मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणार्या सिंधुताई ‘अनाथांच्या माई’ आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे.
सिंधुताई सपकाळ हे नाव आज प्रत्येक मराठी मनावर रुंजी घालणारे आहे. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या सिंधुताई सपकाळ आज हजारो अनाथ मुलांची माई म्हणून आपल्याला दिसतात. त्यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला आदर आहे आणि तो आदर त्यांच्याभोवती कायमच सकारात्मक वलय निर्माण करणारा आहे. सर्वसामान्य गृहिणी, पुढे अनाथांची माई आणि आता पद्मश्री या नव्या बिरुदावलीने त्या ओळखल्या जातील. पण त्यांचा प्रवासही शून्यातून विश्वनिर्मितीचा आहे. या वर्षी पद्मश्री पुरस्काराने त्या अलंकृत झाल्या आहेत. खरे तर ही बातमी ऐकली आणि मनस्वी आनंद झाला, कारण आता ‘पद्मश्री सिंधुताई सपकाळ’ ही नवी ओळख अनेकांना प्रेरणा देणारी आणि मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरणार आहे. आम्हा वैदर्भीय मातीची ही लेक अनेकांची माई आहे. संघर्ष आणि त्यातून स्वत: मार्ग काढत ही स्वयंसिद्धा प्रत्यक्ष कृतीतून समाजात स्त्रीत्वाचे आदर्श निर्माण करणारी आहे.
‘रेल्वेत भीक मागणारी बाई आणि रात्री भीक मागणार्यांना जेवू घालणारी बाई’ एवढीच सिंधुताईंची एक ओळख होती. त्यांनी गाणे म्हटले की त्यांना खायला मिळायचे. रात्रीची खूप भीती वाटायची. त्यामुळे जेवून झाल्यावर सर्व भिकारी झोपून जायचे आणि त्या स्मशानात जायच्या; कारण त्यांना एक माहीत होते की भुताच्या भीतीने स्मशानात कोणी येत नाही आणि त्यामुळे स्मशानात अंधार, ओरडणारे पक्षी, गाडलेले प्रेत आणि जळणार्या प्रेतावर भाकरी भाजणारी अशा सिंधुताई सपकाळ होत्या. त्यांच्याबद्दल वाचताना, प्रसंगी बघताना त्या कल्पनेने अंगावर काटा येतो.
आपल्या आत्मचरित्रात ‘मी वनवासी’मध्ये त्या लिहितात - ‘तेव्हा मी जगले तेव्हा समजलं की अनुभव हाच जगण्याची खात्री आहे. ही वेळ इतर कोणत्याही बाईवर येऊ नये एवढंच वाटतं. मी निर्धार केला आणि शपथ घेतली आणि पुढे अनाथांची माय झाले.’ असे अनेक प्रसंग आणि अंगावर काटा आणणारा प्रवास त्यांनी आत्मचरित्रातून उलगडला आहे.
मानवतेची केवळ भाषा न करता, ती कृतीतून साकारणार्या सिंधुताई ‘अनाथांच्या माई’ आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत, आयुष्याला दोष न देता, त्यावर मात करीत सिंधुताईंनी उभे केलेले काम प्रशंसनीय आणि वंदनीय आहे. त्यांची कहाणी महाराष्ट्राला काही नवीन नाही. खुद्द त्यांच्या भाषणांतून, त्यांच्यावरील लेखनांतून आणि चित्रपटातून ते सर्वांसमोर आहेच. आज पद्मश्री बहाल करत केंद्र सरकारने त्यांची दखलच घेतली आहे आणि जगाला त्यांच्या कार्याची ओळख करून दिली आहे.
सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय असली, तरी प्रेरक आहे. कोवळ्या वयातील विवाह, त्यानंतर मुलांचा जन्म, मुलांना वाढवितानाच करावे लागणारे काबाडकष्ट, घरात आणि दारात होणारी उपेक्षा.. विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे जन्मलेल्या सिंधुताईंची कथा याहून वेगळी नाही; परंतु त्यांनी अन्यायाला वाचा फोडली. शेण काढणार्या महिलांना मजुरी मिळत नसल्याबद्दल त्यांनी आवाज उठविला; परंतु त्याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांचे चारित्र्य मलीन करणारे आरोप झाले, सासरच्यांनीही साथ सोडली अन तिथून सुरू झाला सिंधुताईंचा संघर्ष. हा संघर्ष म्हणावा तसा सोपा नव्हताच. पण इतका संघर्ष करून आज त्या हिमालयाच्या सावलीसारख्या आहेत. त्यांनी जगावेगळा प्रपंच सुरू केला आणि आज सिंधुताईंसारखी विदर्भकन्या, अनाथांची माय झाली आहे. माईंनी अनेक अनाथ मुलांना वाढविले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. ‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे.. घेता घेता देणार्याचे हात घ्यावे!’
समाजासाठी जीवन अर्पित करणारी आधुनिक समाजसेविका म्हणजे सिंधुताई सपकाळ ह्यांना परमेश्वराने निरामय आरोग्य प्रदान करावे, हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे. वयाच्या या टप्प्यावर असताना आजही माईंचा अखंड प्रवास सुरू आहे. सिंधुताई सपकाळ कायम म्हणतात..
दूध में पकाये चावल तो उसे खीर कहते है।
मोहब्बत मे खाये ठोकर तो उसे तकदीर कहते है॥
लकीर की फकीर हू मै, उसका कोई गम नही।
नही धन तो क्या हुवा, इज्जत तो मेरी कम नही॥