भाग 2
‘रशिया, नॉट ट्रूली एशिया’ लेखाच्या पहिल्या भागात आपण पाहिले की व्हायकिंग राजा रूरिकनंतर त्याचा विश्वासू सेनानी ओलेग याच्यावर रूरिकच्या अल्पवयीन पुत्राची - आयगोरची जबाबदारी सोपविण्यात आली. ओलेगने अतिशय निष्ठेने या राजपुत्राला सक्षम केले. इ.स. 907मध्ये आयगोरला सर्व रूस लोकांचा राजा म्हणून घोषित करण्यात आले. आयगोरच्या पश्चात त्याची विधवा राणी ‘ओल्गा’ ही रूस लोकांची राणी झाली. ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतलेली ती पहिली रशियन राणी. तिचा नातू, सम्राट व्लादिमिर पराक्रमी निपजला. या प्रसंगाने रशियाच्या धार्मिक इतिहासाला कशी काय कलाटणी मिळाली, याबद्दलची सुरस कथा आपण या लेखात उलगडणार आहोत.
ज्युइश धर्ममताबद्दल ऐकून घेतल्यावर व्लादिमिरच्या भुवया उंचावल्या. “ज्यांची स्वत:ची भूमीच पारतंत्र्यात असल्याने जे इतरत्र विखुरले गेले आहेत, ज्यांचा देवच त्याच्या अनुयायांवर अप्रसन्न आहे असा धर्मपंथ मी माझ्या राज्यासाठी स्वीकारू?” व्लादिमिरने ज्युइश उपदेशकांना पहिल्या फेरीतच निरुत्तर केले.
याच वेळी एकीकडे विविध ठिकाणी पाठविलेली व्लादिमिरची पथके तिथली निरीक्षणे व वर्णने पाठवीतच होती. असेच एक पथक जाऊन आले होते बायझेंटाइन साम्राज्याची राजधानी कॉन्स्टन्टाइनोपोलिस येथे. इथली भारदस्त चर्चेस, त्यांमधून होणार्या प्रार्थना, अजस्र घंटांचा नाद आणि एकंदरीतच भारावून टाकणारे वातावरण या सर्वांमुळे या पथकातील सदस्य मंत्रमुग्ध झाले. अनेकांना तिथे परमपित्याचा वास असल्याची अनुभूतीदेखील आली. आत्यंतिक प्रभावित होऊन या बायझेंटिनियन ख्रिस्ती धर्मपंथाची विस्मयाने ओथंबलेली वर्णने या सदस्यांनी व्लादिमिरसमोर कथन केली.
व्लादिमिरची आजी सम्राज्ञी ओल्गा हीदेखील याच प्रकारे प्रभावित होऊन ख्रिस्ती धर्ममताकडे आकर्षित झाल्याची पार्श्वभूमी होतीच. या वर्णनांमुळे व्लादिमिरचे कुतूहल जागृत झाले. विविध स्रोतांमार्फत खुंटा बळकट करून घेतल्यावर या उपासना पंथाचा आणि आपल्या भविष्यातील राजकीय व सामरिक आडाख्यांचाही मेळ बसतोय, याची त्याला खात्री पटली आणि अशा प्रकारे इ.स. 988मध्ये ‘केर्सोनिसॉस’ या ऐतिहासिक नगरामध्ये व्लादिमिरने बायझेंटिनियन ख्रिस्ती पंथाची दीक्षा घेतली. ख्रिस्ती धर्ममताला राजाश्रय मिळाला आणि ‘कियेव्हान रूस’मधील सर्व नगरांमध्ये ख्रिस्ती धर्ममताचा झपाट्याने प्रसार सुरू झाला. या कारणामुळे बायझेंटिनियन अथवा ईस्टर्न ऑर्थोडॉक्स पंथ व्लादिमिरचा आजतागायत ऋणी आहे. या चर्चेसनी धर्मप्रसार कार्यात मोलाचे योगदान देणार्या या राजाला ‘सेंट’चा दर्जा दिला आहे.
