राज्याचे सार ते दुर्ग!

17 Nov 2022 13:08:19
 @रश्मिन संजय कुलकर्णी 
 
 
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण शिंदे-फडणवीस सरकारने हटवले. अफझल खानाच्या थडग्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणासंदर्भात अनेक वर्षांपासून विरोध होत होता. या कारवाईमुळे शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. प्रतापगडाबरोबरच अन्य गड-किल्ल्यांवर झालेल्या अथवा होत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई व्हावी, यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत. परंतु कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणार्‍या अतिक्रमणाबाबत अधिक जाणून घेणे गरजेचे आहे. हे अतिक्रमण कुठल्या स्वरूपाचे आहे? कधीपासून होत आहे? या संदर्भातील माहिती प्रस्तुत लेखात दिली आहे.
 
 
vivek
 
दि. 6 जानेवारी 2022 रोजी दुर्गराज रायगडच्या ’मदार मोर्चा’ या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी काही दगडांवर रंगरंगोटी करून, त्यावर चादर चढवून त्या जागेला प्रार्थनास्थळ बनवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरल झाले.
 
 
महाराष्ट्र - 17व्या शतकात याच महान राष्ट्रात हैंदव धर्म उद्धारक छत्रपती शिवाजी महाराजांनी इस्लामी आक्रमणांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याच्या स्थापनेपासून शिवछत्रपतींनी अनेक दुर्गांची उभारणी केली. हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य यांनी करवीरकर छत्रपती संभाजीराजे (छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी राजसबाई यांचे चिरंजीव) यांच्यासाठी ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ रचला होता. आज्ञापत्र म्हणजे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची राजनीती. दुर्गांचे महत्त्व सांगताना आज्ञापत्रात हुकूमतपनाह रामचंद्रपंत अमात्य लिहितात -
 
 
 
‘संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग! दुर्ग नसता मोकळा देश परचक्र येताच निराश्रय, प्रजा भग्न होऊन देश उध्वंस होतो. देश उध्वंस जाल्यावरी राज्य यैसे कोण्हास म्हणावे? याकरिता पूर्वी जे जे राजे जाले त्याणी आधी देशामध्ये दुर्ग बांधून तो देश शाश्वत करून घेतला. आले परचक्रसंकट दुर्गाश्रयी परिहार केले. हे राज्य तरी तीर्थस्वरूप थोरले कैलासवासी स्वामींनी (छत्रपती शिवाजी महाराजांनी) गडांवरूनच निर्माण केले. जो जो देश स्वशासनवश्य न होय त्या त्या देशी स्थलविशेष पाहोन गड बांधिले, तैसीच जलदुर्ग बांधिली. त्यांवरून आक्रम करीत करीत साल्हेरी अहिवंतापासोन कावेरीपर्यंत निष्कंटक राज्य संपादिले. अवरंगजेबासारिखा महान (मोठा, प्रबळ) शत्रू चालोन येऊन विजापूर भागानगर सारखी महासंस्थाने आक्रमिली. संपूर्ण तीस बत्तीस वर्षेपर्यंत या राज्यासी अतिशय केला. त्याचे यत्नास असाध्य काय होते? परंतु राज्यात किल्ले होते म्हणोन अवशिष्ट तरी राज्य राहिले. पुढे पूर्ववत करावयास अवकाश जाहला.
 
 
 
 
या उपरही ज्यास राज्यसंरक्षण करणे, आहे त्यापेक्षा अधिकोत्तर साधणे त्याणें स्वत: गडकोटांची उपेक्षा न करीता, परम सावधपणे, असतील गडकिल्ले त्यांची यथोक्त मजबुती करावी. नूतन देश गडकोट नसतील त्या देशांत आपले राज्याचे सरदेपासून पुढे जबरदस्तीने स्थळे बांधून, बांधीत बांधीत तो देश आक्रमावा. त्या स्थळाचे आश्रयी सेना ठेऊन त्यापुढील देश स्वशासनवश्य करावा. यैसे करीत करीत राज्य वाढवावे. गडकोटांचा आश्रय नसतां फौजेच्यानें परमुलकी टिकाव धरून राहवत नाही. इतकीयांचे कारण ते गडकोट म्हणजे खजिना! गडकोट म्हणजे सैन्याचे मूळ! गडकोट राज्यलक्ष्मी! गडकोट म्हणजे आपले प्राणसंरक्षण! यैसे पूर्ण चित्तांत आणून कोण्हाचे भरवसियांवर न जाता आहे त्याचे संरक्षण करणे व नूतन बांधणे याचा हव्यास स्वत:च करावा. कोण्हाचा विश्वास मानू नये!’
 
