राधाकृष्णन आणि कम्युनिस्ट रशिया

20 Jan 2022 16:35:08
Y. D. Gundevia हे 1948 सालापासून परराष्ट्र मंत्रालय विभागात होते. त्यांनी परराष्ट्र नीतीवर काही पुस्तके लिहिली आहेत, त्यातील त्यांचे 'Outside the Archives' हे महत्त्वाचे पुस्तक आहे. गंडेविया यांच्या या पुस्तकातील मॉस्को प्रकरणातील हा अल्पांश आहे. 1965 सालापर्यंत भारताचे परराष्ट्र धोरण कसे चालले, भारत-अमेरिका संबंध, काश्मीरचा प्रश्न, युरोपीय देश आणि भारत या विषयीची ज्ञानवर्धक माहिती या पुस्तकात आहे.

book

Y. D. Gundevia उर्फ संपूर्ण नाव Yezdezard Dinshaw Gundevia हे पं. नेहरू आणि लाल बहादुर शास्त्री यांच्या काळात भारताचे परराष्ट्र सचिव होते. जन्माने ते पारशी होते. ब्रिटिश काळात ते आसीएस अधिकारी होते. 1930पासून ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात ते रंगूनमध्ये होते. 1948 सालापासून परराष्ट्र मंत्रालयात त्यांची सेवा सुरू झाली. 1965 साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी परराष्ट्र नीतीवर काही पुस्तके लिहिली आहेत, त्यातील "Outside the Archives' हे महत्त्वाचे पुस्तक आहे.
पं. नेहरू यांच्याबरोबर परराष्ट्र विभागात ज्या ज्या मंडळींनी काम केले, ते पं. नेहरू यांचे स्तुतिपाठक झालेले दिसतात. गंडेविया त्याला अपवाद नाहीत आणि हे स्वाभाविकही आहे. त्याची दोन कारणे दिसतात. पहिले कारण परराष्ट्र विभागात काम करणारे, ज्यांना डिप्लोमॅट्स असे म्हटले जाते, एका अर्थाने ते शासकीय नोकर असतात. प्रशासनातील शासकीय अधिकार्‍याला "Yes Boss' आणि "Boss is Always right'  या भूमिकेतूनच काम करावे लागते. तो परराष्ट्र धोरण ठरवू शकत नाही. ठरलेल्या धोरणाची अंमलबजावणी करणे हेच त्याचे काम. आणि दुसरे कारण असे की, प्रशासकीय अधिकार्‍यांच्या तुलनेत पं. नेहरू यांचे व्यक्तिमत्त्व असंख्य पटीने मोठे होते. ते लोकनेता होते. दिवसाचे अठरा-अठरा तास काम करीत. त्यांचे वाचनही अफाट होते आणि विचार पक्के होते. ते थोर राजनेता होते. त्यामुळे नोकरशाहीत जन्म गेलेल्या डिप्लोमॅटने नेहरूंची स्तुती करणे यात काही गैर नाही.

गंडेविया यांचे पुस्तक वाचताना सर्वात पहिली गोष्ट मला जी भावली, ती म्हणजे पारशी माणसाचे गुणविशेष या पुस्तकात पदोपदी व्यक्त झाले आहेत. भारतातील पारशी माणूस शंभर टक्के देशनिष्ठ असतो. देशाच्या हिताचा विचार करीत असतो. रंगूनवर जपानचे आक्रमण झाले आणि तेथून लाखो भारतीय शरणार्थी म्हणून भारतात आले. या शरणार्थींनी परत ब्रह्मदेशात गेले पाहिजे, असे इंग्रज सरकारचे धोरण होते. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. स्वतंत्र भारताचेही तेच धोरण होते. गंडेविया यांचे म्हणणे असे होते की, या भारतीयांना ब्रह्मदेशात पाठवू नये. सगळा ब्रह्मदेश उद्ध्वस्त झालेला आहे. कुणाला काही कामधंदा नाही, लोक उपाशी मरतील. त्यांना भारताचे नागरिकत्व दिले पाहिजे. भारताचे नागरिकत्व कुणाला द्यायचे याची घटना समितीत चर्चा सुरू झाली होती. या चर्चेचे बारकावे गंडेविया यांनी आपल्या पुस्तकात दिले आहेत. आणि अखेरशेवटी ब्रह्मदेशातील भारतीयांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय कसा झाला, हे त्यांनी सांगितले. ते या सर्व विषयाचे एक प्रमुख सूत्रधार होते, हे त्यांच्या निवेदनातून कळते.

