जयशंकर पर्व

07 Oct 2022 17:30:12
 
अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांशी, त्यांच्या नव्या संघर्षकाळातदेखील आपण तितकेच उत्तम संबंध राखू शकलो आहोत, तेही आपली भूमिका जराही शिथिल न करता.. या व अशा असंख्य मुद्द्यांची यादी मोदींच्या परराष्ट्र नीतीचे यश आणि महत्त्व दर्शवते. या सगळ्यात सिंहाचा वाटा असणारे मुत्सद्दी म्हणजे एस. जयशंकर. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि जयशंकर यांच्या कर्तृत्वात आज जागतिक सत्तासंघर्षात भारत एक सामर्थ्यवान, आश्वासक नेतृत्व म्हणून उभा राहिला आहे. म्हणूनच जयशंकर यांची कारकिर्द जागतिक परराष्ट्र नीतीच्या इतिहासातील एक पर्व म्हणून नोंद होईल, यात काहीच शंका नाही. 
 

 S Jaishankar  
 
दि. 30 मे 2019. याच दिवशी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दुसर्‍या कार्यकाळाचा शपथविधी समारंभ झाला. आधीच्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवत, भाजपाच्या इतिहासात प्रथमच 300 जागांचा पल्ला ओलांडत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात प्राप्त झालेला हा विजय भारतासह जगभरासाठी आदराचा, कौतुकाचा आणि आश्चर्याचाही विषय ठरला होता. याचबरोबर मोदींच्या नव्या मंत्रीमंडळात कोण असणार, याचीही उत्कंठा सर्वांनाच होती. अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासारखे वरिष्ठ नेते प्रकृतिअस्वास्थ्यामुळे या नव्या मंत्रीमंडळात असणार नव्हते. त्यामुळे या दोन दिग्गज नेत्यांकडे असलेली अर्थ, परराष्ट्र आदी महत्त्वाची खाती कोण सांभाळणार, हाही मोठा प्रश्न होता. शपथविधी समारंभात मोदींच्या समवेत बसलेल्या त्यांच्या तमाम सहकार्‍यांमध्ये एक नवा चेहरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. तो चेहरा अपरिचित नव्हता, परंतु अनेक वर्षे लोकांनी त्यांना वेगळ्या भूमिकेतून पाहिले होते. त्यामुळे पक्षीय राजकारणाशी कधीही संबंध न आलेली ही व्यक्ती केंद्रीय मंत्रीमंडळात समाविष्ट झाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. ही व्यक्ती म्हणजे डॉ. सुब्रह्मण्यम जयशंकर!
 
 
 
जवळपास चार दशके भारताच्या परराष्ट्र सेवेत काम केलेल्या, देशाचे परराष्ट्र सचिवपद भूषवून सेवानिवृत्त झालेल्या एस. जयशंकर यांचा मोदींच्या दुसर्‍या कार्यकाळात केंद्रीय परराष्ट्र मंत्री म्हणून समावेश झाला, तेव्हाच मोदींची परराष्ट्र नीती येत्या काळात आक्रमकपणे पावले उचलणार, हे स्पष्ट झाले होते. पंतप्रधान मोदींनी पहिल्याच कार्यकाळात, किंबहुना पहिल्या वर्षातच आपल्या परराष्ट्र नीतीची चुणूक दाखवण्यास सुरुवात केली होती. ती पहिली पाच वर्षे परराष्ट्र धोरण विषयात स्थिरस्थावर होण्याचा, गती आणि पकड मिळवण्याचा काळ होता. मोदींनी ती गती आणि पकड मिळवली. बदलत्या ’वर्ल्ड ऑर्डर’मध्ये कोण किती पाण्यात आहे, हे व्यवस्थितपणे ओळखत यामध्ये नव्या भारताची निर्णायक भूमिका मोदींनी तेव्हाच निश्चित केली होती. त्या गतीवर स्वार होऊन घोडदौड करण्यासाठी मोदींना हवे होते ते एक ’हेन्री किसिंजर’! किसिंजर हे विसाव्या शतकातील अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणातील खूप मोठे मुत्सद्दी मानले जातात. परराष्ट्र धोरणातील मुत्सद्देगिरीचा एक मापदंड म्हणून किसिंजर हे जगमान्य नाव आहे. मोदींना आपले किसिंजर एस. जयशंकर यांच्या रूपाने मिळाले. आज अमेरिकेत जाऊन अमेरिकेच्याच परराष्ट्र मंत्र्यांसमोर भारताची रशियाकडून तेल आयातीमागची भूमिका ठामपणे मांडणारे, युरोप-अमेरिकेच्या दुटप्पी, स्व-केंद्रित भूमिकेच्या चिंधड्या उडवणारे एस. जयशंकर पाहिल्यानंतर ही व्यक्ती किसिंजर यांच्याही पुढे जाऊन मुत्सद्देगिरीचा एक नवा मापदंड प्रस्थापित करू शकेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.
 