 
 
दुर्दैवाने आज महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची अवस्था बिकट आहे. शिवछत्रपतींनी बांधलेल्या अनेक दुर्गांवर आज अतिक्रमण बघायला मिळते. अनेक किल्ल्यांची तटबंदी आज ढासळलेली आढळते. सुदैवाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारने गड-किल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी एक स्वागतार्ह निर्णय घेतला. शिवप्रतापदिनाच्या दिवशी - म्हणजेच दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझल खानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण शिंदे-फडणवीस सरकारने हटवले. अफझल खानाच्या थडग्याच्या आजूबाजूला झालेल्या अतिक्रमणासंदर्भात अनेक वर्षांपासून विरोध होत होता. अनेक शिवभक्त कायदेशीर मार्गाने महाराष्ट्र राज्य सरकारकडे याबाबत तोडगा काढण्याची विनंती करत होते. शिंदे-फडणवीस सरकारने या शिवभक्तांची इच्छा पूर्ण करत वन विभागातर्फे अफझल खानाच्या थडग्याजवळील सगळे अतिक्रमण हटवले.
 
 
या कारवाईमुळे शिवभक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळतोय. प्रतापगडाबरोबच अन्य गड-किल्ल्यांवर झालेल्या अथवा होत असलेल्या अतिक्रमणावर कारवाई व्हावी, यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत. परंतु कुठलीही कायदेशीर कारवाई करण्याअगोदर महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणार्‍या अतिक्रमणाबाबत अधिक जाणून घेणे गरजेचे आहे. हे अतिक्रमण कुठल्या स्वरूपाचे आहे? कधीपासून होत आहे? अतिक्रमण करण्यामागे नेमका हेतू काय आहे? असे प्रश्न अनेकांना पडत आहेत. स्वानुभवाने व काही गड-किल्ल्यांवर स्वत: जाऊन तेथील अतिक्रमण बघितल्यामुळे मी वरील प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न येथे करत आहे.
 
 
 
दि. 6 जानेवारी 2022 रोजी दुर्गराज रायगडच्या ’मदार मोर्चा’ या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तींनी काही दगडांवर रंगरंगोटी करून, त्यावर चादर चढवून त्या जागेला प्रार्थनास्थळ बनवण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर वायरल झाले. प्रकरण एवढे तापले की युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी ताबडतोब भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अधिकार्‍यांना पत्र लिहून हे अतिक्रमण हटवायला लावले. जानेवारी 2022च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळात तत्कालीन राज्यसभा खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या अध्यक्षतेखाली दुर्गप्रेमींचे एक संमेलन भरवण्यात आले होते. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि झुंज प्रतिष्ठान यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. माझ्यासह अनेक दुर्गप्रेमी या संमेलनाला एकत्रित आलो होतो. मंडळाचे अध्यक्ष आणि पुण्याचे माजी खासदार प्रदीप (दादा) रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहासकार डॉ. उदय कुलकर्णी, पुरातत्त्वशास्त्रज्ञ डॉ. सचिन जोशी आदी मान्यवरांकडून महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील धार्मिक अतिक्रमणाबाबत काय करता येईल याविषयी चर्चा झाली होती.
 
 
 
या संमेलनानंतर महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवर झालेल्या अथवा सुरू असलेल्या धार्मिक अतिक्रमणाची छायाचित्रे समोर येऊ लागली. मीदेखील माझ्या काही दुर्गप्रेमी मित्रांसोबत विविध किल्ल्यांवर जाऊन तेथील अतिक्रमणाबाबत पुरावे गोळा करू लागलो. आम्ही ज्या ज्या किल्ल्यांवर गेलो, तेथील धार्मिक अतिक्रमणाबाबत आम्ही एक अहवाल तयार केला. अतिक्रमणाबरोबर त्याची पार्श्वभूमी समकालीन पुराव्यांच्या आधारे या अहवालात नमूद केली होती. त्यापैकी काही महत्त्वाची माहिती खाली देत आहे.
 
 
किल्ले प्रतापगड
 
सातारा जिल्ह्यात असलेला किल्ले प्रतापगड हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किल्ला आहे. किल्ले प्रतापगडशी छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक वेगळेच नाते होते. याच किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दि. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझल खानाचा वध केला होता.
 
 
 
अली आदिलशाह आणि त्याची सावत्र आई बडी साहिबा यांनी अफझल खानाला शिवाजीराजे यांना मारण्यासाठी पाठवले होते. खानाने शिवाजीराजांशी मैत्रीचे नाटक करून त्यांना धोक्याने मारण्याचा कट रचला होता. परंतु चाणाक्ष बुद्धी असलेल्या शिवाजीराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाला प्रतापगडच्या पायथ्याशी यमसदनी धाडले.
 