गंडेविया यांची नियुक्ती मॉस्कोला झाली. सप्टेंबर 1950मध्ये ते मॉस्कोला गेले. मॉस्कोेमध्ये तेव्हा डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे राजदूत होते. त्यांच्या अगोदर विजयालक्ष्मी पंडित (पं. नेहरूंच्या भगिनी) राजदूत होत्या. डॉ. राधाकृष्णन हे भारतीय तत्त्वज्ञानाचे विश्वविख्यात विद्वान होते. ऑक्स्फर्ड विद्यापीठात ते प्राध्यापक होते. रशिया तेव्हा कम्युनिस्ट होता. कम्युनिस्ट रशिया देव आणि धर्म न मानणारा होता. त्याचे तत्त्वज्ञान वेगळे होते. डायलेक्टिक मटेरियॅलिझम या दोन शब्दात ते सांगता येते. राधाकृष्णन वेदान्ती होते. 1927 साली त्यांचे ‘हिंदू व्ह्यू ऑफ लाइफ’ हे पुस्तक प्रकाशित झालेले आहे. हिंदू धर्म ही जीवनपद्धती आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर फार उत्तमपणे लक्षात येते. असा वेदान्ती पंडित आणि केवळ भौतिक इहवादी तत्त्वज्ञान सांगणारे कम्युनिस्ट यांचे रशियात कसे जमले, ते गंडेविया उदाहरणे देऊन सांगतात.
राधाकृष्णन यांची गणना थोर पुरुषांत केली जाते. ते केवळ ज्ञानानेच फार मोठे होते असे नाही, तर माणुसकीच्या व्यवहारानेदेखील त्यांची उंची फार मोठी होती. त्यांच्याविषयी गंडेविया लिहितात, ‘चार्ल्स डिकन्स यांचे चरित्रकार जी.के. चेस्टरटन लिहितात की, दोन प्रकारची थोर माणसे असतात. पहिल्या प्रकारातील व्यक्ती तुम्ही जेव्हा त्यांच्या सहवासात जाता तेव्हा तुम्हीही मोठे आहात अशी भावना तुमच्यात निर्माण करते आणि दुसर्‍या प्रकारची व्यक्ती जेव्हा तुम्ही त्यांच्या सहवासात जाता तेव्हा तुम्ही लहान आहात अशी भावना निर्माण करते.’ गंडेविया लिहितात की, ‘मी जेव्हा राधाकृष्णन यांना भेटलो, तेव्हा त्यांनी माझे हसतमुखाने स्वागत तर केलेच, माझ्या पत्नीचेही स्वागत केले आणि माझ्या मुलीकडे पाहून विचारले की, या छोट्या मुलीचे नाव काय?’

