येमेनमध्ये युद्धाचे ढग?

22 Jan 2022 11:48:02
@चंद्रशेखर नेने
येमेनच्या हूती संघटनेने अबूधाबीमध्ये केलेल्या हल्ल्यात तीन लोकांचा मृत्यू आणि 8 जण जखमी झाले. मृतांपैकी दोघे भारतीय होते. ही घटना हे अरब भूमीवरील युद्धसदृश वातावरणाचे एक उदाहरण आहे. त्यामुळे तेथे कामासाठी गेलेल्या भारतीयांची सुरक्षा हा भारतासाठी काळजीचा विषय आहे.

war

आपल्या पश्चिमेला शेजारी असलेल्या अरेबियन द्वीपकल्पामध्ये सौदी अरेबिया, ओमान, येमेन, संयुक्त अरब अमिराती म्हणजेच दुबई, अबू धाबी असे काही देश आहेत. त्या देशांत मुस्लीम राज्यकर्ते आहेत आणि इस्लामी राज्यपद्धतीने तेथील शासनव्यवस्था चालते. तेथील येमेन आणि त्यांचे उत्तरेकडील शेजारी सौदी अरेबिया आणि अबू धाबी ह्यांच्यात युद्धाचे वादळ घोंघावताना दिसत आहे.
 
 
झाले असे की सोमवारी 17 जानेवारी 2022 ह्या दिवशी अबू धाबीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक अचानक बाँबहल्ला झाला. त्यात तिथे असलेल्या ‘अ‍ॅडनॉक’ ह्या कंपनीच्या इंधन तेल टाक्यांचा स्फोट झाला. ह्या स्फोटात तीन व्यक्ती मरण पावल्या, तर 8 लोक जखमी झाले. ह्या तीन मृतांत दोन भारतीय आणि एक पाकिस्तानी नागरिक आहेत. ह्या स्फोटानंतर थोड्याच वेळात एका व्हिडिओ पत्रकार परिषदेत येमेन इथल्या ‘हूती’ बंडखोरांचा सैन्य प्रवक्ता याह्या सारीए ह्याने ह्या हल्ल्याची जबाबदारी घेत संयुक्त अरब अमिरातीच्या प्रमुखांना - म्हणजेच अबू धाबीचे शासक खलिफा बिन झायेद अल नहयान ह्यांना एक इशारा दिला की ‘अबू धाबी ह्या देशाने सौदी अरेबियाला मदत करून येमेनच्या गृहयुद्धात हूती विद्रोही सैन्यावर हल्ले चढविले आहेत, त्याचा सूड घेण्यासाठी, तसेच अबू धाबीला एक इशारा देण्यासाठी आम्ही हे हल्ले केलेले आहेत. ह्यात आम्ही पाच क्षेपणास्त्रांचा आणि अनेक ड्रोन्सचा वापर केला. ह्यापुढे आम्ही असेच व ह्यापेक्षाही क्रूर, भयंकर हल्ले करू शकतो आणि तुम्ही ह्यापासून कुठेही सुरक्षित नाही आहात, हे ध्यानात ठेवून अबू धाबी सरकारने सौदी अरेबियाला हूती बंडखोरांविरुद्ध मदत करणे बंद करावे, अथवा होणार्‍या अशा अनेक हल्ल्यांसाठी तयार राहावे!’ अर्थात अशा धमकीला ताबडतोब प्रत्युत्तर देताना संयुक्त अरब अमिरातीच्या परराष्ट्र मंत्रालयाने हूती बंडखोरांना असा दम दिला आहे की, ‘आम्ही ह्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत आणि त्या हल्ल्याच्या सूत्रधारांना कठोर शासन केले जाईल!’ आणि खरोखरच त्यानंतर सौदी आणि यूएई यांच्या हवाई दलांनी येमेनची राजधानी आणि हूती बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या सना ह्या शहरावर बाँबहल्ला चढविला आहे. त्यात अनेक नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. पण हा लढा इथे थांबणारा राहिलेला नाही. आता अशा अनेक हल्ल्या-प्रतिहल्ल्यांची मालिका सुरू होईल, अशी रास्त भीती जागतिक समुदायाला भेडसावत आहे. सर्व जगाला इंधन आणि ऊर्जा पुरविणार्‍या पश्चिम आशियाई क्षेत्रात झालेल्या ह्या घटनेचे पडसाद जागतिक तेल बाजारात त्वरित उमटले आणि कच्च्या इंधन तेलाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली! आपल्या निकटच्या ऊर्जा पुरवठा क्षेत्रात अशी अस्थिरता निर्माण होणे हा आपल्या अर्थव्यवस्थेला एक मोठाच धक्का आहे आणि जितक्या लवकर ह्या क्षेत्रात शांतता प्रस्थापित होईल, तेवढे आपल्या देशाच्या आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक चांगले लक्षण ठरेल.
 

