ही एलिझाबेथ नक्की कोण?

10 Aug 2021 16:38:18
स्पेनच्या फिलिपशी संबंधित लोकांकडून इंग्लंडच्या सिंहासनावर डोळा ठेवला जाण्याचा धोका असल्याने त्या वेळच्या ट्युडर घराण्यातील एकमेव हयात व्यक्ती म्हणून एलिझाबेथलाच उत्तराधिकारी नेमावे लागले. इ.स. 1559 साली एलिझाबेथ प्रथम ही इंग्लंडची राणी म्हणून अभिषिक्त झाली आणि लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पुढील जवळपास 40 वर्षे एलिझाबेथची कारकिर्द इंग्लंडसाठी अत्यंत लाभदायक ठरली.
rani_2  H x W:
मार्क ट्वेनच्या ‘प्रिन्स अँड द पॉपर’ या कादंबरीवर आधारित डिस्नेचा याच नावाचा चित्रपट 1977 साली प्रदर्शित झाला होता. हे कथानक काल्पनिक असले, तरी त्या कथानकातील बरीच पात्रे वास्तवातील आहेत. याचे कथानक इ.स. 16व्या शतकातील चौथ्या दशकातील आहे. इंग्लंडचा ट्युडर राजा आठवा हेन्री व त्याचा अगदी लहान वयातच गादीवर आलेला पुत्र सहावा एडवर्ड ही यातील प्रमुख पात्रे. उत्सुकतेपोटी एक दिवस हा लहान राजपुत्र अगदी त्याच्यासारख्याच दिसणार्‍या एका सामान्य मुलाचा दिनक्रम अनुभवण्याकरिता एका दिवसाकरिता अदलाबदल करतो. सामान्य मुलगा राजप्रासादात आणि हा राजपुत्र लंडनमधील त्याच्या वस्तीमध्ये एकमेकांचे कपडे घालून दिवसाची सुरुवात करतात, पण यातून पुढे बरेच गोंधळ उडतात आणि हा खरा राजपुत्र काही त्या रात्री परत प्रासादात येऊ शकत नाही.

शेवटी आता या तोतया मुलाचा अगदी राज्याभिषेक होण्याची वेळ येते, तरीही खर्‍या राजपुत्रास प्रवेश नाकारला जातो, इथपर्यंत कथानक उत्कंठा ताणून धरते आणि अखेर बर्‍याच युक्त्या लढविल्यानंतर हा बाल राजपुत्र राजा सहावा एडवर्ड म्हणून अभिषिक्त होतो.

सांगायचा हेतू हा की या कथानकात लेडी जेन ग्रे, एलिझाबेथ आणि मेरी या तीन किशोरवयीन मुली एडवर्डच्या बहिणी म्हणून अगदी कमी वेळासाठी, परंतु महत्त्वाची हजेरी लावून जातात. यापैकी मेरी व एलिझाबेथ या एडवर्डच्या सावत्र बहिणी होत्या, तर लेडी जेन ग्रे ही भाची होती. भाची असली, तरी वयाने ती एडवर्डच्याच बरोबरीची होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एडवर्डची अतिशय लाडकी होती. फक्त दहाव्या वर्षी गादीवर आलेला एडवर्ड अल्पायुषी ठरला. 1553 साली वयाच्या पंधराव्या वर्षी त्याचे निधन झाले आणि अर्थात त्याचा स्वत:चा कोणताही वारस नसल्याने पुढील शासक कोण हा प्रश्न निर्माण झाला. एडवर्डने त्याच्या परीने याचे उत्तर देऊन ठेवले होते. आपली लाडकी भाची लेडी जेन हिला त्याने उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते आणि तिचे पुरुष वारस हेच इंग्लंडचे भावी सम्राट असतील, अशी तरतूद करून ठेवली.