book 
 
 
नंतर या छोट्या मुलीच्या शिक्षणाचे पुढे काय, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गंडेवियांच्या छोट्या मुलीचे नाव होते राप्ती. तिला त्यांनी ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या निवासी शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांनी सहजपणे हे काम केले. रशियात इंग्लिशमधून शिक्षणाची सोय नव्हती. ही अडचण राधाकृष्णन यांनी दूर केली. डॉ. राधाकृष्णन सुस्पष्ट विचार करणारे होते. ते बारीकसारीक तपशिलाची माहिती ठेवत आणि त्यांची स्मरणशक्तीदेखील खूपच दांडगी होते. रशियासारख्या कम्युुनिस्ट देशातील राजदूताला चोवीस तास डोळसपणे सर्व घटनांचे, घडामोडींचे अवलोकन करावे लागते. 1950चा कालखंड रशिया भारताचा मित्रही नव्हता आणि शत्रूदेखील नव्हता. पं. नेहरूंच्या अलिप्ततावादी धोरणामुळे भारत जसा अमेरिकेच्या गटात नव्हता, तसा रशियाच्याही गटात नव्हता. प्रावदा ((Pravda)) आणि इझवेस्तिया (Izvestia) ही कम्युनिस्ट रशियाची दोन मुख्य वर्तमानपत्रे होती. स्टॅलिन रशियाचा सर्वेसर्वा होता. या वर्तमानपत्रांतून रशियाची धोरणे, जागतिक प्रश्नांसंबंधीची रशियाची मते प्रकट होत.
ही वर्तमानपत्रे रशियन भाषेत होती. पाश्चात्त्य वकिलाती त्यांचे इंग्लिश अनुवाद करीत आणि हे अनुवाद भारतीय राजदूतांना मिळत. वेगळी भाषा असणार्‍या परदेशात परराष्ट्र मंत्रालयात काम करताना भाषेची अडचण कशी येत राहते, हे गंडेविया यांच्या पुस्तकातून समजते. इंग्लिश ही जागतिक भाषा आहे हा प्रचार किती खोटा आहे, हे रशियात, युरोपातील देशांत गेल्यानंतर समजते. प्रत्येक देश स्वभाषेत व्यवहार करतो आणि आपली स्वभाषाच ज्ञानभाषा करतो. इंग्लिश भाषेची कुबडी त्याला लागत नाही. रशियातील कम्युनिस्ट राजवटीत सर्व परराष्ट्र वकिलातींमध्ये रशियन कामगारांच्या मदतीनेच कामे करावी लागत. साधा खिळा ठोकायचीही अनुमती नसे. रशियन गुप्तहेेर संघटनेने बहुतेक वकिलातींमध्ये भिंतीमध्ये गुप्त जागी मायक्रोफोन बसविले होते. त्यामुळे त्या त्या देशांचे राजदूत काय बोलतात, काय संदेश पाठवितात हे रशियन सरकारला समजत असे. गंडेवियांनी याचा निसटता उल्लेख केला आहे. नंतर केजीबी संदर्भात जी पुस्तके प्रकाशित झाली, त्यात असे अनेक किस्सेे आपल्याला वाचायला मिळतात. गंडेविया यांनी केलेल्या रशियातील थंडीचे वर्णन वाचूनच आपल्याला हुडहुडी भरेल. हिवाळ्यात मॉस्कोतील तापमान उणे 40 अंश असे. अशाही थंडीत लोक हॉकीचे सामने खेळत. स्टेडियमच्या खुर्चीवर नऊ-दहा इंच बर्फ साठलेला असे.
पारशी माणसाचा स्पष्टवक्तेपणा कसा असतो, हे एका संवादाच्या माध्यमातून आपण बघू. बाकीटोव (Bakhitov) हे रशियन सरकारचे आशिया विभागाचे प्रमुख होते. आशियातील राजदूतांचा त्यांच्याशीच वारंवार संपर्क येई. खेळीमेळीच्या वातावरणात बाकीटोव हे गंडेविया यांना म्हणाले, “पंचवार्षिक योजनेत आमच्याकडून काही चुका झाल्या, त्यापासून तुम्ही धडा घ्यावा.” गंडेविया त्यावर म्हणाले, “या चुकांची किंमत तुम्हाला चाळीस लाख लोकांच्या मरणाने द्यावी लागली. आमची लोकसंख्या पन्नास कोटी असली, तरी त्यातील कम्युनिस्ट राज्य आणण्यासाठी दहा लाख लोकांनाही आम्ही नाही मारू शकत.”

आपल्याला आश्चर्य वाटेल की, 1950-51 साली आपण रशियातून धान्य आयात केले होते. भारतात धान्याचा तुटवडा निर्माण झाला, काही राज्यांत दुष्काळ निर्माण झाला. अमेरिकेने धान्य देण्यास चालढकल सुरू केली. जाचक अटी घातल्या. रशियाने धान्याच्या मोबदल्यात रबर, ज्यूट, मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तू मागितल्या, भारताने त्या दिल्या. स्वतंत्र भारताचा आणि रशियाचा हा पहिला व्यापारी संबंध असावा. पुढे अन्नधान्य कराराचा वाद झाला. रशियन कोर्टात खटला गेला. तो किस्सादेखील गमतीशीर आहे.
भारत आणि रशिया यांचा मैत्री करार व्हावा अशी राधाकृष्णन यांची इच्छा होती. तसे त्यांनी पं. नेहरू यांना लिहिलेदेखील, परंतु नेहरूंनी त्याला मान्यता दिली नाही. नेहरूंना रशियाच्या किंवा अमेरिकेच्या गटात भारताला घेऊन जायचे नव्हते. राधाकृष्णन यांनी मॉस्कोत भारतहिताच्या संदर्भात ज्या अनेक गोष्टी केल्या, त्यातील एक प्रसंग गंडेविया असा सांगतात - युनोच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावर 1950पासूनच ठरावामागून ठराव येत गेले. ते सर्व भारताच्या विरोधी होते. काश्मीर संबंधात भारताची भूमिका न्यायाची आणि तर्कशुद्ध होती. महासत्तांना त्याच्याशी काही घेणेदेणे नव्हते. इंग्लंड, अमेरिका आपला भूराजनीतिक स्वार्थ बघत होते. रशिया तटस्थ होती. तेव्हा रशियाचा परराष्ट्र व्यवहार विशिन्स्की (Vishinsky) पाहत असत. त्यांच्याशी संभाषण करताना राधाकृष्णन यांनी त्यांना विचारले, “सुरक्षा परिषदेतील रशियाचा प्रतिनिधी काश्मीर प्रश्नावर शांत का बसला? तो भारताची बाजू का घेत नाही?” विशिन्स्की यांना हा प्रश्न अनपेक्षित होता. ते म्हणाले, “पण भारताने कधी अशी इच्छा प्रदर्शित केली नाही.” राधाकृष्णन म्हणाले, “तेच काम मी आता करतो आहे.” नंतर राधाकृष्णन म्हणतात, “काश्मीरचे स्थान रशियन सीमेला लागून आहे. दोन-तीन विमानात बसून एकदा तुम्ही जाऊन बघून या.” राधाकृष्णन यांना हे सुचवायचे होते की, अमेरिका आणि ब्रिटन ज्या पद्धतीने काश्मीरशी खेळत आहेत, त्यापासून रशियालादेखील धोका आहे.