yemens

2014पासून येमेनी गृहयुद्धाला सुरुवात झाली. त्या युद्धात अगदी सुरुवातीलाच हूती बंडखोरांच्या सरकारने राजधानी सनावर ताबा मिळविला आणि पुढे जलद चढाया करत त्यांनी येमेनचा बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. राष्ट्रपती हादी ह्यांना पळून जाऊन आपली राजधानी एडन येथे हलवावी लागली. ह्या गृहयुद्धात आजवर सुमारे 56,000 लोकांचा बळी गेलेला आहे, तरीही हे थांबण्याची चिन्हे नाहीत. 
हा सर्व घटनाक्रम जर समजून घ्यायचा असेल, तर आपल्याला थोडे इतिहासात डोकावून पाहावे लागेल. येमेन हा देश, ज्याचे अरब नाव ‘यमन’ आहे, हा फार जुन्या अरबी संस्कृतीतील एक देश आहे. अरेबियन द्वीपकल्पाच्या दक्षिण भागात हा देश आहे. ह्याच्या उत्तरेला सौदी अरेबिया, ईशान्येला ओमान हा देश आहे. दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला एडनचे आखात आणि पुढे सुवेझ कालव्याकडे जाण्याचा लाल समुद्रातील जलमार्ग आहे. हा एक वाळवंटी आणि डोंगराळ प्रदेश असलेला देश आहे. त्यात दक्षिणेकडील किनारपट्टीकडे आणि देशाच्या उत्तरेकडील भागात मुख्य वस्ती आहे. इथे तेल आणि नैसर्गिक वायू थोड्या प्रमाणात सापडतात. शिवाय डोंगराळ भाग असल्याने इथे शेतीचेदेखील उत्पन्न फार नाही. त्यामुळे हा देश जगातील गरीब देशांतच मोडतो. ह्याचे क्षेत्रफळ साडेपाच लाख चौ.कि.मी. आहे - म्हणजे साधारणपणे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्ये मिळून ह्याचे क्षेत्रफळ होते! लोकसंख्या सुमारे तीन कोटी आहे. ह्या देशात मुख्य शहरे म्हणजे सना, मारीब आणि एडन. ह्यातील एडन हे शहर आपल्या ओळखीचे आहे. ब्रिटिश राज्यकाळात एडन हे एक महत्त्वाचे बंदर आणि ठाणे होते आणि विशेष म्हणजे त्याचा कारभार मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरच्या अधिकारात असे. (1967 साली एडन आणि त्याच्या आसपासचा मुलूख ब्रिटनपासून स्वतंत्र झाला!) त्याचमुळे आपले आद्य स्वातंत्र्यसैनिक वासुदेव बळवंत फडके ह्यांना ब्रिटिशांनी एडन येथील तुरुंगात स्थानबद्ध करून ठेवले होते. तिथेच दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. जगप्रसिद्ध अंबानी उद्योगसमूहाचे प्रवर्तक आणि संस्थापक धीरूभाई अंबानी हे सुरुवातीच्या काळात एडन येथेच एक पेट्रोल पंपावर उमेदवारी करत होते! ह्या देशाचे पूर्वी दोन भाग होते - उत्तर येमेन, ज्याची राजधानी होती सना आणि दक्षिण येमेन, ज्याची राजधानी एडन होती. पुढे 1990 साली दोन्ही देश एकत्र झाले आणि त्या एकत्र देशाची राजधानी सना आहे. इथे अली अब्दुल सालेह हे राष्ट्रपती झाले. 