जनकल्याण समितीची सुवर्णमहोत्सवी आश्वासक वाटचाल

29 Oct 2022 14:29:39
@विवेक गिरिधारी । 9422231967
 
आपत्तिनिवारणाच्या प्रासंगिक मदतकार्यातून सुरू झालेले काम समाजातील दारिद्य्र, विपन्नता व अगतिकता लक्षात घेऊन स्थायी स्वरूपातील उपक्रमांतून व प्रकल्पांमधून करण्याची गरज भासू लागली. त्यासाठी उभारल्या गेलेल्या रा. स्व. संघ जनकल्याण समितीची यंदा सुवर्णमहोत्सवी वाटचाल चालू आहे. त्या निमित्ताने समितीच्या कार्याचा सविस्तर परिचय करून देणारा हा विशेष लेख.


rss
 
महाराष्ट्रातील नैसर्गिक आपत्तींच्या इतिहासमापनात ‘1972चा दुष्काळ’ हे एक मोठे पर्व आहे. संघकार्यकर्ते यापूर्वी जसे वेळोवेळी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी देशभर धावून गेले होते, तसे ते याही वेळी गेले. या अभूतपूर्व दुष्काळात ‘दुष्काळ विमोचन समिती’ची स्थापना करून महाराष्ट्रात ठिकठिकाणी संघ कार्यकर्ते सक्रिय झाले व त्यांनी मोठे भरीव मदतकार्य केले. दुष्काळात होळपळणार्‍या पीडित बांधवांना मदतीचा हात दिला, चहूबाजूंनी निराशेच्या गर्तेत सापडलेल्या बळीराजाला जगण्याची नवी उमेद दिली. समितीतर्फे जागोजागी चारा छावण्या, पाणीपुरवठा व अन्नछत्रे उभी करण्यात आली. धान्यवाटप करण्यात आले. यातून संघकार्यकर्त्यांना समाजाच्या विपन्नावस्थेचे जवळून प्रत्यक्ष दर्शन झाले. अशा प्रकारचे सेवा कार्य करण्यासाठी ते काही फक्त आपत्ती आल्यावरच करण्याची गोष्ट नसून सामान्य परिस्थितीमध्येही सातत्याने अशी सेवा करण्याची नितांत गरज आहे, हे ध्यानात आले. सामान्य परिस्थितीतही अशी सेवा कार्ये चालू ठेवायची असतील, तर काहीतरी स्थायी रचना करणे क्रमप्राप्त होते. त्यातूनच ‘दुष्काळ विमोचन समिती’चे ‘रा.स्व. संघ जनकल्याण समिती’त विधिवत रूपांतर झाले. नैमित्तिक आपत्तिनिवारणाच्या उपक्रमाला स्थायी नित्य स्वरूपाच्या सेवा कार्याची जोड मिळाली.
 
 
 
1989च्या हेडगेवार जन्मशताब्दी वर्षात जनकल्याण समितीच्या राज्यभर विस्तारण्याच्या कामाला एक गती मिळाली आणि पुढील दहा वर्षांत शंभरहून अधिक छोटे-मोठे सेवा प्रकल्प सुरू झाले. संघाच्या विचाराने, प्रेरणेने व पुढाकाराने सुरू झालेले सर्व वैद्यकीय सेवा उपक्रम व प्रकल्प यात अंतर्भूत करण्यात आले. यात पनवेल येथील रुग्णालय, विविध रक्तपेढ्या, ग्राम आरोग्यरक्षक प्रकल्प, लातूर येथील भूकंपग्रस्तांसाठीचे स्थायी स्वरूपाचे काम अशा मोठ्या प्रकल्पांचाही समावेश होता.
 
