संघ जगलेला माणूस

14 Oct 2022 12:35:34
 

Dattopant Thengadi 
मा. उदयराव पटवर्धन हे 1971पासून भारतीय मजदूर संघाशी जोडलेले असून त्यांना दत्तोपंतांचा दीर्घ सहवास लाभला आहे. 2002 ते 2008 या काळात ते राष्ट्रीय महामंत्री म्हणून कार्यरत होते. दत्तोपंतांची स्वभाववैशिष्ट्ये आणि वैचारिक भूमिका याविषयी उदयराव पटवर्धन यांच्याशी साधलेला संवाद.
संघप्रचारक दत्तोपंत ठेंगडी कामगार चळवळीत सक्रिय कसे झाले?
 
 
दत्तोपंत संघस्वयंसेवक होते. साठ वर्षे ते प्रचारक जीवन जगले. प्रथम बंगालमध्ये आणि नंतर केरळमध्ये प्रचारक म्हणून काम केल्यावर ते 1945 साली नागपूरला आले. 1948 साली गांधीहत्येनंतर संघबंदी आली. त्या काळात संघनेतृत्वाच्या लक्षात आले की आपण विविध क्षेत्रांत जाऊन काम केले पाहिजे. त्यातूनच मग अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापन झाली. हळूहळू विविध विषय घेऊन त्याचा अभ्यास होऊ लागला. कामगार क्षेत्रात आपले काम असले पाहिजे असे श्रीगुरुजींना वाटत होते, त्यानुसार त्या क्षेत्राचा अभ्यास करावा म्हणून दत्तोपंत ठेंगडी यांनी पोस्ट, बँक आणि कोळसा कामगारांच्या संघटनांमध्ये काम करायला सुरुवात केली. या क्षेत्रातील सर्व कामगार संघटना कम्युनिस्ट विचाराच्या होत्या आणि राजकारण करण्याचे एक माध्यम म्हणून त्या कामगाराचा वापर करत होत्या. आपण कम्युनिस्ट विचारधारेचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल की सत्ता हेच त्यांचे अंतिम लक्ष्य असते. पहिल्या महायुद्धाच्या काळात रशियन सैन्य सीमेवर लढत असताना लेनिनने कामगारांचा उठाव करून झारशाही मोडत सत्ता हस्तगत केली होती. सर्व कम्युनिस्ट संघटना तोच कित्ता गिरवताना दिसत होत्या. संघटना कामगारांच्या होत्या, पण कामगार हा त्यांचा केंद्रबिंदू नव्हता. सत्ता प्रस्थापित करण्यासाठी कामगारांना वापरले जात होते. अशी कामगार क्षेत्रात प्राबल्य असणार्‍या संघटनांची स्थिती होती. या सर्व पार्श्वभूमीवर 23 जुलै 1955 रोजी दत्तोपंत ठेंगडी यांनी भारतीय मजदूर संघाची स्थापना केली. या स्थापनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा व्यापक विचार आणि श्रीगुरुजींचे मार्गदर्शन होते.
 
 
सुरुवातीच्या काळात कामगार क्षेत्रावर कोणाचा प्रभाव होता? आणि त्या पार्श्वभूमीवर दत्तोपंतांचे वेगळेपण काय आहे?
 
 
भारतीय मजदूर संघाची स्थापना 1955 साली भोपाळ येथे पस्तीस प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाली. तेव्हा आपण हे संघटन कसे चालवणार याविषयी सखोल चर्चा होऊन ठरले की, कामगारांनी कामगारांच्या हितासाठी चालवलेली राजकारणविरहित चळवळ म्हणजे भारतीय मजदूर संघ होय. त्यातून ’राष्ट्र हित के चोकट में श्रमिक हित’ ही घोषणा जन्माला आली. आपली संस्कृती, संस्कार, परंपरा, इतिहास यांच्याशी आपले नाते असले पाहिजे, ही भूमिका घेतली गेली. आपले राष्ट्र कसे असेल? तर राष्ट्रविरोधी असुरी शक्तीचा आपण सामना करताना ‘प्रथम राष्ट्र’ ही भूमिका कृतीतून दाखवून दिली पाहिजे. 1962 साली चीन युद्धाच्या वेळी चिनी गोळ्यांपेक्षा शू-बाइटने सीमेवरच्या सैनिकांचे मृत्यू अधिक प्रमाणात झाले. कारण त्यांना बर्फामध्ये वापरण्याचे बूट मिळू शकले नाहीत, कारण त्या काळात कलकत्ता येथे ट्रक चालकांनी संप केला होता आणि हे ट्रक चालक कम्युनिस्ट युनियनचे सदस्य होते. अशा पार्श्वभूमीवर भारतीय मजदूर संघ आपली शून्यापासून सुरुवात करून हळूहळू विकसित होताना राष्ट्रहित जपण्याचा प्रयत्न करत होता. देश, समाज यांच्यावर आवळू पाहणार्‍या असुरी शक्तीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय मजदूर संघ कार्यरत झाला.
 
