गोव्यात फिरताना दोन गोष्टी सहज डोळ्यात भरतात - अनेक हिंदू घरांसमोर सुबक तुळशी वृंदावने आणि ख्रिश्चन घरांसमोर क्रॉस दिसतात. त्या दोन्ही परंपरांचा मागोवा घेणारे Living Traditions Of The Emerald Land - Tulashi Vrindavans & Holy Crosses Of Goa हे पुस्तक डॉ. प्रमोद पाठक आणि त्यांच्या सुविद्य पत्नी उषा यांनी लिहिले आहे. त्यांनी गोव्यात अगदी आतल्या भागात जाऊन दोन्ही परंपरांचा अभ्यास आणि पाहणी केली. शेकडो छायाचित्रे काढली. त्यातून वैविध्यपूर्ण असणारी तुळशी वृंदावने आणि क्रॉस यांची छायाचित्रे या चित्रसंग्रहात संकलित केली आहेत. दोन्ही परंपरांचा आढावा घेणार्या दीर्घ निबंधात तुळशी वृंदावने समोरच्या दारी असण्याचे कारण दिले आहे. काही कामानिमित्त बाहेर जाताना प्रारंभी हातून चांगले काम घडल्यास नंतर करायचे काम सुकर होईल, तुळशीला नमस्कार आणि वृंदावनाला प्रदक्षिणा घातली की पहिले काम यशस्वीपणे पार पडले, ही त्यामागची भूमिका होती.
पुढे जाऊन पोर्तुगीजांनी केलेल्या बाटवाबाटवीमुळे ख्रिश्चन झालेल्या हिंदूंनी तुळशी वृंदावनाऐवजी क्रॉस उभारण्यास सुरुवात केली.
गोव्यात दिवाळीऐवजी देवदिवळी, तुळशीचे लग्न थाटामाटात साजरे केले जाते. त्याचे सचित्र वर्णन पुस्तकात दिले आहे. गोव्यात तुळशी वृंदावनाला मध्यवर्ती धरून महिला ‘धालो उत्सव’ साजरा करतात. त्या वेळी गाईल्या जाणार्या धालोगीतांचे संकलन प्रसिद्ध झाले आहे. डॉ. पाठक दांपत्याने तोपर्यंत न संकलित झालेले एक गीत संग्रहात समाविष्ट केले आहे.
आज बांधलेली तुळशी वृंदावने आणि क्रॉस नंतरच्या पिढीला पाहायला मिळणार नाहीत. पुन्हा ती तशी बांधली जाणार नाहीत. तेव्हा या सांस्कृतिक वारशाचे चित्रांकन करण्याच्या प्रकल्पाची कल्पना डॉ. प्रमोद पाठक यांनी त्यांचे मित्र आणि त्या वेळी मुख्यमंत्री असलेले मनोहर पर्रिकर यांना सांगितली. पर्रिकर यांनी तिला लगेच पाठिंबा दिला. त्या वेळी कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री असलेल्या रामराव देसाईंनी डॉ. पाठकांना कला आणि संस्कृती खात्यातर्फे वाहन आणि छायाचित्रकार उपलब्ध करून दिल्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्याचे लेखकद्वय नमूद करतात. या पुस्तकाला मनोहर पर्रिकर यांनी प्रस्तावना लिहिली आहे. गोव्याचा अमोल सांस्कृतिक वारसा जतन करणारे हे पुस्तक गोव्याच्या कला आणि संस्कृती खात्यातर्फे (पाट्टो, पणजी 401001, गोवा) उपलब्ध आहे. मूल्य - 500 रु.
गोवा कला आणि संस्कृती खाते - वेबसाईट
https://artandculture.goa.gov.in/