भारतीय संस्कृतीतील वृषभचिन्हे

विवेक मराठी    31-Oct-2022
Total Views |
डॉ. माया ज. पाटील (शहापूरकर)
कृषिप्रधान असलेल्या भारतखंडात बैल हा केवळ प्राणी न राहता येथील शेतकर्‍याचा तो प्रमुख सहकारी बनला. अनेक कारणांमुळे त्याला आणि एकूणच गोवंशाला सांस्कृतिकदृष्ट्याही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळेच ‘वृषभाख्यान’ असा एक विभागच आम्ही या दिवाळी अंकात केला आहे. बैल हा हजारो वर्षांपासून येथील सामाजिक-सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग असल्याच्या खुणा अनेक उत्खननांतून, अभ्यासातून समोर आल्या आहेत. त्याचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारा या वृषभाख्यानातील हा पहिला लेख.
 
Story of Nandi
 
पूर्ण जगताची उत्क्रांती अब्जावधी वर्षांपासून सुरू आहे. मानवी उत्क्रांती सुमारे 40 लाख वर्षांपासून होत आहे. अश्मयुगीन मानव उत्क्रांतीच्या एक एक अवस्था पार करत निसर्गात होणार्‍या बदलांचे निरीक्षण करीत होता आणि स्वत:मध्ये तसा बदल करून घेत होता. अचानक उगवणारा सूर्य, पडणारा पाऊस, वीज, अग्नी याचे त्याला आश्चर्य वाटे. त्यामुळे मानव त्याचा आदर करू लागला. त्याबरोबर त्याला प्राण्यांची मदत होत असे. तो पशुपालन करू लागला. निसर्ग, पशू, पक्षी यांनाच तो देव मानू लागला.
 
 
नवाश्मयुगापासून मानव शेती करू लागला. शेतीला लागणारी अवजारे त्याने बनवली. शेती करण्यासाठी नांगरणी करणे खूप आवश्यक होते. प्रथम मानवाने स्वत:च्या हातातील दगडी अवजाराने नांगरणी सुरू केली. नंतर भाजलेल्या मातीचा नांगर वापरला. नंतर लोखंडी नांगराचा फाळ आला. नांगर ओढण्यासाठी बैलाचा उपयोग झाला आणि बैल मानवाचा मित्र झाला. बैलाची, गाईची, तसेच इतर जनावरांची उपयुक्तता लक्षात आल्यावर मानवाने त्यांना पाळणे सुरू केले. त्याआधी शैलचित्रामध्ये बैल दिसत होते. मध्य प्रदेशातील भीमबेटका येथे 20,000 वर्षांपासूनची शैलचित्रे सापडतात. भारताचा विचार केला, तर सर्वप्रथम बैलाचे अंकन शैलचित्रामध्ये आढळते. त्यांनी नैसर्गिक खनिजापासून रंग बनवला. जनावरांच्या केसापासून ब्रश तयार करून गुहांच्या आणि शैलाश्रयाच्या भिंती चितारल्या.
 
 
 
मोठ्या प्रमाणावर होत होता, याचे पुरावे शैलचित्रांतून मिळतात. भारतामध्ये मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणच्या नैसर्गिक गुहा-गव्हारांवर आणि शिलाखंडावर शैलचित्रे आढळतात. मध्य प्रदेशातील भोपाळजवळील भीमबेटका शैलचित्रांचे फार मोठे केंद्र आहे. या ठिकाणी बैल पाहावयास मिळतात.
 
