‘संघसरिता पुणे’ या संकल्पित ग्रंथाची माहिती मी बाबासाहेबांना दिली. त्यांच्यासारख्या इतिहासाच्या अभ्यासकाला ‘आम्ही पुण्याच्या संघकामाचा इतिहास लिहित आहोत’ असे म्हणू शकत नव्हतो. इतिहासलेखन हे शास्त्र आहे आणि त्या शास्त्रात ‘सा. विवेक’ पारंगत नाही. बाबासाहेबांना याचे न बोलताच आकलन झालेले होते. काही सांगण्यापूर्वीच ते म्हणाले की, ‘‘ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या स्मृतींचा संग्रह तुम्ही करून ठेवता, भविष्यात ज्याला इतिहास लिहायचा असेल, त्याला त्याचा उपयोग होईल.’’
आपण शाखेत कसे जायला लागलो, याची आठवण त्यांनी सांगितली. डॉ. हेडगेवार पुण्यात आले की, डॉ. पळसुळे यांच्या घरी उतरत. पळसुळेंच्या घराशी आमचा फार पूर्वीपासूनचा संबंध होता. डॉ. पळसुळेंची मुले आणि मी एकाच शाळेत होतो. त्यांचा बाळ नावाचा मुलगा होता तो आणि मी एकाच वर्गात होतो. पळसुळेंचा वाडा खूप मोठा होता. आम्ही मुलं तिथे भरपूर खेळत असू. एकदा असेच डॉ. हेडगेवार पुण्याला आले. डॉ. पळसुळे आम्हाला म्हणाले, ‘‘आज डॉ. हेडगेवार येणार आहेत, तेव्हा तुम्ही डॉक्टरांच्या खोलीकडे जाऊन दंगा करू नका!’’ डॉक्टरांना तेव्हा संघाचे मालक म्हणायचे. आता संघाचे मालक आलेले आहेत, तेव्हा आपला खेळ दुसरीकडे.
कृष्णराव मराठे यांचा मुलगा गोपाळकृष्ण मराठे हाही माझा मित्र होता. तो शाखेत जात असे. तेव्हा मी शाखेत जात नव्हतो. तो मला म्हणाला, ‘‘चल, डॉक्टरांना भेटायला जाऊ!’’ मी म्हणालो, ‘‘नको, डॉ. पळसुळे रागावतील.’’ हा गोपाळ मला शाखेत घेऊन गेला. तो म्हणाला, ‘‘रोज शाखेत यायचे, नाही आलास तर मारीन.’’ तो अंगापिंडाने मजबूत होता. आठ-दहा दिवस गेल्यानंतर मी शाखेत रमलो, पण पहिले दोन-चार दिवस त्याच्या माराच्या भीतीने मी शाखेत जात होतो. ‘‘मनावर शिलालेखाप्रमाणे संस्कार व्हावेत तसे संस्कार संघाने मला दिले. मला संघ समजला आहे, असे आज मी म्हणू शकत नाही. पुस्तके वाचून संघ काहीसा समजेल, माहिती मिळेल, पण संघ समजण्याचे खरे स्थान संघस्थान आहे. कार्यालये, वाचनालये, संघचालकांची घरे, समर्पित स्वयंसेवकांचे आयुष्य या सर्व वरच्या गोष्टी आहेत, पण संघ खर्या अर्थाने समजू शकतो, तो संघस्थानावर.’’
डॉक्टरांशी संबंध
बाबासाहेबांचा डॉक्टरांशीही संबंध आला म्हणजे डॉक्टरांना त्यांनी अनेक वेळा पाहिले, ऐकले आणि बाल स्वयंसेवक म्हणून संवादही केला. एक आठवण सांगताना ते म्हणाले, ‘‘भावे स्कूलमध्ये ओटीसी (संघ शिक्षा वर्ग) होता. माझ्याकडे डॉक्टरांचा एक सुंदर फोटो होता. आमच्या शाळेमध्ये एक काचपेटी होती आणि त्यात सूचना वगैरे लावल्या जात असत. मी त्या काचपेटीची चावी मागून घेतली आणि ऐतिहासिक फोटो, कात्रणे कापून त्या ठिकाणी लावून ठेवू लागलो. जाता-येता मुले ती पहात असत. एकदा मी त्या ठिकाणी डॉक्टरांचा फोटो लावला आणि त्याखाली त्यावेळच्या एका प्रसिद्ध गीतातील ओळ लिहिली. ‘अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुज समान होऊ दे’ वर्गासाठी आलेले स्वयंसेवक जाता-येता ते पहात. त्यात डॉक्टरांनी तो फोटो पाहिला. डॉक्टरांनी नाना पालकरांजवळ चौकशी केली की, हे कोणाचे काम आहे. नाना म्हणाले, ‘‘आपला एक स्वयंसेवक आहे, तो हे काम करतो. तो रोज इथे येतो.’’