याला दोन कारणे होती. लेडी जेनला ह्यूमनिस्ट पद्धतीचे उत्तम शिक्षण लाभलेले होते व ती अतिशय अभ्यासू आणि नम्र होती. त्याचबरोबर ती प्रोटेस्टंटदेखील होती. एडवर्डचे पिताश्री हेन्री आठवे यांनी आठव्यांदा विवाह करण्याकरिता जेव्हा पोप क्लीमंटची मान्यता मिळाली नाही, तेव्हा पोपचे वर्चस्व झुगारून दिल्याची व इंग्लंडकरिता स्वतंत्र प्रोटेस्टंट चर्चची स्थापना केल्याची कहाणी प्रसिद्धच आहे. एडवर्ड अर्थातच प्रोटेस्टंट होता व इंग्लंडमध्ये पुढील शासकदेखील प्रोटेस्टंटच असावेत, अशी तरतूद करून ठेवणे त्यालाही आवश्यक वाटत होते. त्याच्या वडिलांनी जरी वैयाक्तिक्त सोयीकरिता हा पंथ स्वीकारला असला, तरी इंग्लंडचा एकूण विचार करता प्रोटेस्टंट पंथाच्या मागे एक वेगळी किनार होती. या पंथाच्या रूपाने इंग्लंडची जनता स्वत:च्या उपासना पद्धतीमध्ये स्वायत्त झाली होती आणि धार्मिक क्षेत्रात आमूलाग्र बदलाचे वारे वाहू लागले होते. स्वतंत्र इंग्लिश अस्मिता यामुळे आणखी जोर धरणार होती. अगदी लहान वयातही एडवर्डला ही दूरदृष्टी होती आणि म्हणून कॅथोलिक असणार्‍या मेरी व एलिझाबेथ या दोघी सावत्र बहिणी त्याला पुढील शासक म्हणून अयोग्य वाटल्या होत्या. अर्थात नियतीची इच्छा संपूर्णत: वेगळी होती, कारण कॅथोलिक मेरी काही स्वस्थ बसणार्‍यातील नव्हती. प्रोटेस्टंट पंथाला राजमान्यता असली, तरीही बहुतांश जनता अजूनही कॅथोलिक होती. हेन्री व एडवर्ड यांच्या काळात त्यांनी छुपेपणे आपले अस्तित्व टिकवून ठेवले होते. मेरीने याचाही फायदा उठवून बंडाळीचे निशाण उभारले आणि राजदरबारातील वजन वापरून अवघ्या 7-8 दिवसांपूर्वीच राणी झालेल्या लेडी जेनला अटक केली व सिंहासनावर ताबा मिळविला.


कोवळ्या वयात लेडी जेन ग्रे व तिचा उमराव नवरा लॉर्ड डडली यांचा टॅावर ऑफ लंडनमध्ये शिरच्छेद करण्यात आला. इंग्लिश रि-फॉर्मेशन आणि इंग्लिश प्रोटेस्टंट पंथातील पहिले हुतात्मे म्हणून लेडी जेन ग्रे व तिचा नवरा यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. मेरीची कारकिर्द पुढे मात्र काही लोकप्रिय ठरली नाही. त्यातच स्पेनचा शासक दुसरा फिलिपशी तिने विवाह केल्याने इंग्लिश जनतेत रोष पसरला. स्पेन हा इंग्लंडचा नाविक प्रतिस्पर्धी होता. फिलिप हा जरी इंग्लंडचा राजा नसला, तरी त्याचे अपत्य हे आपत्तीच ठरणार होते, कारण ते मूल पुढे जाऊन स्पेन व इंग्लंड या दोन्ही प्रदेशांचा राजा होणार, हा दंडक होता. पण इंग्लंडचे भाग्य बलवत्तर ठरले आणि असा वारस कधी जन्मालाच आला नाही. खरे तर हा देश नक्की कोणत्या मुहूर्तावर जन्माला आलाय, हे एक कोडेच आहे, कारण 12व्या शतकानंतर नशिबानेसुद्धा हटकून इंग्लंडची साथ दिल्याचे असंख्य प्रसंग आपल्याला पदोपदी आढळून येतात. असो! आपल्या लेखाच्या नायिकेकडे वळू या.

