नेतृत्वाची नवी संधी

17 Nov 2022 19:00:53
भारताकडे बघण्याचा जगातील विकसित राष्ट्रांचा दृष्टीकोन बदलत आहे आणि भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढत आहेत. बाली येथील शिखर परिषदेत या दोन्हीचे ठळक प्रतिबिंब दिसले. या परिषदेत नरेंद्र मोदी यांचा सहभाग लक्षवेधी म्हणावा असा होता. या परिषदेत चर्चा झालेल्या जागतिक समस्या, त्यावर भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या मांडणीला सर्व राष्ट्रप्रमुखांनी गांभीर्याने घेणे, शांघाय सहकार्य परिषदेत नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिलेल्या, ‘सध्याचे युग युद्धाचे नाही’ या थेट इशार्‍याचा परिषदेच्या ठरावाच्या मसुद्यात एकमताने अंतर्भाव होणे हा सगळा घटनाक्रम म्हणजे भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत असलेल्या प्रभावाचे प्रतीक आहे.
 
vivek
 
इंडोनेशियातील बाली येथील ‘जी-20’ शिखर परिषदेची नुकतीच सांगता झाली. आग्नेय आशियातल्या आर्थिक संकटांचा सामना करण्याच्या उद्देशाने 1999मध्ये ‘जी-20’ची निर्मिती झाली. युरोपीय महासंघासह एकोणीस देशांच्या प्रमुखांचा सहभाग असलेली ही एक मोठी आणि शक्तिशाली जागतिक संघटना आहे. एकूण जागतिक उत्पादनातला 80 टक्के वाटा या जी-20चे सदस्य असलेल्या देशांचा आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात 60 ते 70 टक्के वाटाही या देशांचा आहे. या संघटनेचे जागतिक स्तरावरील महत्त्व लक्षात यावे, यासाठी टक्केवारीचा उल्लेख.
 
 
 
पूर्वनियोजनाप्रमाणे पुढील वर्षी या परिषदेचे यजमानपद भारताकडे असेल. त्याच्या अध्यक्षपदाचे सुकाणू नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपविण्यात आले. ‘भारताकडील अध्यक्षपदाचा हा कालावधी सर्वसमावेशक, महत्त्वाकांक्षी, निर्णायक व कृतिप्रवण असेल’ असे सांगतानाच, ‘जी-20 ही नवे जागतिक आयाम निर्माण करणारी संघटना घडवू’ असा विश्वासही मोदी यांनी या प्रसंगी व्यक्त केला. येत्या 1 डिसेंबरपासून भारताचा हा कालावधी सुरू होत आहे. हे अध्यक्षपद पूर्वनियोजित असले, तरी ती एक जबाबदारी आहे आणि बहुमानही आहे.
 
 
 
भारताकडे बघण्याचा जगातील विकसित राष्ट्रांचा दृष्टीकोन बदलत आहे आणि भारताकडून जगाच्या अपेक्षाही वाढत आहेत. बाली येथील शिखर परिषदेत या दोन्हीचे ठळक प्रतिबिंब दिसले. या परिषदेत नरेंद्र मोदी यांचा सहभाग लक्षवेधी म्हणावा असा होता. या परिषदेत चर्चा झालेल्या जागतिक समस्या, त्यावर भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या मांडणीला सर्व राष्ट्रप्रमुखांनी गांभीर्याने घेणे, शांघाय सहकार्य परिषदेत नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना दिलेल्या, ‘सध्याचे युग युद्धाचे नाही’ या थेट इशार्‍याचा परिषदेच्या ठरावाच्या मसुद्यात एकमताने अंतर्भाव होणे हा सगळा घटनाक्रम म्हणजे भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढत असलेल्या प्रभावाचे प्रतीक आहे.
 
 
 
पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात भारतात नवी दिल्ली इथे होणार्‍या ‘जी-20’ परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘वसुधैव कुटुंबकम् - एक वसुंधरा, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी असून 20 पाकळ्यांच्या कमलदलातली पृथ्वी हे तिचे चिन्ह असणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा विचार या मातीत वेदकाळापासून आहे. हे आपल्या तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान आहे. मी, माझा समाज, माझा देश यापलीकडे अखिल विश्वाच्या हिताचा विचार करणारी आपली विचारपरंपरा आणि त्यावर आधारित असलेली पर्यावरणानुकूल जीवनशैली ही आपली ओळख आहे. तीच आजच्या काळाची गरज आहे, हे कोविडसारख्या जागतिक महामारीनंतर बहुतेक सर्व राष्ट्रांना कळून चुकले आहे. कारण यापैकी बहुतेकांना त्यापायी जबर किंमतही मोजावी लागली आहे. या महामारीने अखिल विश्व धोक्यात असताना भारताला तारले ते त्याच्या पांरपरिक जीवनशैलीने आणि याच काळात भारत अनेकांचा तारणहार बनला तो ‘वसुधैव कुटुंबकम्’ या त्याच्या विचारसणीमुळे, त्यातून अनेक देशांना केलेल्या मदतीमुळे.
 
 
 
कोविड महामारीमुळे आज जगातल्या बहुतेक अर्थव्यवस्थांसमोर विविध प्रकारची आव्हाने उभी आहेत. भारतही त्याला अपवाद नसला, तरी तुलनेने भारताची परिस्थिती समाधानकारक आहे. या आर्थिक आव्हानांशी मुकाबला करण्याची बहुतेक देशांची धडपड चालू असतानाच, रशिया-युक्रेन दरम्यान चालू असलेल्या युद्धाने समस्यांमध्ये भरच घातली आहे. जगभरात जाणवत असलेला इंधन तुटवडा, या तुटवड्यामुळे अग्रक्रम मिळालेला ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न, भेडसावणारी खत टंचाई, तिच्या पोटात दडलेली भविष्यातली अन्नटंचाई... या प्रश्नांवर सुटा सुटा आणि स्वतंत्र विचार करण्यापेक्षा त्याचा समग्रपणे, एकत्र येऊन विचार करण्याची गरज आणि त्याचे फायदे नरेंद्र मोदींनी या परिषदेत मांडले. एवढेच नाही, तर औद्यागिकीकरणाच्या माध्यमातून वेग घेत असलेल्या भारताच्या अर्थव्यवस्थेला कोणतेही निर्बंध घालून रोखू नका, असे आवाहनही त्यांनी उपस्थित राष्ट्रप्रमुखांना केले. या मुख्य मांडणीसह महत्त्वाच्या राष्ट्रप्रमुखांसमवेत त्यांच्या झालेल्या थेट चर्चा, त्या चर्चांमधले विषय, त्यावर मिळालेला प्रतिसाद, झालेला विचारविनिमय हे सर्वच भारताच्या वाढत्या प्रभावाचे निदर्शक आहेत.
 
 
 
तेव्हा या पार्श्वभूमीवर, जागतिक समस्या निराकरणाच्या दिशेने पुढच्या वर्षी भारतात होणार्‍या बैठकीत पुढचे पाऊल पडेल. पर्यावरणपूरक विकास, ऊर्जा सुरक्षा आणि सर्व समस्यांच्या सोडवणुकीसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतानाच, गांधींच्या आणि बुद्धाच्या या भूमीतून जागतिक शांततेसाठीही काही भरीव प्रयत्न होतील, अशी आशा आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0