 
सतत विस्तारणारे जनकल्याण समितीचे कार्य
 
 
वर्ष 2004च्या सुमारास समितीच्या कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि देवगिरी प्रांतांची निर्मिती करण्यात आली. गरजेनुसार कामाच्या सुसूत्रीकरणासाठी जिल्हा समिती, विभाग समिती, संभाग समिती आणि प्रांत समिती अशा रचना स्वाभाविकपणे करण्यात आल्या. कामाच्या गरजेनुसार विविधांगी प्रकारांनी काम विस्तारले गेले. पूर्वांचल विकास व वनवासी या दोन नवीन विषयांची भर पडली. फिरती विज्ञान प्रयोगशाळा, बालकामगार शाळा, किशोरी विकास, अभ्यासिका, वाचनालय व पुस्तकपेढी आदी शैक्षणिक उपक्रमांना ग्रामीण व शहरातील सेवा वस्त्यांमध्ये गती मिळाली. जलसंधारण योजना, पाणलोट क्षेत्रविकासाचे उपक्रम, गावातील ओढे, नाले, तसेच शेततळी व तलाव यातील गाळ काढणे आदी यापूर्वी न हाताळलेल्या उपक्रमांनाही हात घातला गेला. यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करताना शिक्षण, संस्कार, आरोग्य, कृषी, स्वावलंबन, आपत्तिविमोचन व पूर्वांचल विकास या सात प्रमुख आयाम अथवा प्रकारांनी जनकल्याण समितीचे काम विस्तारत आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात 58 जिल्ह्यांमधून सुमारे 1800हून अधिक प्रकल्पातून हे विविधांगी कार्य छोट्या-मोठ्या प्रकल्पांतून चालू आहे.
 
 
अलीकडच्या काळातील आपत्ती निवारणाचे कार्य
 
 
नैमित्तिक आपत्तिनिवारण ही तर समितीच्या कामाची सुरुवात असल्याने ते काम तर सातत्याने व जेव्हा गरज असेल तेव्हा चालू असतेच. अगदी अलीकडे काही वर्षांपूर्वी सांगली येथे महापुराने हाहाकार माजविला होता, त्या वेळी समितीतर्फे सांगलीतील चार तालुक्यांतील केंद्रात मिळून रोज सुमारे तीन हजार नागरिकांच्या भोजन व न्याहारीची व्यवस्था करण्यात आली होती. पूर ओसरल्यावर सुमारे 15 हजार कुटुंबांना 32 नित्योपयोगी वस्तूचा संच वितरित करण्यात आला. महाड-चिपळूण परिसरात पुराने बाधित अडीच हजारहून अधिक कुटुंबांना प्रासंगिक भोजनव्यवस्था करणे, जीवनावश्यक वस्तूंचा संच देणे, घरांची साफसफाई करणे या स्वरूपाची मदत करण्यात आली. अशाच प्रकारे पाटण तालुक्यातील कोयनानगर परिसरात दरडी कोसळून बेघर झालेल्या लोकांसाठी तीन ठिकाणी मदत केंद्रे चालविण्यात आली. यात 650 पूरग्रस्त लोकांची प्रासंगिक राहण्याची व्यवस्था करण्यात आली. समितीच्या तिन्ही प्रांतांतील 88 गावांत दुष्काळनिवारणाचे काम करण्यात आले. यात टँकरने पाणीपुरवठा, पाणी साठवण टाक्या व गुरांसाठी चारावाटप यांचा समावेश होता. यासाठी समाजातून सव्वा दोन कोटींचा निधी देणग्यांतून उभा राहिला.
 
 
rss
 
कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेदरम्यान तर अनेक ठिकाणी कामाची मोठी गरज होती. त्याचे सुसूत्रपणे नियोजन करून अनेक जिल्ह्यांमध्ये कोविड मदत केंद्रे उभारून रुग्णांसाठी तात्पुरती विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली. पुण्यातील महर्षी कर्वे शिक्षण संस्थेत 450 खाटांचा विलगीकरण कक्ष उभारण्यात आला. त्याच्या नियोजनाची महत्त्वाची जबाबदारी समितीकडे होती. या कोविड मदत केंद्रात 1764 रुग्णांवर उपचार करण्यात आले. या कामात 664 कार्यकर्ते सक्रिय होते. या उपक्रमासाठी जनसामान्यांचा मिळालेला सढळ पाठिंबाही मोलाचा होता.
 