व्लादिमीरनंतर विविध ‘रूरीकिड’ राजांच्या अखत्यारीत कियेव्हान रूसची भरभराट झाली. परंतु इ.स. 1236 साली कियेव्हान रूसवर मंगोल टोळ्यांचे भयंकर आक्रमण झाले. मंगोल नेता बटू खान (गेंगीझ खानचा नातू) व सुबुताई (गेंगीझ खानचा जवळचा सेनापती) यांनी इ.स. 1240च्या आसपास कियेव्ह बेचिराख केले आणि ‘ब्लू हॉर्ड’ नावाने प्रसिद्ध अशा साम्राज्याचा पाया रचला. ‘ब्लू हॉर्ड’ साम्राज्याच्या शासकांनी पुढील 250 वर्षे या प्रदेशात स्वत:चे वर्चस्व राखले. रूरीकिड राजांचा अंमल लयास गेला आणि त्यांची सरंजामशाही व उमराव विखुरले गेले. मात्र याच रूरीकिड वंशशाखेत जन्मास आलेल्या ‘आयव्हन द फोर्थ’च्या कारकिर्दीत रशियाच्या इतिहासाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली.
इ.स. 1547 साली रूसचा ग्रँड प्रिन्स म्हणून गादीवर आलेल्या आयव्हन द फोर्थने खिळखिळ्या झालेल्या मंगोल तसेच मध्य आशियाई शासकांच्या राज्यांच्या मुळांवर एकामागोमाग एक घाव घालण्यास प्रारंभ केला आणि झंझावाती मोहिमा काढून रशियन साम्राज्यविस्ताराला प्रारंभ केला. या राजाला म्हणूनच पहिला रशियन झार म्हणून संबोधले जाते.
अगदी 1550पर्यंत युरोपीय वंशाच्या रशियन उमरावांची प्रभावक्षेत्रे ही आज युरोपमध्ये रशियाचा जेवढा भाग आहे तेवढ्यापर्यंतच मर्यादित होती. पण पुढील केवळ 150-200 वर्षांत आधीच्या आकाराच्या किमान तीन पट मोठा भूभाग आधी आयव्हन आणि मग झेम्स्की सोबोर (आयव्हननंतर साधारण 120 वर्षे रशियाचे सत्ताकारण सांभाळणारी वैशिष्ट्यपूर्ण पार्लमेंट)ने पूर्व दिग्विजय करून जिंकून घेतला. पुढे झेम्स्की सोबोरचा प्रभाव ओसरला व 17व्या शतकाच्या प्रारंभी रशियात पुन्हा राजेशाहीने जोर धरला. याच रोमानोव्ह राजघराण्यातील जगप्रसिद्ध झार पीटर द ग्रेट (इ.स. 1682-1721)च्या कारकिर्दीत आशिया खंडात आज रशियाचा जेवढा भाग आहे, तो सर्वच्या सर्व भाग रशियन साम्राज्यात समाविष्ट झाला. 1917च्या रशियन राज्यक्रांतीत ज्या राजघराण्याचे समूळ उच्चाटन केले गेले, ते 300 वर्षांपासून चालत आलेले हेच ते रोमानोव्ह राजघराणे.
तर असा आहे रशियन इतिहासाचा धावता आढावा. आशिया खंडाचा 38% भूभाग व्यापून असलेल्या रशियाची सर्वच्या सर्व सांस्कृतिक मुळे ‘कियेव्हान रूस’शीच जोडली गेली आहेत. रशियन ही ओळखदेखील त्यांना मिळाली, ती व्हायकिंग तसेच स्लाव्ह या युरोपीय वंशसमूहांच्या मिश्रणातूनच. मंगोलियन टोळ्यांचे आक्रमण म्हणजे एका अर्थाने आशियाई टोळ्यांचे आक्रमण हे रशियावरील परकीय आक्रमण म्हणूनच गणले गेले. या आक्रमकांचा बीमोड करीत करीत मध्यपूर्व तसेच सबंध उत्तर आशियावर रशियन साम्राज्य विस्तार पावले. या प्रकारे अस्तित्वात आलेला भूभाग म्हणजेच रशियाव्याप्त आशिया!
भारत आणि रशिया हे सर्वस्वी भिन्न संस्कृती व परंपरा लाभलेले दोन देश आहेत. या दोन देशांच्या मैत्रीचा अध्याय केवळ 7 दशकांचा असला, तरी जागतिक स्तरावरील घडामोडींवर प्रभाव पाडणारा आहे. अशा या रशियन इतिहासाचे आणखी खोलवर अवलोकन अवश्य करावे. ‘रशिया, नॉट ट्रूली एशिया’ असे असले, तरी एशियन सत्ताकारणाच्या गणितात रशियाला बगल देऊन काही करता येणार नाही, हेही तितकेच खरे!