ये देश रहना चाहिये!!

09 Aug 2021 16:18:54
मागील पाऊण शतकाचा हा प्रवास, ही प्रक्रिया पाहताना यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणार्‍या प्रसारमाध्यमांनी लोकमान्यांच्या वरील वाक्याप्रमाणे समाजाचा आत्मविश्वास वाढवणारी भूमिका घेतली का? मुख्य प्रवाहातील मानली जाणारी प्रसारमाध्यमं येत्या काळात या सर्व प्रक्रियेत महत्त्वाच्या भूमिकेत राहण्याची चिन्हं दिसतात का? काही सन्माननीय अपवाद वगळता याचं उत्तर नाही असंच दुर्दैवाने द्यावं लागेल. याची कारणं अनेक आहेत. सदर विशेषांकाच्या निमित्ताने या अंकात पुढे याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे.


india_1  H x W:
‘पत्रकार हा लोकपक्षाचा कुशल, धीट आणि तडफदार असा वकील असावा. सरकार जशी आपली व्यंग उघड करत नाही, तशी तुम्हीही जनतेची व्यंग उघड करू नयेत. वेळप्रसंगी दोषदर्शनही करावे लागते आणि ते करावेही. परंतु शक्यतो लोकांचा आत्मविश्वास वाढेल असे पाहावे.’ लोकमान्य टिळकांची पत्रकारितेबद्दलची ही वाक्यं आहेत. आज याची पुन्हा पुन्हा उजळणी करण्याची गरज लोकमान्यांच्या स्मृतिशताब्दीच्या नंतरही जाणवत राहते. लोकमान्यांच्या निधनानंतर 27 वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळालं. एका बलाढ्य, विस्तारवादी जागतिक महासत्तेने लादलेलं दीडशे वर्षांचं पारतंत्र्याचं जोखड देशाच्या मानेवरून दूर करणं अजिबातच सोपं नव्हतं. हजारो-लाखो लोकांच्या त्यागामुळे, समर्पणामुळे आणि बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालं. भारताने मिळवलेलं स्वातंत्र्य केवळ ‘परकीय शासकांच्या शासनापासून मुक्ती’ एवढ्यापुरतं मर्यादित नव्हतं. स्वतंत्र होत असताना भारताने लोकशाही मूल्यं व व्यवस्था स्वीकारली आणि ही लोकशाही अधिक सशक्त, दृढ करणारी, एक भारतीय म्हणून आपलं नागरिकत्व - त्याचे हक्क व जबाबदार्‍या सुनिश्चित करणारी राज्यघटना निर्माण केली. आज हा स्वतंत्र, सार्वभौम, प्रजासत्ताक भारत अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करतो आहे. ही आपणा सर्वांसाठी जितकी आनंदाची, अभिमानाची बाब आहे, तितकीच ती येत्या काळातील आपली जबाबदारी वाढली असल्याचंही लक्षण आहे.

वास्तविक, हा विशाल भारतदेश हजारो वर्षांपासून सांस्कृतिकदृष्ट्या एक आहे, त्या एकत्वाच्या भावनेने जोडला गेलेला आहे. तथापि, राजकीयदृष्ट्या हा एक देश कधीच नव्हता. काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर विविध शासकांनी येथील वेगवेगळ्या भूभागांवर राज्य केलं. ब्रिटिशांची सत्ता उलथवून निर्माण झालेला स्वतंत्र भारत हा खर्‍या अर्थाने एक भारत होता. अर्थात, फाळणीनंतर निर्माण झालेला पाकिस्तान आणि त्यातून पुन्हा निर्माण झालेला बांगला देश वगळून. दीडशे वर्षं अतोनात शोषण झालेला भारत स्वतंत्र झाला आणि त्याने लोकशाहीची आधुनिक संकल्पना स्वीकारली. भारतीय राष्ट्रवादाच्या आजवरच्या वाटचालीतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. हजारो वर्षांचा वारसा, मूल्यं, अस्मिता आणि आता आधुनिक लोकशाही, तिला दृढ करणारी राज्यघटना असा अनोखा संगम साधत भारतीय राष्ट्रवादाची पुढील पाऊण शतकाची वाटचाल झाली आहे. या वाटचालीत या राष्ट्रवादावर आघात करण्याचे, राष्ट्रीय विचारांचा तेजोभंग करण्याचे असंख्य प्रयत्न झाले. ते प्रयत्न कधी या देशाबाहेरून झाले, तर कधी देशांतर्गतच उघड किंवा अप्रत्यक्ष माध्यमातून झाले. या देशाची हजारो वर्षांची जडणघडण ज्या प्रवाहातून झाली, ती हिंदू संस्कृती, त्या संस्कृतीच्या मूल्यांतून निर्माण झालेला राष्ट्रवाद त्याज्य, अस्पृश्य ठरवण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. गेल्या दशकातील राजकीय घडामोडी व त्यानंतर देशाच्या राजकारणाची सुरू असलेली वाटचाल पाहता ही बाब आपल्या लक्षात येते.

