दहशतवाद आणि भारत - अ

14 Jun 2021 12:08:25

जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर झालेले अत्याचार असो किंवा मुंबईत 1993मध्ये 2008मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिका असोत, देशभरातील अशा असंख्य कारवायांमागे मुस्लीम दहशतवाद होता. धर्मांधतेतून या दहशतवादी कारवाया घडवल्या जात होत्या. आता तर इसीसचाही भारतातील प्रभाव वाढताना दिसत आहे.


Terrorism _4  H
भारतातील दहशतवादाचे स्वरूप मूलत: धार्मिक दहशतवादाचे असल्याचे दिसून येते. अलीकडच्या काळात ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ म्हणजेच इसीससारखी इस्लामी धर्मांध संघटना भारतात पाय रोवू लागल्याचे दिसून येते. तसेच ईशान्येकडील राज्यांत ख्रिश्चन धर्माचा प्रभाव वाढवण्यासाठी दहशतवादी कारवाया चालू आहेत. राष्ट्रापेक्षाही धर्माच्या बाबतीत जास्त तीव्र असणारी निष्ठा ठळकपणे जाणवते. भारतातील दहशतवादाला बहुतांश वेळा देशाबाहेरची मदत आहे असे इतिहास सांगतो. विशेषत: पाकिस्तानच्या आणि चीनच्या मदतीने दहशतवादी कारवाया झालेल्या आढळतात.

 

भारतातील दहशतवादाची पाळेमुळे

भारतातील दहशतवादाचे मूळ प्रामुख्याने काश्मीरमध्ये असल्याचे दिसून येते. जम्मू आणि काश्मीर ह्यांचे भारतात झालेले विलीनीकरण हे पूर्णपणे कायदेशीर आणि न्याय्य होते. तरीही काश्मीरला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काही संघटना निर्माण झाल्या, त्यापैकी एक म्हणजे जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट (जेकेएलएफ). अमानुल्लाह खान आणि मकबूल भट ह्यांनी 1977ला बर्मिंगहॅममध्ये हिची स्थापना केली. मूळच्या आझाद काश्मीर प्लेबिसाईट फ्रंट ह्या संघटनेचीच ही एक शाखा होती. शिवाय नॅशनल लिबरेशन फ्रंट ही त्यांची लष्करी शाखा होती. नॅशनल लिबरेशन फ्रंटसाठी काश्मीरमधून तरुणांना भरती करण्यासाठी मकबूल भट आणि त्यांचे सहकारी येत असताना चकमक झाली आणि त्यात सीआयडीचे अमरचंद हे ठार झाले. त्यामुळे मकबूल भट ह्यांना तिहार तुरुंगामध्ये टाकण्यात आले. त्यांना न्यायमूर्ती नीलकंठ गंजू ह्यांनी फाशीची शिक्षा सुनावली होती. मग बर्मिंगहॅममध्ये नॅशनल लिबरेशन आर्मीने भारतीय दूतावासातील रवींद्र म्हात्रे ह्यांचे 1984मध्ये अपहरण केले. त्या मोबदल्यात जेकेएलएफचे संस्थापक मकबूल भट ह्यांची तिहार तुरुंगामधून सुटका व्हावी, ही मागणी केली. हे अपहरण फसले आणि 6 फेब्रुवारी 1984ला रवींद्र म्हात्रे ह्यांना ठार केले गेले. मकबूल भटला लगेच 11 फेब्रुवारी 1984ला फाशी देण्यात आली. भारतातील दहशतवाद असा मुळात बाहेरील देशांतसुद्धा आपले अस्तित्व राखून होता. मग अमानुल्लाह खान ह्यांनी मुजफ्फराबाद येथे जाऊन जेकेएलएफचे मुख्यालय सुरू केले. त्या वेळी पाकिस्तानमध्ये झिया उल हक सरकारने पंजाबमधील खलिस्तानी दहशतवाद्यांना पाठिंबा दिलेला होता. (संदर्भ - प्रवीण स्वामी, इंडिया, पाकिस्तान अँड दि सिक्रेट जिहाद, 2007, पृष्ठ -163-164.)

