दोन वर्षांपूर्वी भारतीय संसदेने याच कालखंडात पारित केलेले कायदे हे आपल्या राजकीय परिपक्वतेचे, दूरदृष्टीचे द्योतक म्हणावे लागतील. आपल्या देशाला त्यायोगे लाभलेले सुरक्षाकवच मोलाचे आहे. मात्र त्याच वेळी ही जागतिक त्सुनामी आहे, हे लक्षात घेत पुढील व्यूहरचना करण्याचे व मुत्सद्दीपणाने ती अन्य राष्ट्रांच्या गळी उतरवण्याचे कामही भारताला करावे लागेल. गलितगात्र झालेल्या एका संस्कृतिसमृद्ध राष्ट्राला पुन्हा उभे करण्याचे काम छत्रपती शिवाजीमहाराजांचा भारतच करू शकतो. मात्र ही जबाबदारी पार पाडण्यासाठी भारताला आधी आपल्या सामर्थ्यात वाढ करावी लागेल. त्यासाठी नियोजनबद्ध, कालबद्ध प्रयत्न करावे लागतील.
गेले काही दिवस माध्यमविश्व आणि अवघे जगच अफगाणिस्तानशी संबंधित धक्कादायक घडामोडींच्या छायेखाली आहे. अपेक्षेपेक्षाही कमी कालावधीत तालिबान्यांकडे अफगाणिस्तानातल्या महत्त्वाच्या शहरांचा ताबा आला. त्याच्या राष्ट्रप्रमुखांनी देश सोडला आणि सैन्याने लढण्याचे अवसान. आता आपल्याला या देशात कोणीही वाली उरला नाही, याची खात्री पटल्यावर सर्वसामान्य अफगाणी लोकांनी स्वत:चा जीव वाचवायला काबुल विमातळांवर केलेली अभूतपूर्व गर्दी सगळ्या जगाने पाहिली. देश असूनही अनाथ झालेली माणसे किती केविलवाणी होतात, याचे हे हृदयद्रावक दर्शन होते.
अमेरिकेने अफगाणिस्तान सोडण्यापूर्वी त्यांच्याशी वाटाघाटी करताना तालिबानने मंजूर केलेल्या अटीशर्तींना लगेचच केराची टोपली दाखवली गेली. अर्थात हे तालिबान्यांकडून अपेक्षित असेच होते. आता तर अफगाणिस्तानच्या अनेक देशांशी असलेल्या आयात-निर्यात व्यापारावरही बंदी घातली जाणार आहे. मुस्लीम देश अशी अफगाणिस्तानची ओळख असली, तरी तिथल्या सर्वसामान्य जनतेला कडव्या, धर्मांध तालिबान्यांची सत्ता आपल्या देशात नको आहे, हे वास्तव आहे. विमानतळांवर झालेली सर्वसामान्यांची गर्दी ही तालिबान्यांवरील अविश्वासाचेच द्योतक आहे. याचे कारण पारंपरिक, कडव्या इस्लामपेक्षा अफगाणिस्तानातला इस्लाम वेगळा आहे आणि त्याचे मूळ या देशाच्या जडणघडणीत, त्याच्या पूर्वेतिहासात आहे.
पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या मते या देशाच्या अस्तित्वाला किमान 6000 वर्षांपासूनचा इतिहास आहे. इ.स.पूर्व 2000मध्ये आर्यांची वस्ती असल्याचे, वैदिक वाङ्मयात - ऋग्वेदात या देशाचे उल्लेख आढळतात. त्याचा महाभारत पर्वाशी जवळचा आणि थेट संबंध आहे. बौद्धधर्मीय सम्राट कनिष्काने इथे बौद्ध धर्माचा प्रचार-प्रसार केला. त्याच्या खाणाखुणा या देशाने आताआतापर्यंत जपल्या होत्या. सातव्या शतकापासून अरबांनी इथे स्वार्या करून इस्लामीकरणाची सुरुवात केली, तरी काबुल येथे दहाव्या शतकापर्यंत हिंदू राजे राज्य करीत असल्याचे उल्लेख आढळतात. हिंदू, जैन, बौद्ध, इराणी आणि सूफी मुस्लीम यांच्या शेकडो वर्षांच्या परस्पर साहचर्यातून या देशाची स्वत:ची अशी एक संस्कृती विकसित झाली. आतिथ्यशीलता, कुटुंबव्यवस्थेला समाजात असलेले महत्त्वपूर्ण स्थान, आत्मसन्मानाची प्रखर जाणीव आणि स्वतंत्र राहण्याची आवड ही अफगाण संस्कृतीची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील. विशिष्ट भौगोलिक रचनेमुळे टोळ्यांमध्ये राहणे हे जरी स्वाभाविकपणे झाले असले, तरी त्यात वरील सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब होते.
