हिंदुत्व ही आपली ओळख सांगणार्या शिवसेनेचे पक्षप्रमुख विरोधी विचारांच्या पक्षांशी युती करत मुख्यमंत्री पदावर आल्यावर ही ओळख पूर्णपणे विसरले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पालघरमधील साधूंची हत्या, हिंदू सणांवरील निर्बंध, नांदेड-अमरावतीमधील दंगली यांसह अनेक हिंदूविरोधी घटनांची मालिकाच पहायला मिळत आहे.
राज्यातील जनतेने 2019 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून मते दिली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे आणि उदार भूमिकेमुळे शिवसेनेशी युती केली होती. राज्याची सत्ता भाजप-सेना युतीलाच मिळाली होती, परंतु शिवसेनेने विश्वासघात केला. ठाकरे घराण्यातील पहिला मुख्यमंत्री होण्याच्या आमिषाला उद्धव ठाकरे भाळले आणि सेक्युलर पक्षांशी म्होतूर लावला. त्यानंतर कोरोनाच्या काळात जवळजवळ पार्टटाईम मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केले. जगभरात वर्क फ्रॉम होम या तत्त्वाची अंमलबजावणी लोकांनी कुठे स्वखुशीने तर कुठे अनिच्छेने केली. परंतु त्याचे शब्दशः पालन जर कोणी केले असेल तर ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी. मात्र त्यांच्या घर-कारभाराच्या काळातच महाराष्ट्रातील हिंदूंना कधी नव्हे एवढ्या अन्यायाला सामोरे जावे लागले.
एक काळ होता की शिवसेना स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत असे. प्रखर हिंदुत्व म्हणजे आमचेच, असा शिवसैनिकांचा दावा असे. एवढेच कशाला, ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी,’ अशी गर्जना खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत केली होती. त्याच शिवसेनेची स्थिती अशी झाली की तिच्याच राज्यात सर्वात जास्त अत्याचार हिंदूंवर होत आहेत.
ज्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भगवी वस्त्रे घालून, गळ्यात व हातात रुद्राक्षांच्या माळा घालून हिंदूंचे राजकारण केले, त्यांचाच मुलगा मुख्यमंत्री असताना त्याच महाराष्ट्रात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हिंदू समाजाचा अपमान केला जात आहे. सत्ताधारी पक्ष हिंदुत्व सोडून कुटुंबाची पार्टी झाला आहे. परिवाराचा विकास आणि महाराष्ट्राचा विनाश चालू आहे, हे दुर्दैव आहे.
गेल्या महिन्यात त्रिपुरात मुळात जी घटना घडली नाही, ती घडल्याची अफवा पसरवून मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे दंगली झाल्या. त्यावेळी 15-20 हजार लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर हिंदूंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया उमटली. तेव्हा सरकारच्या बाजूने भाजपावरच आरोप करण्यात आला.
वास्तविक ही घटना ही अशा अनेक घटनांच्या साखळीतील एक कडी होती. सत्तेवर आल्यापासून या सरकारने अशाच पद्धतीने अनेक पावले उचलली. पहिल्यांदा या सरकारने काझींचे मानधन वाढविले. त्यानंतर सरकारने आणखी काही मुस्लिमधार्जिणी पावले उचलण्याआधीच कोरोनाचे संकट आले. जगभरातील अन्य भागांप्रमाणे महाराष्ट्रातही टाळेबंदी (लॉकडाऊन) लागली. ही टाळेबंदी केवळ बहुसंख्याकांसाठीच होती आणि अल्पसंख्याक नागरिकांचे सर्व व्यवहार तेव्हाही सुरळीत चालू होते, असे आरोप तेव्हा झाले होते. त्याच काळात एप्रिल 2020मध्ये पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात झालेल्या दोन साधू आणि त्यांच्या एका चालकाच्या हत्येने महाराष्ट्र हादरला. श्री पंच दशनाम जुना आखाड्याचे संत कल्पवृक्षगिरी महाराज आणि सुशीलगिरी महाराज माथेफिरू झुंडीला बळी पडले. पोलिसांच्या साक्षीने जमावाने केलेल्या या हत्येने राज्याच्या सार्वजनिक जीवनात नवीन निच्चांक प्रस्थापित झाला. देशभर सरकारची छी-थू झाली. मात्र त्यापेक्षाही जास्त लज्जास्पद आणि संतापजनक गोष्ट म्हणजे सरकारकडून या घटनेवर घातले जात असलेले पांघरूण. जणू ही एखादी सामान्य घटना आहे आणि विनाकारण त्यावर गहजब होतोय, असा आविर्भाव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी करत होते. त्यांचा हा आविर्भाव आजही चालू आहे. (मात्र तेव्हा गृहमंत्री असलेले अनिल देशमुख आज तुरुंगात आहेत, हा नियतीचा न्याय आहे.)
