@सुचिता रमेश भागवत । 8767454261
’राष्ट्रीय सेवा भारती’ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ’शहर आपत्ती व्यवस्थापन विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथे दिनांक 1 आणि 2 ऑक्टोबर 2022 असा दोन दिवसांचा आपत्ती प्रबंधन प्रशिक्षण वर्ग पार पडला. सामान्य जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृती करणं अशा स्वरूपाची एक संधी सेवा भारतीने या प्रशिक्षणातून आम्हाला दिली आहे.
More you sweat in peace less your bleed in war!
अखंड मानवजातीला प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक परिस्थितीत उत्तम काम करण्यास प्रवृत्त करणारी ही उक्ती.. खरं तर आपलं जीवन अनिश्चित आहे. पुढचा क्षण काय असणार हे आपल्याला माहीत नसतं. पण तो क्षण आपल्या भूतकाळातल्या कामाच्या पायावरच (foundationवर) उभा असतो, हे विसरून कसं चालेल!!
आणि म्हणूनच ’अनिश्चिततेलाही विशिष्ट स्वरूप असतं, ते समजून घेऊन, पूर्वतयारी, पूर्वनियोजन करून आपला बेडा सहज पार होऊ शकतो’ ही जाणीव जिथे जाऊन मला अन माझ्या सहकार्यांना झाली, त्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत आज मला सांगावसं वाटतं.
’राष्ट्रीय सेवा भारती’ आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेचा ’शहर आपत्ती व्यवस्थापन विभाग’ यांच्या संयुक्त विद्यमाने परळ येथे दिनांक 1 आणि 2 ऑक्टोबर 2022 असा दोन दिवसांचा आपत्ती प्रबंधन प्रशिक्षण वर्ग पार पडला.
या वर्गाला 19 प्रांतांतून 127 महिला-पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं स्वरूप ’भरघोस अशा माहितीने आणि प्रात्यक्षिकांनी’ भरलेलं होतं. परंतु पहिल्या सत्रापासून अखेरच्या सत्रापर्यंत सहजता, ज्ञान, परस्पर संवाद यातून दोन दिवस कधी संपले ते कळलंच नाही.
भारताला आपत्ती काही नवीन नाही. बंगालमध्ये 1770मध्ये पडलेल्या दुष्काळात सुमारे 1 कोटी लोकांनी प्राण गमावले होते आणि अगदी अलीकडच्या काळात म्हणायचं, तर 1999मध्ये ओदिशामध्ये आलेल्या चक्रीवादळाने 15000पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले, 2.5 लाख घरं जमीनदोस्त झाली. गुजरातमधील 2001मध्ये आलेल्या भूकंपात 20000पेक्षा जास्त मनुष्यहानी झाली. 2004च्या त्सुनामीने तर कहरच केला. 2 लाख 27 हजारपेक्षा जास्त लोक जिवाला मुकले.
2013मध्ये उत्तराखंडात भूस्खलन झालं, तेव्हा 6000च्या आसपास स्थानिक, प्रवासी मारले गेले. काश्मीर, केरळ आणि महाराष्ट्रातल्या किल्लारी भूकंप, भूस्खलनाने माळीण गावाचा झालेला दुर्दैवी अंत, कोल्हापूर, सांगली, चिपळूण येथील पूर अशा अनेक आपत्ती.. कधी चेंगराचेंगरी, तर कधी बाँबस्फोट या सार्यांनी केलेलं नुकसान तर सर्वांनाच हादरवणारं आहे. या नैसर्गिक आपत्तींसह अपघात, आग लागणं अशा स्वरूपाच्या मानवनिर्मित आपत्तीदेखील आपण अनुभवत असतो.
अशा संकटात तत्परतेने पोहोचतात ते संघ आणि परिवारातील कार्यकर्ते! कारण ‘सेवा परमो धर्म:’ हे संघपरिवाराच्या शरीर-मन-बुद्धीमध्ये भिनलंय. अतिशय स्थिर मनोवृत्तीने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं, त्याचं पुनर्वसन होईपर्यंत पाठपुरावा करणं या गोष्टी संघाने आजपर्यंत जबाबदारीने केलेल्या आहेत. या भूमिकेला प्रशिक्षणाची, कौशल्य विकासाची जोड देत अधिक ठोस करण्याची पहिली पायरी म्हणजेच हा प्रशिक्षण वर्ग. सेवा भारतीचे संयुक्त महामंत्री विजयराव पुराणिक यांच्या शब्दात सांगायचं, तर “प्रेरणेला परिणामकारकतेची जोड देण्यासाठी या वर्गाचं आयोजन करण्यात आलं.”
