@ओंकार कोकणे
आरोग्यदायक आणि पौष्टिक अशा रानभाज्यांची चर्चा आता सर्व ठिकाणी डोळसपणे होताना दिसत आहे. सामान्यतः शहरी भागात रानभाज्यांकडे बघून नाक मुरडले जात असे. पण त्याचे आरोग्यदृष्ट्या महत्त्व लक्षात घेता, औषध म्हणून का होईना, वर्षातून या रानभाज्या खाण्याकडे कल दिसत आहे.
महाराष्ट्रात जवळपास सर्व ठिकाणी रानभाज्या आढळून येतात. पाऊस सुरू झाला की साधारण पंधरा दिवसांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात रानभाज्या दिसू लागतात, त्या सप्टेंबर- ऑक्टोबरपर्यंत.
1. आघाडा
गणपतीला वाहतो तो हाच आघाडा. खूप आरोग्यदायक असतो. पोटाच्या विकारांसाठी भलताच लाभदायक (त्याचे महत्त्व सांगणारे बरेच व्हिडिओज यूट्यूबवर मिळतील.) याची भाजी कुणी केल्याचे फारसे तुमच्या ऐकिवातही नसावे बहुधा. आघाड्याची कोवळी पाने आणि बियाही वापरून ही भाजी करू शकता.
भाजीची कृती - तव्यावर किंवा कढईत अगदी थोडेसे तेल घेऊन त्यात अगदी थोडेसे जिरे तडतडून ठेचलेले लसूण घालून त्यावर आघाड्याची पाने चिरून, बिया स्वच्छ धुऊन घालाव्यात. चटणी हवी असेल तर थोडे जास्त मीठ घाला. दाण्याच्या कुटानेही छान चव येते. थोडेसे परतून झाले की डाळीचे पीठ भुरभुरावे, त्या वेळी भाजी सतत परतत राहावी. त्याने भाजी मोकळी राहते. लागेल तसे थोडेथोडे पाणी शिंपडून परतले की ही भाजी तयार होते.
पांढरा कुडा किंवा ‘इंद्रजव’ किंवा ‘कुटज’ (इंग्लिश - Holarrhena pubescens)
मूळव्याध, रक्तस्राव, अतिसार, आमांश, अग्निमांद्य या विकारांवरील आयुर्वेदिक औषधीमध्ये कुड्याचा वापर होतो. 10 ते 15 फूट उंच वाढणार्या या झाडाच्या प्रत्येक फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेल्या पांढर्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात. या फुलांची भाजी करतात. या झाडाला लांबट शेंगा जोडीजोडीने येतात. कुड्याच्या सालीचा त्वचाविकारातही उपयोग होतो. कुटजारिष्ट हे प्रसिद्ध औषध कुटाच्या सालींपासून बनते.
कुड्याच्या झाडांच्या शेंड्यांना पांढरी फुले येतात, ती घेऊन निवडून एकदा पाण्यातून उकळून घेऊन पाणी ओतून द्यावे. त्यामुळे भाजीचा कडवटपणा कमी होतो. तसेच रानात फिरणार्या जनावरांमुळे बॅक्टेरिया वगैरे असू शकतात, त्यासाठी पाण्यात उकळणे उत्तम.
आंबुशी या वनस्पतीला ‘आंबुटी’, ‘आंबोती’, ‘चांगेरी’ अशीही स्थानिक नावे आहेत. आंबुशीला इंग्लिशमध्ये इंडियन सॉरेल असे म्हणतात. हे प्रामुख्याने ओलसर जागी, तसेच कुंड्यांतून वाढणारे तण आहे. हे तण महाराष्ट्रात सर्वत्र आढळते. ही वर्षायू वनस्पती जमिनीवर पसरत वाढते.
आंबुशी गुणाने रूक्ष व उष्ण आहे. ही वनस्पती पचनास हलकी असून चांगली भूकवर्धक आहे. ही रोचक, दीपन, पित्तशामक, दाहप्रशमन, रक्तसंग्राहक, शोथघ्न आहे. आंबुशीच्या अंगरसाने धमन्यांचे संकोचन होऊन रक्तस्राव बंद होतो. कफ, वात आणि मूळव्याध यात आंबुशी गुणकारी आहे. ही वनस्पती आमांश, अतिसार, त्वचारोग आणि चौघारे तापात उपयुक्त आहे. घृत गुदभ्रंशात, योनिभ्रंशात उपयोगी.
पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला आंबुशी ही नाजूक वनस्पती आपल्याला अगदी हमखास उगवलेली पाहावयास मिळते. आंबट चवीमुळेच जेवणाची रुची वाढविण्यास या भाजीचा उपयोग होतो. आहारकल्प म्हणून या भाजीचा वापर करतात.
शरीरातील कफ व वातदोष वाढले असल्यास आंबुशीच्या भाजीचा आहारात समावेश करावा.
4. पाथरी
पाथरी कडू, शीतल, स्नेहन, ग्राही व स्तन्यजनन गुणांची आहे.
संपूर्ण वनस्पती (पंचांग) औषधात वापरतात.
पाथरीचा अंगरस ज्येष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंतिणीचे दूध वाढते. हे चाटण सुक्या खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांना पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते.

