पुनरुज्जीवन निसर्गाचे

02 Jun 2021 19:43:19

केतकी घाटे आणि मानसी करंदीकर याऑयकॉस’ (Oikos) या पर्यावरणीय सेवा देणार्या कंपनीच्या संस्थापक-संचालक आहेत. पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटीमध्ये त्या अध्यापनकार्यही करतात. खासगी जमिनींवर निसर्गपुनरुज्जीवन करणं हा यांच्या कामाचा मुख्य भाग आहे. जाणून घेऊ या त्यांच्या कार्याबद्दल...


environment_1  

आज पर्यावरणरक्षणाचं काम हे बहुतांशीसामाजिक कार्यया स्वरूपात केलं जातं. पण तुम्ही हा व्यवसाय म्हणून करता. आपल्या व्यवसायाचं स्वरूप नेमकं कसं आहे?

ऑयकॉसही पर्यावरणीय सेवा देणारी आमची कंपनी आम्ही 2002 साली सुरू केली. निसर्गपुनरुज्जीवन (Eco-restoration), पर्यावरणपूरक बागा तयार करणं (Eco-landscaping), स्थानिक झाडांचा अवलंब करून वृक्षलागवडीची योजना तयार करून देणं, अशा सेवा आम्ही देतो. हल्ली शहरातल्या लोकांनी खेडेगावांमध्ये जमीन घेऊन तिथे फार्महाउस बांधणं, बागा करणं हे खूप वाढलं आहे. पण हे करताना त्या परिसरातल्या निसर्गाचा विचार फारसा होत नाही. आपल्या जमिनीवर निसर्ग फुलवण्याची इच्छा बर्याच जणांना असते, पण नेमकं काय करायचं ते माहीत नसतं. अशा लोकांना निसर्गपुनरुज्जीवनाची सेवा अथवा त्यासंबंधी योग्य सल्ला देण्याचं काम आम्ही करतो. आम्हाला निसर्गासाठी पूर्णवेळ काम करायची इच्छा होती. पण उत्पन्नाचं साधन म्हणून काहीतरी वेगळं करायचं आणि उरलेल्या वेळात पर्यावरणासाठी काम करायचं, यापेक्षा दोन्ही गोष्टी एकाच वेळी साध्य होऊ शकतात का, हा विचार करून आम्ही ही कंपनी सुरू केली. शिवाय निसर्गसंवर्धनाच्या कामाला व्यावसायिक स्वरूप दिलं, तर ते काम अधिक जबाबदारीच्या भावनेने केलं जाईल, हाही हेतू कंपनी सुरू करण्यामागे होता.


environment_4  

झाडं लावणंआणिनिसर्गपुनरुज्जीवन करणंया दोघांमध्ये नेमका काय फरक आहे?

वृक्षलागवडीने नुसती झाडं वाढलेली आणि हिरवळ तयार झालेली दिसेल, पण जीवविविधता नाही जोपासली जाणार. निसर्गपुनरुज्जीवन ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे. जिथे निसर्गपुनरुज्जीवन करायचं आहे, तिथली जमीन, हवामान, आजूबाजूचा परिसर, तिथली शिखर परिसंस्था या सगळ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणं हा निसर्गपुनरुज्जीवन प्रक्रियेचा पहिला टप्पा आहे. मग तिथे जैविक कुंपण घालायचं, बायोमास जमिनीवर पसरायचं, जमिनीतला ओलावा वाढवायचा आणि एकंदरच जमिनीची गुणवत्ता सुधारायची हा पुढचा टप्पा. त्यानंतर आपोआप तिथे गवत उगवू लागतं. मग क्रमाक्रमाने वेली, छोटी छोटी झुडपं तिथे वाढायला लागतात. कीटक, किडे, अळ्या, फूलपाखरं, पक्षी, सरपटणारे प्राणी तिथे हळूहळू येऊ लागतात. त्यांच्याद्वारे होणार्या बीजप्रसारामुळे मोठ्या झाडांची रोपटीही तिथे उगवतात आणि वाढू लागतात. हे सगळं झाल्यानंतर मग जरूर असेल, तर आपण तिथे काही देशी झाडं लावू शकतो. अशी ही निसर्गपुनरुज्जीवनाची टप्प्याटप्प्याने होणारी दीर्घकालीन प्रक्रिया आहे. नैसर्गिक निवडीला (Natural Selectionला) प्राधान्य देऊन केलं गेलेलं निसर्गपुनरुज्जीवन हे शाश्वत असतं, जे नुसती झाडं लावून होत नाही. परिसंस्थेतले सर्व स्तर निसर्गपुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत तयार होतात. वृक्षलागवड चांगलीच, फक्त ती शास्त्रीय पद्धतीने आणि आधीचे टप्पे पूर्ण केल्यानंतरच व्हायला हवी.

