अडगळीत गेली असून आता देशाची सनातन विचारधारा अग्रक्रमावर आलेली आहे.
 
 
या विचारधारेचे वैचारिक प्रतिनिधीत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ही विचारधारा खेडोपाडी आणि घरोघर नेली. भारतीय जनता पक्षाने ही विचारधारा कार्यक्रमांत परावर्तित केली. राहुल गांधी यांना ही विचारधारा नको आहे. त्यांना पुन्हा काँग्रेसचे दिवस आणायचे आहे आणि त्यासाठी ते संग्रम करीत आहेत.
राहुल गांधी आपल्यापरिने लढत आहेत. माझे राज्य गेले, गद्दारी झाली, अशी मुक्ताफळं ते उधळत नाहीत. लढणार्‍या योद्धयाचा आदर केला पाहिजे. जरी त्याने चुकीचे रणांगण आणि चुकीची रणनीती आखली असली तरी. रडण्यापेक्षा लढणे हे नेहमी चांगले. सावरकरांची राहुल गांधी यांनी बदनामी केली म्हणून त्यांच्या प्रतिमेला जोडे मारणे चांगले नाही. त्यांच्या कष्टाला दाद दिली पाहिजे आणि ‘बेटा तू चुकीच्या मार्गाने निघाला आहेस,’ म्हणून सहानुभूती व्यक्त केली पाहिजे. सावरकरांना बदनाम करून सावरकरांची विचारधारा बदनाम होत नाही. हिंदुत्वाच्या अश्वमेधाला आता कोणीही रोखू शकत नाही. यात्रा आपल्याला नवीन विषय नाही आणि त्यामुळे यात्रा बघायला, राजीव गांधी यांना बघायला गर्दी होणे स्वाभाविक असते. ही गर्दी म्हणजे स्वीकृती नसते. परिपक्व राजनेत्याला हे समजतं. राहुल गांधी यांना हे किती समजतं, हे त्यांचं त्यांना माहीत.
आपला देश सनातन आहे. त्याची एक प्राचीन विचार परंपरा आहे. या देशाचे एक जीवनदर्शन आहे. पंडित नेहरू या सर्वाचे प्रतिनिधीत्व करीत नव्हते. काँग्रेसमध्ये याचे प्रतिनिधीत्व महात्मा गांधीजी करीत होते. ते आपल्यापरिने हिंदू जीवनपद्धती जगत होते. राजकीय अर्थाने ते नेहरूंसारखे काँग्रेसी नव्हते. ते सनातनी राष्ट्रीय होते. काँग्रेस महात्मा गांधींचा वारसा सांगते, परंतु गांधीजींच्या हिंदू वर्तनाला लाथ मारते. म्हणून काँग्रेसचे मुखवटे फाडायचे असतील तर, महात्मा गांधीजींचे हिंदुत्व काय होते, याचा अभ्यासही केला पाहिजे आणि ते लोकभाषेत मांडले पाहिजे. गांधीजी रामभक्त होते आणि नेहरू-सोनिया काँग्रेस रामविरोधी होते. अयोध्येत राममंदिर कसे उभे राहाणार नाही यासाठी काँग्रेसने जीवाचे रान केले. अशी काँग्रेस हिंदू प्रिय होणे शक्य नाही. राहुल गांधी यांचे सल्लागार त्यांना योग्य सल्ला देत नाहीत, असा याचा अर्थ झाला. काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते ए.के. अँथोनी यांनी काँग्रेस पराभूत का होते, याचा अहवाल दिला होता. त्यात त्यांनी असे म्हटले की, काँग्रेस हिंदू विरोधी आहे असे हिंदू जनतेला वाटते. राहुल गांधी यांनी तो अहवाल वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे त्यावर मनन-चिंतन करायला पाहिजे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर चिखलफेक हा राजकीय घाट्याचा धंदा हे त्यांना निवडणुकांत फटके खाल्यानंतर लक्षात येईल.
 
 
 
नेहरू यांची विचारधारा, स्वातंत्र्यवीर सावरकरांसहित सर्व हिंदुत्ववादी प्रवक्त्यांशी लढू शकत नाही. स्वातंत्र्यनंतरही ती एक अवस्था होती, त्या अवस्थेत तिला यश मिळाले. मुसलमान, ख्रिश्चन, दलित यांची व्होटबँक त्यांनी तयार केली. ती अनैसर्गिक असल्यामुळे तीही फारकाळ टिकलेली नाही. कॅथलिक सोनियामुळे केरळ आणि इतर राज्यांतील कॅथॉलिक, कॅथलिक सोनिया काँगे्रसच्या मागे आहेत. ते राहुल गांधींना निवडून देऊ शकतात, पण पंतप्रधान करू शकत नाहीत. हिंदू जनतेने आपला पंतप्रधान निवडलेला आहे आणि त्याचे नाव आहे, नरेंद्र मोदी.
 
 
नरेंद्र मोदी आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये दोन ध्रुवांचे अंतर आहे. नेहरू कधी मंदिरात गेले नाहीत. कोणत्याही मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला नाही. पंतप्रधान मोदी गंगेची आरती करतात, केदारनाथला जातात आणि राममंदिराचे भूमीपूजन करतात. तरीही ते सेक्युलर आहेत. सेक्युलॅरिझम म्हणजे हिंदू विरोध, असे नेहरूंचे धोरण होते आणि सेक्युलॅरिझम म्हणजे सर्व धर्ममतांचा आदर-सन्मान हे मोदींचे धोरण आहे. मोदींचे हिंदुत्व विकासाच्या असंख्य कार्यक्रमांतून प्रकट होते आणि आंतरराष्ट्रीय धोरणांतदेखील प्रकट होते. पंडित नेहरूंविषयी असे म्हटले गेले की, ते शेवटचे ब्रिटीश राज्यकर्ते होते आणि नरेंद्र मोदी यांच्याविषयी म्हटले जाते की, ते सनातन भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. कालचक्र कोणाला उलटं फिरवता येत नाही. राहुल गांधी तसा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना कोणती विशेषणं लावायची हे वाचकांवर सोडून देतो.
- रमेश पतंगे
Powered By Sangraha 9.0