 
 
मोठ्या प्रकल्पांचा संक्षिप्त आढावा
 
 
महाराष्ट्राच्या विविध भागात सध्या मोठ्या स्वरूपाचे व उल्लेखनीय अनेक प्रकल्प कार्यरत आहेत. त्याची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे -
 
डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालय, पनवेल
 
 
पनवेल (जि. रायगड) येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन हे निष्णात शल्यविशारद व संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. त्यांनी परिसरातील रुग्णांची गरज ओळखून 1964मध्ये रुग्णालय सुरू केले होते. त्यांच्या दुख:द निधनानंतर त्यांच्या पत्नी नीलाताई पटवर्धन यांनी 1988मध्ये ही रुग्णालयाची वस्तू जनकल्याण समितीकडे चालविण्यासाठी सुपुर्द केली. आता हे सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा माफक दरात उपलब्ध करून देणारे रुग्णालय म्हणून नावारूपास आले आहे. रुग्णालयाच्या परिसरातील 21 गावांमधील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. वर्षभरात 50 हजारांहून अधिक रुग्ण येथील सेवांचा लाभ घेतात.
 

rss 
 
जनकल्याण निवासी विद्यालय, हरंगुळ
 
 
1993मध्ये मराठवाड्यात किल्लारी येथे झालेल्या विनाशकारक भूकंपामुळे परिसरातील संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त झाले. या परिसरातील भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाबरोबरच मुलांचे शिक्षण बंद पडण्याचा धोका लक्षात घेऊन हरंगुळ (जि. लातूर) येथे शाळा सुरू करण्यात आली. आज या शैक्षणिक प्रकल्पाच्या साडेनऊ एकर जागेत जनकल्याण निवासी विद्यालय चालते. यात सध्या 456 मुले व 121 मुली शिकत आहेत. येथे विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष व गणेश मंदिर आहे. शैक्षणिक प्रगतीबरोबरच येथे मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे अनेक उपक्रम राबविले जातात.
 
 
भूकंपग्रस्तांसाठी पुनर्वसन, संस्कार व अन्य देशविघातक कामांवर लक्ष ठेवण्यासाठी लातूर व धाराशिव जिल्ह्यांत 12 गावांमध्ये भारतमाता मंदिरांची उभारणी करण्यात आली. सध्या सार्वजनिक उपक्रम, शेतकरी मार्गदर्शन व युवकांसाठी व्यवसाय मार्गदर्शन यासाठी या जागेचा वापर करण्यात येतो.
 
 
 
मेंदूचा पक्षाघात ही बालकांमधील जन्मत:च व्यंग निर्माण करणारी अवस्था आहे. या अवस्थेत बालकांच्या हालचाली, वैचारिक व संभाषणक्षमता, स्पर्शाची जाणीव व एकूण अभिव्यक्ती यात न्यूनता आढळून येते. अशा मुलांना व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी हरंगुळ येथे ‘संवेदना सेरेब्रल पाल्सी विकसन केंद्र’ चालविण्यात येते. सध्या 80 मुले त्याचा लाभ घेत आहेत. राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन या उपक्रमाचे कौतुकही करण्यात आलेले आहे. दिल्लीच्याच संतेश्वर प्रतिष्ठान यांच्याकडूनही या प्रकल्पाला पाच लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे.
 
