गीता परिवारचा एक अपूर्व उपक्रम

विवेक मराठी    12-Jan-2022
Total Views |
@वंदना वर्णेकर 9422803903  मार्च 2020पासून जगभरात कोविडचे थैमान सुरू झाले आणि संपूर्ण देशाला लॉकडाउनला सामोरे जावे लागले. याच वेळी पूज्य स्वामीजींनी ‘हर हर गीता घरघर गीता’ ही संकल्पना दिली. त्यांच्या प्रेरणेतून गीता परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. आशुजी गोयल यांच्या कुशल नेतृत्वात गीता परिवारच्या लखनऊ शाखेने  Learn Geeta  हा गीता संथा वर्गाचा ऑनलाइन उपक्रम प्रारंभ केला. गीता परिवारचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनीही त्यांची ही अभिनव संकल्पना उचलून धरली. पहिल्याच आवाहनाला काही तासांतच 2000 गीताप्रेमींनी ऑनलाइन फॉर्म भरून प्रतिसाद दिला. बघता बघता प्रत्येक बॅचमध्ये ही संख्या वाढत जाऊन 50 हजारपर्यंत गेली.

geeta parivar

श्रीमद भगवद्गीता हे आनंदमय जीवन जगण्याचे परिपूर्ण योगशास्त्र आहे. या गीतेची महती गाताना श्री ज्ञानेश्वर माउली म्हणतात,

काये मने वाचा। जो सेवक होईल इयेचा

तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी।

जो काया-मन-वाणीने गीतेची सेवा करील, त्याला गीता स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करेल, त्याला आनंदासाठी कुठेही बाहेर धावाधाव करावी लागणार नाही, जणू स्वानंदाचा झराच त्याच्या अंतरंगात प्रस्फुटित होईल, हे माउलींचे अभिवचन आहे.
या जगातल्या प्रत्येकाला वाटते की मला सुख हवे आणि मला शांती हवी. पण सुखप्राप्तीच्या मागे धावता-धावता मनुष्य कधीकधी नैतिकतेच्या मार्गावरून घसरतो, तर कधी स्पर्धात्मक युगाच्या ताणाने आत्मशांती गमावून बसतो.
 
 
मोहग्रस्त किंकर्तव्यमूढ अर्जुनाला योग्य मार्ग दाखवून कर्तव्यपथावर अग्रेसर करण्यासाठी प्रत्यक्ष समरांगणावर भगवंताच्या मुखातून गीता रूपाने जे तत्त्वज्ञान प्रवाहित झाले, ते आजसुद्धा नैतिकतेच्या मार्गावर राहून अभ्युदय व नि:श्रेयस म्हणजेच आत्मशांती प्राप्त करण्याचा मार्गदर्शक दीपस्तंभ आहे.


geeta parivar
 
राष्ट्रसंत प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज

या अनुपमेय गीतेचे पाथेय बालपणापासून प्राप्त व्हावे, यासाठी राष्ट्रसंत प.पू. स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज (गीता परिवारचे संस्थापक अध्यक्ष) यांनी परमआदरणीय स्व. ओम्कारनाथजी मालपाणी यांच्या छत्रछायेत पांडव पंचमी इसवी सन 1986मध्ये संगमनेर येथे गीता परिवाराची स्थापना केली. याद्वारे पूर्ण विश्वाचे सांस्कृतिक नेतृत्व करण्याच्या संकल्पनेतून देशाचे भावी नागरिक होणार्‍या बालकांना सुसंस्कारित करण्याच्या कार्याचा शुभारंभ झाला. भगवद्भक्ती, भगवद्गीता, भारतमाता आणि स्वामी विवेकानंदांचा आदर्श या स्वामीजींनी दिलेल्या सूत्रांच्या आधारावर गीता परिवारचे सेवाभावी कार्यकर्ते छोट्या छोट्या गावापासून महानगरापर्यंत, प्रसिद्धीपासून दूर राहून बालसंस्काराचे आणि गीता प्रचाराचे पवित्र कार्य गेली अनेक वर्षे करीत आहेत.