 
नंतर आश्चर्याची गोष्ट अशी की, 1952 साली सुरक्षा परिषदेत रशियाचे प्रतिनिधी मलिक यांनी काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने ठाम भूमिका घेतली. अमेरिका आणि ब्रिटन यांच्या साम्राज्यवादी धोरणावर सडकून टीका केली. रशियाच्या या भूमिकेचे सर्व देशांना आश्चर्य वाटले, पण नवी दिल्लीलादेखील आश्चर्य वाटले. सुरक्षा परिषदेत भारताची बाजू घेणारा एकही देश नव्हता, रशिया भारताच्या बाजूने उभा राहिला.
 
 
राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतिपदासाठी निवड झाली. मॉस्कोतून भारतात येण्यापूर्वी त्यांनी स्टॅलिनच्या भेटीची इच्छा प्रदर्शित केली. परदेशी राजदूताने स्टॅलिनला भेटणे फार अवघड असे. राधाकृष्णन यांचे तसे पत्र गेल्यानंतर अनेक दिवसांनी स्टॅलिनकडून भेटीला अनुमती मिळाली. स्टॅलिनची ख्याती अशी होती की, परदेशी राजदूतांना तो मध्यरात्रीनंतर बोलवत असे. राधाकृष्णन यांना मात्र त्याने साडेनऊची वेळ दिली. पं. नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित यांना स्टॅलिनने कधीच भेट दिली नाही. क्रेमलिन येथे राधाकृष्णन आणि स्टॅलिन यांची भेट झाली. स्टॅलिनचे संभाषण रशियनमध्ये आणि राधाकृष्णन यांचे संभाषण इंग्लिशमध्ये झाले. राधाकृष्णन त्यांना म्हणाले की, “संस्थानिकांचा प्रश्न आम्ही शांततेने सोडविला आहे.” स्टॅलिनच्या शब्दकोशात शांतता, अहिंसा हे शब्दप्रयोग नव्हते. स्टॅलिनने चॉपरप्रमाणे हात केला आणि टेबलावर दोन-तीनदा हात आपटून म्हणाला की, “संस्थानिकांचा प्रश्न मुंडकी छाटून सोडविला पाहिजे.” स्टॅलिनने रशियन म्हण सांगितली की, ‘रशियन शेतकरी जेव्हा लांडग्याला पाहतो, तेव्हा त्याचा कसा समाचार घ्यायचा हे त्याला बरोबर समजते.’ स्टॅलिनला सुचवायचे होते की, संस्थानिकांची डोकी छाटून टाकली पाहिजेत. तो जर भारतात असता तर त्याने हेच काम केले असते. शेवटी स्टॅलिन म्हणाला की, “तुम्ही किंवा पंतप्रधान नेहरू आमचे शत्रू नाहीत.” तो असे म्हणाला नाही की, तुम्ही आमचे मित्र आहात. म्हणून पुढे जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले, तेव्हा मित्र असलेल्या चीनची बाजू रशियाने घेतली आणि शत्रू नसलेल्या भारताला रशियाने वार्‍यावर सोडले.
गंडेविया यांच्या पुस्तकातील मॉस्को प्रकरणातील हा अल्पांश आहे. 1965 सालापर्यंत भारताचे परराष्ट्र धोरण कसे चालले, भारत-अमेरिका संबंध, काश्मीरचा प्रश्न, युरोपीय देश आणि भारत याची ज्ञानवर्धक माहिती या पुस्तकात आहे. जिज्ञासूंनी आणि अभ्यासकांनी त्याचा आस्वाद घ्यावा.
 
Powered By Sangraha 9.0