 
 
 
नाशिक, नगर व ठाणे येथील रक्तपेढ्या
 
 
वाढत्या शहरीकरणामुळे रक्तपेढ्या ही नाशिक, नगर व ठाणे यासारख्या मोठ्या शहरांची अत्यावश्यक गरज निर्माण झाली आहे, हे लक्षात घेऊन या तीन ठिकाणी रक्तपेढ्यांची उभारणी करण्यात आलेली आहे. अद्ययावत यंत्रसामग्री, कुशल व प्रशिक्षित तंत्रज्ञवर्ग, स्वतंत्र इमारती, रक्तसंकलनासाठी नियमित शिबिरे व त्यासाठीची वातानुकूलित वाहने ही या तिन्ही ठिकाणची वैशिष्ट्ये आहेत. यामुळेच प्रगत व आदर्श रक्तपेढ्या ही जनकल्याण समितीची एक स्वतंत्र ओळखच बनली आहे. थॅलेसेमिया व हिमोफिलिया रुग्णांना या तिन्ही रक्तपेढ्यांमार्फत मोफत रक्त दिले जाते. या क्षेत्रातील छअइक हे सर्वोत्तम गुणवत्तेसाठीचे नामांकन तिन्ही रक्तपेढ्यांना मिळाले आहे. नाशिक येथील रक्तपेढीत जीवघेण्या विषाणूंचे रक्तातील अस्तित्व तपासणे यासाठी छअढ ही आधुनिक व सुरक्षाप्रणाली बसविण्यात आलेली आहे.
 
 
rss
 
 
ग्राम आरोग्यरक्षक प्रकल्प
 
 
दुर्गम भागातील वनवासी भागात व खेड्यापाड्यात आजही अनेक गावांमध्ये वेळेवर आरोग्यसेवा मिळणे दुरापास्त असते. यावर उपाय म्हणून 1998मध्ये जनकल्याण समितीतर्फे ग्राम आरोग्यरक्षक योजनेची सुरुवात करण्यात आली. सध्या 21 जिल्ह्यांमध्ये 972 आरोग्यरक्षक कार्यरत आहेत. यात गावामधील सेवाभावी वृत्तीच्या कार्यकर्त्याला प्राथमिक उपचाराचे प्रशिक्षण व आवश्यक ती औषधे उपलब्ध करून देण्यात येतात. ती वेळी-अवेळी रुग्णासाठी खूप मोलाची ठरतात. शुद्ध पाणी, सार्वजनिक स्वच्छता, वनीकरण, सेंद्रिय शेतीचा प्रसार व गांडूळ खतांची निर्मिती हेही विषय गावांमध्ये आरोग्यरक्षकांमार्फत लावून धरले जातात.
 
 

rss 
 
 
फिरती विज्ञान प्रयोगशाळा
 
 
दुर्गम ग्रामीण भागातील शाळांमधील प्रामुख्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे, कुतूहल निर्माण करणे व त्यांना स्वहस्ते प्रयोग करण्याची संधी निर्माण करणे या हेतूने 1993मध्ये ठाणे जिल्ह्यात शहापूर-मुरबाड परिसरात हा प्रकल्प सुरू झाला. यात विज्ञानाचे प्रयोग मुलांकडून करवून घेऊ शकणार्‍या व त्या मागचे शास्त्रीय तत्त्व उलगडून दाखवू शकणार्‍या परिसरातील शिक्षकाची निवड करण्यात येते. त्याकडे अंदाजे वीस शाळांची जबाबदारी दिली जाते. तो शिक्षक प्रयोगाचे सर्व साहित्य असलेली पेटी घेऊन मोटरसायकलवर प्रत्येक शाळेत जातो, मुलांना प्रयोग दाखवितो व करवूनही घेतो. सध्या या उपक्रमात 18 शिक्षक सहभागी असून ते 365 शाळांमध्ये हा उपक्रम राबवितात. सुमारे 28 हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम नित्य स्वरूपात गेली अनेक वर्षे चालू आहे. साधनांचा व अनेकदा प्रेरणेचा अभाव असणार्‍या ग्रामीण व वनवासी भागात या उपक्रमाचे मोल मोठे आहे.
 
