सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी त्यांच्या आजी, आई आणि बाबा यांच्या आठवणींवर लिहिलेले ‘दीप कृतज्ञतेचे’ पुस्तक प्रकाशित झाला आहे. या पुस्तकाविषयी विवेक समूहातील पितृतुल्य व्यक्तिमत्त्व व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांनी लिहिलेला अभिप्राय.
‘दीप कृतज्ञतेचे’ या पुस्तकाची छपाईपूर्व प्रत अश्विनी मयेकर यांनी मला वाचायला दिली. “हे पुस्तक मी माझी आजी, आई आणि बाबा यांच्या आठवणींसंबंधी लिहिलेले आहे.” असे अश्विनी मला म्हणाली. अशी आठवणींची पुस्तके वाचणे मला कठीण जाते. माझ्यापुढेच माझे म्हणून लिखाणाचे विषय हनुमंताच्या शेपटीसारखे पडलेले असतात. पुस्तकांचे लेखन चालू असते. झालेल्या पुस्तकांचे प्रकाशनपूर्व वाचन चालू असते. आठवड्यात दोन-तीन लेख लिहावे लागतात आणि महिन्यात किमान सहा ते सात भाषणे झूमवर द्यावी लागतात. हे सर्व विषय गंभीर अभ्यासाचे आणि वाचनाचे असतात. त्यातून मन काढून आठवणींची पुस्तके वाचणे कठीणच.
परंतु अश्विनी विवेकची कार्यकारी संपादक आहे, माझी सहकारी आहे. त्यामुळे पुस्तक वाचणे हे माझे काम झाले. पुस्तक वाचायला घेतले आणि ते कधी संपले हे कळले नाही. तसा आवडीचा विषय नसतानाही, एका दमात पुस्तक वाचणे शक्य झाले, त्याची कारणे दोन - पहिले कारण अश्विनीचे पुस्तक अत्यंत भावपूर्ण आहे, अनेक प्रसंग डोळ्याचा कडा ओल्या करणार्या आहेत. भाषा सुंदर आहे, शैलीला साहित्यरसाचा सुगंध आहे. आणि दुसरे कारण - जे घटना-प्रसंग अश्विनीने टिपलेले आहेत, ते सामान्य नाहीत. त्यामागे अतिप्रचंड असा सामाजिक आशय आहे.
अश्विनी ही ब्राह्मण कुटुंबात जन्मली, ब्राह्मणी संस्कारांत वाढली आणि आजच्या पगडी-पागोट्याच्या भाषेत हे कुटुंब ब्राह्मण्यग्रस्त असायला पाहिजे होते. अश्विनीने आपल्या वडिलांचे अनेक अनुभव दिलेले आहेत. त्यातील राजाराम सांगावकर काकांचा अनुभव अभूतपूर्व समजला पाहिजे. हे सांगावकर नाभिक समाजाचे होते. इस्लामपूरला नोकरीनिमित्त दोघांनाही एकत्र राहावे लागले. त्यात त्यांचे नाते रक्ताचे नाते निर्माण झाले. मराठे कुटुंबाचे ते काका झाले आणि हे नातेपण दोघांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांभाळले. अश्विनीच्या धाकट्या भावाच्या मुंजीला ते काका म्हणून हजर राहिले आणि पुतण्याचे मुंडन माझ्या हातून करून घेतले नाही, म्हणून दु:खी झाले. असे दोघांचे भावसंबंधाचे अनुभव वाचताना अंगावर काटा उभा राहतो. समरसतेविषयी मी खूप लिहिले, लिहितो, असे सर्व लिखाण या एका नातेसंबंधावरून ओवाळून टाकावेत, इतके त्याचे मोल मोठे आहे.
अश्विनीची आई अनुराधा मराठे ही खर्या अर्थाने सहधर्मचारिणीच होती. घरात घरकामाला वडार समाजातील ‘लक्ष्मी’ येत असे. ब्राह्मण कुटुंबाच्या घरात वडार समाजाची स्त्री स्वयंपाकघरात.. सामाजिक क्रांती येथे थांबते. ही लक्ष्मी कधी कधी तीन-चार दिवस येत नसे. नवरा दारुडा, मारझोड करणारा, हे आईला माहीत होते. ती काही बोलत नसे. या लक्ष्मीच्या घरी लग्न निघाले आणि लग्नात नेसायला अश्विनीच्या आईने आपली किमती नारायणपेठ दिली. ही साडी कुणी कुणाला दिली आणि त्यांच्या जातीचे संदर्भ डोळ्यापुढे येतात, तेव्हा कुटुंबा-कुटुंबातून केवढे मोठे सामाजिक परिवर्तन घडत असते, हे जाणवल्याशिवाय राहत नाही.
