पहिल्या पावसानेच योग्यता दाखवली!

10 Jun 2021 18:21:07

 मुंबई आणि मुंबईच्या मराठी माणसाचा स्वघोषित कैवार घेतलेल्यांनी आज या मुंबईची, देशाच्या आर्थिक राजधानीची ही अशी अवस्था करून ठेवलेली आहे. हा पावसाळा निघून जाईल, पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा पुन्हा हेच सर्व जण मतं मागायला हसत हसत मुंबईकरांच्या दारात येतील. केंद्रावर, भाजपावर, अन्य प्रशासकीय विभागांवर जबाबदार्या ढकलतील. परंतु आपल्याला पहिल्या पावसाचाही आनंद घेऊ देण्यास, आपल्या मनस्तापास, दर वर्षीच्या दुखण्यास जबाबदार कोण, हे किमान सर्वसामान्य मुंबईकराने तरी त्या वेळी लक्षात ठेवायला हवं.

sampadkiy_1  H

 ‘नेमेची येतो मग पावसाळाया काव्यपंक्तीप्रमाणे दर वर्षी पावसाळा येतो आणि मग निसर्गकवींपासून अलीकडे सोशल मीडियावरील नवकवींच्या प्रतिभेलाही अंकुर फुटू लागतात. अनेक जण गरमगरम चहा-कांदाभज्यांबरोबर बाल्कनीत बसून पावसाचा आस्वाद घेऊ लागतात. ठिकठिकाणचे लोक हे असं बरंच काय काय करत असताना इकडे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वाट्याला मात्र हे सुख काही केल्या येताना दिसत नाही. कारण जसा पावसाळा दर वर्षी येतो, तसंच त्याला जोडून मुंबईकराच्या वाट्याला पूर, पाणी तुंबणं, वाहतूक ठप्प होणं, मनस्ताप असं बरंच काय काय येत असतं. एव्हाना नागरिकांना या मनस्तापाची सवय झाली आहे. ही सवय जशी नागरिकांना झाली आहे, तशीच ती या मुंबईच्या सत्ताधार्यांना, प्रशासन यंत्रणेलाही झाली आहे. ती सवय आहे ढिम्म राहण्याची, आपल्या जबाबदार्या दुसर्यांवर ढकलण्याची आणि कोडगेपणाची.
 

