परिवर्तनाची नांदी

03 Sep 2021 18:50:31
जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये हिंदूंनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या जन्माष्टमी साजरी केलीच, तशीच हांडवाडासारख्या छोट्या शहरांतदेखील जन्माष्टमी जल्लोशात साजरी झाली. श्रीनगरमधील लाल चौक हे ठिकाण एकेकाळी फुटीरतावादी घटकांसाठी महत्त्वाचं होतं. तिथे पाकिस्तानचे झेंडे फडकावले जायचे, भारतविरोधी घोषणा दिल्या जायच्या, तशी होर्डिंग्ज-बॅनर्स झळकावली जायची. या लाल चौकात भारताचा तिरंगा झेंडा फडकावणं हीदेखील एकेकाळी संवेदनशील बाब होती, त्यासाठीही अनेक वर्षं संघर्ष करायला लागला. आज त्याच लाल चौकात जन्माष्टमीची मिरवणूक वाजतगाजत निघाली.

kashmir_1  H x
 
कोणतंही सामाजिक परिवर्तन एका दिवसात होत नाही. सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया ही नेहमीच अतिशय संथ असते. या संथ प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा प्रतीकात्मक घटनांतून जरी व्यक्त होत असला, तरी तो टप्पा किंवा घटना त्या परिवर्तनाची पुढील काळातील दिशा स्पष्ट करण्यासाठी पुरेसा असतो. भारताच्या उत्तर टोकावर असलेलं आणि हिंसाचाराने - अस्थिरतेने अनेक वर्षं धगधगत असलेलं जम्मू-काश्मीर सध्या याच परिवर्तनाच्या वाटेवर वाटचाल करत आहे. या परिवर्तनाची पुढील दिशा स्पष्ट करणारी घटना म्हणजे नुकतीच काश्मीर खोर्‍यात श्रीनगरसह अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी झालेली कृष्ण जन्माष्टमी. ही जन्माष्टमी पुढील परिवर्तनाची नांदी ठरावी.
 
 
कश्यप ऋषींच्या कश्यप-मीर (कश्यपांचे सरोवर) किंवा कश्यप-मेरू (कश्यपांचा पर्वत) अशा उल्लेखांतून पुढे हिमालयाच्या पर्वतरांगेतील या खोर्‍याला ‘काश्मीर’ नाव पडलं. काश्मीरमधील पूर्वापार नांदत आलेल्या हिंदू समाजाला तेथून हद्दपार करण्याचे प्रयत्न आजवर अगणित प्रमाणात झाले. शतकानुशतकं झालेल्या परकीय आक्रमणांपासूनचा हा इतिहास अगदी विसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सांगता येतो. स्वतंत्र भारतात काश्मीर संस्थानचं सामिलीकरण, त्यानंतर पाकिस्तानने सातत्याने केलेली आक्रमणं, त्यातून पाकिस्तानशी उद्भवलेली तीन युद्धं हा सारा अलीकडचा इतिहास आपल्या सर्वांना बर्‍यापैकी ज्ञात आहे. शिवाय, तत्कालीन भारतीय नेतृत्वाने केलेल्या घोडचुका, त्यातून काश्मीरमधील मोठा भाग पाकिस्तानने अनधिकृतरित्या बळकावणं इ. पार्श्वभूमीदेखील आपण जाणतो. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, काश्मीर खोर्‍याला ‘त्यांचे हक्क’ देण्याच्या नावाखाली आपण 370 कलम लागू करून काश्मीरला उर्वरित भारतापासून वेगळं ठेवलं, विकासाच्या-सुधारणेच्या मुख्य प्रवाहातून लांब ठेवलं. ऐंशी-नव्वदच्या दशकांत काश्मीर खोर्‍यातील हिंदूंना अक्षरश: हाल हाल करून काश्मीर सोडण्यास भाग पाडण्यात आलं. तरीही आमचे तत्कालीन सत्ताधारी आणि वैचारिक क्षेत्रातील त्यांचे चेले 370 कलम कसं योग्य, हेच कंठशोष करून सांगत राहिले. दुसरीकडे, देशातील राष्ट्रवादी-हिंदुत्ववादी चळवळीने सातत्याने 370 काळं - कलम?? हटवून काश्मीरला भारतीय राज्यघटनेच्या मुख्य प्रवाहात आणण्याची भूमिका घेतली, त्यासाठी सहा-सात दशकं संघर्ष केला. स्थिर आणि कणखर राजकीय सत्ता व नेतृत्व लाभताच हिंदुत्ववादी चळवळीने आपला शब्द पाळला आणि परिणामी 2019मध्ये 370 कलम रद्द झालं.
 