 
Story of Nandi
 
सिंधू संस्कृतीचा कालखंड इतिहासपूर्व कालखंडात मोडतो. आजपासून साधारणत: पाच हजार ते सात हजार वर्षांपूर्वी ही संस्कृती अस्तित्वात होती. भारतातील पहिली महत्त्वाची संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती होय. याच संस्कृतीला हरप्पन संस्कृती, सिंधू-सरस्वती संस्कृती अशी नावे दिली आहेत. या कालखंडामध्ये बैल वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये पाहावयास मिळतो. सिंधू संस्कृतीमधील मुद्रांमध्ये एकशिंग्यानंतर (णपळलेीप) बैलाच्या प्रतिमा सर्वात जास्त पाहायला मिळतात. चौकोनी मातीच्या मुद्रांवरील बैल अत्यंत देखणा असा आहे. पुष्ट शरीर, आत वळलेले शिंग, मोठे वशिंड, मानेखालील मोठी पोळी असे त्याचे आकर्षक रूप दिसते.
 
 
Story of Nandi
 
अनेक मुद्रांवर बैलाच्या समोर एक भांडे अथवा अग्निपात्र ठेवलेले दिसते. त्यातून अग्नीच्या ठिणग्या बाहेर निघालेल्या दिसतात. बैलाच्या अंगावर रंगीत पट्टे असलेली मातीची काही शिल्पे सापडलेली आहेत. कालीबंगन येथील बैलही अत्यंत उल्लेखनीय आहे. प्राणिपूजा त्या काळापासून आजतागायत अस्तित्वात आहे. उदाहरणार्थ, बैलपोळ्यासारखा सण. या मुद्रा पश्चिम आशियामध्येसुद्धा सापडल्या आहेत, यावरून या देशांशी त्यांचा व्यापार असावा, हे स्पष्ट होते. महाराष्ट्रात उत्तर सिंधू कालखंडामध्ये दायमाबाद येथे एक रथ, तसेच तीन प्राणी ब्राँझचे सापडले आहेत. यामध्ये रथाला एक बैल जुंपला आहे आणि त्यावर एक पुरुष उभा आहे. बहुतेक एखाद्या विधीमध्ये या रथाचा वापर होत असावा. म्हणजेच या कालखंडामध्ये बैलाचे स्थान किती महत्त्वपूर्ण होते, ते येथे सिद्ध होते. माती, तांबे आणि ब्राँझ यापासून, तसेच अर्ध मौल्यवान दगडापासूनही बैल बनवलेले दिसतात. अतिशय देखणा आणि महत्त्वाचा पुरावशेष भिवानी येथील पूर या खेड्यामध्ये मिळाला. अँगेट या अर्ध मौल्यवान दगडापासून बनवलेला अतिशय सुंदर परंतु लहान असा बैल सापडला आहे. त्याची शिंगे सोन्याची आहेत. हा बैल इसवीसनपूर्व 2000 ते 1700 या कालखंडातील आहे. राखीगढी येथेही मातीने बनवलेला प्रमाणबद्ध बैल सापडला आहे. तसेच बैलाचे मुख आणि शिंग मोठ्या प्रमाणावर उत्खननामध्ये मिळतात.
 
 
 
प्रागैतिहासिक कालखंडामधील चित्रामध्ये दिसणारा वृषभ ताम्रपाषाण युगात आता मातीच्या भांड्यावरील चित्रांमध्ये, तसेच मृत्तिका शिल्पांमध्ये दिसू लागला. पाषाणयुगीन चित्रामधील बैलाचे रूप आता पालटू लागले. शिंगे दोन्ही बाजूंनी वळून गोलाकार दिसू लागली. शरीर पुष्ट होत गेले. वशिंडे उठावदार झाली. या काळातील मातीच्या भांड्यावर काळ्या रंगामध्ये चित्रे रंगवली आहेत. त्यात बैलाची उत्कृष्ट चित्रे आढळतात.
 
  
ऋग्वेदामधील अनेक उल्लेखांनुसार या काळातील समाज पशुपालक होता. गाय आणि बैल यांचे स्थान महत्त्वपूर्ण होते. बहुसंख्य संपत्ती म्हणजे पशुधन होते. वैदिक काळातील साहित्यामध्ये याची वर्णने मिळतात.
 
