बीजाचा वृक्ष

09 Apr 2021 11:55:07

संघ आज शक्तिस्थानावर आहे. त्यामुळे या ना त्या कारणाने संघावर चर्चा होत असते. संघ समजून घेण्यासाठी संघाचे जे बीज आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. पूजनीय डॉक्टरांच्या बोलण्यातील अनेक विचारसूत्रे आहेत. या विचारसूत्रांचा कर्मयोगी विस्तार म्हणजे आजचा संघवृक्ष आहे. या वृक्षाला अमृतसिंचन करण्याचे कार्य डॉक्टरांचे बीज करत असते. पूजनीय डॉक्टरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या निवडक विचारसूत्रांवर कालसापेक्ष भाष्य करणारा विशेषांक, सा. विवेकतर्फे येत्या जून 21ला प्रकाशित होणार आहे. विशेष अभ्यास आणि मनन, चिंतन करून प्राप्त झालेले लेख हे या अंकाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे.


RSS_2  H x W: 0

छांदोग्य उपनिषदात श्वेतकेतूची कथा आहे. बारा वर्षे गुरुगृही राहून, विद्या प्राप्त करून तो परत घरी आला. त्याचे वडीलदेखील विद्वान होते. श्वेतकेतूला असे वाटले की, मी आता सर्वज्ञानी झालो आहे, म्हणून त्याच्या वागण्याबोलण्यात अहंकार प्रकट होत असे.

त्याच्या वडिलांचे नाव होते उद्धालक. ते त्याला म्हणाले, “श्वेतकेतू, जे जाणले असता सर्व काही जाणले जाते, ते ज्ञान तुला झाले का?” श्वेतकेतू म्हणाला, “हे ज्ञान मला माझ्या गुरूंनी दिले नाही, कदाचित त्यांनाच माहीत नसावे.”


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी

 

उद्धालक त्याला म्हणाले, “समोरच्या वटवृक्षाचे एक फळ घेऊन ये.” श्वेतकेतूने तसे केले. उद्धालकांनी त्याला फळ फोडायला सांगून विचारले, “आत काय आहे?” श्वेतकेतू म्हणाला, “आत असंख्य बिया आहेत.” उद्धालकांनी त्याला सांगितले, “त्यातील एक बी बाहेर काढ आणि ती फोड.” श्वेतकेतूने तसे केले. उद्धालकांनी त्याला विचारले, “आत तुला काय दिसते?” तो म्हणाला, “काहीही दिसत नाही.”

उद्धालक म्हणाले, “जे दिसत नाही, त्यातून प्रचंड वृक्ष निर्माण झालेला आहे. ते सर्वव्यापी तत्त्व आहे आणि ते तू आहेस.”

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेदेखील असेच आहे. संघाचे बी म्हणजे परमपूज्यनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार. त्यांच्या बीजाचा विस्तार म्हणजे आजचे संघकार्य आहे. याची तीन वैशिष्ट्ये आहेत. 1) ते देशव्यापी आहे. 2) ते समाजव्यापी आहे. 3) आणि ते विश्वव्यापी आहे. डॉक्टररूपी एका बीजाचा हा विस्तार आहे.

 

यासाठी ज्यांना प्रामाणिकपणे संघ समजून घ्यायचा आहे, त्यांना डॉ. हेडगेवार समजून घेतल्याशिवाय संघ समजणे अशक्य आहे. त्यांचा एक एक शब्द आणि एक एक वाक्य हे मंत्रसामर्थ्यासारखे अफाट सामर्थ्यशाली आहे, हे जे समजून घेतात त्यांना संघ समजतो.

बाह्यात्कारी संघ समजणे सोपी गोष्ट आहे. संघाच्या शाखा मैदानात लागतात, कार्यक्रम उघड्यावर होतात. सरसंघचालकांचे आणि अन्य अधिकार्यांचे निरंतर प्रवास होतात. सरसंघचालकांच्या भाषणांच्या बातम्या होतात. संघकार्यालयात जाऊन संघ अधिकार्यांशी बोलता येते. संघाचे साहित्य प्रकाशित झाले आहे. डॉक्टर, श्रीगुरुजी, बाळासाहेब देवरस इत्यादींची चरित्रे उपलब्ध आहेत. श्रीगुरुजींच्या भाषणांचे लेखनाचे खंड उपलब्ध आहेत. याच्याच जोडीला संघस्वयंसेवकदेखील संघावर सतत लिहीत असतात. त्यातील मी, म्हणजे रमेश पतंगे हादेखील एक आहे.