नानांनी मला बोलावले. ते म्हणाले, ‘‘तुला डॉक्टरांनी बोलावले आहे.’’ मी घाबरलोच. डॉक्टर दिसायला अगदी उग्र होते. ते रागीट वाटायचे. मी भीत भीत त्यांच्याजवळ गेलो. मी म्हटले, ‘‘मला का बोलावले. माझे काही चुकले का?’’ हे म्हणण्यापूर्वी मी त्यांना वाकून नमस्कार केला. ते हसले आणि मला म्हणाले, ‘‘तू ही चित्रे लावतोस का?’’ मी होय म्हटले, ‘‘मला याची आवड आहे.’’ त्यांनी मला माझे नाव विचारले. मी म्हणालो, ‘‘बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे.’’ मी शाळकरी मुलगा होतो, पण स्वत:चे नाव बळवंतराव असे सांगत असे. त्याचे कारण असे की, मी ऐतिहासिक खानदानी घराण्यातील आहे आणि आमच्या घराण्यात अशीच नाव सांगण्याची पद्धत आहे. आमच्या घरात लहान मुलांनाही अरे-तुरे करीत नाहीत. डॉक्टरांनी विचारले, ‘‘की हे तुला कोणी सांगितले?’’ मी म्हणालो, ‘‘मला कोणीही सांगितले नाही. माझे मीच करतो.’’ पुढे त्यांनी विचारले की, हा फोटो तुला कुठे मिळाला. मी म्हणालो, ‘‘तो कुठे मिळाला हे मलाही आठवत नाही.’’ नंतर डॉक्टरांनी मला मोजक्याच शब्दात प्रोत्साहन दिले. माझी पाठ थोपटली.
स्वातंत्र्यापूर्वीचा संघ
‘स्वातंत्र्यापूर्वी’चा संघ, संघ स्वयंसेवक, संघ कार्यकर्ते हे कसे होते, याचे मोजके किस्से बाबासाहेबांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘परक्यांचे राज्य असल्यामुळे संघकामात कमालीची सावधता बाळगली जाई. कुणाचेही फोटो काढले जात नसत. वृत्तपत्र प्रतिनिधींना निमंत्रण नसे. बौद्धिक वर्गास अपेक्षित स्वयंसेवकच आलेले आहेत आणि ते कोणाच्या ना कोणाच्या गटातील आहेत, हे तपासले जाई. काहीही लिहून ठेवू नये, असा संकेत असे.’’ स्वत:च्या डायरीत संघाचा उल्लेख करायचा नाही. आवश्यकच असल्यास सांकेतिक भाषेत काही नोंदी ठेवाव्यात. इतकी दक्षता त्या काळात घेतली जात होती. (यामुळेच संघाचा लिखित इतिहास मिळणे हे अशक्यप्राय झालेले आहे.)
कार्यकर्ते अत्यंत कर्मठ असत. एकांतिक प्रेम जसे असते, तशी एकांतिक निष्ठा असावी लागते. अशी एकांतिक निष्ठा त्या काळात कार्यकर्त्यांत होती. भालू मटांगे नावाचा एक स्वयंसेवक होता. तो माझ्या शाखेतच होता. आम्ही दोघेही वेळेवर शाखेत यायचो. आमच्या शाखेत बबन गोखले नावाचा आणखी एक स्वयंसेवक होता. शाखेत वेळेवर जाण्याचे संस्कार आमच्या मनावर खोलवर झाले होते. त्याची परीक्षा होती आणि शेवटचा प्रश्न सोडवत बसलो, तर शाखेत जायला उशीर होईल म्हणून तो प्रश्न न सोडविताच शाखेत आला.