 
rss
 
पूर्वांचल विद्यार्थी वसतिगृह
 
 
ईशान्य भारतामधील प्रदेशाला पूर्वांचल असे संबोधले. या परिसरात सध्या फुटीरतावाद, दहशतवाद मोठ्या प्रमाणात आहे. याच्या छायेतून मुलांना बाहेर काढण्यासाठी व संस्कारक्षम वयात या मुलांवर महाराष्ट्रात आणून त्यांच्यावर राष्ट्रीयत्वाचे संस्कार करण्याच्या हेतूने पूर्वांचल वसतिगृह या उपक्रमास 1995मध्ये सुरुवात झाली. देशभक्ती व राष्ट्रीयत्वाचे संस्कार घेऊन परत गेलेले हे विद्यार्थी ईशान्य भारतातही त्याच संस्कारांचा वारसा पुढे चालवितात, हा अनुभव आहे. सध्या महाराष्ट्रात डोंबिवली, चिपळूण, नाशिक, सांगली, पुणे, चिंचवड, संभाजीनगर व लातूर या शहरांमध्ये 8 वसतिगृहे कार्यरत असून त्यात 43 मुले व 64 मुली शिक्षण घेत आहेत.
 
 
 
मुंबई महानगर-वस्ती परिवर्तन योजना
 
 
यंदाच्या वर्षीच सुरुवात झालेल्या या प्रकल्पात माता-बाल आरोग्यावर विशेषत्वाने भर देण्यात येत आहे. यात मुंबईतील 46 वस्त्यांमधील 0 ते 6 वर्षे वयोगटातील निवडक बालकांना व त्यांच्या मातांना दररोज पोषक आहार देण्यात येत आहे. यात एकूण 2350 गरजू बालके निवडली आहेत. याशिवाय या वस्त्यांमधील नागरिकांना वस्तीपातळीवर आरोग्यसेवा पुरविण्यासाठी चल चिकित्सालयाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या उपक्रमाच्या वस्तीपातळीवरील संयोजनासाठी या प्रत्येक वस्तीतील एका सेवाभावी महिलेची निवड करण्यात आली आहे. याबरोबरच किशोरी विकास वर्ग, मुलांसाठी संस्कार व अभ्यासवर्ग आदी उपक्रमांची जोड नजीकच्या काळात दिली जाणार आहे.
 
 
 
सेवा भवन - पुण्यातील प्रस्तावित सेवाप्रकल्प
 
 
पुण्यातील एरंडवणे या मध्यवर्ती परिसरात आरोग्यविषयक उपक्रमांसाठी सेवा भवन या आठमजली इमारतीची भव्य वास्तू प्रस्तावित आहे. यात 22 बेडचे डायलिसिस सेंटर प्रस्तावित आहे. येथे गरजू रुग्णांना कमी खर्चात डायलिसिससारखी तातडीची व अत्यावश्यक सेवा चोवीस तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या परिसरात अनेक रुग्णालये आहेत. तेथे बाहेर गावांहून उपचारासाठी येणार्‍या गरजू रुग्णांची व त्याच्या 60-70 नातेवाइकांची सोय अल्पदरात करण्याचीही योजना आहे.
 
 
सेवा कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण - एक निरंतर प्रक्रिया
 