 
 
इसवीसनपूर्व सहाव्या शतकामध्ये आहत नाण्यांवर काही ठिकाणी वृषभ आढळलेला आहे. हा फारसा देखणा नसला, तरीही वृषभाचे अस्तित्व नाण्यावर दिसते. याशिवाय या कालखंडापासून नंदीपाद चिन्ह (गाईच्या अथवा बैलाच्या पावलाचे ठसे) दिसतात. जनपद नाण्यांमध्ये अयोध्या येथे वृषभाची काही नाणी मिळाली आहेत. इंडो-ग्रीक नाण्यांमध्ये मिन्यांडर नाण्यावर उंट आणि मागील बाजू बैलाचे शीर्ष आढळते. काही नाण्यावर नंदीसहित शिवाची प्रतिमा आहे. यावरील नंदी उत्कृष्ट दिसतो. इसवीसनपूर्व 324पासून मौर्य कालखंड सुरू होतो. या कालखंडामध्ये शिल्पकलेचा अत्युत्कृष्ट नमुना दिसतो. यात अशोककालीन स्तंभ खूप महत्त्वपूर्ण मानले जातात. या वेगवेगळ्या स्तंभांवर प्राण्यांचे स्तंभशीर्ष आढळतात. सारनाथच्या स्तंभांचा स्तंभशीर्ष चार सिंहांचा आहे. त्याच्या खालच्या बाजूच्या पाट्यावर सिंह, घोडा, हत्ती आणि बैल यांच्या उत्कृष्ट मूर्ती आहेत. या मूर्तींना जणू काही एक वेग प्राप्त आहे असा वाटते. संपूर्ण स्तंभाची उंची 12 मीटरपर्यंत आहे. या स्तंभाचा दगड चुनार येथील खाणीतून आणलेला आहे. हा वालुकाश्मय दगड असून अँगेटसारख्या कठीण दगडाने त्यावर घासून एक प्रकारची झिलई आणलेली आहे. त्याच्यावरील ध्वजाचा भाग तांब्याच्या खुंटीने जोडला आहे, तर त्यावर कमळाच्या पाकळ्यांसारखे स्तंभशीर्ष असून त्या शीर्षावर एक पट्टिका अथवा पाट आहे, आणि सर्वात वरच्या बाजूला पशुआकृती असलेला ध्वज आहे. वर उल्लेखल्याप्रमाणे सारनाथचा स्तंभध्वज चार सिंहांचा आहे, तर रामपूर्वा येथील ध्वज अतिशय देखण्या बैलाचा आहे. हा बैल धष्टपुष्ट, वशिंड असलेला आहे. कलेच्या दृष्टीने त्याची प्रत अतिशय उच्च आहे. सम्राट अशोकाने बर्‍याच स्तंभांवर आज्ञा कोरल्या आहेत.
 
 
 
आद्य ऐतिहासिक कालखंडामध्ये बैलाचे महत्त्व अधिक वाढलेले दिसते. ते पूर्व मध्ययुगातसुद्धा तसेच होते. मूर्तिशास्त्रामध्ये प्रत्येक देवदेवतेला वाहन दिले आहे. त्यापैकी लोकप्रिय अशा शंकराला अथवा शिवाला बैल अथवा नंदी हे वाहन आहे. मूर्ती स्वरूपातील शिवाच्या अथवा शिवलिंगाच्या समोरसुद्धा नंदी हे वाहन आपणास आजतागायत पाहायला मिळते. शिव मंदिराच्या समोर नंदी मंडप आवर्जून दिसतो. यामध्ये नंदीची उत्कृष्ट मूर्ती कोरलेली असते. या मंडपातील नंदी बसलेला असतो. वळलेली शिंगे, उंच वशिंड, अंगावर विविध प्रकारची आभूषणे, घंटांची माळ ही या नंदीची वैशिष्ट्ये आहेत. शिवाचे वाहन नंदी वेगवेगळ्या प्रकारे परंतु अतिशय उत्कृष्ट रितीने कोरलेले असतात. अगदी आत्ता-आत्तापर्यंत असे नंदी आपणास पाहायला मिळतात. वेरूळच्या कैलास लेण्यात एक पाषाणात सर्व मंदिर कोरलेले आहे. त्यातील नंदी अतिशय उल्लेखनीय आहे.
 

