भेट इतिहासपुरुषाची…स्वयंसेवकाची

29 Aug 2021 09:52:31
भेट इतिहासपुरुषाची…स्वयंसेवकाची 
जे रात्रंदिन शिवध्यासमग्न आहेत, शिवचरित्रकथन हे ज्यांनी जीवनव्रत म्हणून अंगिकारलं आहे त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं जन्मशताब्दी वर्ष नुकतंच सुरू झालं. या थोर शिवसाधकाला मानवंदना देण्यासाठी तसेच या निमित्ताने बाबासाहेबांच्या स्वप्नातली शिवसृष्टी आकारण्यासाठी या माध्यमातून काही निधी उभा करावा या हेतूने, विवेक समूह जन्मशताब्दी विशेषांक आणि अन्य कार्यक्रमांची आखणी करत आहे. हे सर्व आदरणीय बाबासाहेबांच्या कानावर घालावे आणि त्यांची अनुमती मिळवावी यासाठी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. भेट अर्थातच पूर्वनियोजित होती. वेळेचं एखाद्या व्रताइतकं काटेकोर पालन करण्याबाबतही बाबासाहेबांचा विशेष लौकिक. त्यामुळे आमच्याकडून त्याचा भंग होऊ नये याची दक्षता घेत आम्ही चौघं - सर्वश्री रमेशजी पतंगे, दिपक जेवणे, धनाजी जाधव आणि मी, दिलेल्या वेळेआधी पंधरा मिनिटं त्यांच्या निवासस्थानी पोहोचलो.
 
बाबासाहेब विश्रांती घेत होते. आम्ही आल्याचा निरोप मिळताच सहाय्यकाच्या मदतीने उठून खुर्चीत बसले. वयोमानानुसार अधिकच कृश झालेली पण तेजस्वी काया. चेह-यावरच्या तेजाला चंदेरी केसांची महिरप उठून दिसत होती.
स्थानापन्न झाल्यावर भेटीचं प्रयोजन सांगितलं.
 
"आपण शताब्दी वर्षात प्रवेश केलात…"
 
मध्येच थांबवत ते म्हणाले, "होय…अपराधाला क्षमा असावी…" बोलण्यातली मिश्कील छटा बुद्धीच्या तरतरीतपणाची साक्ष देत होती. त्यांच्या या सहज उद्गारांनी वातावरण सैलावलं, मनावर त्यांच्या मोठेपणाचं आलेलं दडपण कमी झालं.
"या निमित्ताने एक विशेषांक करावा आणि आपण उभारत असलेल्या शिवसृष्टीसाठी निधी उभारावा असं मनात आहे. त्यासाठी आपली अनुमती आणि आशीर्वाद हवेत."
 
"बाबासाहेब पुरंदरे गौरव अंक असं स्वरूप देऊ नका…शिवसृष्टीची संकल्पना लोकांपर्यंत पोचूद्या…"
 
त्यांनी हे सुचवणं अपेक्षितच होतं. त्यावर रमेशजी म्हणाले,
"बाबासाहेब तुमचा गौरव म्हणजे तुमचा कार्याचा गौरव करणारा हा विशेषांक असेल. ज्या कार्याची तुम्ही आयुष्यभर पूजा बांधली त्याचा गौरव करणारा अंक असेल…"
 
त्यांना हे पटलं असावं…मग आपण मांडलेल्या विचाराला पुष्टी देणारा आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांचा एक किस्सा त्यांनी सांगितला, तो ही थेट 1938 सालच्या पुण्यात हेडगेवारांच्या गौरवाप्रीत्यर्थ निघालेल्या एका मिरवणुकीचा. या मिरवणुकीत भारतमातेचं गौरवगान करणा-या घोषणा दिल्या जात होत्या, ब्रिटिशांचा उद्धारही काही घोषणांमधून होत होता. त्याच उत्साहाच्या भरात स्वयंसेवकांनी 'डॉक्टर हेडगेवार की जय', म्हणत जयजयकार केल्याचं गाडीत बसलेल्या डॉक्टरांनी ऐकलं. त्यांनी तत्क्षणी नाना पालकरांना जवळ बोलावलं आणि ती घोषणा न देण्याची शांत स्वरात सूचना केली. या प्रसंगाचे साक्षी असलेल्या पोरसवदा वयातल्या बाबासाहेबांनी 2 दिवसांनी थेट डॉक्टरांनाच यामागचं कारण विचारलं. डॉक्टरांनी सांगितलं,"संघाचं कार्य व्यक्तीसापेक्ष नाही, कार्यसापेक्षता हा आपला गुणविशेष आहे…"
 
इथेच बाबासाहेबांनी कथन थांबवलं. अगदी सहजपणे त्यांनी आपलं जीवनव्रत हे संघकार्यच असल्याचा संदेश आमच्यापर्यंत पोचवला होता. त्यांना भेट दिलेला डॉक्टर हेडगेवार विशेषांक पाहताना, मुखपृष्ठावरच्या डॉक्टरांच्या चित्राची तारीफ केली. 'अगदी हुबेहूब असेच दिसत डॉक्टर' असं म्हणून जणूकाही चित्रकाराला प्रशस्तीपत्रच दिलं.
 