 
आपत्तिविमोचनासारख्या प्रासंगिक कामांपासून नित्य स्वरूपातील व त्यातही मोठ्या स्वरूपाचे प्रकल्प लावून धरताना वेगळ्या प्रकारच्या मनोधारणेची व सातत्याची गरज असते. जबाबदारी सक्षमपणे निभावण्याची गरज असते. प्रेरणासंपन्न कार्यकर्त्यांना कामाची गरज ओळखून सक्षम बनविणे व कामानिमित्ताने जोडले गेलेल्या सक्षम कर्मचारी सदस्यांमध्ये समाजभाव, सेवाभाव जागृत करण्यासाठी प्रकल्पातील सर्व पूर्णकालीन व अंशकालीन कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणावर विशेष भर देण्यात येत असतो. संघभावना, सामूहिक चिंतन, परस्परविश्वास व परस्परपूरकता या भावनांचा परिपोष होण्यासाठीची मानसिकता या प्रशिक्षणांमधून घडणे अपेक्षित असते. प्रकल्प यशस्वी होण्यासाठी परस्पर सहविचार, अधिकार व जबाबदार्‍यांचे विकेंद्रीकरण, तज्ज्ञतेनुसार कामाची विभागणी, स्पष्टता व मर्यादांची जाणीव तसेच योग्य व्यक्तीला योग्य काम, कार्यालयीन कौशल्ये, शासकीय कायदे यांचा परिचय, संगणक हाताळणी, लेखा (अकाउंट) व्यवस्थापन आदी सुनियोजित व्यवस्थापनाची पथ्ये पाळणे गरजेचे असते. याचाही अंतर्भाव या प्रशिक्षणात वेळोवेळी केला जातो. प्रशिक्षण ही एक सातत्याची दीर्घकालीन प्रक्रिया आहे. सतत वाढणारे सेवा प्रकल्प, त्यात वेळोवेळी नव्याने सामील होणारे कार्यकर्ते व कर्मचारी सदस्य यांच्यातील सेवाभाव धारणा कायम राखण्यासाठी या प्रशिक्षणांचा नक्कीच उपयोग होत असतो.
 

rss 
 
 
पुरस्कार कार्यक्रमांचे आयोजन
 
 
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय व दखलपात्र कामगिरी करणार्‍या आणि वय वर्षे 45पेक्षा कमी असणार्‍या युवा कार्यकर्त्यांना ‘स्वामी विवेकानंद युवा पुरस्कार’ हा पुरस्कार दर वर्षी देण्यात येतो. शिक्षण, विज्ञान, वैद्यकीय सेवा, क्रीडा व योग, महिला सबलीकरण आणि सेवा या सहा प्रकारांपैकी दोन विषयांतील पुरस्कार प्रत्येक वर्षी 12 जानेवारीला देण्यात येतात. 41 हजार रुपये रोख, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. वर्ष 2014पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत.
 
 
 
वाङ्मय, सेवा, कृषी, क्रीडा, कला, समाजप्रबोधन, अनुसंधान, धर्मसंस्कृती, पर्यावरण, महिला सबलीकरण या क्षेत्रांत आयुष्य वेचणार्‍या व भरीव कामगिरी करणार्‍या व्यक्तीला ‘प.पू. श्रीगुरुजी पुरस्कार’ दर वर्षी देण्यात येतो. 1 लाख रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असते. वर्ष 2016पासून हे पुरस्कार देण्यात येत आहेत. दर वर्षी दोन विषयांतील पुरस्कार देण्यात येत असतात. या दोन्ही पुरस्कारांची निवडप्रक्रिया व पुरस्कार प्रदान कार्यक्रम याची जबाबदारी जनकल्याण समितीकडे असते.
 
 
 
निरपेक्ष भावनेने प्रदीर्घकाळ समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात सक्रियतेने काम केलेल्या, परंतु आता वयामुळे प्रकृतीच्या मर्यादा आलेल्या समाजसेवकांबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही निवडक व्यक्तींना दर वर्षी आर्थिक साहाय्य करण्यात येते. समाजसेवक साहाय्यता निधीतून समितीतर्फे ही मदत करण्यात येते. हा एक स्तुत्य उपक्रम आहे.
 
 
 
नैमित्तिक आपत्तिनिवारणासह विविध आघाड्यांवर सातत्यपूर्ण काम करीत समाजातील दुर्बल व गरजू घटकांसाठी सेवाभाव जपत जनकल्याण समितीची सुवर्णमहोत्सवी वर्षात चालू असणारी कालक्रमणा निश्चितच भूषणावह आहे. कोविड मदतकार्याच्या निमित्ताने जनकल्याण समितीचे विविधांगी कार्य ‘मन की बात’मधून अलीकडे माननीय पंतप्रधान यांनीही वाखाणलेले आहे. ते अगदीच सार्थ आहे!
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0