मागील पाऊण शतकाचा हा प्रवास, ही प्रक्रिया पाहताना यामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणवल्या जाणार्‍या प्रसारमाध्यमांनी लोकमान्यांच्या वरील वाक्याप्रमाणे समाजाचा आत्मविश्वास वाढवणारी भूमिका घेतली का? मुख्य प्रवाहातील मानली जाणारी प्रसारमाध्यमं येत्या काळात या सर्व प्रक्रियेत महत्त्वाच्या भूमिकेत राहण्याची चिन्हं दिसतात का? काही सन्माननीय अपवाद वगळता याचं उत्तर नाही असंच दुर्दैवाने द्यावं लागेल. याची कारणं अनेक आहेत. सदर विशेषांकाच्या निमित्ताने या अंकात पुढे याबाबत सविस्तर चर्चा झालेली आहे. परंतु, यातील सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे प्रसारमाध्यम म्हणून घेतलेल्या भूमिकेचा आणि त्यामागील दृष्टीकोनाचा. समाजातील, व्यवस्थेतील दोष दाखवले पाहिजेत, ते माध्यमांचं काम आहेच; परंतु हे करत असताना समाजामध्ये न्यूनगंडदेखील निर्माण होता कामा नये, याची काळजी घेणंही तितकंच आवश्यक ठरतं. इतक्या सार्‍या पंथ-जातींचा, भाषांचा, समुदायांचा हा देश राजकीयदृष्ट्या एकत्र आणून आपण लोकशाही मूल्यांच्या, राज्यघटनेच्या आधारावर त्याची बांधणी केली. ही बांधणी टिकवणं हेच मुळी महाप्रचंड आव्हान होतं. भारताला, येथील समाजाला हे पेलवणारं नाही, अशी भाकितं जगभरात तेव्हा अनेकांनी केली होतीच. परंतु आपण हे आव्हान समर्थपणे पेललं. लोकशाही यशस्वी करून दाखवत अमृतमहोत्सवाकडे वाटचाल केली. हे किती मोठं यश आहे, हे आज विकसित देश मानल्या जाणार्‍या अमेरिका, रशिया, ब्रिटन, चीन यांसारख्या देशांच्या राज्यव्यवस्थांचे प्रश्न, इतकंच काय तर आपल्या शेजारी पाकिस्तानच्या राज्यव्यवस्थेचे प्रश्न पाहिल्यास आपल्या लक्षात येतं.
 
अटलजींनी संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातील त्यांची वाक्यं खूप गाजली - “सरकारे आएगी - जाएगी, पार्टिया बनेगी - बिगडेगी, लेकिन ये देश रहना चाहिये!” यासाठी येत्या काळात आवश्यक राहील ती प्रसारमाध्यमांची राष्ट्रीय भूमिका. भारतीय राष्ट्रवाद, राष्ट्रभावना दृढ करत, समाजाला दिशा देत, समाजाचा आत्मविश्वास वाढवत भारतीय राष्ट्रवादापुढील आव्हानांचा सामना करण्यात राष्ट्रीय प्रसारमाध्यमं महत्त्वाची भूमिका निभावतील, अशी अपेक्षा व्यक्त करू या. विवेक समूह हीच भूमिका येत्या काळातही माध्यम क्षेत्रात अग्रेसर राहून निभावेल, अशी ग्वाही आम्ही या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देतो.

Powered By Sangraha 9.0