 

RSS_1  H x W: 0 

परंतु संघ समजून घेण्यास अशा सर्व गोष्टींचा मर्यादित उपयोग आहे. एका बीजाचा विस्तार कसा, हे यातून पूर्णपणे समजेल असे नाही. संघाविषयी आणखी एक प्रकार आपल्याकडे चालतो, तो म्हणजे तथाकथित संघ सहानुभूतिदार संघाविषयी पुस्तके लिहितात. दामले आणि अँड सन्स यांची पुस्तके प्रकाशित आहेत. याशिवाय डावे टीकाकार संघाविषयी सतत काही ना काहीतरी लिहीत राहतात. अशा लिखाणामधून संघाविषयी साधकबाधक चर्चा चालू राहते.


चक्रधर स्वामींनी एक हत्ती आणि चार आंधळ्यांची गोष्ट सांगितली आहे. चार आंधळे हत्ती पाहायला गेले. एका आंधळ्याला हत्तीचा पाय हाती लागला, दुसर्याला त्याचे कान हाताला लागले, तिसर्याला त्याची शेपूट हाती लागली, चौथ्याला त्याची सोंड हाती लागली. नंतर त्यांच्यात चर्चा सुरू झाली - हत्ती कसा आहे? पाय धरणारा म्हणाला, “हत्ती खांबासारखा आहे.” शेपूट धरणारा म्हणाला, “हत्ती दोरीसारखा आहे.” कान धरणारा म्हणाला, “हत्ती सुपासारखा आहे.” आणि सोंड धरणारा म्हणाला, “हत्ती लांब हातासारखा आहे.” हे सगळे हत्तीचे अवयव आहेत, ते अवयव म्हणजे हत्ती नव्हे.


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी

 
 

भारतीय जनता पार्टी संघविचाराचा एक भाग आहे, पण भारतीय जनता पार्टी म्हणजे संघ नव्हे. विश्व हिंदू परिषद व्यापक संघकार्याचा एक भाग आहे, पण विश्व हिंदू परिषद म्हणजे संघ नव्हे. भारतीय मजदूर संघ संघविचाराचा एक भाग आहे, पण भारतीय मजदूर संघ म्हणजे संघ नव्हे. सामाजिक समरसता मंच संघविचाराचाच एक भाग आहे, पण मंच म्हणजे संघ नव्हे. अवयवावरून जसा हत्ती ठरविता येत नाही, तसेच हे आहे. म्हणून मूळ रचना ज्यांच्या दिव्य प्रतिभेतून जन्माला आली, त्यातील बीजवाक्ये कोणती आहेत, याचा गहन अभ्यास, मनन, चिंतन करावे लागते.

 

संघसंस्थापक पूजनीय डॉ. हेडगेवारांनी तीन सिद्धान्त सांगितले. 1. हे हिंदुराष्ट्र आहे. 2. हिंदू समाज राष्ट्रीय समाज आहे. 3. हिंदू समाज आत्मविस्मृत समाज आहे, त्याची स्मृती जागविली पाहिजे आणि त्याचे संघटन केले पाहिजे. या तीन सिद्धान्तात आजचा सगळा संघ सामावलेला आहे.

ही तीन महावाक्ये एवढा चमत्कार घडवून आणतील, यावर आजही अनेकांचा विश्वास बसणार नाही. हे हिंदुराष्ट्र आहे हा डॉक्टरांचा शोध नाही. हे हिंदुराष्ट्र आहे ही गोष्ट आधुनिक काळात स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, योगी अरविंद, एवढेच काय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फक्त एकदाच ही गोष्ट सांगितली. (नंतर त्यांनी याचे खंडन केले.) स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याची तत्त्वमीमांसा केली. हिंदू संघटनेचा विषय वर दिलेल्या सर्व थोर पुरुषांनी आपापल्या पद्धतीने मांडला. यावरून एवढे लक्षात येईल की, डॉक्टरांचे यात नावीन्य काही नाही.

मग तरीही विश्वव्यापी संघ त्यातून कसा निर्माण राहिला? हा प्रश्न निर्माण होतोच. त्याचे उत्तर असे की, या तीन सिद्धान्तांसाठी डॉक्टरांनी आपले जीवन समर्पित केले. तीन सिद्धान्तरूपी ध्येय गाठण्यासाठी त्यांनी अतिशय उग्र साधना केली. तिला संघसाधना म्हणतात. साधक म्हणून त्यांनी अंतर्बाह्य शुचिता निर्माण केली. सत्यवाद, न्यायप्रियता, धर्माचरण याचे ते चालतेबोलते आदर्श झाले. अशा व्यक्तीच्या मुखातून पडणारे शब्द केवळ शब्द राहत नाहीत, हे शब्द प्रचंड ऊर्जेचे शब्द बनतात. आणि ही शब्दऊर्जा कधी नष्ट होत नाही. ऊर्जेचा वैज्ञानिक सिद्धान्त सांगतो की, ऊर्जा कधीही नष्ट होत नाही, तिचे रूपांतर होते. डॉक्टरांच्या शब्दऊर्जेचे रूपांतर संघकार्याच्या वेगवेगळ्या आयामांत झालेले आहे.