खरं तर मुंबईचे विद्यमान आणि गेल्या पंचवीसहून अधिक काळ महापालिकेत सत्तेत असलेले सत्ताधारी म्हणजे शिवसेना पक्ष. त्यात या पक्षाचे सर्वेसर्वा असलेले ठाकरे कुटुंब हेही मुंबईकर. त्यात आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेल्या दीड वर्षांपासून राज्याच्या मुख्यमंत्रिपदी आहेत. शिवाय, नगरविकास विभागही शिवसेनेच्याच मंत्र्यांकडे आहे. त्यामुळे महापालिका ते मंत्रालय शिवसेनेची सत्ता असताना, एक मुंबईकर मुख्यमंत्रिपदी असताना तरी किमान मुंबईकरांच्या या व्यथा दूर होतील, अशी अपेक्षा होती. परंतु दीड वर्षांच्या कार्यकाळात फसलेल्या असंख्य अपेक्षांप्रमाणे ही अपेक्षादेखील फसली आणि तीदेखील पावसाच्या अगदी पहिल्याच दिवशी. दर वर्षीप्रमाणे महापालिकेने नालेसफाई नावाचा एक फार्स हाती घेतला होता, त्यावर कोटीच्या कोटी खर्च होत होते, राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यापासून शिवसेनेचे मुंबईतील अनेक नेते, लोकप्रतिनिधी मोठ्या आवेशात यंदा मुंबईत पाणी तुंबणार नाही यासाठी आम्ही कसे प्रयत्न करतो आहोत, याचे पाढे वाचत होते. या सगळ्या फार्सची योग्यता पावसाने अगदी पहिल्याच दिवशी, अक्षरश: पाच-सहा तासांतच दाखवून दिली. बुधवारचा दिवस उजाडून सकाळी मुंबईकर घराबाहेर पडायच्या आधीच मुंबई ठप्प झालेली होती. नालेसफाई आणि अन्य नियोजनाचे सत्ताधार्यांचे दावे पाच-सहा तासदेखील टिकू शकले नाहीत. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, मालाड-मालवणीत इमारत कोसळून 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हे सगळं सुरू असताना या सर्व परिस्थितीमध्ये ज्यांनी पुढाकार घेऊन परिस्थिती सुधारण्यासाठी पुढाकार घ्यायचा ते काय करत होते? तर माध्यमांसमोर आपली जबाबदारी ढकलण्यात गर्क होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी लागलीच माध्यमांसमोर येतमुंबईत पाणी भरणार नाही असा दावा कधीच केला नव्हताअसं सांगत जणू काही ही अगदीच किरकोळ गोष्ट असल्याचं सूचित केलं. रेल्वेकडून सहकार्य मिळत नसल्याचं सांगून दुसर्यावर जबाबदारी ढकलण्याची औपचारिकताही त्यांनी पूर्ण करून घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औपचारिकता म्हणून महापालिकेच्या नियंत्रण कक्षात जाऊन म्हणे जेमतेम पाच-दहा मिनिटं आढावा घेतला. नाइटलाइफ फेम आदित्य ठाकरे या सगळ्यात काय करत होते? असं विचारलं तर कुणालाच ठोस काही सांगता येणार नाही. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर लोकांचा बाप काढणं आणि मग ते ट्वीट डिलिट करणं असले उद्योग करणार्या, देशाच्या आर्थिक राजधानीच्या महापौर पेडणेकर यांनी आपल्या महापालिकेत ट्विटरपेक्षा अधिक गांभीर्याने लक्ष दिलं असतं, तर कदाचित मुंबईवर इतकी वाईट वेळ आली नसती. परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या खास वर्तुळातले अनिल परब दोन-तीन वर्षांपूर्वीपावसाळ्यात मुंबई तुंबल्यास मुख्यमंत्री जबाबदारअसली बेधडक (बेजबाबदार?) विधानं करत होते. आता पहिल्याच पावसाने मुंबईच्या सत्ताधार्यांची, त्यांच्या वकूबाची योग्यता दाखवली असता मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्यासाठी अनिल परब काही अवतरले नाहीत. दीड वर्षं जुन्या सरकारच्या कामांना स्थगिती देण्यात आणि प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोटं दाखवण्यात मग्न असलेलेबेस्ट सीएमपरवा पंतप्रधानांकडे जाताना मागण्यांची भलीमोठी यादी घेऊन गेले. परंतु, राज्याची राजधानी तुंबत असताना तिथे मात्र पाच-दहा मिनिटांहून अधिक वेळ काढावासा त्यांना वाटलं नाही. जवळपास तीन दशकं मुंबईवर सत्ता गाजवणार्या शिवसेनेची आणि शिवसेनेच्या नेतृत्वाची आज ही अशी अवस्था आहे.

मुंबई आणि मुंबईच्या मराठी माणसाचा स्वघोषित कैवार घेतलेल्यांनी आज या मुंबईची, देशाच्या आर्थिक राजधानीची ही अशी अवस्था करून ठेवलेली आहे. हा पावसाळा निघून जाईल, पुढच्या वर्षी महापालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा पुन्हा हेच सर्व जण मतं मागायला हसत हसत मुंबईकरांच्या दारात येतील. केंद्रावर, भाजपावर, अन्य प्रशासकीय विभागांवर जबाबदार्या ढकलतील. परंतु आपल्याला पहिल्या पावसाचाही आनंद घेऊ देण्यास, आपल्या मनस्तापास, दर वर्षीच्या दुखण्यास जबाबदार कोण, हे किमान सर्वसामान्य मुंबईकराने तरी त्या वेळी लक्षात ठेवायला हवं.

Powered By Sangraha 9.0