आपले राजकीय हेतू सफल करण्यासाठी दहशतवादी सक्रिय झालेले होते. त्यासाठी भारत सरकारवर दबाव आणणे आणि सामान्य जनतेला वेठीस धरणे सुरू झालेले होते. जेकेएलएफने 14 सप्टेंबर 1989 रोजी काश्मिरी पंडिताचा आवाज असणारे पंडित टिकालाल तापलू ह्यांची भरदिवसा हत्या केली. (संदर्भ - कर्नल तेज के. टिकू - 2012 - काश्मीर - इट्स ॅबओरीजिन्स अँड देअर एक्सोडोस, लांसर पब्लिशर, पृष्ठ 414.) लगेच 4 नोव्हेंबर 1989 रोजी न्यायमूर्ती नीलकंठ गंजू ह्यांची हत्या केली गेली, कारण त्यांनी मकबूल भटला फाशीची शिक्षा ठोठावली होती. पुढे डिसेंबर 1989मध्ये जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटच्या अतिरेक्यांनी भारताचे तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती महंमद सैद ह्यांची मुलगी रुबिया सैद हिचे अपहरण केले होते. तिच्या सुटकेच्या मोबदल्यात त्यांच्या साथीदारांना सरकारने तुरुंगातून सोडावे ही त्यांची मागणी होती. अशा कारवाया चालूच होत्या.


1988मध्ये मुहमद एहसान दर ह्याने जेकेएलएफप्रमाणेच मुजफ्फराबाद येथे मुख्यालय असणारी हिजबुल मुजाहिदिनची स्थापना केली. ‘हिजबुलह्या अरेबिक शब्दाचा अर्थ आहे अल्लाचे नाव आणिमुजाहिदीनचा अर्थ आहे गैर-इस्लामी लोकांच्या विरोधात लढणारे सैनिक. हिजबुल मुजाहिदिनची धमकी 4 जानेवारी 1990 रोजी स्थानिक उर्दू वर्तमानपत्रआफताबने छापली. सर्व हिंदूंना काफिर घोषित करून काश्मिरी पंडितांना काश्मीर खोरे सोडून जायला सांगितले होते. ‘इस्लाम धर्म स्वीकारा नाही तर काश्मीर सोडून जाहे तर मशिदीमधून सांगण्यात आले. लाखो काश्मिरी पंडित विस्थापित झाले.



Terrorism _2  H


Terrorism _1  H

जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंटचे संस्थापक मकबूल भट अमानुल्लाह खान

हा सगळा इतिहास असला, तरी तो देशाच्या सद्य परिस्थितीतील दहशतवादाला थेट जोडला गेलेला आहे. हिजबुल मुजाहिदिनचा नेता बुरहान वानी ह्याला 8 जुलै 2016 रोजी सुरक्षा रक्षकांनी ठार मारले. बुरहान वानी सोशल मीडियावर लोकप्रिय होता. त्याने आधी आपल्या व्हिडिओमधून काश्मिरी पंडितांचा उल्लेख केला होता. (संदर्भ - पर्सिंग काश्मीर्स डबलथिंक अबाउट द रिटर्न ऑफ दि पंडित्स, 15 जून 2016. शाकीर मीर, द वायर पोर्टल.) ह्याच्या मृत्यूला विरोध करण्यासाठी काश्मीरच्या जनतेने जो मोर्चा काढला होता, त्यात एक जण सक्रियपणे सहभागी झालेला होता, तो म्हणजे आदिल अहमद दर. ह्याने पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-श्रीनगरच्या राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या वाहनावर आत्मघातकी दहशतवादी हल्ला केला, ज्यात चाळीस जवान ठार झाले. तो जैश-ए-महंमदचा सदस्य होता. नंतर त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला. त्यात त्याने म्हटले आहे की हा व्हिडिओ मिळेल तेव्हा तो स्वर्गात असेल. म्हणजेच आपल्या कृत्याचे समर्थन त्याने धार्मिक आधारावर केलेले आहे. जैश-ए-महंमद हा पाकिस्तानातील जिहादी गट असून काश्मीरमध्ये आणि नंतर भारतात अन्य ठिकाणी त्यांना जिहाद घडवायचा आहे. ह्या गटाचा तालिबान आणि अल कैदा ह्या संघटनांशी जवळचा संबंध आहे. (संदर्भ - मोज, देवबंद मद्रासाह मुव्हमेंट,2015,पृष्ठ -98, रीडेल, आणि डेडली एमब्रास - 2012, द आन्सर इज जैश ए महंमदस फ्रेंड अँड अलाय, ओसामा बिन लादेन्स अल कैदा, पृष्ठ 69.)

याच अल कैदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन ह्याने दिलेल्या आर्थिक मदतीने 1987मध्ये हाफिज सैद, अब्दुल्लाह अझ्झाम आणि झफर इक्बाल ह्यांनी पाकिस्तानमध्ये लष्कर--तैबाची स्थापना केली. (संदर्भ - . ॅटकिनस, स्टीफन, 2004, एन्सायक्लोपीडिया ऑफ मॉडर्न वर्ल्डवाइड एक्स्ट्रीमिस्ट अँड एक्स्ट्रीमिस्ट ग्रूप्स, ग्रीनवूड प्रेस, पृष्ठ 173) आणि लष्कर--तैबाच्या दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला केला होता. म्हणजेच ह्या सगळ्या संघटना परस्परांशी जोडलेल्या आहेत.