भालूची आई आजारी होती आणि त्यातच एक दिवस ती गेली. ती गेल्यानंतरही भालू शाखेवर आला. नित्य कार्यक्रम त्याने पार पाडला. काही बोलला नाही. शाखा संपली की, आम्ही कोंडाळे करून बसत असू तसे नेहमीप्रमाणे बसलो. भालू थांबला नाही. मी त्याला विचारले, ‘‘काय रे भालू कुठे निघालास?’’ तो अचानक थांबला आणि रडायला लागला. त्याला जवळ घेऊन विचारले तर तो म्हणाला, ‘‘आई गेली. शाखा सुरू होण्याच्या आधी गेली.’’
वामन परांजपे नावाचा एक लंगडा स्वयंसेवक होता. तो शनिपाराजवळ राहायचा. त्याला वडील नव्हते. त्याची आई वारली. तिचे दहन करायला ओंकारेश्वराजवळ आणले गेले. ओंकारेश्वराजवळ शाखा लागत असे. तिचे नाव प्रल्हाद शाखा. त्याने शाखा पाहिली. तो नातेवाईकांना म्हणाला, थोडा वेळ थांबा. तो शाखेत आला शाखा उरकून तो दहन करायला गेला. त्या काळत स्वयंसेवकांचा पिंड असा होता. माझी जडणघडण त्यात झाली.
पुढे मी कोपरगावला प्रचारक म्हणून गेलो. दिलेला शब्द पाळला पाहिजे, वेळ पाळली पाहिजे, हा संघसंस्कार माझ्यावर फार खोलवर झालेला आहे. आजही बाबासाहेब पुरंदरे दिलेला शब्द आणि वेळ पाळणार याविषयी लोकांना विश्वास वाटतो. मी प्रचारक गेलो, ते साल होते 1942-43. भैय्याराव गौतम हे आमचे जिल्हाप्रचारक होते. कोपरगावला एकच शाखा लागत असे. मला पुण्यातील संघकामाचा अनुभव होता. हवेली तालुक्यात मी शाखा लावण्यास जात होतो. शाखा स्वत:हून चालल्या पाहिजेत, मी गेलो की शाखा लागली, मी गेल्यानंतर शाखा बंद असे मला वाटे. कोपरगावाच्या परिसरात तेव्हा चार साखर कारखाने होते. या कारखान्यांतून मी फेरफटका मारला. दिसायला मी किरकोळ होतो, प्रौढ वाटत नसे. या कारखान्यांतील कामगारांशी ओळखी केल्या. काहीजण कधीतरी शाखेत गेलेले मला भेटले. मी त्यांना म्हणालो, ‘‘आपण एकत्र यायला पाहिजे.’’ त्यांनी होकार दिला. आम्ही एकत्र आलो आणि शाखा सुरू झाल्या.
तसा नगर जिल्हा संघकामाच्या दृष्टीने कठीण होता. नगर जिल्ह्यात काँग्रेसचे काम खूप मोठे तसेच कम्युनिस्टांचेही काम होते. संघाला दोघांचाही फार विरोध होता. मामी कोमठेकर म्हणून एक महिला होत्या आणि सहजानंद नावाचे स्वामी होते. हे दोघेही संघाचे विरोधक. तेव्हा आम्ही गमतीने म्हणत असू ‘‘बायकांत मामी आणि पुरुषांत स्वामी’’ या विरोधातही शाखेचे काम मार्गी लागले.