 
 
केवळ 3 वर्षांत इतकी जागतिक घोडदौड करणारे, प्रत्येक व्यासपीठावरून भारताची स्वतंत्र-सार्वभौम भूमिका स्वाभिमानाने मांडणारे आणि त्यावरून जगभरात लोकप्रियता मिळवणारे, समाज माध्यमांतून ’व्हायरल’ होणारे, सर्वसामान्य व्यक्तीलाही भावणारे एस. जयशंकर हे स्वतंत्र भारतातील कदाचित पहिलेच परराष्ट्र मंत्री असावेत. एकेकाळी काँग्रेस सरकारच्या काळात एका आंतराराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या भाषणाऐवजी पोर्तुगालच्या मंत्र्यांचे भाषण नजरचुकीने वाचणारे परराष्ट्र मंत्री देशाने पाहिले. भारतासाठी ती जागतिक स्तरावर अभूतपूर्व अशी नाचक्की होती. परराष्ट्र मंत्री होण्याआधी जयशंकर यांनी परराष्ट्र सेवेत चार दशके काम केलेले असल्याने त्यांनी जगभरातील मुत्सद्द्यांशी संवाद साधलेला आहे. विशिष्ट प्रसंगी अन्य देशांचे मुत्सद्दी काय विचार करतील, काय भूमिका घेतील, याचा अचूक अंदाज जयशंकर यांना आहे. त्यांच्या मूळच्या आक्रमक स्वभावाला साजेसे आक्रमक आणि ठाम नेतृत्व आज पंतप्रधानपदी असल्याने जयशंकर यांचे कर्तृत्व आणखी उजळून निघाल्याचे आपण आज पाहतो आहोत. चार दशके नोकरशाहीत काम करूनही आज जयशंकर यांच्यातील नोकरशहा परराष्ट्र मंत्र्याच्या वरचढ ठरत नाही, हे आणखी एक वैशिष्ट्य. अन्यथा नोकरशहा कितीही विद्वान, अनुभवी असला तरी नेतृत्व करण्यास सक्षम नसला की काय होऊ शकते, हे आपण डॉ. मनमोहन सिंग यांच्या रूपाने पाहिले आहेच.
 
 
 
एस. जयशंकर यांच्या कामाचे मूल्यमापन केवळ त्यांच्या भाषणांवरून करणे चुकीचे ठरेल. मागील तीन वर्षांत भारताने अनेक गोष्टी जशा जाहीरपणे बोलून केल्या, तशाच काहीही न बोलताही केल्या. अफगाणिस्तानात तालिबानने हैदोस घातला असता भारतीय मात्र सुरक्षितपणे अफगाणिस्तानातून बाहेर पडू शकले. युक्रेनमध्ये तर रशिया आणि युक्रेन या दोन्हीही परस्पर शत्रुराष्ट्रांशी समन्वय साधत भारतीय विद्यार्थ्यांना आपण बाहेर काढू शकलो. मध्यंतरी आखाती देशात तेथील मुस्लीम कट्टरतावाद्यांच्या अपप्रचाराला बळी पडून निर्माण झालेले भारतविरोधाचे खूळ एक आठवडाही तग धरू शकले नाही. कोविड काळातील ’व्हॅक्सीन डिप्लोमसी’, इतर अनेक वेळेला विविध देशांच्या संकटकाळात भारताने त्यांना केलेली मदत यामुळे भारताची प्रतिमा ’संकटमोचक’ अशी झालेली दिसते. चीन-पाकिस्तानसारखे आपले शेजारी देश ’संकट निर्माण करणारे’ म्हणून प्रसिद्ध झाले असताना भारताचे हे वेगळेपणा सार्‍या जगाच्या नजरेत भावते आहे. अमेरिका आणि रशिया या दोन्ही महासत्तांशी, त्यांच्या नव्या संघर्षकाळातदेखील आपण तितकेच उत्तम संबंध राखू शकलो आहोत, तेही आपली भूमिका जराही शिथिल न करता.. या व अशा असंख्य मुद्द्यांची यादी मोदींच्या परराष्ट्र नीतीचे यश आणि महत्त्व दर्शवते. या सगळ्यात सिंहाचा वाटा असणारे मुत्सद्दी म्हणजे एस. जयशंकर. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आणि जयशंकर यांच्या कर्तृत्वात आज जागतिक सत्तासंघर्षात भारत एक सामर्थ्यवान, आश्वासक नेतृत्व म्हणून उभा राहिला आहे. म्हणूनच जयशंकर यांची कारकिर्द जागतिक परराष्ट्र नीतीच्या इतिहासातील एक पर्व म्हणून नोंद होईल, यात काहीच शंका नाही.
Powered By Sangraha 9.0