Story of Nandi
 
हळेबिडू येथील नंदी
 
 
हळेबिडू किंवा हळेबीड हे कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातल्या बेलूर तालुक्यातील एक गाव आहे. हळेबिडू इथे इ.स. बाराव्या शतकातील होयसाळ साम्राज्याची राजधानी होती. या ठिकाणी होयसळेश्वराचे सुंदर असे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असल्याकारणाने या मंदिराच्या समोरील बाजूस नंदी मंडप आहे. या मंडपामध्ये सुंदर आणि अलंकरणाने युक्त अशी नंदीची प्रतिमा आहे. ती ग्रॅनाइट या पाषाणापासून निर्माण केलेली आहे. नंदीचे मुख मंदिराकडे आहे. नंदी बसलेला असून त्याचे समोरील दोन पाय त्याच्या अंगाखाली मुडपलेले दिसून येतात, तर मागील दोन पायदेखील मुडपलेले असून या पायांच्या वरून शेपूट दाखवलेले आहे. त्याच्या चारही पायांमध्ये खुराच्या जवळ नक्षीकामाने युक्त असे तोडे दिसून येतात. पायाची नखेदेखील सुबक कोरली आहेत. नंदीचे वशिंड हुबेहुब कोरण्यात आलेले आहे. त्यामुळे नंदी खरा आहे की काय असा भास होतो. नंदीच्या गळ्यामध्ये घंटेची सुबक अशी माळ कोरण्यात आली आहे, तर गळ्याच्या जवळील बाजूस साखळी दिसून येते आणि याची गाठ वरील बाजूस बांधलेली दाखवण्यात आली आहे. तर गळ्याच्या अगदी जवळ तीन दोर्‍या अतिशय सुबक दाखवण्यात आल्या आहेत. नंदीचे कान ताठ असून तो सावधपणे बसला आहे. नंदीच्या गळ्याच्या खालील बाजूस मध्यभागी मोठी घंटा आहे. कपाळावर नक्षकामाने युक्त अशी माळ आहे. एकंदरीत होयसळेश्वर मंदिरातील नंदी होयसळकलेचा एक उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल.
 
विरुपाक्ष मंदिर पट्टदकल येथील नंदी
 
 
विरुपाक्ष मंदिराची निर्मिती इ.स. 740च्या सुमारास झाली. विक्रमादित्य दुसरा या राजाने या मंदिराचे निर्माणकार्य केले. या राजाने पल्लवांच्या कांची या राजधानीवर स्वारी करून राजधानी कांची जिंकून घेतली. पल्लवांची राजधानी कांची येथे असलेले कैलासनाथ मंदिर हे अतिशय वैभवशाली होते. अप्रतिम सौंदर्याचा नमुना असलेले हे मंदिर राजा विक्रमादित्य दुसरा याला फार आवडले. कैलासनाथ मंदिराने प्रभावित झालेला राजा विक्रमादित्य, ज्या कलाकारांनी कैलासनाथ मंदिर बांधले, त्यांना पट्टदकल येथे घेऊन आला. राजा विक्रमादित्याने त्यांच्याकडून अगदी तसेच मंदिर बांधून घेतले. विरुपाक्ष मंदिराची निर्मिती द्रविड शैलीत झालेली आहे. या मंदिराच्या समोर स्वतंत्र असलेला नंदीमंडप आहे. नंदीचे मुख मंदिराकडे आहे. नंदी बसलेला असून त्याचे समोरील दोन पाय त्याच्या अंगाखाली मुडपलेले दिसून येतात, तर मागील दोन पायदेखील मुडपलेले असून या पायांच्या वरून त्याचे शेपूट आलेले दाखवलेले आहे. नंदीचे वशिंड आणि त्याची बसण्याची पद्धत आजच्या बैलांसारखीच दिसून येते. या नंदीवर जास्त अलंकरण केलेले दिसून येत नाही.
 