भारतातील दहशतवादी हल्ले

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम

भारतात आतापर्यंत अनेक दहशतवादी झालेले आहेत. 21 मे 1991 रोजी चेन्नईच्या श्रीपेरुम्बुदूर येथे आत्मघातकी दहशतवादी हल्ल्याद्वारे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी ह्यांची हत्या केली गेली. एलटीटीई म्हणजेच लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या थेनमोझी राजरत्नम म्हणजेच धानू हिने ही हत्या केली. राजीव गांधी हे निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले होते. या वेळी धानूने आपल्या कमरेभोवती लावलेल्या बाँबचा स्फोट घडवून आणला. महिलेने केलेला हा भारतातील पहिला आत्मघातकी दहशतवादी हल्ला होता. भारताने श्रीलंकेत इंडियन पीस कीपिंग फोर्स पाठवली होती. त्याला एलटीटीईचा विरोध होता. राजीव गांधी जर निवडणुकीत जिंकून पुन्हा पंतप्रधान बनले असते, तर त्यांनी हेच धोरण पुढे चालवले असते, म्हणून ही हत्या केली गेली. एलटीटीईचे प्रमुख ध्येय हे तामिळ इलम म्हणजेच स्वतंत्र तामिळ राज्याची निर्मिती करणे होते. ही संघटना धार्मिक नाही, पण राजकीय कारणासाठी सक्रिय होती. ह्या हल्ल्यामुळे एलटीटीईने राजकीय हेतू पुर्ण केला होता.

मुंबईमधील बाँबस्फोट

मुंबईमध्ये 12 मार्च 1993 रोजी बाँबस्फोटांची मालिकाच घडवून आणली गेली. मुंबई शेअर बाजार, हॉटेल सी रॉक, एअर इंडियाची बिल्डिंग, तसेच झवेरी बाजार, दादरला प्लाझा सिनेमा, पासपोर्ट कार्यालय अशी अनेक ठिकाणे बाँबस्फोटांनी हादरली. शिवाय सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि फिशरमन कॉलनी ह्या ठिकाणी ग्रेनेड फेकण्यात आले. यात एका दिवसात 257 ठार आणि 1400 जण जखमी झाले होते. दाऊद इब्राहीम आणि त्याचे साथीदार टायगर मेमन आणि याकूब मेमन ह्यांनी हे स्फोट घडवून आणले होते. ह्या दहशतवादी हल्ल्यामागे कारण धार्मिकच होते. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशीद पाडली गेली होती, त्याचा बदला घेण्यासाठी हे बाँबस्फोट घडवून आणले गेले होते. विशेष म्हणजे आताही इसीसने भारताला धमकी देण्यामागेहीबाबरीचा बदलाहेच कारण जाहीर केलेले आहे. मुळात बाबरी मशिदीचा वाद न्यायालयीन मार्गाने, सगळे पुरावे सादर करून, सगळ्या औपचारिकता पूर्ण करून आता सोडवण्यात आला आहे. हिंदू आणि मुस्लीम ह्या दोन्हीही धर्मीयांनी भारतात त्याचा निकाल मान्य केलेला आहे. तरीही इसीस ह्या दहशतवादी संघटनेनेव्हॉइस ऑफ हिंदह्या आपल्या मुखपत्रातबाबरीचा बदलाघेण्याची धमकी दिलेली आहे. म्हणजेच

 

1. इसीससारख्या संघटनेने आपले लक्ष मध्यपूर्वेकडून आता दक्षिण आशियावर केंद्रित केलेले आहे.

2. इसीसने भारताच्या अंतर्गत धोरणाच्या विरोधात जिहाद लादला आहे, त्यामुळे हा सार्वभौमत्वावर हल्ला आहे.

3. देशांच्या कायद्यांपेक्षा जागतिक इस्लाम धर्म महत्त्वाचा मानला आहे.

