@प्रांजल अक्कलकोटकर
700 वर्षांच्या समृद्ध रिपब्लिकन पद्धतीनंतर रोमन साम्राज्यात राजेशाही उत्पन्न झाली. आधुनिक भारताचा विचार केला, तर याच्या बरोबर उलट चित्र - म्हणजे प्रदीर्घ कालावधीच्या राजेशाहीनंतर लोकनियुक्त आणि प्रजासत्ताक लोकशाहीचा स्वीकार आढळून येतो.
मध्ययुगातील 16वे शतक! इटलीच्या क्षितिजावर युरोपीय पुनर्जागृतीच्या पर्वाची अंधुकशी तांबडी किनार दिसू लागली होती. याच काळातील ख्यातनाम राज्यशास्त्र विश्लेषक म्हणजे ‘निकोलो माकीयावेली.’ याच व्यक्तीला आज आधुनिक राज्यशास्त्र शाखेचा जनक म्हणून ओळखले जाते. निकोलोच्याच ‘डिस्कोर्सेस ऑन लिव्ही’ या पुस्तकात प्राचीन रोमन साम्राज्याच्या साम्राटांचे आणि त्यांच्या कारकिर्दीचे विश्लेषण आढळून येते. यामध्ये प्रशासन, स्थैर्य इ. अनेक बाजूंनी विचार करता पाच रोमन सम्राट आदर्श मानता येतील, असा निष्कर्ष निकोलो काढतो.
आता हे पाच भाग्यवान सम्राट कोणते? तर नर्व्हा, ट्रजान, हेड्रियान, अँटोनियस पायस आणि मार्कस ऑरेलियस!
आणि याही वर जाऊन निकोलो हेही म्हणतो की हे सर्व सम्राट असे कर्तृत्वशाली निपजले, कारण यातील सर्वच्या सर्व हे जन्मत:च एखाद्या सम्राटाचा आयता वारस म्हणून निपजले नाहीत, तर आगोदरच्या प्रत्येक सम्राटाने यांच्यामधील कुवत ओळखून त्यांना उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आणि त्यामुळेच हे असे आदर्शवत प्रशासन करू शकले.
केवढे धाडसी विधान आहे, नाही का?
पण, निकोलो असे म्हणतो तरी का, हे पाहू या.
रोमच्या स्थापनेपासून - म्हणजेच इ.स.पू. 753पासून पुढे 7 दशके रोमन साम्राज्यात कधीच राजेशाही नव्हती. रोमच्या प्रभावाखाली असलेल्या विस्तीर्ण प्रदेशाचा कारभार हा सिटिझन्सच्या मतावर निवडून आलेले सिनेट आणि या सिनेटचा नेता असलेला असा ‘काउन्सुल’ पाहत असे. सेनाप्रमुखदेखील वेळोवेळी या सिनेटलाच आर्जव करून हव्या त्या मोहिमा मागून घेत असत.
इ.स.पू. 107नंतर मात्र पराक्रमी सेनाधिकारीच ‘काउन्सुल’ म्हणून निवडून येण्याच्या प्रमाणात प्रकर्षाने वाढ दिसू लागली. ‘मारियस म्युल्स’ हा अशाच प्रकारे 7 वेळा निवडून आलेला लष्करी पार्श्वभूमीचा ‘काउन्सुल.’
यानंतर मात्र वेगळे वारे वाहू लागले. पश्चिमेला स्पेनपासून ते पूर्वेस सीरियापर्यंत पसरलेले आणि सबंध भूमध्य सागराला वेढणारे हे अफाट साम्राज्य, चारही दिशांतून रोममध्ये वाहणारा संपत्तीचा ओघ या सर्वांतून रोमन नागरिकांच्या सुबत्तेत पुष्कळ वाढ झाली होती. टुमदार घरे, प्रासाद, स्नानगृहे, उपवने, क्रीडा-कलेची व मनोरंजनाची अनेक केंद्रे निर्माण होत होती.
या साम्राज्याच्या सामर्थ्याचे प्रतीक असलेला एक दिग्विजयी राजा असला, तर काय हरकत आहे? अशा चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाल्या. खरे तर सतत सुरू असलेल्या मोहिमांचा नागरिकांवर ताण येत असे. या मोहिमा, त्यातील योग्य अथवा अयोग्य सामरिक निर्णय, जय अथवा पराजय याची सर्वस्वी जबाबदारी घेणारे एक सत्ताकेंद्र असावे आणि आम्हा नागरिकांना आमच्या नागरी जीवनात गढून जाण्याची मुभा मिळावी, असेही त्यांना वाटू लागले असेल.