 
दत्तोपंत केवळ कामगार नेते नव्हते, तर मूलगामी विचार करून चळवळीला राष्ट्राशी आणि संस्कृतीशी जोडणारे महान दार्शनिक होते, याबाबत आपण काय सांगाल?
 
 
दत्तोपंत ठेंगडी हे दार्शनिक होतेच, त्याचबरोबर कामगारांच्या हृदयात राष्ट्रभक्ती जागृत करणारे प्रेरणापुरुषही होते. त्यांनी राष्ट्रहिताचे अनेक निर्णय घेतले. त्यातून प्रेरणा घेऊन पुढे अनेक वेळा त्या राष्ट्रभक्तीचा अनुभव आला. काही उदाहरणे सांगितली की दत्तोपंतांनी कशा प्रकारे राष्ट्रभाव जागवला होता हे लक्षात येईल. ‘राष्ट्र प्रथम’ ही आपली नीती असल्याने 1962च्या युद्धकाळात भारतीय मजदूर संघाची सर्व आंदोलने स्थगित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे 1965च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळची गोष्ट आहे. सीमेवर रसद पोहोचवायची होती. तेव्हा मजदूर संघाचा सदस्य असलेल्या कामगाराने आपला जीव धोक्यात घालून सीमेवर रसद घेऊन जाण्याचे काम केले. पाकिस्तानने पेरलेल्या सुरुंगांनी समेवरून परत येत असताना त्या कामगाराचा जीव घेतला. तो हुतात्मा झाला. कारगिल युद्धाच्या काळात भांडार आयुध निर्मिती कारखान्यातून तातडीने बंदुकीच्या गोळ्या सीमेवर पाठवायच्या होत्या. तेथील आपल्या संघटनेच्या कामगारांनी सलग पाच दिवस रात्रंदिवस काम करून सीमेवरच्या तातडीची पूर्तता केली होती. हा विषय येथेच संपत नाही, तर पाच दिवस जादा केलेल्या कामाचा आम्हाला मोबदला नको, असे पत्रही त्यांनी प्रशासनाला दिले होते. देशावर संकट असताना आपण आपल्या पातळीवर देशासाठी काम करून संकटाशी मुकाबला केला पाहिजे, हा भाव दत्तोपंत ठेंगडी यांनी जागवला होता.
 
 
दत्तोपंतांनी अनेक संस्था, संघटना स्थापन केलेल्या आहेत, त्यामागची भूमिका काय होती?
 
 
दत्तोपंतांचे म्हणणे असे होते की आपले काम हे दररोज करण्याचे काम आहे. त्यामुळे अन्य विषयाकडे आपले दुर्लक्ष होऊ शकते. पण कामगार क्षेत्राशिवायचेही अन्य विषय महत्त्वाचे आहेत, त्यांचे आकलन झाले पाहिजे, चिंतन झाले पाहिजे आणि ते विषय राष्ट्रीयतेशी जोडले पाहिजेत. दत्तोपंतांनी असा विचार, चिंतन करणारा गट तयार केला. वेगवेगळ्या विषयांवर चिंतन होऊ लागले. शेतकरी, ग्राहक, स्वदेशी, पर्यावरण अशा समाजहिताच्या विविध गोष्टींचा विचारविनिमय दत्तोपंतांनी सुरू केला. जे जे समाजहिताचे आहे ते जपले पाहिजे, त्याला बळ दिले पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्याचप्रमाणे संस्कार, संस्कृती यांच्या आधारे आपली प्रतीके आणि परिमाणे निर्माण केली पाहिजेत, असा त्यांनी प्रयत्न केला. विश्वकर्मा दिवस, बलराम जयंती अशामागे दत्तोपंत ठेंगडींची विधायक भूमिका आणि सनातन विचार होता.
 
 
 
साठ वर्षांहून अधिक काळ प्रचारक जीवन जगलेल्या दत्तोपंतांची स्वभाववैशिष्ट्ये काय होती?
 