 

एका बैठकीत डॉक्टर म्हणाले होते, “होय, मी केशव बळीराम हेडगेवार म्हणतो की, हे हिंदुराष्ट्र आहे.” आज देशातील कैक कोटी हिंदू हेच म्हणतात. डॉक्टर म्हणाले, “अखिल हिंदू समाजात आपल्याला नवचैतन्य आणि निर्भयता उत्पन्न करायची आहे. सामाजिक बळ उत्पन्न करून समाजघटकांत स्वाभिमान आणि आत्मविश्वास जागवायचा आहे.” आज आपण काय पाहतो, डॉक्टरांचे हे शब्द प्राणहीन किंवा अर्थहीन शब्द राहता ते ऊर्जाशब्द झालेले आहेत.

समाजात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी दक्षिणेत हिंदू मुन्नानी ही संघटना उभी राहिली. ज्या तामिळनाडूत हिंदू देवदेवतांची विटंबना करणे हा पुरोगामीपणा झााला होता, त्याला हिंदू मुन्नानीने प्रतिबंध घातला. केरळमध्ये एक काळ असा होता की, हिंदूंना मुसलमानांच्या दहशतीत राहावे लागे. लुंगी गुडघ्याच्या वर केली असेल तर समोर मुसलमान आला की ती खाली करावी लागे. केरळमधील हिंदू आता ताठ मानेने कुठेही फिरू शकतो. मशिदीपुढे वाद्य वाजविली की पूर्वी दंगा ठरलेला असे. आता दंग्याची कुणी हिम्मत करीत नाहीत. कारसेवकांना जाळले की काय होते, याचा अनुभव हिंदू समाजाने दिलेला आहे. डॉक्टरांना अभिप्रेत असलेले नवचैतन्य आणि निर्भयता सर्व देशभर उत्पन्न झालेली आहे.

काशीला एका बैठकीत डॉ. हेडगेवार म्हणाले, “काशीविश्वेश्वराच्या देवळाजवळ मशीद का? घाटावर मिनार का उभा आहे? असा प्रश्न हिंदू मनाला पडत नाही त्याची खंतही वाटत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी संघ आहे, हे विसरू नका.” आपल्या श्रद्धास्थानांचे आपण रक्षण केले पाहिजे, श्रद्धास्थानांचे अपमान धुऊन काढले पाहिजेत हा भाव जागविणारी ही वाक्ये ठरली. काशीला, अयोध्येला आणि मथुरेला दर वर्षी लाखो लोक जातात, तीन-चारशे वर्षांपासून जातात. प्रत्येकाच्या मनात डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे विचार येतातच, पण त्या वाक्यांच्या शब्दऊर्जा होत नाहीत. डॉक्टरांच्या वाक्यांच्या शब्दऊर्जा झाल्या, कारण त्यामागे साधना आहे, तपश्चर्या आहे, शुद्ध सात्त्विक जीवन आहे.

डॉक्टरांच्या या वाक्यामुळे अयोध्येचे आंदोलन उभे राहिले. प्रथम स्वयंसेवकांच्या मनात आग निर्माण झाली, त्याचा वणवा समाजात पसरला आणि बघता बघता रामजन्मभूमी मुक्तिआंदोलन सर्व समाजाचे आंदोलन झाले. याचा अनुभव आपण सर्वांनी घेतलेला आहे आणि घेत आहोत. एका महापुरुषाच्या शब्दऊर्जेचा हा एक प्रचंड आविष्कार आहे.

डॉ. हेडगेवार म्हणाले, “आमचा पवित्र हिंदू धर्म आणि आमची प्रिय हिंदू संस्कृती विश्वात गौरवाने चिरंजीवन प्राप्तकर्ती झाली पाहिजे.” आज आपण काय अनुभव करतो आहोत? डॉक्टरांचा स्मृतिदिन 21 जून हा विश्वात योगदिवस म्हणून साजरा केला जातो. शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा यांचे संतुलन साधणारी साधना म्हणजे योग. आज विश्वातील बहुतेक देशांत योगासने केली जातात. चित्तवृत्तीचा निरोध करून शांत आणि सुखी जीवन जगण्याचा हा एक मार्ग आहे. हिंदू संस्कृतीची विश्वाला ही देणगी आहे. पृथ्वी आपली माता आहे आणि पुत्र म्हणून आपली तिच्याविषयी काही कर्तव्ये आहेत, याचे एक शास्त्र तयार झाले, त्याला नाव दिले गेलेपर्यावरणशास्त्र’. हा आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार आहे, तो आज विश्वमान्य झालेला आहे. विश्व एक कुटुंब आहे आणि आम्ही त्या कुटुंबाचे घटक आहोत, ही वैश्विक भावनादेखील हिंदू संस्कृतीची देणगी आहे. विश्वाने तिचा अंगीकार केलेला आहे.