आपत्ती सांगून येत नाही. त्यामुळे आपत्ती आली, तरी स्वत:चा जीव धोक्यात घालून मदतकार्य करणारे हजारो कार्यकर्ते ही आपली शान आहे.. पण आपत्ती येण्याआधीच तिचे आडाखे बांधणं, त्यासाठी मदतकार्याचं नियोजन करणं आणि या सार्यात स्वत:ला सुरक्षित ठेवत उत्तम प्रतीची rescue आणि rehabilitation करणं हा एक उत्तम मार्ग असू शकतो.
प्रत्येक क्षेत्रात जसं रिसर्च आणि डेव्हलपमेंटने कामाची प्रत उंचावते, तसंच हे प्रशिक्षण ’संघाच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंटला महत्त्व देण्याच्या दृष्टीकोनाचं’ द्योतक आहे.
’आपत्तीमध्ये एखाद्याचा जीव वाचवायला जशी आत्मीयता हवी, तसंच त्याला ’उपलब्ध साधनांचा परिपूर्ण उपयोग करून ती कृती सोपी करण्यासाठी कौशल्य’देखील विकसित करायला हवी’ यावर या वर्गात भर देण्यात आला.
आपत्ती, त्यांचे प्रकार, प्रत्येक ठिकाणी असणारा करूरीव, Hazard, Vulnerability आणि exposure यांचा त्रिकोण, त्यातून निर्माण होणारी Risk, विविध आपत्तींमधील बचावकार्याचे अनुभव, त्यातल्या त्रुटी, आपत्ती व्यवस्थापनामध्ये भूमिका असणार्या NDMA, NDRF इ. संस्था, आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा, पहिला रिस्पॉन्सर म्हणून आपली भूमिका, आग, भूकंप, पूर, स्फोट, चक्रीवादळ या आपत्तींबाबत फर्स्ट रिस्पॉन्सरसाठी करण्याच्या आणि टाळण्याच्या गोष्टी, आपत्तीची भीषणता कमी करणं, मानसिक आधार देणं, CPSRचं प्रशिक्षण, फर्स्ट एडची माहिती, स्ट्रेचर बनवणं, दोरीच्या साह्याने रेस्क्यू करतानाच्या टिप्स, त्याची प्रात्यक्षिकं आणि सर्वात महत्त्वाचं आपत्तीमध्ये सामान्यजनांमध्ये गोंधळलेपण येणार नाही अशा प्रकारे त्यांना सोबत घेऊन त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करण्याची आपली भूमिका... हे सारे या प्रशिक्षण वर्गातील वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे!
राजेंद्र लोखंडे (shift incharge), डॉक्टर चंद्रात्रे (Mumbai University), रश्मी लोखंडे (chief officer), रणधीर भोई (fire brigade), अक्षता तांबे, नायर हॉस्पिटलच्या निवृत्त वॉर्डन सुरेखा सावंत, प्रवीण ब्रह्मदंडे आणि महेंद्र खांबळेकर यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत हे प्रशिक्षण उत्तम प्रकारे दिलं.
माझ्यासाठी हा एक अनोखा अनुभव होता. आपत्तीकडे पाहण्याची नवी दृष्टी यातून मिळाली. चिपळूणच्या पुरात पूरग्रस्त म्हणून आपण काय टाळू शकलो असतो, काय करता येऊ शकलं असतं याचं चिंतन सुरू झालं. ‘आधी माणूस जगवा, बाकी सर्व उभं करता येतं’ हा सतत कानावर पडणारा एक मंत्र.. पण जर आपत्तिप्रवण क्षेत्रातला प्रत्येक माणूस सज्ज असेल, तर त्या सजगतेतून नुकसान खूप कमी करता येईल आणि म्हणूनच आपापल्या जिल्ह्यामध्ये, आपापल्या तालुक्यामध्ये असलेल्या आपत्ती व्यवस्थापन सेलशी संपर्क साधणं, तिथली माहिती मिळवणं आणि आपल्या आजूबाजूच्या फर्स्ट रिस्पॉन्सरमध्ये - अर्थातच सामान्य जनतेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागृती करणं अशा स्वरूपाची एक संधी सेवा भारतीने या प्रशिक्षणातून आम्हाला दिली आहे.
दोन दिवसाचं प्रशिक्षण तर संपलं.. पुन्हा सारे जण आपापल्या प्रांतात, जिल्ह्यात जायला निघाले. पण जाताना प्रत्येकाच्या मनामध्ये स्वर उमटत होते -
संघटित शक्ती के आगे, हर संकट टल जायेगा।
गोवर्धन उंगली से थामे, संघ कृष्ण बन जायेगा॥