 
दत्तोपंत ठेंगडींचे वर्णन करायचे तर असे म्हणता येईल की, संघात पूर्णपणे विलीन झालेले व्यक्तिमत्त्व म्हणजे दत्तोपंत. ते प्रत्येक श्वासातून संघ जगत असत. संघस्वयंसेवक म्हणून घेतलेल्या प्रतिज्ञेमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड ते करत नसत. सदैव समाजाची काळजी करत. वैयक्तिक आयुष्य ते कधीच जगले नाहीत. त्यांच्या ‘स्व’चा संघात विलय झाला होता. एकदा हैदराबाद येथे मी त्यांच्यासोबत प्रवासात होतो. दत्तोपंत ठेंगडींना मच्छरांचा त्रास होई. एक मच्छर चावला तरी त्यांची झोपमोड होई. त्या रात्री तसेच झाले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांनी सांगितले की रात्री झोप लागली नाही. मग मी कार्यालयाला सांगून कूलर आणि मच्छरदाणीची व्यवस्था केली आणि सांगितले, “आज रात्री तुम्हाला त्रास होणार नाही.” दत्तोपंत हसले. दुसर्‍या दिवशी सकाळी मी भेटायला गेलो आणि विचारले, “झाली का झोप?” दत्तोपंतांनी नाही म्हणून सांगितले. मी प्रश्न विचारला, “आता काय अडचण आली?” तेव्हा दत्तोपंत म्हणाले, “रात्री केरळचा एक प्रचारक माझ्या खोलीत निवासाला आला. केरळच्या संघकामाविषयी आम्ही गप्पा मारल्या. झोपायला जाताना माझ्या लक्षात आले की मला मच्छरदाणी आहे, पण त्या प्रचारकाला नाही. माझ्यासाठी कूलर आहे, त्या प्रचारकाला नाही. मग मी कूलरही वापरला नाही आणि मच्छरदाणीही वापरली नाही.” दत्तोपंत ठेंगडींनी दिलेल्या या उत्तरातून त्याचे व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर येते. त्यांनी स्वयंसेवक भाव कायम जपला.
 
 
 
दत्तोपंतांनी मांडलेल्या विविध संकल्पना विकसित होत आज राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या ठरत आहेत, आपण या गोष्टीकडे आपण कसे पाहता?
 
 
 
दत्तोपंत ठेंगडींनी आपल्या भाषणातून अनेक वेळा संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा उल्लेख केला आहे - ‘फोडिले भांडार। धन्याचा हा माल। मी तो हमाल भारवाही।’ दत्तोपंतांच्या कामामागे श्रीगुरुजींचे चिंतन होते. श्रीगुरुजींनी कधी संकेताने तर कधी स्पष्टपणे दिशादर्शन केले. त्यांना व्यवहारात आणण्याचे काम दत्तोपंतांनी केले. दत्तोपंतांनी अनेक संकल्पना मांडल्या, त्यातील समरसता, पर्यावरण हे विषय आज राष्ट्रीय पातळीवर संघाचे नित्यकार्याचे विषय झाले आहेत. सामाजिक समस्या आणि त्याला उत्तर शोधताना दत्तोपंतांनी भारतीय तत्त्वज्ञान आणि जीवनपद्धती यांचा आधार घेतला. त्यामुळे संविधानाची समता प्रस्थापित व्हायची असेल तर समरसता आवश्यक आहे, हे त्यांनी सांगितले. पर्यावरण विषय मांडताना आपण सृष्टीचे शोषण न करता दोहन केले पाहिजे, असे ते म्हणत. यामागे श्रीगुरुजींची प्रेरणा होती. संघविचाराची व्याप्ती वाढवणार्‍या अनेक संकल्पना दत्तोपंतांनी मांडल्या आहेत.
 
 
आजच्या काळात दत्तोपंतांचे विचार समाजासमोर कशा प्रकारे मांडता येतील?
 
 
दत्तोपंत बारा वर्षे राज्यसभेचे खासदार होते. ते तेव्हा साउथ एव्हेन्यूमध्ये राहत. तेथील टॅक्सी स्टँडवरील सर्व चालकांशी परिचय होता. त्याचप्रमाणे बंगाल आणि केरळमधून आलेल्या कम्युनिस्ट खासदारांशी त्यांचा स्नेह होता. ‘जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत’ अशी त्यांची वृत्ती होती. स्नेह, मैत्री, साधेपणा हा त्यांचा स्थायिभाव होता. ते जगन्मित्र होते. सामान्य कामगार ते झांबियाचे राष्ट्रध्यक्ष असा त्यांच्या मैत्रीचा परीघ होता. कामाशी एकात्म होताना ते कायम स्वयंसेवक भाव जपत असत. दत्तोपंत ठेंगडी यांचा हा मैत्रीचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे.
 
 
मुलाखत : रवींद्र गोळे
 
(- विचारमहर्षी दत्तोपंत ठेंगडी विशेषांक)
Powered By Sangraha 9.0