डॉक्टर म्हणाले, “विचारांमागे शक्ती उभी केली पाहिजे. शक्ती उभी राहिली तरच जग आपले ऐकेल.” आज भारत विश्वशक्तीच्या रूपात उभा आहे. डॉ. हेडगेवारांच्या कुळातील नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. विश्वातील शक्तिमान नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. भारताला आर्थिक महासत्ता, सैनिकी महासत्ता बनविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. जगात ते जिथे जातील तेथे त्यांचे भव्य स्वागत होते. जगातील हिंदू बांधव अतिशय गौरवाने आणि ताठ मानेने जगात वावरताना दिसतात. ही शक्ती निर्माण करण्याची ऊर्जा डॉक्टरांच्या अक्षय शब्दऊर्जेतून झालेली आहे.

 

डॉक्टर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, कारण ते प्रमादातीत आहेत आणि ज्यांच्या गुणांचे आपण अनुकरण करू शकतो.” छत्रपती शिवाजी महाराज आदर्श हिंदू राजा होते. मातृभक्त होते. प्रजेवर त्यांनी पित्याप्रमाणे प्रेम केले. उपासनाभेद केला नाही. जातिभेदाचे पालन केले नाही. स्त्रीसन्मानात कोणतीही तडजोड केली नाही. आपले प्राचीन आदर्श सोडले नाहीत. आपल्या धर्मस्थानांचे रक्षण केले. रयतेचे राज्य निर्माण केले. हा आदर्श आपल्याला जगायचा आहे, असे डॉ. हेडगेवार यांचे म्हणणे होते. राज्यसत्तेत गेलेले स्वयंसेवक हा आदर्श आपापल्या परीने जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाजी महाराज हा आरती करण्याचा विषय नाही, पोकळ गुणगान करण्याचा विषय नाही, तर तो अनुकरण करण्याचा विषय आहे, हे डॉ. हेडगेवारांनी बिंबविले.

 

अशी पूजनीय डॉक्टरांच्या बोलण्यातील अनेक विचारसूत्रे आहेत. या विचारसूत्रांचा कर्मयोगी विस्तार म्हणजे आजचा संघवृक्ष आहे. अनेक शाखा, उपशाखा यांनी तो वाढलेला आहे. त्याच्या वाढीला मर्यादा नाही. त्याच्या विस्ताराला कोणतीही सीमा नाही. या वृक्षाला अमृतसिंचन करण्याचे कार्य डॉक्टरांचे बीज करत असते. अमृत कधी अपवित्र होत नाही. ते कधी नासत नाही. म्हणून त्याला अमृत म्हणायचे. संघकार्य करणारे सर्व जण या अर्थानेआम्ही पुत्र अमृताचेम्हणत असतात.

अशा निवडक विचारसूत्रांवर कालसापेक्ष भाष्य हे डॉक्टरांवरील विशेषांकाचे ठळक वैशिष्ट्य राहणार आहे. विशेष अभ्यास आणि मनन, चिंतन करून प्राप्त झालेले हे लेख या अंकाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे. अपेक्षा अशी आहे की, ज्यांना संघावर चर्चा करायची आहे, त्यांनी या विचारसूत्रांच्या आधारे चर्चा केली पाहिजे. या विचारसूत्रांच्या विस्तारांचा वेध घेतला पाहिजे आणि त्यावर स्वतंत्रपणे मनन, चिंतन केले पाहिजे.

 

आज भारत म्हणून आपण मोहनिद्रेतून जागे होणारे राष्ट्रबांधव आहोत. आपल्या मुळाकडे जाण्याचा आज प्रत्येक क्षेत्रात या ना त्या प्रकारे प्रयत्न चाललेला आहे. या मुळाकडे नेण्याची वैचारिक ऊर्जा डॉ. हेडगेवारांनी निर्माण केलेली आहे. सत्त्वगुणयुक्त संघटित समाजशक्ती, धारणा करणार्या धर्मतत्त्वांच्या आधारे आज उभी राहत आहे. अंधाराचे जाळे फिटत चालले आहे आणि नवनिर्मितीची प्रकाशकिरणे हळूहळू सर्वदूर पसरत चाललेली आहेत. डॉक्टरांनी उभा केलेला संघ हे त्याचे कारणमात्र आहे. डॉक्टरांना संघ मोठा करायचा नव्हता, समाज मोठा करायचा होता. समाज बलशाली, आत्मनिर्भर आणि स्वयंशासित व्हावा, हेच त्यांचे स्वप्न होते. हे त्यांचे स्वप्न त्यांच्या शब्दऊर्जेतून कसे प्रत्यक्षात येत आहे, हे या अंकात आपल्याला वाचायला मिळेल.


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी


Powered By Sangraha 9.0