@अभय पालवणकर
मनसेच्या दीपोत्सव उद्घाटनाच्या निमित्ताने भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे या तिन्ही राजकीय पक्षांची युती होण्याची चर्चा महाराष्ट्रात होऊ लागली आहे. प्रत्यक्षात ही युती होते की, या तीनही पक्षांचे नेते केवळ दीपोत्सवासाठीच एकत्र आले होते... याचे उत्तर येणारा काळच देईल. घोडामैदान फार लांब नाही.
स्थापनेपासून मनसे शिवाजी पार्क येथे दीपोत्सव साजरा केला जात असायचा. कधी शिवसेना आणि मनसेचा यावरून वाद-विवाद होऊन दीपोत्सव चर्चेत आला होता. यंदा मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन केले. त्यामुळे महायुती होणार म्हणून चर्चा सुरू झाली आहे. जेव्हा तीन पक्षांचे प्रमुख एकत्र येतात, तेव्हा ही चर्चा होणे स्वाभाविक आहे. राज्यात काही महिन्यांतच महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार का? अशा प्रकारच्या चर्चा माध्यमांत होऊ लागल्या आहेत. काही अपवादत्मक गोष्टी सोडल्या, तर ही महायुती होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण हिंदुत्व हा तिघांच्या युतीमधील समान धागा आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेपासून वंचित ठेवायचे असेल तर या तिन्ही समविचारी राजकीय पक्षांना एकत्र येणे गरजेचे आहे असे दिसते. तसेच राजकीय गणिते पाहता ही युती होणे फारस अवघड नाही, शिवाय काही वर्षांत राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यापेक्षा हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या मराठी मुद्द्याची अडचण येण्याची शक्यता मावळली आहे. शिवसेना फुटणे ही खर्या अर्थाने मनसेला संधी असू शकते, हे राज ठाकरे यांनी अचूक ओळखले आहे. त्यामुळे महायुतीत सामील होऊन महापालिकेची सत्ता मिळाली तर मनसेच्या विस्ताराला मोठा फायदा होऊ शकतो.
काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येतील का?
जर महापपालिकेच्या निमित्ताने भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, मनसे एकत्र आले, तर दुसर्या बाजूला उद्धव ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पार्टी एकत्र येतील असे दिसते. शिवसेना आता सेक्युलर होऊ लागली असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी युती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुंबईत राष्ट्रवादीचे फारसे अस्तित्व नाही. पण मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने अनेक वर्षे विरोधी पक्ष म्हणून काम केले आहे. काँग्रेसचा मुंबईमध्ये मोठा मतदार आहे. एक बर्यापैकी सक्रिय कार्यकर्ता आहे. वर्षांनुवर्षे शिवसेनेच्या विरोधात लढल्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये एक कटुता निर्माण झालेली आहे. हे कार्यकर्ते काँग्रेस आणि शिवसेनेची युती झाल्यास एकदिलाने काम करतील का? नाहीतर बॅनरवर आघाडी आणि खाली कुस्ती अशी स्थिती पाहण्यास मिळाली,, तर नवल वाटायला नको!
बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे एकत्र?
महायुती झाल्यावर अनेक मुंबईकर मराठी माणसांच्या मनात शिवसेना आणि मनसे एकत्र यावेत असे वाटते. मूळ शिवसेनेतील अनेक आमदार व असंख्य शिवसैनिक बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर आहेत. त्यामुळे मराठी मतांचे होणारे विभाजन काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आणि याचा फायदा होऊन अधिक ठिकाणी मराठी नगरसेवक निवडून येऊ शकतात, असे दिसते.
भाजपाचे स्वप्न
2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने शिवसेनाला मोठा शह दिला होेता. अगदी थोडक्यात पालिकेची सत्ता भाजपाच्या हातून गेली होती. त्यामुळे या वेळी भाजपाने पूर्ण तयारीने पालिकेची सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. गेल्या पाच वर्षांत विविध कार्यक्रम राबवले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईच्या विकासासाठी भरीव असे योगदान दिले आहे. त्यामुळे या वेळी भाजपाला शिंदे गट आणि मनसेची साथ मिळाली, तर भाजपा सत्तेपर्यंत अगदी सहज पोहोचू शकते. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत भाजपाची एकहाती सत्ता स्थापन करून मुंबईचा विकास सहज करता येऊ शकतो. त्यामुळे सत्ता मिळवणे हे भाजपाचे स्वप्न आहे.
प्रत्यक्षात ही युती होते की, या तीनही पक्षांचे नेते केवळ दीपोत्सवासाठीच एकत्र आले होते... याचे उत्तर येणारा काळच देईल. घोडामैदान फार लांब नाही.