अफगाणिस्तानातल्या मुस्लीम राज्यकर्त्यांनी हिंदुस्थानची लूट केली असली, तरी सर्वसामान्य अफगाणी माणसाच्या मनात हिंदुस्थानविषयी आत्मीयता आहे, आदर आहे, प्रेम आहे, विश्वास आहे आणि म्हणूनच भारताकडून मदतीची अपेक्षाही. या संदर्भात बोलताना अलीकडेच ज्येष्ठ लेखिका प्रतिभाताई रानडे यांनी त्यांची एक आठवण सांगितली. चार वर्षांच्या अफगाणिस्तानातील मुक्कामानंतर त्या व त्यांचे कुटुंबीय तिथून निघाले, तेव्हा अनेक अफगाणी सहकारी, मदतनीस यांना प्रचंड दु:ख झाले होते. 40 वर्षांपूर्वीही अफगाणिस्तानातील मूलभूत सुविधा उभारणीत भारताचे योगदान होते. ‘तुम्ही गेलात तर आमचं कसं होईल? आम्हांला सोडून तुम्ही जाऊ नका’, अशी विनवणी त्यापैकी अनेकांनी केली होती, त्यामागे हेच कारण होते.
आधी नमूद केल्याप्रमाणे पूर्वापार होत आलेल्या सांस्कृतिक, धार्मिक अभिसरणामुळे अफगाण लोकांचा इस्लाम हा वहाबी, सुन्नी, तालिबानी यांच्या इस्लामहून वेगळा आहे. मूर्तिपूजा इस्लामला निषिद्ध असताना अफगाणी लोक मात्र अनेक पीरांची पूजा करतात, त्यांची चित्रे मशिदीत, घरात लावतात. इस्लामला संगीत मंजूर नाही, तर अफगाण माणूस संगीताचा शौकीन आहे आणि त्याचा उत्तम जाणकारही. भक्तिसंगीतात गुंफलेली अफगाणिस्तानातली सूफी संप्रदायाची परंपराही इस्लामला मान्य नाही. असा इस्लाम धर्म अफगाणी आचरतात, मग ते कोणत्याही टोळीचे वा जमातीचे असले तरी.
हीच ओळख त्यांना देश म्हणून एकत्र आणणारी आणि त्यांच्यातील सामर्थ्याला जाग आणणारी ठरू शकते, जिचे सध्या त्यांना विस्मरण झाले आहे वा त्याआधारे उठून उभे राहण्याची ताकद तरी त्यांनी गमावलेली आहे. साडेतीन लाखाचे अफगाण सैन्य निर्माण करूनही त्यांच्यात देशासाठी लढायची ऊर्मी निर्माण झाली नाही, त्यामागेही हेच कारण असावे.
स्वत:ची वेगळी ओळख असलेला, संस्कृती असलेला हा देश आज अस्तित्वासाठी धडपडतो आहे. गलितगात्र झाला आहे. अफगाणिस्तानने कोणत्याही सामर्थ्यशाली राष्ट्राचे वा धर्मांध तालिबान्यांचे बटिक होऊन राहणे वा पाकिस्तानसारख्या राष्ट्राच्या प्रभावाखाली येणे या दोन्ही शक्यता म्हणजे भारतासाठी आणि जागतिक शांततेसाठीही धोक्याची घंटा आहे. त्यात स्वार्थी, कपटी चीनने तालिबान्यांना समर्थन दिल्याने या सगळ्या घडामोडींचे गांभीर्य जगाच्या संदर्भात कैक पटींनी वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर, दोन वर्षांपूर्वी भारतीय संसदेने याच कालखंडात पारित केलेले कायदे हे आपल्या राजकीय परिपक्वतेचे, दूरदृष्टीचे द्योतक म्हणावे लागतील. आपल्या देशाला त्यायोगे लाभलेले सुरक्षाकवच मोलाचे आहे. मात्र त्याच वेळी ही जागतिक त्सुनामी आहे, हे लक्षात घेत पुढील व्यूहरचना करण्याचे व मुत्सद्दीपणाने ती अन्य राष्ट्रांच्या गळी उतरवण्याचे कामही भारताला करावे लागेल. गलितगात्र झालेल्या एका संस्कृतिसमृद्ध राष्ट्राला पुन्हा उभे करण्याचे काम छत्रपती शिवाजीमहाराजांचा भारतच करू शकतो.
मात्र ही जबाबदारी पार पाडण्यासाठी भारताला आधी आपल्या सामर्थ्यात वाढ करावी लागेल. त्यासाठी नियोजनबद्ध, कालबद्ध प्रयत्न करावे लागतील. एका मुस्लीमधर्मीय राष्ट्राला आपल्याविषयी वाटणारा विश्वास, आदर हे एक प्रकारे आपल्या संस्कृतीला दिलेले प्रशस्तिपत्र आहे. आपण त्याचे मोल ओळखायला हवे.