कल्पक बाबाराव
काम करताना थोडी कल्पकता वापरली की, काम वाढते. कल्पकतेचे धडे मी बाबाराव भिडेंकडून शिकलो. एकदा बाबांनी सर्व स्वयंसेवकांना अचानक बोलाविले. तसे कोणतेही नेमके कारण नव्हते. सर्व स्वयंसेवकांसमोर बाबा पंधरा-वीस मिनिटे बोलले. ते म्हणाले, ‘‘आज आपल्याला ध्वजपूजन करायचे आहे. हे गुरुपूजन नाही. शेजारी फुले ठेवलेली आहेत, त्यातील फक्त एकच फूल, उचलायचे आणि ध्वजाला वाहायचे. संख्या घेतली जाणार नाही.’’ वीस मिनिटांत कार्यक्रम संपला. वाहिलेली फुले मोजली गेली. बाबा म्हणाले, ‘‘इतके स्वयंसेवक आपल्याकडे आहेत. इतकी फुले शिल्लक आहेत, इतके स्वयंसेवक समाजात आहेत, ते आपल्याला मिळवायचे आहेत.’’ बाबांचे बोलणे सुरेख झाले आणि ते शिलालेखासारखे मनात कोरले गेले.
मी वर म्हटले की, ‘‘बाबांपासून कल्पकतेचे धडे आम्ही गिरवले. मीही दर गुरुवारी सर्वांनी मिळून पावणेसहा वाजता शाखेवर यायचे, असा नियम केला. एकदा प्रवासात मी टिळकनगर शाखेत श्रीरामपुरला गेलो. तो बुधवार होता. शाखा वगैरे झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडे जेवायला गेलो. या नादात गुरुवारी सकाळी पावणेसहा वाजता कोपरगावला शाखेवर जायचे आहे, हे मी विसरलो. जेवत असतानाच मला त्याची आठवण झाली. जेवण उरकून मी म्हणालो, ‘‘मला कोपरगावला गेले पाहिजे. उद्या सकाळी पावणेसहा वाजता शाखेची बैठक आहे. त्याला उपस्थित राहिले पाहिजे.’’ कार्यकर्ते म्हणाले, ‘‘एवढ्या रात्री कुठे जाणार?’’ दिवस पावसाचे, खराब रस्ता, रस्त्यावर दिवा-बत्तीची सोय नव्हती, वाहने नव्हती आणि कोपरगाव ते श्रीरामपूर बावन्न किमीचे अंतर होते.
मी तसाच अंधारात चालतचालत नदीकिनारी पोहोचलो. नदीच्या पलीकडे कोपरगाव होते. नदीला पाणी भरपूर होते, त्याला ओघही भरपूर होता. प्रवाशांची वाहतूक करणारा तराफा होता, पण एवढ्या रात्री नदीतून कोणी प्रवास करीत नसे म्हणून तो तराफेवालाही तेथे नव्हता. पाण्याचा अंदाज घेऊन मी पाण्यात उतरलो आणि पुढे जाऊ लागलो. इतक्यात अचानक मागून मोटारीचा प्रकाश पडला आणि आवाज आला. ‘‘कोण आहे? पाण्यात कशाला उतरला?’’ मी अंधारात असल्यामुळे त्यांना दिसत नव्हतो, पण ते मला दिसत होते. ते होते भाऊसाहेब वझे, कोपरगावचे संघचालक. गाडीत ते स्वत:, त्या वेळचे प्रसिद्ध गायक रानडे आणि सोबत तराफेवाला होता. रानडे यांचे श्रीरामपुरला गणेशोत्सवात गायन होते. गाणे उरकून सकाळी कोपरगावहून गाडी पकडून त्यांना नगरला जायचे होते. आम्ही सर्वजण नदी पार करून पलीकडे आलो. पहाटे मी भाऊरावांना म्हटलं की, मी शाखेवर जातो.’’
भाऊरावांची एक आठवण सांगायची तर, भाऊसाहेब संघचालक असूनही शाखेवर कधीच येत नसत. ही गोष्ट मला नेहमी खटकायची, पण त्या दिवशी असे झाले की, माझी शाखेची एवढी ओढ पाहून भाऊरावांना काय वाटले कोणास ठाऊक तेही माझ्याबरोबर शाखेत आले. यानंतर भाऊसाहेब वझे नियमितपणे शाखेत यायला लागले. ‘‘तुम्ही रोज शाखेत आले पाहिजे’’, असे म्हणण्याची आमची कोणाची हिंमत नव्हती कारण आम्ही पोरसवदा मुले होतो, पण भाऊसाहेबांचे त्यानंतर शाखेत नियमित येणे सुरू झाले.