 
मार्च 2020पासून जगभरात कोविडचे थैमान सुरू झाले आणि संपूर्ण देशाला लॉकडाउनला सामोरे जावे लागले. जनता संकटग्रस्त होऊ लागली. चौफेर एक प्रकारचे नैराश्य, पूर्ण भयप्रद वातावरण निर्माण झाले. याच वेळी पूज्य स्वामीजींनी ‘हर हर गीता घरघर गीता’ ही संकल्पना दिली. त्यांच्या प्रेरणेतून गीता परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. आशुजी गोयल यांच्या कुशल नेतृत्वात गीता परिवारच्या लखनऊ शाखेने Learn Geeta हा गीता संथा वर्गाचा ऑनलाइन उपक्रम प्रारंभ केला. गीता परिवारचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनीही त्यांची ही अभिनव संकल्पना उचलून धरली. त्यांच्या मार्गदर्शनातून ही ऑनलाइन नि:शुल्क गीता संथा वर्गाची भव्यदिव्य योजना साकार होऊ लागली. पहिल्याच आवाहनाला काही तासांतच 2000 गीताप्रेमींनी ऑनलाइन फॉर्म भरून प्रतिसाद दिला. बघता बघता प्रत्येक बॅचमध्ये ही संख्या वाढत जाऊन 50 हजारपर्यंत गेली.


geeta parivar

गीता परिवारचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी
 
गेल्या एक वर्षात (नोव्हेंबर 2021पर्यंत) 117 देशांतील तीन लाखापेक्षा जास्त गीताप्रेमींनी नोंदणी करून उच्चांक निर्माण केला. आज चार स्तरांवर चालणार्‍या विविध झूम वर्गांमध्ये प्रत्येक दिवशी 60000च्या वर गीता साधकांची उपस्थिती असते. सकाळी 6 ते रात्री 10पर्यंत 40-40 मिनिटांच्या तेरा कालांश सत्रांमधून शिकण्याची संधी साधकांना उपलब्ध केली आहे. इंग्लिश, हिंदी, गुजराती, मराठी, बांगला, कानडी, मल्याळम, ओडिया, तामिळ व तेलगू या दहा भाषांमधून आणि चार स्तरांमध्ये विभाजित केलेल्या 18 अध्याय यांच्या अभ्यासक्रमातून दररोज 937 झूम वर्ग होतात. पहिल्या स्तरात बारावा आणि पंधरावा अध्याय शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकविला जातो. रोजची वर्गाची लिंक व्हॉट्सअ‍ॅप ग्रूपवर प्राप्त होते. सोमवार ते शुक्रवार वर्गात रोज दोन किंवा तीन लोक शुद्ध उच्चारासह शिकविले जातात. यासाठी सेवाभावी प्रशिक्षक-प्रशिक्षिका, तांत्रिक सहयोगी, समूह संचालक अशी चार हजार कार्यकर्त्यांचा चमू रोज कार्यरत असतो.
उच्चार शिकलेल्या लोकांसाठी शनिवार-रविवार झूमवर, तसेच यूट्यूबवर अर्थविवेचन आणि प्रश्नोत्तरांचे सत्र आयोजित केले जातात. साधकांना सुलभतेने श्लोक वाचता यावेत यासाठी सर्व अध्यायांचे उच्चारण नियमांसह साहित्य उपलब्ध केले जाते. सरावासाठी सुश्राव्य ऑडिओ आणि व्हिडिओजसुद्धा दिले जातात शुद्ध उच्चारण नियमांचे व्याकरण सत्र आयोजित केले जातात. दोन अध्याय शुद्ध वाचणार्‍यांना ‘गीता गुंजन’, तीन अध्याय पाठ म्हणून दाखविणारा ‘गीता जिज्ञासू, सहा अध्याय पाठ म्हणून दाखवणारा ‘गीता पाठक’, 12 अध्याय पाठ म्हणून दाखविणारा ‘गीता पथिक’ तर संपूर्ण गीता पाठ म्हणून दाखविणारा ‘गीताव्रती’ असे प्रमाणपत्र देऊन गौरविला जातो.
 

geeta
 
अशा या अपूर्व उपक्रमाद्वारे जणू गीताप्रेमच प्रवाहित होत आहे व त्याला लोकप्रियता प्राप्त होत आहे. श्रीमद्भगवद्गीता ही भगवंताची मंत्रमय वाणी आहे.
 