 
काश्मीरच्या दृष्टीने व एकूणच भारताच्या दृष्टीने ही घटना एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होती. त्या वेळी अनेकांनी उद्दिष्टपूर्ती झाल्याचा आनंद व्यक्त केला आणि याने काय होणार म्हणून अनेकांनी नाकंही मुरडली. या दोन्ही बाजूंना आणि त्यांच्या विविध प्रश्नांना आता उत्तरं मिळू लागली आहेत. एकीकडे पाकपुरस्कृत दहशतवाद, फुटीरतावाद यावर नियंत्रण आणून खोर्‍यात शांतता प्रस्थापित करण्यात यश मिळताना दिसतं आहे, तर दुसरीकडे गेली सत्तरेक वर्षं न होऊ शकलेली विकासात्मक वाटचालही आता सुरू होऊ लागली आहे. जसजशी ही प्रक्रिया आकार घेत जाईल, तसतशी त्याची फळं मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्या काश्मीरच्या निर्हिंदूकरणासाठी विदेशातील आणि आपल्या देशातील राष्ट्रविरोधी, हिंदुविरोधी शक्ती इतकी वर्षं आटापिटा करत होत्या, त्यांनाही आता चोख उत्तरं मिळू लागली आहेत. याचंच प्रतीक म्हणून काश्मीरमध्ये साजरी झालेल्या कृष्ण जन्माष्टमीची नोंद आपल्याला घावी लागेल. जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये हिंदूंनी मोठ्या प्रमाणात सार्वजनिकरित्या जन्माष्टमी साजरी केलीच, तशीच हांडवाडासारख्या छोट्या शहरांतदेखील जन्माष्टमी जल्लोशात साजरी झाली. श्रीनगरमधील लाल चौक हे ठिकाण एकेकाळी फुटीरतावादी घटकांसाठी महत्त्वाचं होतं. तिथे पाकिस्तानचे झेंडे फडकावले जायचे, भारतविरोधी घोषणा दिल्या जायच्या, तशी होर्डिंग्ज-बॅनर्स झळकावली जायची. या लाल चौकात भारताचा तिरंगा झेंडा फडकावणं हीदेखील एकेकाळी संवेदनशील बाब होती, त्यासाठीही अनेक वर्षं संघर्ष करायला लागला. आज त्याच लाल चौकात जन्माष्टमीची मिरवणूक वाजतगाजत निघाली.
 
 
केवळ एक सण साजरा झाला, एवढ्यापुरतं या घटनेचं महत्त्व नाही. ज्या खोर्‍यातून हिंदूंना अक्षरश: हुसकावून लावण्यात आलं, त्याच हिंदूंना आता त्यांचा आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होऊ लागला आहे, निर्वासिताचं जगणं सोडून पुन्हा आपल्या भूमीत सन्मानाने जीवन जगण्याची आशा पल्लवित झाली आहे. आता वेगवेगळ्या ठिकाणी निर्वासित म्हणून जगत असलेले काश्मिरी हिंदू पुन्हा खोर्‍यात परतू लागले आहेत, सरकारही त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहे. 370 हटवल्याने जम्मू-काश्मीरच्या विकासाचे खुंटलेले प्रवाह मोकळे झाले. जन्माष्टमी उत्सवाने काश्मिरी पंडितांच्या मनात गेले कित्येक दशके दबा धरून बसलेलं भय विरून जाण्याच्या मार्गावरील हा खूप महत्वाचा टप्पा आहे. निर्हिंदूकरणाची प्रक्रिया उलट्या दिशेने जाऊ लागली असून राष्ट्रवादाला आणि भारतीयत्वाला पुन्हा अंकुर फुटू लागले आहेत. यामागे भलामोठा संघर्ष आहे, कित्येकांचा त्याग-बलिदान आहे. त्यामुळे लाल चौकात रस्त्यावर उतरून उत्साहात जन्माष्टमी साजरा करणारा हिंदू समाज पाहून हे बलिदान व्यर्थ गेलं नाही, असं नक्कीच म्हणता येईल आणि हे परिवर्तन येत्या काळात यशाच्या दिशेने अधिक वेगाने वाटचाल करेल, असा विश्वास व्यक्त करायलाही हरकत नाही.
 
 
Powered By Sangraha 9.0