पुण्याच्या संघकार्यावर बाबाराव भिडे, विनायकराव आपटे, नानाराव पालकर यांचे संस्कार खोलवरचे आहेत. नानाराव पालकर हे माझे लेखनातील गुरू. ते प्रतिभावंत होते. विनायकराव आपटे हे तर आमचे दुसरे बाप. स्वयंसेवकांचा सांभाळ त्यांनी आपल्या अपत्याप्रमाणे केला. गोपाळराव देशपांडे हे आमच्या पिढीतील स्वयंसेवक होते. ते पुढे मावळात प्रचारक गेले. भाऊसाहेब देशमुख हे संघचालक होते. ते अत्यंत तापट होते. ते पुण्यात स्काऊटमध्ये होते. डॉक्टरांचा आणि त्यांचा संबंध कसा आला, हे मला सांगता येणार नाही, परंतु डॉक्टर जेव्हा जेव्हा शाखेत येत तेव्हा भाऊसाहेबांना घेऊन येत. भाऊसाहेब त्यांना म्हणत, ‘‘माझ्या नादी लागू नका, माझे आणि संघाचे काही पटणार नाही. माझा स्वभाव सर्वांशी जुळणारा नाही.’’ पण डॉक्टरांनी त्यांना संघात बसविले.
स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्याची आस प्रत्येकाच्या मनात होती. मला वाटते की, संघकामाची रचनासुद्धा स्वातंत्र्य मिळविण्यासाठीच आहे. त्या वेळच्या तरुणांना असे वाटणे स्वाभाविक होते. ब्रिटिशांबद्दल असणार्या चिडीने संघ त्या काळात फोफावत गेला. त्यावेळी संघाची गीतेही स्वातंत्र्याची आकांक्षा व्यक्त करणारीच होती. ‘एकनिष्ठ सेवक बनलो, यात मोक्ष सारा, पहा तुझ्या मागे येतो, चाल तू पुढारा’ परंतु, संघाच्या कल्पनेपेक्षाही स्वातंत्र्य लवकर आले. 1947 सालीच इंग्रजांनी देश सोडून जाण्याचे ठरविले. सत्तांतर झाले आणि काँग्रेसच्या हाती सत्ता आली.
हुकमीशक्ती
स्वातंत्र्यासाठी हुकमीशक्ती निर्माण करण्यावर संघाने तेव्हा भर दिला होता. बाबाराव भिडे हुकमीशक्ती असाच शब्दप्रयोग वापरायचे. या शक्तीच्या बळावर इंग्रजांकडून सत्ता काढून घेणे शक्य होणार होते. अशी हुकमीशक्ती निर्माण करण्याचे वेगवेगळे प्रयोगही त्याकाळी पुण्यात केले गेले. वसंत छत्रे नावाचा एक स्वयंसेवक होता. तो बालांच्या शाखेचा शिक्षक होता. फर्ग्युसन रोडला कचरे-पाटील यांची रानात मोठी विहीर होती. त्याने एकदा अमावस्येच्या रात्री वीस-एक बाल स्वयंसेवकांना बोलावले आणि त्या सर्वांना घेऊन तो त्या विहिरीवर पोहायला गेला. गडद अंधार, पुन्हा विहीर, अमावस्येची रात्र, भुताखेतांची भीती असतानाही त्याने हे काम केले. मला हे कळल्यानंतर मी त्याला विचारले की, ‘‘वसंता! तू हे काय केलेस?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘संघाचे काम असले की, अमावस्या असो वा पौर्णिमा असो, दिवस असो की रात्र, संघाने बोलावले की गेलेच पाहिजे. हा संस्कार झाला पाहिजे ना! तो देण्याचा हा कार्यक्रम होता.’’ एकूण काय तर, स्वातंत्र्यासाठी सदैव सिद्ध असले पाहिजे, अशी मानसिकता तयार करण्यावर त्यांचा भर होता. आपल्याकडे हुकमीशक्ती असली पाहिजे, असे श्रीगुरुजीही म्हणत असत आणि ती निर्माण करण्यावर त्यांनी खूप भर दिला. राष्ट्रउभारणीच्या कामासाठी माणसे जोडावी लागतात. माणसे जोडण्याच्या कामाची ते शिकस्त करीत होते. अंगात तीन डिग्री ताप असतानाही ठरलेला कार्यक्रम श्रीगुरुजींनी कधीच चुकविला नाही. श्रीगुरुजींचा नगरला प्रवास असताना ते आजारी पडले. डॉ. खानोलकर संघचालक होते, ते म्हणाले, ‘‘तुम्हाला भरपूर ताप असल्याने सगळे कार्यक्रम रद्द करा. मी जिल्हा संघचालक या नात्याने तुम्हाला प्रथम विनंती आणि नंतर आज्ञा करतो की, कुठेही जाऊ नका. श्रीगुरुजी हसले आणि म्हणाले, ‘‘मी सरसंघचालक म्हणून तुम्हाला आज्ञा देतो की, तुमची आज्ञा मागे घ्या.’’ अंगात तीन डिग्री ताप असतानाही ते ठरलेल्या कार्यक्रमासाठी बाहेर पडले.
