‘सनातन’ माणूसपणाचा शोध

06 Apr 2021 17:23:27

 ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन या कादंबरीला नुकताच सरस्वती सन्मान पुरस्कार घोषित झाला. सामाजिक प्रश्नांची उत्तम जाण आणि समन्वयशील भूमिका यासाठी शरणकुमार लिंबाळे प्रसिद्ध असून त्यांच्या साहित्यातून त्यांच्या व्यक्तित्वाचे प्रतिबिंब पडत असते. चाळीसहून अधिक पुस्तकांचे लेखन करणार्‍या लिंबाळे सरांना सरस्वती सन्मान पुरस्कार मिळाला, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. शरणकुमार लिंबाळे यांच्या सनातन कादंबरीचा परिचय येथे देत आहोत.

 


sanatan_1  H x
 
शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीस मानाचा सरस्वती पुरस्कार जाहीर झाला. स्वाभाविकपणे या कादंबरीचे वैशिष्ट्य काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. या कादंबरीत सातशे वर्षांचा पट दोनशे दहा पानांत मांडला गेला आहे. बिदरचा बादशहा ते स्वातंत्र्यपूर्व काळ या कादंबरीमध्ये साकार केला आहे. एवढ्या मोठ्या कालखंडाचे ताणेबाणे उकलताना दलित, विशेषतः महार समाज आणि आदिवासी यांच्या सामाजिक, आर्थिक स्थितीगतीचा आलेख या कादंबरीतून मांडला आहे. ही कादंबरी कशासाठी लिहिली? त्यामागील प्रेरणा काय? लेखक आपल्या मनोगतात लिहितो – ‘हे केवळ दलितांसाठी लिहिले नाही, नव्या समाजाच्या उभारणीसाठी हा केलेला प्रयत्न आहे. नवा माणूस ह्यातून घडावा आणि महान राष्ट्राची निर्मिती व्हावी, ह्या विचाराने हे लेखन केले आहे. वाचक यांची जरूर दखल घेतील. समाजात होणारे सकारात्मक बदल, रचनात्मक कार्य व लोकशाहीविषयी आस्था असणारी एक पिढी आहे, जी अन्याय-अत्याचारांविषयी काळजी करते आणि काळाबरोबर चालते. परंपरेने रंजल्या-गांजल्यांची पाठराखण सतत केलेली आहे. ही परंपरा खंडित तर होत नाही ना, अशी काळजी करण्याची वेळ आली आहे.’ लेखकाची लेखनामागची भूमिका इतकी स्पष्ट आणि स्वच्छ आहे की सनातन नावाची ही कादंबरी हिंदू समाजातील व्यंगांवर आणि व्याधीवर नेमकेपणाने बोट ठेवताना आम्ही वेगळे आहोत ही भूमिका कुठेही दिसून येत नाही, तर या व्याधी आपल्या आहेत, त्या आपणच दूर करून समाज बलशाली केला पाहिजे ही बाब वेळोवेळी अधोरेखित होताना दिसते. पुस्तकाच्या मलपृष्ठावरचा मजकूर ही भूमिका ठळकपणे स्पष्ट करतो – ‘सनातन हे वर्तमान आहे अर्ध्याअधिक भारताचे. नाकारलेल्या इतिहासाचे हे उत्खनन आहे. शेकडो माणसे, शेकडो मैल आणि शेकडो वर्षे व्यापणारी ही कादंबरी वाचायला हिंमत लागते. कल्पना आणि इतिहास यांच्या सरमिसळीतून तयार झालेला हा सत्याचा नवा प्रयोग वाटतो. शरणकुमार लिंबाळे यांची सनातन ही कादंबरी व्यापक सामाजिक हिताची जाणीव करून देते, त्यामुळे जातीच्या संकुचित परीघात जगणार्‍या तमामांना ती धारदार शस्त्रासारखी वाटते. ही शस्त्रपूजा नाही, तर माणसाची प्रार्थना आहे.’