पाथरीची भाजी - पाथरीच्या पानांची भाजी करतात. पाथरीची भाजीही औषधी गुणधर्माची आहे. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचारोगात होतो. याने पचन सुधारते, म्हणून पाथरीची भाजी कुपचनात देतात. कावीळ व यकृत विकारात ही भाजी फार हितावह आहे. या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते. ही भाजी थंड पण थोडी कडवट आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.
पाककृती
1. पाथरीची सुकी भाजी
साहित्य - पाथरीची पाने, कांदा, लसूण, तिखट, मीठ, तेल, शेंगदाणा कूट, डाळीचे पीठ इ.
कृती - पाथरीची पाने स्वच्छ धुऊन चिरून घ्यावीत. पातेल्यात पाणी घेऊन त्यात पाने उकडावीत. पाणी गार झाल्यानंतर पाने पिळून घ्यावीत व पाणी टाकून द्यावे. तेलात कांदा परतून घ्यावा, नंतर त्यात वाटलेले लसूण, तिखट, दाण्याचे कूट व भाजी घालावी. चांगले परतून घ्यावे. नंतर गरजेपुरते मीठ घालावे.

5. शेवगा
सर्वत्र मुबलक आढळणारी ही भाजी खूपच आरोग्यदायक आहे. याच्या शेंगांची, तसेच कोवळ्या पानांचीही भाजी केली जाते. आपण जशी मेथीची भाजी करतो, अगदी त्याचप्रमाणे याचीही भाजी बनवता येते. दुधाच्या 4 पट, मटणाच्या 800 पट कॅल्शियम असलेली, तुरट असूनही चवीचा बादशहा, अनेक विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी पोषक अशी शेवग्याच्या पानांची भाजी असते. रक्तदाब नियंत्रित करणारी, आतड्यांचे व्रण-जखमा बरी करणारी, पित्त नियंत्रित करणारी शेवग्याच्या पानांची भाजी ही सहज उपलब्ध होत असलेली रानभाजी आहे. बाळाच्या पाचवीला ही भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवितात. तो नैवेद्य बाळाच्या आईला खाण्यास देतात.

बांबूचे कोवळे कोंब घेऊन त्याच्या वरचे साल किंवा पापुद्रा काढून आतील गर काढून घ्यावा. काढलेला गर पाण्यातून चांगला उकळून नंतर वाहत्या पाण्याखाली दोन-तीन वेळा धुऊन त्याचा कीस करावा. कढईत तेल गरम करून जिरे-कांदा-हळद फोडणी टाकून त्यामध्ये तो गर टाकावा, नंतर टमाटा, चवीनुसार तिखट-मीठ घालून थोडा वेळ शिजू दिला की तयार होते बांबू गराची भाजी. भज्यांच्या मिश्रणात याच किसाचा वापर करून याची भजीही करता येतात.
7. कुरडू
कुरडूची पाने खुडून, धुऊन (तीन ते चार वेळा पाण्यात धुवावीत), 2 कांदे बारीक चिरून, 4-5 लसूण पाकळ्या ठेचून, 2-3 मिरच्या चिरून, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 टमाटा बारीक चिरून, पाव वाटी ओले खोबरे, चवीपुरते मीठ, अर्धा चमचा साखर,
2 चमचे तेल
भांड्यात तेल गरम करून लसूण, मिरची फोडणीला टाकावी. मग हिंग, हळद, कांदा घालून जरा परतवावे. आता लगेच टमाटा आणि कुरडूची चिरलेली भाजी टाकावी. मग झाकण ठेवून जरा शिजू द्यावे. थोड्या वेळाने ढवळून त्यात मीठ, साखर घालावी. परत ढवळून 3-4 मिनिटांनी ओले खोबरे घालून गॅस बंद करावा.
ही भाजी डोंगरात मिळते. चव साधारण माठाच्या भाजीप्रमाणेच असते. ह्यात चणा डाळ, मूग डाळ घालूनही ही भाजी करता येते. टमाट्याऐवजी अर्धे लिंबूही चालेल.
9545357985