2011 साली झालेल्या अनेक अरबी देशांतील लोकविद्रोह आणि क्रांतीमध्ये, ज्याला ‘अरब स्प्रिंग’ ह्या नावाने ओळखले जाते, त्यात येमेन इथे सत्तापालट झाला आणि त्यात सालेह ह्यांना 2012 साली सत्ता सोडावी लागली. त्यांच्या जागी अब्द रब्बू मंसूर हादी हे सत्तेवर आले. ह्यांना सौदी अरेबियाचे साहाय्य होते. पण तेव्हापासून हा देश सदैव अंतर्गत यादवीमुळे अशांत आहे. इथे एक गृहयुद्धच चालू आहे. त्या युद्धाचे मूळ कारण म्हणजे, इथल्या नागरिकांमध्ये असलेली शिया मुस्लिमांची मोठी संख्या. इथे शिया 35 टक्के आहेत आणि ते मुख्यत्वेकरून उत्तर येमेन भागात आहेत. उत्तरेला हूथ नावाचे एक शहर आहे, तेथील कडव्या शियापंथी प्रजेने येमेनच्या सुन्नी शासकांविरुद्ध आंदोलन सुरू केले. लवकरचे हे आंदोलन हिंसक झाले आणि त्यातून सप्टेंबर 2014पासून येमेनी गृहयुद्धाला सुरुवात झाली. त्या युद्धात अगदी सुरुवातीलाच हूती बंडखोरांच्या सरकारने राजधानी सनावर ताबा मिळविला आणि पुढे जलद चढाया करत त्यांनी येमेनचा बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. राष्ट्रपती हादी ह्यांना पळून जाऊन आपली राजधानी एडन येथे हलवावी लागली. ह्या गृहयुद्धात आजवर सुमारे 56,000 लोकांचा बळी गेलेला आहे, तरीही हे थांबण्याची चिन्हे नाहीत. येमेनच्या उत्तरेला असलेला सौदी अरेबिया हा एक सुन्नीबहुल देश आहे. तिथेदेखील 10 टक्के शिया आहेतच. त्यांचे आणि हूती बंडखोरांचे संगनमत आहे आणि त्यामुळे हुती बंडखोर सौदी अरेबियाच्या दक्षिण प्रदेशात हल्ले चढवीत असतात आणि तेथेही अशांतता माजवीत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सौदी अरेबियाने, त्यांना अमेरिकेने दिलेल्या अत्याधुनिक विमानांद्वारे येमेनवर हवाई हल्ले चालविलेले आहेत. ह्या हवाई हल्ल्यात त्यांना अबू धाबी म्हणजेच संयुक्त अरब अमिरात सरकारने मदत केली आहे. त्या मदतीचा सूड घेण्यासाठी हे सोमवारचे अबू धाबीवरचे हल्ले झालेले आहेत. सौदी अरेबियाने ह्या युद्धात प्रत्यक्षपणे उडी घेतलेली आहे आणि त्यांचे मित्र देश म्हणून यूएई, बहरीन, कुवेत आदी देशांनीदेखील त्या शियाविरोधी युद्धात आपला वाटा उचललेला आहे. असे झाल्यावर शिया बहुसंख्य असलेला इराण कसा मागे राहील! हे एक उघड गुपित आहे की इराण आता हूती बंडखोरांना जहाजमार्गे आधुनिक शस्त्रास्त्रे, पैसे आणि इंधन तेल अशी भरघोस मदत करीत आहे.
 