बाबासाहेब पुरंदरेंशी जेव्हा बोलणे चालू होते, त्या काळात थोड्याच दिवसांत पुण्यात ‘ब्राह्मण महाअधिवेशन’ भरणार होते. या अधिवेशनात बाबासाहेबांचा सत्कार होणार आहे, अशी बातमीही प्रसिद्ध झाली होती, पण बाबासाहेब स्वत:ची जात केव्हाच विसरले आहेत. संघात आलेल्या हिंदूंची ओळख हिंदू एवढीच असते. ब्राह्मण संमेलनाचे कार्यकर्ते त्यांना निमंत्रण देण्यासाठी आले होते. त्याविषयी बाबासाहेब म्हणाले, ‘‘संमेलनाचा कार्यकर्ता मला म्हणाला, ‘‘ब्राह्मण समाजातील एक मोठा माणूस म्हणून तुमचा सत्कार करणार आहोत.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘मी तिथे येणार नाही आणि सत्कारही करून घेणार नाही, कारण मी संघविचारांचा आहे. माझ्या घरात शिकण्यासाठी तथाकथित अस्पृश्य जातीतील अनेक मुले आहेत. आजपर्यंत अशी पस्तीस मुले माझ्याकडून शिकून गेली आहेत. मी तुमच्या अधिवेशनात आलो तर, इतकी वर्षे संघात राहूनही मी माझे ब्राह्मणत्व विसरलो नाही, असा त्याचा अर्थ होईल. माझ्याकडे राहिलेल्या मुलांवर त्याचे काय संस्कार होतील? इंग्रजांनी हिंदू समाजात फूट पाडण्याचे धोरण स्वीकारले. अशी जातीय संमेलने भरवून आपण त्याला खतपाणी घालीत आहोत.
मेकॉलोचे एक वाक्य प्रसिद्ध आहे की, ‘बे्रेक देअर बॅकबोन सो दे विल फरगेट देअर हिस्ट्री’ हा बॅकबोन म्हणजे हिंदुत्वाचा अभिमान. विठ्ठलभक्ती, शिवभक्ती, दुर्गाभक्ती, रामभक्ती इत्यादी त्याचा कणा आहे. आज जातीअस्मिता प्रमाणाबाहेर वाढलेल्या आहेत. आज निवडणुकीत हिंदू धर्माविषयी काही वेडेवाकडे बोललो, तरी मी जिंकून येईन, पण एखाद्या जातीविषयी काही बोललो, तर हमखास पडेन. संकुचित जातीअस्मिता कमी करणे हे मोठे आव्हान आहे.
‘बाबासाहेब म्हणजे शिवशाहीर’ सहजपणे त्यांनी महाराजांची एक आठवण सांगितली. महाराजांच्या कारभार्याने एकदा त्यांना विचारले, ‘‘इतके गड-किल्ले-गावे घेतली, पण आपले अंतिम उद्दिष्ट कोणते?’’ महाराज म्हणाले, ‘‘सिंधू नदीच्या उगमापासून कावेरी नदीच्या तिरापर्यंत सारा मुलुख आपला आहे, तो मुक्त करावा. महाक्षेत्रे सोडवावीत, एैसा मानस आहे.’’
या विचाराचे स्मरण आपण सतत केले पाहिजे, असे मला वाटते.
मुलाखत : रमेश पतंगे