असेही सीमोल्लंघन

08 Oct 2022 12:06:02
राष्ट्रीय प्रश्नांना स्पर्श करणारे सरसंघचालकांचे भाषण, सर्व प्रकारचे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चिंतन आणि विचार करण्यासारखे आहे. ही प्रक्रियादेखील लगेच सुरू होईल असे नाही. परंतु या वेळच्या भाषणावर जी चर्चा चालू आहे आणि त्यावर जी वेगवेगळी मते येत आहेत, त्यावरून समाजदेखील राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रीय प्रश्नावर विचार करण्याच्या भूमिकेत येत चाललेला आहे, हे लक्षात येते. हे सीमोल्लंघनदेखील स्वागत करण्यासारखे आहे.

rss
 
प्रतिवर्षी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचे नागपूरच्या रेशीम बाग संघस्थानावर भाषण होते. गेली 97 वर्षे ही परंपरा चालू आहे. साधारणत: पहिली पन्नास वर्षे प्रसिद्धी माध्यमे सरसंघचालकांच्या भाषणाची फारशी दखल घेत नसत. वर्तमानपत्रात कुठे बातमी आली आहे का, हे स्वयंसेवकांना शोधत बसावे लागे. तो काळ आता गेला. गेली काही वर्षे सरसंघचालकांचे विजयादशमी भाषण अनेक वृत्तवाहिन्या थेट प्रक्षेपित करतात आणि कोट्यवधी लोकांना ते घरातच बसूनच ऐकण्याचे भाग्य लाभते. म्हटले तर हे अतुलनीय असे ‘सीमोल्लंघन’ आहे. कालपर्यंत जी संघटना आणि त्या संघटनेचे सरसंघचालक दखलपात्रही नव्हते, ते एवढे दखलपात्र कसे झाले?
 
 
या प्रश्नाचे उत्तर एका शब्दात देता येते, तो शब्द आहे, ‘संघसामर्थ्य’. पूर्वी संघाबाहेरील मंडळींनी संघाला ‘हाफ पँट घालून खेळ आणि कवायती करणारे संघटन’ एवढ्याच रूपात बघितले. आणि आता ते पाहतात तेव्हा देशाचा पंतप्रधान संघस्वयंसेवक आहे, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री स्वयंसेवक आहेत, राज्यपाल स्वयंसेवक आहेत. जगात जेथे जेथे हिंदू आहेत, तेथे तेथे संघ पोहोचला आहे. विद्यार्थी, कामगार, वनवासी, महिला, उद्योेग, शिक्षण, आरोग्य, दोन लाखांच्या आसपास सेवा कार्ये अशी संघाची अफाट शक्ती आहे. जेथे शक्ती, तेथे आकर्षण असते. शक्तीची दखल सर्वांना घ्यावी लागते.
 
 

rss
 
 रेशीम बाग येथील दसरा मेळाव्यात मुख्य अतिथी म्हणून निमंत्रित केलेल्या गिर्यारोहक संतोष यादव, हीदेखील संघविचारात महिलांचे स्थान अधोरेखित करणारी घटनाच. संघ मुख्यालयात महिला अतिथी येण्याची पहिली घटना असली तरी अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून संघाच्या उत्सवात अणि शिबिरांमध्ये विविध क्षेत्रांतील महिलांना मुख्य अतिथी वा वक्ता म्हणून निमंत्रित करण्याची संघाची परंपरा आहे.
  
 
विजयादशमीला सरसंघचालक काय बोलणार आहेत याकडे सर्व देशच नव्हे, तर जगदेखील लक्ष ठेवून असते. या भाषणाकडे पाहणार्‍यांचे दृष्टीकोन वेगवेगळे असतात. एक मोठा वर्ग असा आहे, जो भाषणातून कोणते विवाद उत्पन्न करता येतील एवढेच शोधत राहतो. दुसरा वर्ग असा असतो, ज्याला जहाल भाषण हवे असते. आणि तिसरा वर्ग असा असतो, जो सरसंघचालकांनी कोणते विषय हाताळलेले आहेत याची चिकित्सा करतो. या सर्वांपेक्षा संघस्वयंसेवकांचा आणि कार्यकर्त्यांचा एक वर्ग असतो, जो सरसंघचालकांनी कोणती दिशा दिली आहे, याचे मनन, चिंतन करतो.
 