 
Story of Nandi
 
महाबलीपुरम येथील एकाश्म पाषाणापासून निर्मित नंदी
 
 
तामिळनाडू राज्यामध्ये महाबलीपुरम असून या ठिकाणी पांडव रथ म्हणून प्रसिद्ध एकाश्म पाच मंदिरे आहेत. यामध्ये द्रौपदीरथ, अर्जुनरथ, भीमरथ, धर्मराजरथ आणि नकुल-सहदेवरथ आहेत. याच्या मागील बाजूस एका नंदीची प्रतिमा कोरण्यात आली आहे. इ.स. 7व्या ते 8व्या शतकात पल्लव राजा नरसिंह वर्मन प्रथम याने याची निर्मिती केली. या ठिकाणी एकाश्म नंदीची प्रतिमा कोरण्यात आलेली आहे. यावर फारसे नक्षीकाम आढळून येत नाही. जे काही नक्षीकाम करण्यात आलेले होते, ते तेथील आर्द्रतेमुळे खराब झालेले आहे, कारण येथून जवळच समुद्र आहे. येथील क्षारयुक्त हवेमुळे याचे बरेचसे नुकसान झालेले आहे. तरीदेखील आपल्याला नंदीचे मूळ रूप दिसून येते. यामध्ये नंदीचे वशिंड अतिशय सुबक दाखवण्यात आले आहे. गळ्यामध्ये एक दोरी असून मध्यभागी घंटा आहे. नंदी बसलेला असून त्याचे समोरील दोन पाय त्याच्या अंगाखाली मुडपलेले दिसून येतात, तर मागील दोन पायदेखील मुडपलेले आहेत. नंदीचे शेपूट डाव्या बाजूला वळलेले दिसून येते.
 

Story of Nandi  
 
बृहदेश्वर मंदिर येथील नंदी
 
 
तंजावर, तामिळनाडू येथे कावेरी नदीच्या दक्षिण तिरावर स्थित हे बृहदीश्वर मंदिर शिवाला समर्पित द्रविडी शैलीतील मंदिर आहे. मंदिरास राजराजेश्वरमदेखील म्हटले जाते. हे मंदिर चोळ राजा राजराजा पहिला याने इ.स. 1003 ते 1010 या दरम्यान बांधले. हे णछडउजद्वारा जागतिक दर्जाचे स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. मंदिराच्या समोर प्रांगणामध्ये नंदी मंडप आहे. मंडपामध्ये नंदीची मोठी मूर्ती दिसून येते. यामध्ये नंदीचे मुख मुख्य मंदिराकडे आहे. नंदी बसलेला असून त्याचे समोरील दोन पाय मुडपलेले असून पिंडरीवर कीर्तिमुख, तर खालील बाजूस साखळी दाखवण्यात आली आहे. गळ्याच्या अगदी जवळ तीन दोर्‍यांच्या तीन माळा अतिशय सुबक दाखवण्यात आल्या आहेत. नंदीचे वशिंड सुबक कोरण्यात आलेले आहे. नंदीचे मुख थोडे उघडलेले असल्यामुळे त्याच्या तोंडातील जीभ बाहेर आलेली आहे. नंदीच्या पाठीवर झूल आहे. ही झूल वेगवेगळ्या नक्षीकामाने युक्त आहे. नंदीचे कान ताठ असून त्यावर साखळीचे नक्षीकाम केलेले आहे. नंदीच्या गळ्यामध्ये ज्या माळा दाखवण्यात आल्या आहेत, यामध्ये सर्वात वरची माळ साखळीची आहे. दोन नंबरची माळ घंटेची आहे. तिसरी माळसुद्धा घंटेची माळ आहे. चौथी माळ झुंबराची आहे. पाचवी माळ कीर्तिमुखाची आहे, तर सर्वात शेवटची माळ झाडाच्या पानांची असावी, असे दिसून येते. सर्वात शेवटी एक पट्टी असून त्यावर मध्यभागी कीर्तिमुख कोरलेले आहे. हा नंदी 16 फूट लांब, 8.5 फूट रुंद आणि 13 फूट उंच आहे.
 