 
 
गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातील काही लोकांना अफझल खानाबद्दल जास्तच आपुलकी वाटायला लागली आहे. त्यात काही राजकारणी राजकीय स्वार्थासाठी प्रतापगडच्या पायथ्याशी असलेली अफझल खानाची कबर दस्तुरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती, असा बाष्कळ दावा करत आहेत. या दाव्यामागची सत्यता जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 
 
सर्वप्रथम, अफझल खानाच्या कबरीचा उल्लेख एकाही शिवकालीन कागदपत्रात येत नाही. इ.स. 1885 साली तत्कालीन इंग्रज सरकारद्वारा प्रकाशित करण्यात आलेल्या 'Gazetteer of Bombay Presidency - Volume XIX' मध्ये किल्ले प्रतापगडचे संपूर्ण वर्णन दिलेले आहे. त्यात अफझल खानाच्या कबरीबद्दल एवढाच उल्लेख आढळतो - "The tomb, a short distance outside of the fort, marks the spot where Afzul Khan's head was buried.' - पृ. क्र. 509.
"Afzal Khan's head is buried beneath the tower.' - पृ. क्र. 547.
 
 
गॅझेटियरच्या प्रथम आवृत्तीत कुठेही अफझल खानाच्या दर्ग्याचा उल्लेख नाही. याचा साधा सरळ अर्थ आहे की इ.स. 1885 साली प्रतापगडच्या पायथ्याशी केवळ अफझल खानाचे थडगे होते. तिथे कुठलाही दर्गाह नव्हता.
 
 
 
पुढे इ.स. 1916 साली थोर इतिहास संशोधक रावबहादुर द.ब. पारसनीस यांनी ‘महाबळेश्वर’ हे इंग्लिश पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात पारसनीसांनी अफझल खानाच्या थडग्याचे छायाचित्र छापले आहे. 1916 साली या थडग्याचे स्वरूप काय होते, ते पाहा. 
 
 
vivek
 
इ.स. 1963 साली महाराष्ट्र राज्य सरकारने इ.स. 1885 साली प्रकाशित झालेले Gazetteer of the Bombay Presidency’ पुन:प्रकाशित केले. इ.स. 1885 ते इ.स. 1963 या कालखंडात प्रतापगडाचे आणि मुख्यत: अफझल खानाच्या थडग्याचे बदलले स्वरूप आश्चर्यजनक आहे.
 
 
इ.स. 1885 ते इ.स. 1963 या कालखंडात स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा दर्गाह मूळ थडग्याभोवती उभा केला गेला. एवढेच नाही, तर दर वर्षी जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान या दर्ग्यात उरूस भरवला जातो, हेही पुन:प्रकाशित गॅझेटियरमध्ये नमूद केलेले आहे. या 'Afzalkhan Tomb Committee'ला हे करण्याची परवानगी कोणी दिली असेल? या प्रश्नाचे उत्तर मात्र मिळाले नाही.
 
 
किल्ले लोहगड
 
 
पुणे जिल्ह्यात असलेला व पुणे-मुंबई या दोन्ही महानगरांपासून जवळ असलेला किल्ले लोहगड एक प्रसिद्ध गिरिदुर्ग आहे. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांमधील गिर्यारोहकांची गर्दी लोहगडावर बघायला मिळते. लोहगड हा एक प्राचीन गिरिदुर्ग आहे. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, निजामशाही, आदिलशाही, मोगलाई, मराठेशाही या सर्व राजवटी या किल्ल्याने पाहिल्या आहेत.
 
 
लोहगडावर धार्मिक अतिक्रमण प्रचंड मोठ्या प्रमाणावर आढळते. आणि हे अतिक्रमण गेल्या काही वर्षांतील आहे, हे सांगणे कठीण नाही. इ.स. 1885 साली तत्कालीन इंग्रज सरकारने सर्वेक्षण करून "Gazetteer of Bombay Presidency - Volume XVIII, Part III' मध्ये लोहगडबद्दलची सगळी माहिती प्रकाशित केली होती.
 
 
vivek
 
प्रकाशित केलेल्या माहितीप्रमाणे, इ.स. 1885 साली लोहगड किल्ल्यावर एका दंतकथेवरून मोगल बादशाह औरंगजेब आणि त्याच्या एका पत्नीच्या स्मरणार्थ दोन थडगी उभी करण्यात आली होती. परंतु औरंगजेबाचा मृत्यू खुल्ताबाद येथे झाला होता. आजही औरंगजेबाचे थडगे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद येथे आहे. याबरोबरच कुठल्यातरी शेख उमर अवलियाची कबर लोहगडावर असल्याचे गॅझेटियरमध्ये नमूद आहे.
 