‘जयतु जयतु गीता वाङ्मयी कृष्णमूर्ति:’ असे म्हटले जाते. पाच हजार वर्षांपूर्वी अर्जुनाला सुयोग्य मार्गावर नेण्यासाठी भगवंत प्रत्यक्ष सगुण-साकार रूपात त्याचे सारथ्य करीत होते. आज भगवान श्रीकृष्ण गीता रूपाने आमचे सारथ्य करून विवेकजागृतीचे कार्य करीत आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक गीताप्रेमींना गीता शिकताना येत आहे.
 
 
कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अनेक संकटांचा सामना करताना गीतेने प्रेरणा दिली, मन:स्वास्थ्य दिले, गीतेच्या मंत्रोच्चाराने घरातील वातावरण पवित्र झाले अशा अनेक प्रतिक्रिया अनेक साधकांकडून रोज प्राप्त होतात.


geeta parivar

गीता परिवाराचे ऑनलाइन गीता संथा वर्ग
 
ऑस्टिन, टेक्सास, अमेरिका येथील दीपाली सचिन देव त्यांचा अनुभव लिहितात - ‘गीतापठणाने पंचेंद्रियांपैकी डोळे, कान आणि जीभ ही तीन इंद्रिये एकाग्र होतात. प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत मनाला काबूत ठेवायला आणि सकारात्मकता जागी ठेवायला निश्चितच हातभार लागतो याची प्रचिती येते. स्वरलहरींमुळे घरातील वातावरणावर उत्तम परिणाम झाला. धन्यवाद गीता परिवार!’
जर्मनीतून मंजिरी किर्लोस्कर लिहितात - ‘गीता शुद्ध उच्चारासह शिकण्याचा आनंद अवर्णनीय आहे. पाच हजार वर्षांपूर्वी सांगितलेले गीतारूपी मानसशास्त्रीय तत्त्वज्ञान आजच्या काळात अत्यंत उपयोगी असून ते घराघरात पोहोचले पाहिजे.’
 
 
पुण्याच्या मृणाल विप्रदास, ज्या गीता स्तर 4च्या प्रशिक्षक आहेत, यांनी सांगितले की, “शनिवारी रात्री ज्या वेळी त्यांना त्यांच्या पतीच्या दु:खद निधनाची बातमी कळली, तेव्हा जो वर्ग सुरू होता, तो त्यांनी पूर्ण केला व सोमवारपासून सर्व वर्ग अखंडित घेतले. सद्गुरू स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या कृपेने व गीता वर्गातील ऊर्जेने या दु:खद प्रसंगातून बाहेर पडण्याची शक्ती मिळाली. गीतेचा अर्थ समजून घेतला, तर तीव्र दु:खातूनही बाहेर यायला मदत होते.”
 
गीता परिवारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी म्हणतात, “मुझे कोई पूछे की क्या अपने भगवान को देखा है? तो मेरा उत्तर होगा, जी हां, उस का विराट रूप गीता संस्था कक्षाओं को चलता हुआ मै रोज देख रहा हूँ। यह गोवर्धन उसने उठा रखा है।”
 
 
डॉ. आशुजी गोयल (गीता परिवारचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि ऑनलाइन संथा वर्गाचे संयोजक) म्हणतात, “जैसा कि भगवान ने 18वे अध्याय के 69 वे श्लोक में कहा - ‘न च तस्मान्मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृत्तम:’ उसी के अनुसार भगवानने अपनी सर्वाधिक प्रिय सेवा के लिये हमे चुन लिया है, ऐसा प्रतीत हो रहा है।”
 
 
पाच हजार वर्षांत भौगोलिक परिस्थिती बदलली असेल, वैज्ञानिक प्रगती आकाशाला गवसणी घालत असेल, पण मनुष्याची मन:स्थिती तशीच आहे, मनातील विकार तसेच आहेत.. किंबहुना ते अधिकाधिक तीव्र होत आहेत. अशा वेळी गीतेचे श्लोक मुखोेद्गत, हृदयस्थ असले तर नैराश्यातूनसुद्धा प्रगतिपथावर भरारी मारण्याचे बळ प्राप्त होते. ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दात - ‘की गीता हे सप्तशती। मंत्र प्रतिपाद्य भगवती। मोह महिषा मुक्ती। आनंदलीसे॥’