आपल्या या सेवेला लोकांकडून कशी मागणी आहे? आत्तापर्यंत आपण केलेल्या निसर्गपुनरुज्जीवनाच्या प्रकल्पांची कुठली ठळक उदाहरणं सांगता येतील?

सुरुवातीला आम्हाला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. कंपनी स्थापन केल्यावर आम्ही काही प्रदर्शनांमध्ये सहभाग घेऊन लोकांना आमची कल्पना पटवून देण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद कमी होता, पण 2006-07नंतर अनेक कामं आम्हाला मिळायला लागली. 2006 साली वनकुसवडे या गावी 24 एकर जागेवर सुरू केलेला निसर्गपुनरुज्जीवनाचा प्रकल्प हे आमच्या एका यशस्वी प्रकल्पाचं उदाहरण म्हणून सांगता येईल. वर उल्लेख केलेली निसर्गपुनरुज्जीवनाची प्रक्रिया इथे गेल्या 15 वर्षांत चांगल्यापैकी सुरू झाली आहे. ‘बायफसंस्थेबरोबर आम्ही देवरायांच्या संवर्धनाचा प्रकल्प केला. जव्हार आणि जुन्नर इथल्या दोन देवरायांचं जतन करण्यासाठी स्थानिक लोकांना तांत्रिक मार्गदर्शन करणं आणि प्रोत्साहित करणं असा त्या प्रकल्पाचा भाग होता. पुण्याच्या जवळ भूगावला आम्ही एक एकराची काही पर्यावरणपूरक फार्महाउसेस तयार केली आहेत, जिथे जंगलनिर्मिती हे अंतिम उद्दिष्ट नसलं, तरी बागांना पर्यावरणपूरक स्वरूप दिलंय. यवतमाळला आम्ही एकॅग्रो-इको रिसर्च सेंटरतयार करत आहोत. इथे 100 एकर जागेवर शेती, जंगल, तळी, चराईची जागा याची योजना तयार करण्याचं काम सुरू आहे. पानशेतजवळ शिरकोली या गावी आम्ही 60 एकर जमिनीवर एक खासगी अभयारण्य उभारण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. अशा प्रकारे आमच्या कंपनीची वाटचाल सुरू आहे.


environment_2   

पुनरुज्जीवन विषयातील संशोधन पुढे नेण्यासाठी आम्हीअधिवास फाउंडेशनही संस्था स्थापन केली आहे. त्या संस्थेमार्फत सह्याद्रीत फील्ड स्टेशन उभारून तरुण संशोधक आणि हौशी निसर्गप्रेमींना निसर्गसंवर्धनात सहभागी करून घेण्याचा मानस आहे.

ज्या ठिकाणी आपण पुनरुज्जीवनाचे प्रकल्प करता, त्या ठिकाणच्या स्थानिक लोकांच्या परंपरागत ज्ञानाचा आपल्याला काही उपयोग होतो का? कसा?

पारंपरिक ज्ञानाचं महत्त्व तर खूपच आहे. स्थानिक लोकांनी वर्षानुवर्षांच्या अनुभवातून खूप ज्ञान कमावलेलं असतं आणि त्यांच्यात काही गोष्टी करण्याची कलाही असते. उदा., भातखाचरांमध्ये जी ताल (दगडी भिंत) बांधलेली असते, ती इतकी पक्की असते की, सिमेंटची भिंत फार फार तर वीस-एक वर्षं टिकेल, पण या ताली पिढ्यानपिढ्या टिकतात. म्हणजेच स्थानिक लोकांकडे बांधकामाविषयीचं आणि इतर अनेक बाबतीतलं शहाणपण असतं, जे निसर्गसंवर्धनाला पूरक ठरतं. आम्हीसुद्धा कुठलाही प्रकल्प करताना कुंपण, बंधारा . गोष्टी स्थानिक लोकांशी बोलून त्यांच्याकडूनच त्यांच्या पद्धतीने करून घेतो. त्यामुळे त्या पक्क्या होतात. आज जशी जीवनशैली बदलते आहे, तसतसं हे ज्ञान मागे पडत चाललंय. म्हणून त्याचं संकलन होण्याची गरज आहे. मध्यंतरी आम्हीवारसानावाचा ग्रामीण जीवनशैलीचं दर्शन घडवणारा एक माहितीपट बनवला होता. त्याच नावाने आम्ही एक पुस्तक लिहीत आहोत, ज्यात पारंपरिक गोष्टींचं संकलन केलं आहे. एक माहितीपट बनवला आहे. त्याच नावाचं एक पुस्तकदेखील नव्याने प्रकाशित करण्याचा मानस आहे.