तर ही एलिझाबेथ! भावाचीही लाडकी नव्हती व सावत्र बहिणींचीही. मार्गातील काटा इतकेच काय तिच्या मागे चिकटलेले बिरुद. अ‍ॅन बुलीन या आठव्या हेन्रीच्या दुसर्‍या पत्नीची ही मुलगी. विक्षिप्त अशा आठव्या हेन्रीची खप्पा मर्जी झाल्याने टॅावर ऑफ लंडनमध्ये अ‍ॅन बुलीनचा शिरच्छेद करण्यात आला. तेव्हा एलिझाबेथ फक्त अडीच वर्षांची होती. राजकन्या या नात्याने तिचे शिक्षण मात्र रितीरिवाजानुसार व्यवस्थित झाले. तिचा भाऊ सहावा एडवर्ड गेल्यानंतर झालेल्या घडमोडी आपण पाहिल्या. सावत्र बहीण सम्राज्ञी व्हावी अशी मेरीची कधीही इच्छा नव्हती, पण नियतीच्या मनात मात्र पूर्णत: वेगळे होते. खरे तर सावत्र बहीण गादीवर आल्यानंतर एलिझाबेथला 4-5 वर्षे नजरकैदेतच काढावी लागली होती. पण वर म्हटल्याप्रमाणे वारस काही जन्मालाच आला नाही व मेरीचे निधन झाले. पुढे-मागे स्पेनच्या फिलिपशी संबंधित लोकांकडून इंग्लंडच्या सिंहासनावर डोळा ठेवला जाण्याचा धोका असल्याने त्या वेळच्या ट्युडर घराण्यातील एकमेव हयात व्यक्ती म्हणून एलिझाबेथलाच उत्तराधिकारी नेमावे लागले. इ.स. 1559 साली एलिझाबेथ प्रथम ही इंग्लंडची राणी म्हणून अभिषिक्त झाली आणि लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. पुढील जवळपास 40 वर्षे एलिझाबेथची कारकिर्द इंग्लंडसाठी अत्यंत लाभदायक ठरली.
इंग्लंड हा अजूनही नाविक शर्यतीत मागे होता. स्पेन व पोर्तुगाल या त्या वेळच्या सर्वात प्रबळ नाविक सत्ता होत्या. ‘न्यू वर्ल्ड’ म्हणजे उत्तर व दक्षिण अमेरिकन खंड हे याच सागरी सत्तांच्या वर्चस्वाखाली येत होते. अशा वेळी मुसंडी मारण्याकरिता इंग्लंडमध्ये स्थिर आणि मुत्सद्दी शासकाच्या कारकिर्दीची आवश्यकता होती, जी एलिझाबेथने भरून काढली. इ.स.158मध्ये अमेरिकेवरील इंग्लिश नाविक मोहिमेने तेथील इंग्लिश वसाहतीकरणाची नांदी झाली.
युरोपियन ‘रेनिसां’चा प्रवाह इंग्लंडमध्ये झिरपू लागला, तोदेखील प्रामुख्याने एलिझाबेथच्याच राजवटीत. 1585पासून इंग्लिश नेव्ही व स्पॅनिश आर्माडा यांच्यामध्ये संघर्ष सुरू झाले. इ.स. 1588ला इंग्लिश नेव्हीने इंग्लंडच्या खाडीत स्पॅनिश आर्माडाचा मोठा पराभव केला आणि स्पॅनिश सागरी वर्चस्वाला ग्रहण लागण्याची चिन्हे दिसू लागली. याच आत्मविश्वासातून पुढे इ.स. 1600 साली राणी एलिझाबेथच्या अनुमोदनातून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली.
 
एलिझाबेथ आजन्म अविवाहित राहिली, पण धूर्तपणे गरज पडेल तिथे स्पेनच्या अथवा फ्रान्सच्या प्रबळ युरोपीय राजांना विवाहाचा प्रस्ताव देण्याचे पत्ते टाकून या राणीने जोखमीचे संघर्ष टाळलेले अथवा पुढे ढकललेले आढळून येतात.


rani_1  H x W:
तिच्यानंतर इ.स.1603 साली सहाव्या जेम्स या स्कॉट राजाकडे इंग्लंडचे सिंहासन हस्तांतरित झाले आणि ट्युडर कालखंड संपुष्टात आला. स्कॉटलंडचा सहावा जेम्स इंग्लंडचा पहिला जेम्स म्हणून अभिषिक्त झाला. या पहिल्या जेम्सने स्वत:ची राजमुद्रा फार कल्पकतेने बनविली. अर्ध्या भागात ट्युडर शाखेचे प्रतीक असलेला गुलाब व अर्ध्या भागात काटेरी असे थिसल अशी त्याची राजमुद्रा प्रसिद्ध आहे. या शांततापूर्वक स्थित्यंतरास ‘युनियन ऑफ क्राउन्स’ असे म्हणले जाते.
इथपासून पुढे इंग्लंडच्या वसाहतीकरणाच्या इतिहासाला प्रारंभ होतो. त्यासाठी आजही राजनिष्ठ ब्रिटिश प्रजाजन एलिझाबेथचे खास ऋण मान्य करतो, हे मात्र नक्की!
Powered By Sangraha 9.0