 

rss
 
सरसंघचालकांच्या भाषणाकडे बघण्याचे दृष्टीकोन कसे असतात, यासाठी एका कथेचा आधार घेऊ या. रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक साधू समाधी लावून बसलेला होता. बायकोशी भांडण झाल्यामुळे एक नवरा वैतागून त्या रस्त्याने चाललेला होता. तो त्या साधूकडे पाहून म्हणाला, “याचे बायकोशी कडाक्याचे भांडण झालेले दिसते, म्हणून हा डोळे मिटून बसलेला आहे.” थोड्या वेळाने त्या रस्त्याने खूप दारू प्यायलेला एक जण झिंगत झिंगत चाललेला होता. तो साधूकडे पाहून म्हणाला, “बेट्याला खूप चढलेली दिसतेय. त्यामुळे कसा शांत बसलेला आहे.” आणखी थोड्या वेळाने त्या रस्त्याने एक साधक चाललेला होता. त्याने साधूकडे पाहिले. त्याच्या लक्षात आले की, हा कुणीतरी मोठा योगी आहे. तो त्याच्यापुढे गेला, बसला, त्याला नमस्कार केला आणि आपल्याजवळील फळे त्याच्यापुढे ठेवली. माणूस एकच, पण त्याच्याकडे बघण्याची दृष्टी अशी असते.
 
 
उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात संरसंघचालकांच्या भाषणाचा उल्लेख केला आणि सवयीप्रमाणे टोमणे मारले.. भाषण समजून घेण्याची पात्रता तेवढीच. असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट केले आणि ‘विद्वेष पसविणारे भाषण’ असा उल्लेख केला.. त्यांचीही अक्कल तेवढीच. वाहिन्यांवर नंतर चर्चा सुरू झाली. त्या सामान्यपणे मी ऐकत नाही, पण या वेळी ऐकल्या. ज्याचे जेवढे भांडे, तेवढे त्यात पाणी राहते.
 
 

https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/
सा. विवेक प्रकाशित ‘कर्तव्यभूमीचे पुजारी’ या मालिकेच्या दुसर्‍या संचात रवींद्र पवार, मोहनराव गवंडी, भाऊसाहेब जहागिरदार, बापूसाहेब लाखनीकर आणि गोविंद उपाख्य नाना आहेर या पाच स्वयंसेवकांच्या चरित्रांचा समावेश आहे. स्वार्थलोलुप समाजामध्ये अशा स्वयंसेवकांच्या रूपाने तार्‍यांचे बेट पाहिले, म्हणजे चांगुलपणा शिल्लक आहे असे वाटते. अंधार होत असलेल्या भवताली कुठेतरी आशेचा किरण दिसतो व या देशाला ऊर्जस्वल भविष्य आहे याची खात्री पटते. अशा दिवंगत स्वयंसेवकांनी आपल्या लोकोत्तर आयुष्यामधून संघाची गंगा आपल्या आचरणातून सर्वदूर पोहोचवली, हे या पुस्तकांमधून आपल्याला वाचायला मिळते.
https://www.vivekprakashan.in/books/book-of-the-work-rashtriya-swayamsevak-sangh-swayamsevak/

 
 
सरसंघचालक मोहनजी भागवत यांचे या वर्षीचे विजयादशमी उत्सवातील भाषण अतिशय महत्त्वाच्या राष्ट्रीय विचारांना स्पष्ट करणारे होते. त्यांनी जे विषय आपल्या भाषणात हाताळले, ते क्रमश: असे आहेत - * महिला सशक्तीकरण, * गुलामीची निशाणी पुसून टाकणारे वेगवेगळे उपक्रम, * पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर टिप्पणी, * मातृभाषेतून शिक्षण यावर भर, * सामाजिक समता आणि समरसता का आवश्यक आहे याचे प्रतिपादन, * लोकसंख्या संतुलन राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणावर भर, * संविधानाचा गौरवपूर्ण उल्लेख.
 