 

 


सनातन या कादंबरीतील घटना सोनई, देवगड, पुणे या ठिकाणी घडत असल्या, तरी त्याला अखिल भारतीय संदर्भ आहेत. तापी आणि फाल्गुनी नदीच्या परिसरातील सोनईच्या महारवाड्यात होळीच्या सणाने कादंबरी सुरू होते आणि याच सोनईत वेदांत कॉर्टरवर अंत्यसंस्कार करतो तेथे कादंबरी संपते. महार समाज, संस्थानिक, सरदार, पाटील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा या कादंबरीत येतात. त्याचबरोबर हिंदू समाजातील प्रचलित लोककथांचाही या कादंबरीत खुबीने समावेश केला गेला आहे. बिदरच्या बादशहाने दिलेली बावन हक्कांची सनद, शंकर-पार्वतीचा गोमांस खाणारा मुलगा, संत चोखामेळाचे कुसाखाली गाडले जाणे, जालंदर-वृंदाची कथा, संत दामाजीला मदत करणारा विठू महार अशा अनेक कथा या कादंबरीत येतात. त्याचबरोबर उत्तर पेशवाई, भीमा कोरेगावची चकमक, कानपूरच्या सैनिकांचा उठाव, १८५७चे स्वातंत्र्यसमर, १८७२चा जन्मजात गुन्हेगार कायदा अशा अनेक ऐतिहासिक घटनाचा संदर्भही या कादंबरीत येतो. सोनईच्या महार समाजाचे एकूणच इतिहासातील स्थान शोधताना, त्यांच्या स्थितीगतीचा आढावा घेताना लेखक या गावातील सामाजिक ताणाबाणा समर्थपणे साकार करतात.

 

 


हिंदू समाजातील अस्पृश्यता आणि त्यामुळे निर्माण झालेले प्रश्न हा विषय सनातन कादंबरीचा गाभा आहे. स्वाभाविकच महार समाजातील व्यक्ती अन्याय-अत्याचारापायी, उपासमारीपायी धर्मांतराच्या वाटेने जातात. भारतात व्यापारी म्हणून आलेले इंग्रज राजसत्तेबरोबरच अस्पृश्य जातीचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतात. महार ख्रिश्चन होतात, महार मुसलमान होतात, पण त्यांची जात पाठ सोडत नाही. सहाशे-सातशे वर्षे ही धर्मांतराची मालिका चालू राहते, मात्र महार समाजाच्या वाट्याला आलेली अवहेलना संपत नाही.. मग ते सोनईसारखे गाव असो अगर पुण्यासारखे राजधानीचे शहर. महार समाज कायम उपेक्षित राहिला. स्वाभिमानी तरुण ब्रिटिशांच्या सैन्यात भरती होतात. हाती शस्त्र घेतात आणि ब्रिटिशांच्या वतीने विविध लढायांमध्ये शौर्य गाजवतात. एका बाजूला ग्रामव्यवस्थेतील जातीय उतरंड, तिचे वाईट परिणाम तर दुसर्‍या बाजूला धर्मांतर आणि शिपाईगिरीची संधी अशा दोन पातळ्यांवर कादंबरीचे कथानक फुलत जाते.

 

 