बदलती परिस्थिती ओळखून इ.स.पू. 70च्या आसपास ज्युलियस सीझर, पॉम्पेयस आणि मार्कस क्रॅसस या तीन सत्ताधिकार्यांनी आपले त्रिकूट स्थापन केले. यालाच पहिले ‘ट्रायमव्हायरेट’ असेही म्हणतात. सिनेटवर आणि सैन्यावर वर्चस्व स्थापन करून प्रशासनासंबंधीचे जवळपास सर्व अधिकार या तिघांनी आपल्या अखत्यारीत आणले.
रोमन साम्राज्य एकाधिकारशाहीच्या उंबरठ्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचले, पण आता सत्तेच्या लोलकाने आणखी एक झोका घेतला. तीव्र महत्त्वाकांक्षा असलेले हे तिघेही आता एकमेकांना शह देऊ लागले. शह-काटशह देण्याच्या या खेळात ज्युलियस सीझरने बाजी मारली.
इजिप्तमधील क्लिओपात्रामुळे प्रसिद्ध ठरलेली मोहीम गाजवून रोममध्ये प्रवेश करणार्या सीझरच्या शोभायात्रेचे प्रजेने अभूतपूर्व स्वागत केले. आता सीझर हा नावापुरता ‘काउन्सुल’ होता, पण त्याची कीर्ती आणि दरारा एका सम्राटाला समतुल्य होता.
सीझरने रोमचा तहहयात सर्वेसर्वा म्हणून स्वत:च्या नावाने द्वाही फिरवली, पण सम्राटपद मात्र घेतले नाही.
या एकाधिकारशाहीतून धोके उद्भवू शकतील, या अनाठायी भीतीने सिनेटमध्ये सीझरच्या प्रतिस्पर्ध्यांनी सीझरची हत्या केली. (इ.स.पू. 44.) पण आता समाजमन पालटले होते. सीझरच्या हत्येस जबाबदार ठरलेल्या सिनेटर्सच्या विरोधात प्रचंड जनक्षोभ उसळला. आता रोमन समाजमन एका सम्राटासाठी आतुरले होते.
सीझरने वारसापत्रात स्वत:चा पुतण्या ऑक्टाव्हियस यास उत्तराधिकारी म्हणून सूचित केले होते. पुढील 14 वर्षे हाच ऑक्टाव्हियस स्वकर्तृत्वाने रोममधील अंतर्गत सत्तासंघर्षाला पुरून उरला आणि इ.स.पू. 29मध्ये रोमन इतिहासात एक राजकीय चमत्कार घडला.
सिनेटच्या आणि प्रजेच्या इच्छेने ऑक्टाव्हियस हा पहिला रोमन सम्राट म्हणून अभिषिक्त झाला. इतकेच नाही, तर त्याच्या प्रजेने या नवनियुक्त राजाला ‘ऑगस्टस’ - म्हणजे दैवी शक्ती असलेला अशी उपाधी बहाल केली.
योगायोग म्हणा किंवा काही, पण ऑक्टाव्हियस सीझरनंतर जे जे सम्राट वंशपरंपरेने सम्राट बनले, त्यातील काही अपवाद वगळता बरेचसे विक्षिप्त आणि क्रूर असेच निपजले. पण इ.स. 96 ते 180 या काळात नर्व्हापासून ते पुढे मार्कस ऑरेलियसपर्यंतचे सर्व सम्राट अत्यंत लोकप्रिय, साम्राज्यहितदक्ष आणि मुत्सद्दी असेच निपजले. कारण?
निकोलो म्हणतो, त्याप्रमाणे हे सर्वच्या सर्व आयते राजकुलात जन्मास आले नाहीत. या प्रत्येकाने अगोदर स्वकर्तृत्व सिद्ध केले होते. तसेच त्यांच्या आधीच्या सम्राटानेदेखील साम्राज्याच्या हिताच्या दृष्टीने उत्तराधिकारी म्हणून कोण योग्य ठरेल याचा विचार करून यामधील प्रत्येकाची निवड केली होती.
700 वर्षांच्या समृद्ध रिपब्लिकन पद्धतीनंतर रोमन साम्राज्यात राजेशाही उत्पन्न झाली. आधुनिक भारताचा विचार केला, तर याच्या बरोबर उलट चित्र - म्हणजे प्रदीर्घ कालावधीच्या राजेशाहीनंतर लोकनियुक्त आणि प्रजासत्ताक लोकशाहीचा स्वीकार आढळून येतो.
या लोकशाहीत देशहित आणि समाजहित लक्षात घेऊन त्या दृष्टीने योग्य असा उत्तराधिकारी निवडण्याचा पर्याय सर्वच स्तरांतील कर्तृत्वसंपन्न स्त्री-पुरुषांना खुला आहे. ‘दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम्’ ही परंपरा टिकवायची, तर तसेच उदार पूर्वजदेखील पाहिजेतच! नाही का?
8888264603