 
rss
मोहनजी भागवत यांचे संपूर्ण भाषण विवेकच्या बहुतेक वाचकांनी एकतर ऐकले असेल अथवा वाचले असेल, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती करण्याचे कारण नाही. येथे फक्त दोन प्रश्नांचा विचार करू या. संघ हा काही विचारधारांच्या दृष्टीने सदैव टीकेचा विषय राहतो. राजकीय क्षेत्रात त्याचे प्रतिनिधित्व राहुल गांधी करतात. त्यांची कंटेनर यात्रा चालू आहे. त्या प्रत्येक ठिकाणी “संघाच्या विचारधारेने देशाचे नुकसान केले आहे” ही पोपटवाक्ये ते बोलत असतात. मोहनजींनी त्याला काहीही उत्तर दिलेले नाही. जे विषय उत्तर देण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांना मोहनजींनी स्पर्श केलेला नाही. मोहनजी भागवत काहीही बोलले की लगेच ओवैसी औरंगजेबी पोशाखात आपली प्रतिक्रिया देतात. मोहनजी त्यांचा चुकूनही उल्लेख करीत नाहीत. शहाण्या माणसांनी मूर्खांच्या नादी लागू नये, याच्या खूप कथा आहेत. त्यातील ही एक कथा.
 
 
 
ही एक जातककथा आहे. भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेली आहे. हिमालयातील एका गुहेजवळ एके दिवशी सिंहाचा मेळावा भरला आणि सिंहगर्जना करून सिंह एकमेकांचे स्वागत करू लागले. त्या सिंहांतील राजालादेखील त्यांनी सिंहगर्जना करून वंदन केले. थोड्या दूर टेकडीवर कोल्ह्यांचा एक कळप गोळा झाला. सिंहगर्जनेला प्रतिसाद म्हणून त्यांनी कोल्हेकुई सुरू केली. ती ऐकून सर्व सिंहांनी मौन धारण केले. युवराज सिंहाने आपल्या वडिलांना विचारले, “तुम्ही सर्व गप्प का बसलात? आवाजाला घाबरलात का?” राजा सिंह युवराजाला म्हणाला, “मुला, ते क्षुद्र कोल्हे आहेत. त्यांच्या कोल्हेकुईला सिंहगर्जना करून उत्तर देणे म्हणजे आपली अप्रतिष्ठा करून घेण्यासारखे आहे. म्हणून सर्व सिंह शांत बसले आहेत.” मोहनजी वर दिलेल्या महाभागांना उत्तर देत नाहीत, त्याचे हे कारण आहे.
 

साप्ताहिक विवेकच्या आगामी 'हिंदुत्व' ग्रंथातून नेमकं हेच उत्तर आपल्याला मिळणार!
"हिंदुत्व ग्रंथ" नोंदणी अभियान

https://www.evivek.com/hindutva-granth/

 
 
दुसरा प्रश्न असा की, वर जे विषय दिलेले आहेत, तेच विषय या वेळी मोहनजींनी का निवडले? देशाचा विचार करता प्रश्नांची काही कमतरता नाही. इंधन दरवाढ, चीनची घुसखोरी, काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवादी चळवळ, धर्मांतराचे वाढते प्रमाण, मुस्लीम कट्टरतावाद, स्त्रियांवरील अत्याचार, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान इत्यादी असंख्य विषय आहेत. परंतु मोहनजींनी यापैकी कुठलाही विषय महत्त्वाचा न करता महिला सशक्तीकरण यावर विस्तृत भाष्य केले. स्त्री आणि पुरुष ही राष्ट्र्रजीवनाची दोन चाके आहेत, म्हणून दोघांचे संतुलित सशक्तीकरण होणे फार आवश्यक आहे. दीर्घ पारतंत्र्याच्या काळात ते झाले नाही. आता त्यावर खूप लक्ष केंद्रित केले पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा विचार आहे. हिंदू धर्मात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते, हे कथानक हिंदूविरोधक मोठ्या प्रमाणात चालवितात. त्यांच्या कथानकाला उत्तर देण्यासाठी हा विषय नाही, तर तो राष्ट्रजीवनासाठी आवश्यक विषय आहे, एवढे लक्षात घ्यावे लागेल.
 
 
 
 
हीच गोष्ट लोकसंख्येच्या संतुलनासंबंधी आहे. मोहनजींचा हा मुद्दा अपेक्षेप्रमाणे मुस्लीम तुष्टीकरणवाद्यांना भयंकर झोंबलेला आहे. या तुष्टीकरणवाद्यांनी 1947 साली देशाची फाळणी घडवून आणलेली आहे, पण ते अक्कल शिकायला तयार नाहीत. जगात ज्या ज्या ठिकाणी लोकसंख्येचे संतुलन बिघडते, तेथे तेथे देश विभाजित होतात, याची उदाहरणे मोहनजींनी आपल्या भाषणात दिली आहेत. स्वत:च्या, मुलांच्या आणि नातवांच्या हिताचा आणि सुरक्षेचा विचार करता या प्रश्नांचा विचार अतिगंभीरपणे करण्याची गरज आहे. जे तुष्टीकरणाने आंधळे झालेले आहेत, त्यांना समाजाने कोणत्याही प्रकारची शक्ती देणे म्हणजे आपल्या पोटात स्वत:होऊन सुरा खुपसून घेणे आहे. मोहनजी असे बोलले नसले, तरी एक स्वयंसेवक म्हणून मला हा अर्थ समजतो.
 