त्यानंतर हिंदूंच्या विविध सणांवर बंदी आणण्यात आली, मात्र ईदच्या काळात प्रशासन शिथील झाले होते. एवढेच कशाला, मुंबईतील शिवसेना नेत्यांची मजल अजानची स्पर्धा आयोजित करण्यापर्यंत गेली होती. एका लोकप्रतिनिधीने उर्दू दिनदर्शिका छापून त्यावर जनाब उद्धव ठाकरे असा आपल्या हुजूरांचा उल्लेख केला होता.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर राज्यात सर्व व्यवसाय सुरू करण्यात आले. मद्यालये, हॉटेल, दुकाने इतकेच नाही तर गुटखासुद्धा सगळीकडे मिळू लागला. मात्र कोरोना होईल किंवा पसरेल म्हणून मंदिरे बंद ठेवण्यास सरकार भाग पाडत होते. एकीकडे बार सुरू करण्यास परवानगी दिली जाते आहे. मात्र मंदिरे उघडण्यास परवानगी नाकारली गेली. वारकरी संघटनांचे प्रतिनिधी, संत, महंत मंडळींनी गेल्या महिन्यात राज्यात शेकडो मंदिरांत घंटानाद करून मंदिरे उघडण्याची विनंती केली होती. मात्र मुक्या, बहिर्या आणि आंधळ्या सरकारने ती विनंती ऐकली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मुळाची आठवण करून दिली, “सेक्युलॅरिझमच्या नादी लागून तुम्ही आपला मूळ स्वभाव सोडला आहे का?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मद्यालय सुरू आणि मंदिर बंद या स्थितीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले. तेव्हा उपरती होण्याऐवजी राज्यपालांवरच आगपाखड करायला हे मुख्यमंत्री सरसावले होते. “माझ्या हिंदुत्वासाठी तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही,” असे त्यांनी राज्यपालांना उलट बोलण्यास मागे-पुढे पाहिले नाही.
स्वभावाने सहिष्णू असलेल्या हिंदूंनी हा सापत्नभाव पचवला खरा, परंतु मग अन्यायाची अशी मालिकाच सुरू झाली. त्याचे प्रत्यंतर यावर्षी मार्च महिन्यात आले.
मलंगगड येथे होळीच्या दिवशी मच्छिंद्रनाथांच्या समाधीवर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना मुस्लिम कट्टरपंथियांनी अरेरावी, घोषणाबाजी केली. त्यांनी ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दिल्या व आरती करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी हिललाईन पोलीस स्थानकात कट्टरपंथियांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हिंदूंच्याच श्रद्धास्थानाच्या ठिकाणी त्यांच्यावरच अरेरावी केल्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते.
दरवर्षी होळी पौर्णिमेला भाविक मच्छिंद्रनाथांच्या समीधीचे दर्शन घेण्यास जातात. यंदा मलंगगड यात्रा कोरोनामुळे रद्द झाली तरी काही निवडक भाविक पूजा, आरतीसाठी गडावर गेले होते. यातली खास बात ही की ‘मलंगगडावरील यात्रा’ हा उपक्रम शिवसेनेनेच राबवला होता. ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात आपले पाय घट्ट रोवण्यासाठी शिवसेनेने तिचा वापर केला. ‘धर्मवीर’ या संबोधनाने ओळखले जाणारे शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेली ही यात्रा म्हणजे अनेक वर्षे जिल्ह्यातील शिवसेनेचा मुख्य वार्षिक कार्यक्रम होता. मात्र घर फिरले की घराचे वासे फिरतात म्हणतात तसे राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आला आणि या यात्रेवर संक्रांत आली.
अशा प्रकारे हिंदूंवर दंडेली करण्याची घटना फक्त ठाण्यातच घडली काय? छे! छे! अहमदनगर येथे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये असाच प्रकार झाला होता. तेथे शहरातील सूर्यनगरमधील गणेश मंदिरात पुजारी व महिलांना मारहाण करत काही समाजकंटकांनी आरतीस विरोध केला होता. अनेक दिवस हा प्रकार सुरू होता. अखेर या प्रकाराच्या विरोधात कोण पुढे आले? तर शिवसेनेचेच कार्यकर्ते! त्यांनीच या मंदिरात जाऊन पूजा केली व आपल्याच सरकारला आंदोलनाचा इशाराही दिला होता!
ही यादी करायची झाली तर अनेक बाबी मांडता येतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एल्गार परिषदेला परवानगी दिली. याच परिषदेत हिंदूविरोधात गरळ ओकण्यात आली. हिंदू समाज सडलेला आहे म्हणण्यापर्यंत शरजील उस्मानी यांची हिंमत गेली. परंतु एवढे होऊनही हे सरकार ढिम्मच! काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दगडाखाली हात साप़डलेल्या या सरकारने कारवाई करणे तर दूरच, उलट शरजीलवर कारवाई होणार नाही याचीच काळजी घेतली.
या असल्या प्रकारामुळेच जे खरोखरचे शिवसैनिक आहेत, ज्यांनी हिंदुत्वाचे ‘बाळकडू’ प्यायलेले आहे ते हळूहळू का होईना बोलू लागले आहेत.
महाविकास आघाडीत असल्यामुळे शिवसैनिकांचे 100 टक्के नुकसान होत आहे, अशी खंत शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकतीच व्यक्ती केली. महाविकास आघाडीच्या नावाने चालू असलेल्या या सर्कशीत अस्सल शिवसैनिकांची होत असलेली घुसमट व्यक्त करताना हेमंत पाटील म्हणतात की राज्यातील या आघाडीमध्ये आमचा वापर करून घेतला जात असल्याची भावना आमच्या मनात निर्माण झाली आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांच्या कानावर काही बाबी घातल्या आहेत.
अर्थात हिंदूविरोधी विचारांच्या दोन्ही काँग्रेस आणि सत्तेसाठी मम म्हणणारे ठाकरे हुजूर यांच्या कचाट्यात सापडलेल्या सेनेच्या वरिष्ठांना हा आक्रोश कधी ऐकू येणार? मुखभंग होत नाही तोपर्यंत त्यांचा हा हिंदूविरोधी कार्यक्रम सुरूच राहणार. हिंदूंवरील हा अन्याय काँग्रेस कुळातील पक्षांनी केला असता, तर त्याचे वैषम्य वाटले नसते. मात्र हिंदूंच्या नावाने पोळी भाजून घेणार्या शिवसेनेने हा डाव साधला याची खंत जास्त आहे. कुर्हाडीचा दांडा अखेर गोतास काळ ठरलाच, हे खरे दुःख आहे.