असे असले, तरी धर्मांतराचे परिणाम आणि जातवास्तव, समाजव्यवस्था याविषयी लेखक ठिकठिकाणी भाष्य करतो. हे भाष्य कधी संवादाच्या रूपात येते, तर कधी मनोगताच्या रूपाने. ‘धर्म माणसाचा आत्मा लुटतो, तर सत्ता माणसाचे अधिकार लुटते. धर्म आणि सत्ता ही मानवी जीवनाला लागलेली अभद्र ग्रहणे आहेत.’ ‘महार-मांग आहेत, आदिवासी आहेत. होतील ते ख्रिस्ती! विलायतेहून ख्रिस्ती थोडेच येणार आहेत? वसईला गेला असालच, आपल्यापासून जवळच आहे. जा, बघा. आपलेच लोक ख्रिस्ती झालेले दिसतील. काळ्या ख्रिस्त्यांना गोरे ख्रिस्ती शिवून घेत नाहीत. आपलेच लोक मुसलमान झालेत. इथले मुसलमान काही बाहेरून आले नाहीत. आपल्या लोकांचं आपल्या धर्मावर प्रेम नाही, स्वाभिमान नाही. स्वभाषा, स्वधर्म, स्वराज्य ह्याची लोकांना चाड नाही.’ ‘धर्मांतर केल्याने माणूस आपल्या रक्ताच्या नात्यांपासून तुटतो, समाजापासून दुरावतो. मी माझ्या जातीशी गद्दारी करणार नाही.’ ‘अस्पृश्यांनी धर्मांतर करून त्यांचा प्रश्न मिटला नाही, उलट बिकट झाला. धर्मांतरामुळे अन्य धर्मात अस्पृश्य गेले, त्यामुळे हिंदू धर्मात अल्पसंख्य झाले. अस्पृश्यांनी धर्मांतर केले जाती टाकण्यासाठी. ते ज्या धर्मात गेले, तिथेही त्यांना त्यांच्या जातीवरून ओळखले गेले. अस्पृश्यांनी स्थलांतर केले. देशांतर केले. ते ज्या देशात गेले, तिथेही त्यांना त्यांच्या जातीवरूनच ओळखले गेले. त्यांची कला, त्यांची कौशल्ये, त्यांची प्रतिभा, त्यांचे गुणधर्म कधीच पाहिले गेले नाहीत. जिथेतिथे त्यांची जात पाहिली. त्यांची अवहेलना केली. अपमान केला. छळ केला. शोषण केले.’ ‘अस्पृश्यांनी युगानुयुगे सहन केलेल्या अपार संयमातून अहिंसेचा जन्म झाला. ह्या व्यवस्थेच्या तळाशी अस्पृश्य आहेत, म्हणून ही व्यवस्था डगमगली नाही.’ ‘उच्च जातीचे ख्रिश्चन हलक्या जातीच्या ख्रिश्चनांना मुली देत नसत. गोर्‍या ख्रिश्चनांना काळ्या ख्रिश्चनांविषयी काही देणे-घेणे नव्हते. मिशनरी धर्मप्रसाराचे कार्य करत, पण ख्रिश्चनांमधल्या जाती मिटवण्याचे काम त्यांनी कधी केले नाही. हिंदू धर्मातल्या जातिव्यवस्थेविषयी प्रखर टीका करायचे, पण ख्रिश्चनांमधल्या जातिभेदाविषयी मौन पाळायचे. त्यामुळे धर्मांतरित अस्पृश्यांना फसवणूक झाल्यासारखे वाटायचे. इंग्रजांना हिंदुस्थानात सुरक्षित राहण्यासाठी ख्रिश्चन समुदाय हवा होता.’ ‘जातिव्यवस्था ही लुटीच्या रणांगणासारखी आहे. उच्च जाती खालच्या जातीची लूट करतात. वरच्या जातींनी महारांचे सर्वस्व लुटले. वरच्या जाती - मग त्या कोणत्याही धर्माच्या असोत - त्यांनी खालच्या जातींना दूर ठेवले आहे.’ ‘धर्मांतर करूनही अस्पृश्यांचा उद्धार झाला नाही. त्यांचे दारिद्र्य दूर झाले नव्हते. इंग्रजी राजवट असूनही नोकर्‍या मिळाल्या नव्हत्या. गोरे ख्रिश्चन काळ्या ख्रिश्चनांकडे सहानुभूतीने पाहायचे. हिंदू धर्मातल्या जातिभेदाचा ख्रिश्चनांना संसर्ग झाला होता. ख्रिश्चनांमध्येही जाती घट्ट झाल्या. चर्चचे धर्मगुरू, नन आणि धर्मांतरित उच्च जातीचे लोक धर्मांतरित अस्पृश्यांना समानतेने वागवत नव्हते.’ या आणि अशा अनेक वाक्यांतून लेखक धर्मांतराचे भलेबुरे परिणाम अधोरेखित करतात. छळाने, बळाने किंवा आमिषाने धर्मांतरित झालेल्या लोकांच्या जीवनात काही बदल होत नाही, त्यांची जातीची ओळख संपत नाही, हे लेखक प्रकर्षांने दाखवून देतात. या कादंबरीतून लेखक केवळ अस्पृश्य समाजबांधवांनी केलेले धर्मांतर आणि त्याचे परिणाम यावर भाष्य करत नाहीत, तर समाजात होत असलेली जागृतीही मांडत आहेत. अस्पृश्य समाजावर होणार्‍या अन्यायास धर्म जबाबदार आहे असे मानून धर्मव्यवहारातच बदल केला पाहिजे, अशी आग्रही भूमिका ब्राह्मण मंडळींसमोर विश्वनाथ घेतो. ही भूमिका पारंपरिक धर्मभावनेस छेद देणारी असते. विश्वनाथ म्हणतो, आपले धर्मग्रंथ ब्राह्मणांनी लिहिले आहेत आणि ते ब्राह्मणाला केंद्रस्थानी ठेवून लिहिले आहेत. त्यात ब्राह्मण्याच्या हिताचा विचार आहे. आपणच लिहीत होतो, आपणच पारायण करत होतो. इतरांना संस्कृत शिकण्याची बंदीच होती. त्यामुळे ब्राह्मणांविरुद्ध तक्रार केली गेली नाही. आपणही ब्राह्मण्याच्या पलीकडे जाऊन धर्म आणि समाज जाणून घेतला नाही. हिंदू धर्मातील ब्राह्मण्य आणि अस्पृश्यता गाडल्याशिवाय आपण व्यापक समाजहिताची भूमिका घेऊ शकत नाही. विश्वनाथ या ब्राह्मणाची ही भूमिका नव्या जाणिवेचे बीजारोपण करताना दिसते. खरा धर्म आणि त्याचा आत्मा असलेल्या माणूसपणाची अनुभूती समाजात दिसायला हवी, असा त्याचा आग्रह आहे. एका अर्थाने धर्माचे मर्म येथे सांगितले आहे.
 