environment_3   

झाडं लावताना स्थानिक झाडांची निवडच का करावी? विदेशी झाडं का लावू नयेत? त्याचं शास्त्रीय कारण जाणून घ्यायला आवडेल.

त्याची दोन-तीन मुख्य कारणं आहेत. भारतात गेल्या काही दशकांमध्ये जे वनीकरण केलं गेलं, त्यात निलगिरी, सुबाभूळ, आकेशिया, सुरू, गिरीपुष्प अशा ठरावीक विदेशी वृक्षांचीच मोठ्या प्रमाणावर लागवड झाली. ही झाडं स्थानिक नसल्यामुळे निसर्गचक्राचा भाग होत नाहीत. उदा. आकेशियाची वा सुरूची पानं जमिनीवर पडली, तर ती कुजवणारे जीवाणूच आपल्या जमिनीत नाहीयेत. त्यामुळे ती वर्षानुवर्षं तशीच पडून राहतात. सुबाभळीसारख्या वनस्पती अतोनात पसरतात आणि बाकी कशाला वाढू देत नाहीत. विदेशी वनस्पती इथल्या सृष्टिचक्राचा भाग नसल्यामुळे आक्रमक (invasive) होण्याचा धोका असतो. पण असे धोके आपण पत्करायचेच कशाला? भारतात सुमारे साडेअठरा हजार इतक्या फुलणार्या देशी वनस्पती आहेत. स्थानिक जातींची निवड केली तर परिसंस्था अधिकाधिक भक्कम होईल. त्यामुळे, जे झालं ते झालं, पण यापुढे वृक्षलागवड करताना स्थानिक जातीच लावायच्या यासाठी आपल्याला आग्रही राहावं लागेल. आता, स्थानिक म्हणजे केवळस्वदेशीनव्हे. कोकणातलं झाड हे विदर्भात अस्थानिकच आहे. त्यामुळे त्या त्या जैवभौगोलिक प्रदेशानुसार प्रजातींची निवड लागवडीसाठी केली जायला हवी. बरोबरीनेअधिवास जपणार्या लागवडीव्हायला हव्यात. त्यात स्थानिक वन्यजीवांसाठी खाद्य वनस्पती, कीटक फूलपाखरे आकर्षित करणारी झाडे लावण्यावर भर असावा.

निसर्गपुनरुज्जीवन हा भारतात सगळीकडे एक रोजगारक्षम व्यवसाय होऊ शकतो का? आपल्याला काय वाटतं?

आपल्याकडे सुमारे 27-28 टक्के जमीन पडीक आहे. तिच्यावर निसर्गपुनरुज्जीवनाचे प्रकल्प केले, तरी त्यातून भरपूर रोजगारनिर्मिती होईल. सरसकट सगळीकडे औद्योगिकीकरण करण्याऐवजी अशा प्रकारची काहीतरी वेगळी विकासनीती आपण राबवू शकतो का? याचा विचार शासनाकडून केला जायला हवा. याचं एक चांगलं उदाहरण धुळे जिल्ह्यातल्या लामकानी गावात बघायला मिळतं. तिथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून गवताळ कुरणाच्या संवर्धनाचा प्रकल्प करण्यात आला. चराईचं सुयोग्य व्यवस्थापन केल्यामुळे आज तिथे पवन्या, मारवेल अशी सकस दर्जाची गवतं चांगली वाढू लागली आहेत आणि त्यामुळे गावातला दुष्काळही संपला आहे. गावागावांमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जंगलनिर्मितीचे वा परिसर संवर्धनाचे प्रकल्प राबवता येऊ शकतात.

संपर्क - oikos@oikos.in

Powered By Sangraha 9.0