यादवीच्या दिशेने?

06 May 2021 18:22:26

. बंगालची सत्ता आपल्या ताब्यात राहावी, शिवाय भाजपाचा बंगालमध्ये शिरकाव होऊ नये यासाठी ममता बॅनर्जींनी खेळलेला हा खेळ त्यांच्याच अंगावर उलटण्याची चिन्हं आहेत. या सगळ्यात राज्य म्हणून पश्चिम बंगालची जी वाताहत होईल, त्यालाही सर्वस्वी त्याच जबाबदार असतील.

west bangal_1  


केलेल्या
(कु)कर्माची फळं याच जन्मात भोगावी लागतात अशी आपली धारणा आहे. . बंगालच्या मुख्यमंत्रिपदी तिसर्यांदा विराजमान झालेल्या ममता बॅनर्जी हे त्याचं ताजं उदाहरण. 200हून अधिक जागांवर विजय मिळवत त्यांनी . बंगालची सत्ता तर हस्तगत केली, पण त्यानंतरची हिंस्र परिस्थिती त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या मुळावर येण्याची शक्यता आहे. याला कारण अर्थातच ममता स्वत: आहेत. पक्ष चालवण्यासाठी, तो वाढवण्यासाठी म्हणून त्यांनी जी धोरणं आजवर अवलंबली, तिला लागलेली ही विषारी फळं आहेत.

. बंगालचं राजकारण आणि राजकीय हत्या हे समीकरण कम्युनिस्टांच्या कार्यकाळापासून तिथे अस्तित्वात आहे. किंबहुना जिथे जिथे कम्युनिस्ट राज्यकर्ते झाले, तिथे तिथे त्यांनी हिंसेचं समर्थन केलं, हिंसाचाराला पाठबळ दिलं. कम्युनिस्ट राजवटीच्या कार्यकाळात ममता बॅनर्जी यांच्या पक्षातल्याही अनेकांच्या हत्या झाल्या. या आघातांनी डगमगता, कम्युनिस्टांच्या डोळ्याला डोळा भिडवून त्या पाय रोवून उभ्या राहिल्या. ‘स्ट्रीट फायटरही त्यांची प्रतिमा त्यातूनच बनत गेली, विकसित झाली. मात्र त्यानंतर कम्युनिस्टांचं पानिपत करत त्या जेव्हा सत्तेवर आल्या, तेव्हा कम्युनिस्टांकडे असलेली गुंडांची टोळी तृणमूलमध्ये भरती झाली. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता आणि ममतांसाठीही त्यांना पाळणं, पोसणं फायद्याचं होतं. या भरती प्रक्रियेपासून तृणमूल पक्षात गुंडगिरी ही संस्कृती म्हणून विशेषत्वाने रुजली, फोफावली. म्हणूनच सत्ताधारी पक्ष बदलला, तरी राज्यातली गुंडगिरी संपली नाही की नागरिकांवरची दहशतीची पकड सैलावली नाही. एखाद्या लोकशाहीचा अवलंब केलेल्या राज्यात सलग 35 वर्षं एका विशिष्ट विचारसरणीच्या पक्षाची सत्ता असणं हे योग्य नाही आणि सहज शक्यही नाही. शिवाय कम्युनिस्टांनी राज्यहित डोळ्यासमोर ठेवून, . बंगालमध्ये अशी काही कौतुकास्पद कामगिरी केली नव्हती, ज्यामुळे इतकी दीर्घकाळ त्यांच्या हाती सत्ता राहावी. तेव्हा हे घडलं ते केवळ दहशतीच्या कारभारामुळे. आणि त्याचाच कित्ता नंतरची 10 वर्षं ममतांनी गिरवला. गिरवत आहेत.

तेव्हा ममतांनी डाव्यांना वा काँग्रेसला संपवलं असं जे म्हटलं जातं, ते शब्दश: खरं नाही. हे पक्ष संपवताना या दोन्ही पक्षांतले भरपूर उपद्रवमूल्य असलेले गुंड कार्यकर्ते तृणमूलमध्ये घेतले. काँग्रेसला आणि कम्युनिस्ट पक्षाला ओहोटी लागल्यानेे या गुंड कार्यकर्त्यांना तृणमूलच्या तंबूचा आसरा हा एकच पर्याय होता. ते तिकडे शिरले. त्याने लोकांमध्ये असलेली डाव्यांची दहशत कमी झाली आणि तृणमूलची वाढली आणि त्यातून तृणमूलच्या विजयाचा मार्ग सोपा होत गेला. तसं पाहता गेल्या 10 वर्षांच्या तृणमूलच्या कार्यकाळातही औद्यागिक स्तरावर . बंगालची पीछेहाटच होते आहे. तरीही इतक्या मताधिक्याने तृणमूल पक्ष सत्तेवर येतो, त्यामागे पक्षाची समाजमनावर असलेली दहशत हा मोठा घटक आहे. डावे आणि तृणमूल यांच्या कार्यकाळात गेल्या 45 वर्षांत . बंगालमध्ये इतक्या राजकीय हिंसा झाल्या आहेत की तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना या बाबतीत बधिरत्व आलं आहे. ही खरं तर धोक्याची घंटा आहे.