चर्चवर हल्ले

.. 2000मध्ये कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेश तेथील विविध चर्चेसमध्येदिदार अंजुमनह्या संघटनेने बाँबस्फोट घडवून आणले. 1924मध्ये सिद्दिकी दिदार - यालाच सयेद सिद्दिकी दुसेन असेही ओळखतात - ह्याने कर्नाटकच्या गदग येथे ह्या संघटनेची स्थापना केली होती. ते स्वत:ला हिंदूंचा देव चन्ना बसवेश्वरचा अवतार मानत होते. अनेक हिंदूंना त्यांनी धर्मांतर करून इस्लाममध्ये आणले. सयेद सिद्दिकी ह्यांचा मुलगा झिया उल हसन हा ह्या चर्चवरील हल्ल्यात मुख्य आरोपी होता. त्याला खात्री होती की चर्चमध्ये झालेल्या बाँबस्फोटांमुळे भारतात हिंदू आणि ख्रिश्चन ह्यांच्यात नागरी युद्ध होईल. त्याच वेळी अफगाणिस्तानमधून इस्लामी धार्मिक नेतृत्व येऊन भारत जिंकून घेईल आणि पूर्ण देश इस्लाममध्ये धर्मांतरित होईल. (संदर्भ - चर्च सीरियल ब्लास्ट, 11 गेट डेथ, टाइम्स ऑफ इंडिया, 30 नोव्हेंबर 2008.) म्हणजेच इस्लाम धर्माला जागतिक पातळीवर पसरवणे आणि आपलेखलिफतनिर्माण करण्याची इच्छा अशा हल्ल्यामागे असून आज इसीसला तेच हवे आहे. इस्लामी धर्मांधता हे मुख्य कारण ह्या हल्ल्यांच्या मागे असल्याचे सिद्ध होते.


Terrorism _3  H

26/11/2008चा मुंबईवरचा हल्ला

लष्कर--तैबाच्या दहा दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे येऊन पाच गट तयार करून मुंबईवर दहशतवादी हल्ला चढवला. पहिल्या गटाने लिओपोल्ड कॅफेवर हल्ला चढवला. नंतर ते ताज हॉटेलकडे गेले. तिथे आणखी एक गट येऊन मिळाला. तिसर्या गटाने छबाड हाउसवर, चौथा गट हॉटेल ट्रायडंटवर, तर पाचवा गट छत्रपती शिवाजी टर्मिनसवर हल्ला चढवत होता. ह्या हल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हल्ला चढवताना हे दहशतवादी परस्परांशी संपर्क ठेवून होते. त्यांच्यात आणि नियोजन करणारे यांच्यात समन्वय होता. देशाच्या सार्वभौमत्वावर हा हल्ला होता. देशाच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरणे, सामान्य जनतेत दहशत पसरवणे, ज्यू लोकाना वेठीस धरणे ह्या कारणांसह प्रमुख कारण इस्लामी धर्मांधता हे होतेच.


आठ पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी इस्रायलवर 4-5 मार्च 1975 रोजी समुद्रातून येऊन तेल अवीवच्या हॉटेल सॅव्हॉयवर अगदी असाच हल्ला केला होता. पण इस्रायलच्या जवानांनी वेगवान कारवाई करत सगळ्या दहशतवाद्यांना ठार केले, तर एकाला जिवंत पकडले होते. ह्या हल्ल्याच्या मागेजिहादचा जनकअबू जिहाद होता. त्याच्या घरात मोसादने हुशारीने बग लावले आणि 1988मध्ये इस्रायलने त्याला शयनकक्षात घुसून ठार केले होते.


पण 26/11चा मास्टरमाइंड असणारा हाफीज सैद पाकिस्तानमध्ये अजूनही सुरक्षित आहे.

इसीसचे आव्हान

इसीस ह्या संघटनेने जागतिक इस्लामी राज्याच्या निर्मितीसाठी आपला प्रभाव जगभर वाढवला. भारतातही त्यांचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. याचा स्वयंघोषित खलिफा अबू बकर अल बगदादीला पूर्ण खात्री होती की कायमस्वरूपी जिहादला पर्याय नाही. त्याने गैर-मुस्लीम लोकांच्या कत्तली आणि त्यांच्या स्त्रियांवर अत्याचार करण्याचे स्वातंत्र्य दिले होते.(संदर्भ - दि इंडियन एक्स्प्रेस, खालिद अहमद, 30 नोव्हेंबर 2019.) केरळमध्ये सक्रिय असणार्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी आणि सिमीशी इसीसचा थेट संबंध आहे. (संदर्भ - पीएफआय रॅडीकल आउटफीट विथ सिमी लिंक नाऊ अंडर सीएए प्रोटेस्ट स्कॅनर, रोहिणी स्वामी, 24 डिसेंबर 2019, दि प्रिंट काश्मीर, केरळ) तसेच देशाच्या अन्य भागांतून इसीसला जाऊन मिळणारे अनेक जण आहेत. त्यापैकी काही जण पकडले गेले.

जागतिक इस्लामी सत्ता प्रस्थापनेचे अवास्तव स्वप्न दाखवून अनेकांचे शोषण केले जात आहे. दहशतवादाचे हे आव्हान जास्त गंभीर आहे, कारण ते थेट इस्लामी धर्मांधतेशी जोडलेले आहे.

Powered By Sangraha 9.0