कुटुंबजीवन हा आमच्या संस्कृतीचा मूळ आधार आहे. पाश्चात्त्य समाजदर्शनात आणि हिंदू समाजरचना याच्यातील कुटुंबव्यवस्थेत जमीन-अस्मानाचे अंतर आहे. एक आदर्श हिंदू कुटुंब कसे असते हे जाणून घ्यायचे असेल, तर हे पुस्तक वाचले पाहिजे. घरात आजी आहे आणि ती शंभरीच्या घरात पोहोचली आहे, परंतु तिचे स्थान घरातील मध्यवर्ती खांबाचे आहे. सर्व कुटुंबाशी असलेलेल तिचे भावबंध अत्यंत नाजूक आहेत आणि न दिसणार्या या नाजूक रेशीमधाग्याने हे कुटुंब बांधले गेले आहे. आजीचे नाव गंगूताई. तिची कहाणी एका कादंबरीचा विषय आहे. शालेय शिक्षण विशेष न झालेली, पण उपजत बुद्धिमत्ता असलेली अशी ही विलक्षण आजी होती.
प्रपंच कुणाला सुटत नाही आणि प्रापंचिक प्रश्न कुणाची पाठ सोडत नाहीत. हे सर्व करत असताना समाजभान जपावे लागते. जे आपल्याकडे आहे, ते गरजवंताला गरज पडली असता द्यावे लागते, मोकळ्या मनाने. अश्विनीच्या बाबांची शिकवण होती, सन्मार्गाने उत्तम पैसे मिळवावेत आणि आपली गरज भागल्यानंतर ज्याला गरज आहे, त्याला सढळ हस्ते मदत करावी, याचक विन्मुख जाता कामा नये. अश्विनीला सोन्याचे पेडंट भेट मिळाले, ते ती गळ्यात घालत असे. तिच्या घरी तेव्हा साधना नावाची मुस्लीम मुलगी घरकामाला येत असे. ती गुणी होती आणि बाबांचीही आवडती होती. तिचे लग्न ठरले. तिला काही भेट देणे आवश्यक होते. अश्विनीच्या बाबांच्या मनात तिला सोने द्यावे असे आले आणि त्यांनी अश्विनीकडे तिच्या गळ्यातील पेडंट मागितले आणि अश्विनीनेही क्षणाचाही विचार न करता पेडंट काढून बाबांच्या हातात ठेवले.
कुणासाठी? एका मुस्लीम मुलीसाठी आणि कुणी दिले? मराठे नावाच्या एका ब्राह्मण गृहस्थाने दिले. कुठून आले हे संस्कार? अश्विनीचे बाबा अरविंदराव मराठे हे संघस्वयंसेवक होते. संघ जीवनात जगावा लागतो. कुटुंबजीवनात संघ आणावा लागतो. ऐकलेले विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवावे लागतात. अरविंदराव यांचे संपूर्ण जीवन हे संघ जगणेच होते. ठाणे बँकेचे सरव्यवस्थापक असो, डोंबिवली नागरी बँकेचे अध्यक्ष असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी हे स्वयंसेवकत्व गुणातून प्रकट केले. ही त्यांची महानता आहे. हे संस्कार त्यांनी आपल्या परिवारात रुजविले.
सर्व समाज आपला आहे, आपले जीवन जगताना आपण समाजाचे काही देणं लागतो, याचे भान ठेवावे लागते. हा संस्कार त्यांनी आपल्या मुलांमध्ये संक्रमित केला. अश्विनीने सहजपणे आजी, आई आणि वडील याचे असे भावप्रसंग आपल्या पुस्तकात रेखाटले आहेत. शून्य वैचारिक अंगाने जाणारे हे पुस्तक असले, तरी त्यातील प्रत्येक प्रसंगामागे फार मोठा अमूल्य विचार दडलेला आहे. आपली सनातन मूल्यपरंपरा दडलेली आहे. काही भाष्य न करताच हे प्रसंग माझ्यासारख्या वाचकाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतात. हजारो वर्षांचे सातत्य या समाजाला लाभले, ते का? त्याचे गुपित प्रत्येक कालखंडात अशी शेकडो मराठे कुटुंबे शांतपणे जीवन जगत असतात आणि तेच समाजाला स्थैर्य प्रदान करीत असतात.