 
vivek
 
इ.स. 1885 सालच्या या नोंदी सोडल्या, तर इतर कुठल्याही कबरीची नोंद आढळत नाही. परंतु आज गडावर अनेक ठिकाणी दगडांवर रंगरंगोटी करून अथवा चादर चढवून अतिक्रमण करणे सुरू आहे. आश्चर्य म्हणजे लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील गावकर्‍यांनादेखील याची कल्पना नव्हती.
 
 
 
किल्ले विशाळगड
 
 
 
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एक विशेष स्थान बाळगतो. सिद्दी जोहरने जेव्हा पन्हाळगडाला वेढा घातला होता, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजी प्रभू देशपांडे यांच्यासह बांदल सेनेने प्रयत्नांची शर्थ करत आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. राजा भोज (दुसरा) याने आजपासून जवळजवळ 1100 वर्षांपूर्वी विशाळगड किल्ला बांधला होता. आज विशाळगडावर ज्या मलिक रेहानच्या दर्ग्याला अनेक हिंदू-मुसलमान येतात, त्या दर्ग्यात फारसी भाषेतील एक शिलालेख आहे, ज्यात या मलिक रेहानने राजा भोजला हरवल्याचे नमूद केलेले आहे. या दर्ग्यावर येणार्‍या लोकांनी या परिसराचा उकिरडा केलेला आहे. अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षी असलेल्या आणि राजधानीचा दर्जा लाभलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था उद्विग्न करणारी आहे.
 
 
 
vivek
 
 
गडाची सद्य:स्थिती अतिशय भयंकर आहे. या रेहान मलिकच्या दर्ग्याच्या आजूबाजूला अनेक अनधिकृत हॉटेल्स झालेली आहेत. दर्ग्याला भेट देणारे लोक जुगार खेळणे, दारू पिणे व मटण/चिकन खाणे याकरिता हॉटेलमधील रूमचा उपयोग करतात. त्यामुळे किल्ल्यावरील दर्ग्याकडील भागात प्रचंड दुर्गंधी/घाण पसरलेली असते.
 
 
दर्ग्याचे सध्याचे स्वरूप बघून अनेक प्रश्न पडतात. किल्ल्यावर एवढे बांधकाम करण्याची परवानगी कोणी दिली असेल? जर बांधकाम अनधिकृत असेल, तर मग त्यावर कारवाई का होत नाहीये? महाराष्ट्र राज्य सरकारने ज्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी असणार्‍या अतिक्रमणावर कारवाई केली, त्याचप्रमाणे लवकरात लवकर या अनधिकृत बांधकामांना/कृत्यांना आवर घालणे आवश्यक आहे.
 
 
ज्याप्रमाणे किल्ले रायगड, किल्ले प्रतापगड, किल्ले लोहगड आणि किल्ले विशाळगड या किल्ल्यांवर धार्मिक अतिक्रमण अस्तित्वात होते/आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवर अशा प्रकारचे धार्मिक अतिक्रमण आढळले आहे. सरखेल कान्होजी आंग्रे यांचे विद्यमान वंशज, तसेच श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी कोलाब्याच्या किल्ल्यावर झालेल्या धार्मिक अतिक्रमणाविषयी महाराष्ट्रातील जनतेला अवगत करून दिले होते.
 
 
 
महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवरील होणार्‍या धार्मिक अतिक्रमणावर राज्य सरकारने कायदेशीर कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. गड-किल्ल्यांवर होणार्‍या अनधिकृत बांधकामांमुळे किल्ल्याला धोका निर्माण होऊ शकतो. महाराष्ट्र राज्य सरकारने भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याशी संलग्न होऊन गड-किल्ले संवर्धन समितीची स्थापना केली पाहिजे. या समितीने महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची सद्य:स्थिती जाणून एक अहवाल तयार केला पाहिजे. या अशा प्रकारच्या अहवालामुळे जर कुठल्या किल्ल्यावर अनधिकृत बांधकाम होत असेल तर त्यावर कारवाई करणे सोपे होईल.
 
 
 
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने ‘राज्याचे सार ते दुर्ग’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आत्मसात केली पाहिजे. महाराष्ट्र राज्य सरकारने या दिशेने सकारात्मक पाऊल उचलावे, हीच सदिच्छा!
लेखक इतिहास अभ्यासक आहेत.
Powered By Sangraha 9.0