2014पासून येमेनी गृहयुद्धाला सुरुवात झाली. त्या युद्धात अगदी सुरुवातीलाच हूती बंडखोरांच्या सरकारने राजधानी सनावर ताबा मिळविला आणि पुढे जलद चढाया करत त्यांनी येमेनचा बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला. राष्ट्रपती हादी ह्यांना पळून जाऊन आपली राजधानी एडन येथे हलवावी लागली. ह्या गृहयुद्धात आजवर सुमारे 56,000 लोकांचा बळी गेलेला आहे, तरीही हे थांबण्याची चिन्हे नाहीत. येमेनच्या उत्तरेला असलेला सौदी अरेबिया हा एक सुन्नीबहुल देश आहे. तिथेदेखील 10 टक्के शिया आहेतच. त्यांचे आणि हूती बंडखोरांचे संगनमत आहे आणि त्यामुळे हुती बंडखोर सौदी अरेबियाच्या दक्षिण प्रदेशात हल्ले चढवीत असतात आणि तेथेही अशांतता माजवीत असतात.


war

‘हूती’ बंडखोरांचा लष्करी प्रवक्ता याह्या सारीए
 
इस्लामी देशांमध्ये सध्या सुन्नी विरुद्ध शिया हा घनघोर संघर्ष पेटलेला आहे. त्यात एक बाजूला शिया इराण आणि दुसर्‍या बाजूला सुन्नी सौदी अरेबिया असे आहेत. त्या संघर्षाचे दृश्य रूप म्हणजे येमेनचे गृहयुद्ध. ह्या युद्धात इराणने बंडखोरांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्स पुरविले आहेत. त्यांचा मुक्तहस्ते वापर करून हूती बंडखोरांनी गेल्या वर्षी एप्रिल 2021मध्ये सौदी अरेबियाच्या दक्षिणेस असलेल्या जझान येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पावर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे वापरून हल्ला चढविला आणि त्याचे प्रचंड नुकसान केले. त्या वेळीदेखील तेलाचे भाव जागतिक बाजारात प्रचंड वाढले होते. तसेच काहीतरी आतादेखील होण्याची शक्यता आहे, म्हणून जागतिक नेतृत्वाने हा प्रश्न लवकरात लवकर सोडविणे आवश्यक आहे.

 
परंतु अमेरिकेची ह्या सर्व घटनेतील भूमिका बोटचेपेपणाची दिसते. ट्रंप ह्यांनी ह्या हूती बंडखोर संघटनेवर, एक दहशतवादी संघटना असल्याने, बंदी घातली होती. पण जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यावर त्यांनी अनाकलनीय कारणाने ह्या संघटनेवरची बंदी गेल्या वर्षी 5 जानेवारीला उठविली. ह्याचा परिणाम म्हणजे हूती बंडखोरांची हिम्मत वाढली आणि त्यांनी एप्रिल 2021मध्ये सौदी तेल कारखान्यावर वर सांगितलेला हल्ला चढविला. आतासुद्धा अबू धाबीच्या विमानतळावर हल्ला करण्यापर्यंत ह्या बंडखोरांची मजल गेली आहे, कारण त्यांनीदेखील तालिबानप्रमाणेच बायडेन ह्यांचे पाणी जोखले आहे असे दिसते. एक विशेष म्हणजे अबू धाबी येमेनमधील सनापासून सुमारे 1800 किलोमीटर्स दूर आहे. आधीच्या इराणी ड्रोन्सची मजल इतक्या दूरपर्यंतची नव्हती. पण आता वापरलेला ‘समद-3’ हा ड्रोन अधिक शक्तिशाली ड्रोन असावा असे मानले जाते. ह्याच दुसरा अर्थ म्हणजे इराणने ही दक्षिणेची शक्तिशाली फळी उघडून अमेरिकेचे मित्र सौदी अरेबिया आणि यूएई ह्यांना खुले आव्हान दिले आहे! इकडे अमेरिकेची अफगाणिस्तानमध्ये नाचक्की झालेलीच आहे. शिवाय युक्रेनमधील संघर्षामध्येदेखील अमेरिकेचे पडखाऊ धोरण रशियाच्या पुतीनसमोर मात खाताना दिसत आहे. ते सावरण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ब्लिनकेन ह्यांनी नुसत्या कोरड्या घोषणा करण्याचा पवित्रा घेतला आहे. पण ह्यामुळे अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांची चांगलीच चलबिचल होत आहे. जर अमेरिकेला आपली प्रतिष्ठा आणि आपला दरारा पुन्हा स्थापित करायचा असेल, तर त्यांना आता काहीतरी ठोस उपाय योजून ह्या हूती बंडखोरांवर कारवाई करावीच लागेल. तोपर्यंत आपल्याला अरब देशात कामासाठी राहणार्‍या लक्षावधी भारतीय नागरिकांच्या रक्षणासाठी काहीतरी उपाय शोधायलाच हवेत. ह्या ड्रोन हल्ल्याच्या काहीच दिवस आधी हूती बंडखोरांच्या एक तुकडीने ‘रवाबी’ नावाचे यूएईचे एक जहाज एडनजवळ येमेनच्या होडायदा बंदरानजीक असताना आपल्या ताब्यात घेतले आहे आणि त्याला मुक्त करण्यासाठी खंडणीची बोलणी सुरू आहेत. ह्या जहाजावर 11 कर्मचारी आहेत, त्यातील सात भारतीय आहेत! ह्यापुढे आपल्याला आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, हे नक्कीच!
Powered By Sangraha 9.0