 
 
मातृभाषेतून शिक्षण हा तिसरा असा अतिशय महत्त्वाचा विषय त्यांनी घेतलेला आहे. मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व सांगणारी फार मोठी फौज देशात आहे. यातील बहुसंख्यांची मुले इंग्लिश शाळेत असतात. मोहनजींनी सर्व समाजाला आवाहन केले की, आपल्या पाल्यांना आपण मातृभाषेतून शिक्षण देणार का, आपली स्वाक्षरी आपण मातृभाषेतून करतो का, घरावरील नावाचा फलक मराठी भाषेतून असतो का, या सर्वांचा शोध घ्यायला पाहिजे. जोपर्यंत आपण ठरवत नाही, तोपर्यंत परिवर्तन होणे अशक्य आहे. सामाजिक विषमता का आहे? राज्यघटनेचे कायदे समता आणणारे आहेत, तरी विषमता का आहे? कारण ती आपल्या मनात आहे. तिथून तिचे उच्चाटन केल्याशिवाय विषमता दूर होणार नाही.
 
 
 
देशापुढील प्रश्नांची वर्गवारी केली, तर काही प्रश्न हे तात्कालिक असतात, काही प्रश्न परिस्थितीजन्य असतात, तर काही प्रश्न हे दूरगामी विचार करण्याचे असतात. हे दूरगामी विचार करणारे प्रश्न खर्‍या अर्थाने राष्ट्रीय प्रश्न असतात. या प्रश्नांच्या सोडवणुकीवर राष्ट्राची प्रगती किंवा अवनती अवलंबून असते, म्हणून त्यांचा विचार दूरगामी दृष्टी ठेवूनच करावा लागतो. प्रश्नांचा केवळ विचार करून चालत नाही, तर प्रश्न सोडवायचे कसे, याचा कृतिरूप आराखडाही करावा लागतो. मोहनजी भागवत यांनी जे प्रश्न आपल्यापुढे मांडले आहेत, यातील कोणताही प्रश्न किंवा विषय आज कृती केली आणि उद्या तो विषय संपला असा नाही. त्यासाठी दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज असते.
 
 
 
धोरण आखण्याचे काम शासन यंत्रणेला करायचे असते. नवीन शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाला मोठा वाव देण्यात आलेला आहे. शासनाचे धोरण यशस्वी व्हायचे असेल तर समाजाने ते स्वीकारावे लागते. समाजाने ते स्वीकारले नाही, तर धोरण कितीही चांगले असले तरी ते यशस्वी होणार नाही. समाजमानसात परिवर्तन घडवून आणण्याचे काम शासन एका मर्यादेपर्यंतच करू शकते. शासनाकडे कायदा करण्याची आणि कायद्याची अंमलबजावणी करण्याची दंडशक्ती असते. कायद्याने आणि दंडशक्तीने समाजमानसात परिवर्तन होत नाही. येथे खर्‍या अर्थाने समाजातील सज्जनशक्तीचे काम सुरू होते. विविध धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, कुटुंबसंस्था यातून प्रबोधन झाले तर महिला सशक्तीकरण होईल, लोकसंख्या संतुलनाचा प्रश्न मार्गी लागेल आणि मातृभाषेतून शिक्षण हा विषयही पुढे जाईल.
 
 
राष्ट्रीय प्रश्नांना स्पर्श करणारे सरसंघचालकांचे भाषण, सर्व प्रकारचे राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून चिंतन आणि विचार करण्यासारखे आहे. ही प्रक्रियादेखील लगेच सुरू होईल असे नाही. परंतु या वेळच्या भाषणावर जी चर्चा चालू आहे आणि त्यावर जी वेगवेगळी मते येत आहेत, त्यावरून समाजदेखील राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रीय प्रश्नावर विचार करण्याच्या भूमिकेत येत चाललेला आहे, हे लक्षात येते. हे सीमोल्लंघनदेखील स्वागत करण्यासारखे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0