Story of Nandi  
 
कैलास मंदिर, वेरूळ येथील नंदी
 
 
औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट 35 लेणी आहेत. 16 नंबरचे लेणे असलेले कैलास हे एक मंदिर लयन स्थापत्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इ.स. 8व्या शतकात राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने याची निर्मिती केली. हे एकाश्म मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. गर्भग्रह, अंतराळ, प्रदक्षिणा पथ, सभामंडप, अर्धा मंडप, मुखमंडप आणि नंदी मंडप अशी या मंदिराची रचना आहे. कैलास मंदिराला माणिकेश्वर या नावानेदेखील ओळखले जात होते. मंदिराच्या समोरील बाजूस नंदी मंडप असून मंडपामध्ये नंदीची प्रतिमा आहे. नंदीचे मुख जीर्ण झाले आहे. डोळ्यांचा आणि कानाचा भाग भग्न झालेला दिसून येतो. हा नंदी पीठावर आसनस्थ आहे. त्याचे मागील दोन पाय व समोरील दोन पाय दुमडलेले असून ते त्याच्या अंगाखाली आहेत. नंदीचे वशिंड सुबक कोरण्यात आले असून आकाराने लहान आहे. नंदीच्या गळ्यामध्ये, तसेच अंगावर साखळीचे नक्षीकाम केलेले दिसून येते. हे लेणे असल्याने सर्व एक पाषाणातूनच आहे.
 
 
त्र्यंबकेश्वर मंदिर, नाशिक येथील नंदी
 
 
नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथे श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग असलेले मंदिर आहे. नाशिकपासून 40 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये शिवलिंग असून मंदिरासमोर नंदी मंडप आहे. हा नंदी पीठावर आसनस्थ आहे. नंदी अलंकरणाने युक्त आहे. नंदीस नियंत्रणात ठेवण्याकरिता त्याच्या मुखाला दोरी बांधलेली आहे. गळ्यामध्ये साखळी आहे, तर मध्यभागी घंटा दिसून येते. नंदीचे वशिंड रुबाबदार असून त्याच्याभोवती दोरीचे नक्षीकाम केलेले आहे. त्याचे कान खालील बाजूस दिसून येतात. नंदीचे समोरील दोन्ही पाय पाठीमागे दुमडलेले आहेत, तर मागील दोन पाय त्याच्या अंगाखाली दुमडलेले आहेत. शेपूट दिसून येते. नंदीच्या नाकपुड्या फुगलेल्या दिसून येतात. नंदी आकाराने लहान असला, तरी तो अलंकरणाने युक्त आहे. नंदीच्या पाठीवर झूल असून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे.
 
 
भारताच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि अधुनिक कालखंडाचा अभ्यास केला असता असे दिसते की या सर्व काळात चित्रकलेत, शिल्पकलेत नंदीचा/बैलाचा आविष्कार मुक्त होता. भारताच्या अधार्मिक आणि धार्मिक कलेत बैलाचा वावर मुक्त होता, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अगदी आतापर्यंत बैलाच्या प्रतिमा मंदिराच्या वेगवेगळ्या भागावर, तसेच नंदी मंडपामध्ये पाहावयास मिळतात. आजही आपण बैलपोळा साजरा करतो, कारण बैल आपणास उपयुक्तच आहे. आजच्या ट्रॅक्टरच्या जमान्यात बैल न विसरणे गरजेचे आहे.
 
 
(लेखिका पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सोलापूर विद्यापीठात पुरातत्त्वशास्त्र विभागप्रमुख आहेत.)
- सर्व छायाचित्रे इंटरनेटवरून साभार