 

या गुंडांबरोबरच ममता बॅनर्जींनी . बंगालमधल्या अनेक मुल्लामौलवींना आर्थिक मदत देऊन पोसलं आणि पक्षासाठी वापर करून घेतला. त्यामुळेच या निवडणुकीत फुरफुरा शरीफसारखा मोठा मौलाना त्यांच्या विरोधात गेला, तरीही त्यांची मुस्लीम मतांची टक्केवारी कमी झाली नाही. त्यांचं पारडं जडच राहिलं. पोसलेले मुल्ला-मौलाना कामी आले.

 

तात्पर्य - पक्ष कार्यकर्ते म्हणून पोसलेले गुंड आणि मुल्ला-मौलवींच्या माध्यमातून केलेलं मुस्लिमांचं लांगूलचालन, तुष्टीकरण, बांगला देशातून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांचं केलेलं पोषण या बळावर तृणमूल सत्तेवर आला. आता हेच घटक पक्षाच्या अधोगतीला आणि . बंगालमध्ये माजलेल्या हिंसाचाराला कारण ठरत आहेत. प्रचारसभांमध्ये भाजपाने केलेल्या घणाघाती प्रचारामुळे आणि त्यांना असलेल्या लाखोंच्या उपस्थितीमुळे बिथरलेल्या ममता बॅनर्जींनीनिवडणुकीनंतर पाहून घेऊया दिलेल्या अप्रत्यक्ष धमकीलाच आज्ञा मानून, तृणमूलचे कार्यकर्ते, तसेच त्यांनी पोसलेले बांगला देशातून आलेले घुसखोर रोहिंग्या मुसलमान हिंसेला प्रवृत्त झाले. त्यांनी भाजपा नेत्यांच्या-कार्यकर्त्यांच्या नृशंस हत्या करून ममता यांच्या विजयाला काळिमा फासण्याचं काम केलं आहे.

आता ही अध:पतनाच्या उताराला लागलेली तृणमूलची गाडी खुद्द ममताही थोपवू शकणार नाहीत, अशी अवस्था आहे.

. बंगालची सत्ता आपल्या ताब्यात राहावी, शिवाय भाजपाचा बंगालमध्ये शिरकाव होऊ नये यासाठी ममता बॅनर्जींनी खेळलेला हा खेळ त्यांच्याच अंगावर उलटण्याची चिन्हं आहेत. या सगळ्यात राज्य म्हणून पश्चिम बंगालची जी वाताहत होईल, त्यालाही सर्वस्वी त्याच जबाबदार असतील.

या सगळ्या घटनाक्रमामुळे राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व करण्याचं ममतांचं स्वप्न दिवास्वप्नच ठरण्याची शक्यता बळावली आहे. सत्ताकांक्षेपायी इतकी वर्षं त्यांनी पाळलेले साप आता अख्ख्या . बंगालला वेढा घालून बसले आहेत. त्यातून त्यांना स्वत:ला बाहेर पडता येणं आणि त्यांनी . बंगालला बाहेर काढणं हे त्यांच्या आवाक्यातलं काम राहिलेलं नाही.

केवळ प्रादेशिक अस्मितेला ललकारल्यामुळे भावनेच्या भरात आणि असलेल्या दहशतीपायी तृणमूलच्या पारड्यात टाकलेली मतं या राज्यातजंगल राजसारखं अराजक निर्माण केल्याचा अनुभव सध्या बंगालचे नागरिक घेत आहेत आणि उर्वरित सर्व भारतीय . बंगालमध्ये चाललेली लोकशाहीची विटंबना लवकरात लवकर थांबावी, या प्रतीक्षेत आहेत.

ही यादवीसदृश परिस्थिती चिंताजनक तर आहेच, तशीच लोकशाही मूल्यांची जपणूक करणार्या, संविधानाला मानणार्या भारताच्या प्रतिमेचं आंतरराष्ट्रीय स्तरावर अवमूल्यन करणारी आहे.

Powered By Sangraha 9.0