गप्पांमध्ये रंग भरू लागला होता तोच आणखी दोन जण त्यांच्या भेटीसाठी आल्याची वर्दी आली. 'वेळेची काहीतरी गडबड झाली आहे' असं म्हणत बाबासाहेब सहाय्यकाच्या मदतीने बाहेर गेले. आणि, "एवढी मोठी माणसं आपल्याकडे आली आहेत..चहा वगैरे द्याल की नाही?" असं आमच्याकडे बघत घरातल्या मदतनीसांना सांगायला विसरले नाहीत. बाहेर जातानाच अपॉईंटमेंटची नोंद असलेली डायरी मागवून घेतली. पाहुणे आंगतुक होते हे त्यांच्या डायरी पाहून लक्षात आलं. मात्र आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान राखत, त्यांना पुरेसा वेळ देऊन बाबासाहेब पुन्हा आत आले. घडलेल्या प्रसंगावर एक किस्सा त्यांच्या पोतडीत तयार होताच. वेळेचे आणि दिलेल्या शब्दाचे पक्के असलेल्या बाबासाहेबांनी एकदा एकही श्रोता समोर नसताना ठरलेल्या वेळेत, नियोजित विषयावर आपलं भाषण सुरू केलं होतं. त्याची आठवण त्यांना करून दिल्यावर ते म्हणाले, "एका शिवचरित्र व्याख्यानानंतर एक तरूण माझ्याजवळ आला नि म्हणाला, रागावणार नसाल तर एक प्रश्न तुम्हांला विचारायचा आहे. मी त्याला अनुमती दिली तसं त्याने विचारलं…इतके वर्षं तुम्ही शिवचरित्र कथन करताय. शिवाजी महाराजांच्या कोणत्या गुणांचं तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुकरण केलं आहे? प्रश्न अनपेक्षित असला तरी रास्त होता. मी त्याच्याकडून विचार करून उत्तर देण्यासाठी एक महिन्याची मुदत मागून घेतली. बरोब्बर एक महिन्याने तो समोर येऊन बसला, मी त्याला म्हणालो…हे बघ, महाराजांनी जे मुघलांविरूद्ध लढताना अनन्यसाधारण शौर्य दाखवलं त्याचं अनुकरण करावं अशी परिस्थिती माझ्या आयुष्यात नव्हती. ते शक्यही नव्हतं. मग तुझ्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी महाराजांच्या कोणत्या गुणवैशिष्ट्याचं पालन करतो याचा विचार केला असता लक्षात आलं की दिलेली वेळ आणि दिलेला शब्द पाळणं याचं अनुकरण मी आयुष्यभर करत आलो आहे. पण तरीही आजवर मला त्यात 30 टक्के यश आलं असेल. कारण या दोन्ही गोष्टी समोरची व्यक्ती कशी वागते यावरही अवलंबून असतात."
 
यातून एका तरूणाने विचारलेला प्रश्नही गांभीर्याने घेणारे बाबासाहेब तर दिसलेच आणि हा प्रसंग सांगण्याला संदर्भ नुकत्याच भेटून गेलेल्या आगंतुक पाहुण्यांचा आहे हे ही लक्षात आलं.
 
संघ स्वयंसेवक म्हणून काम करताना स्वतःची आणि संघाची प्रतिमा आपल्या वागणुकीतून जपावी लागते. हे सांगताना आठवणींच्या पोतडीतून आणखी एक किस्सा बाहेर आला. त्यांच्या तरुणपणीची गोष्ट. संघ स्वयंसेवकच नव्हे तर शाखा कार्यवाह असतानाची. एकदा ध्रुव शाखेतल्या 20/22 बाल स्वयंसेवकांना पुण्यातल्या कचरे पाटलांच्या विहिरीवर पोहणं शिकवण्यासाठी मध्यरात्री घेऊन गेल्याची. ठरवलेला बेत तर व्यवस्थित पार पडला, पण हे धाडस पुणे संघचालकांच्या कानावर गेलं. तरुण बाबासाहेबांना भेटीसाठी बोलावण्यात आलं. 'हे असं वेडं धाडस अंगाशी आलं असतं तर? एखादी दुर्घटना घडली असती तर? त्यातून आपली बदनामी झाली नसती तर संघाची, संघकार्याची बदनामी झाली असती,' वरिष्ठांच्या बोलण्यात नापसंती होती आणि केलेल्या धाडसाबद्दलचा रागही. त्यातून जे समजायचं ते बाबासाहेब समजून चुकले. चूक कबूल केली. काही मिनिटांतच वातावरणातला तणाव निवळला. संघचालक पुन्हा एकदा खेळीमेळीत गप्पा मारू लागले. संघाचं सलगी देणं कसं असतं याचं उदाहरण तर बाबासाहेबांनी समोर ठेवलंच पण हा इतिहासपुरूष आजही कसा अंतर्बाह्य संघ स्वयंसेवक आहे याचंही दर्शन घडलं.
 
मनावर गारूड करणा-या जादूगाराची पोतडी उघडली गेली होती…पण दिलेल्या वेळेचं बंधन पाळणं आणि त्यांच्या वयाचं भान राखणं आवश्यक होतं. पुन्हा एकदा आदराने झुकून नमस्कार केला आणि निरोप घेतला…इतिहासपुरुषाचा…सच्च्या स्वयंसेवकाचा.
Powered By Sangraha 9.0