 

अस्पृश्यता आणि त्याची वेदना वेगळ्या संदर्भात विधवा ब्राह्मण महिलांना अनुभवावी लागते. पतिनिधनानंतरचे एकाकी जीवन आणि मानसिक कोंडी यांचेही चित्रण या कादंबरीत येते. सर्व धर्म हे शोषण करतात असे म्हणत धर्म माणुसकी जपणारा हवा अशी मागणी ही महिला करते. आपल्या मुलाशी बोलताना सरस्वती म्हणते, कुठलाही धर्म माणुसकीवर आधारलेला नाही, ईश्वरावर आधारलेला आहे. आपण जितकं ईश्वराविषयी बोलतो, तेवढं माणसाविषयी बोललं पाहिजे. आपण जेवढं स्वर्गाविषयी बोलतो, तेवढं समाजाविषयी बोललं पाहिजे. विधवा म्हणून मी जे उपेक्षित जीवन जगलं आहे, त्या जीवनाने मला ही दृष्टी दिली आहे. माझं जाऊ द्या रे, अस्पृश्यांचा विचार करा. आज नाही, शंभर वर्षांनी तरी ते हिशेब विचारतील. तू महान पंडित झाला आहेस. आईकडे अशुभ म्हणून पाहायला तुला काहीच वाटलं नाही? मी तुला जन्म दिलाय, म्हणून विचारते. तू ना? एकटी राहून असा विचार करतेस. ज्यांना ज्यांना एकटं पाडलं आहे - वेगळं पाडलं आहे, तेही असाच विचार करत असतील, हे लक्षात घे. लेखकाने या संवादातून खूप खोलवर रुतून बसलेली वेदना मांडताना भविष्याचा वेधही घेतला आहे.

अनेक ऐतिहासिक घटनांची सांगड या कथानकाशी घातली गेली आहे. त्या प्रसंगावर लेखक स्वतःचे भाष्य करतो – भूतनाथ इतिहासाला हलवून जागं करत होता. पारबतीला गाढ झोप लागली होती. ती इतिहासासारखी घोरत होती.’ ‘राणी लक्ष्मीबाई ब्राह्मण होत्या, तर झलकारीबाई खालच्या कोरी ह्या जातीच्या होत्या. राणी लक्ष्मीबाईंनी कधी त्यांची जात पाहिली नाही. इतिहासाने जात पाहिली.’ ‘राजपुत्राने भिल्लिणीचे दूध प्यायचे... आता तो भिल्लासारखा होईल! आदिवासी स्त्रीच्या दुधाला मोल होते, आदिवासी स्त्रीला मात्र नाही. तिची जागा पायर्‍यांवर होती.’ ‘जोपर्यंत पीडित आपला इतिहास लिहिणार नाहीत, तोपर्यंत त्यांना जेत्यांच्या गौरवगाथा वाचाव्या लागतात. पीडित लिहितील, आज ना उद्या!’ ‘इंग्लंडमध्ये घुसखोर म्हणून जेवढा धोका आहे, तेवढ्यात धोका इथं अस्पृश्य म्हणून राहण्यात आहे. गोरे आणि सवर्ण एकाच वृत्तीचे आहेत. अशा वाक्यांतून लेखक सामाजिक परिस्थिती आणि मानसिकता यावर भाष्य करतो.

तर अशी ही शरणकुमार लिंबाळे यांची सनातन कादंबरी. चार-पाच पिढ्यांच्या सामाजिक, धार्मिक उत्थान-पतनाचा हा आलेख आहे. या संपूर्ण कथानकातून लेखक मानवतेची भूमिका घेतो. अन्याय-अत्याचार, शोषण या गर्तेतून बाहेर येऊन माणसासारखे जगण्यासाठी धडपड करणार्‍या माणसांची ही कथा आहे. दीर्घ कालपट आणि असंख्य व्यक्तिरेखांचा संचार असणार्‍या सनातनमधून आजच्या काळातही समाजाकडे बघण्याची दृष्टी मिळते. कारण सामाजिक समस्या सनातन आहेत. आजही त्या नव्या नव्या स्वरूपात समोर येत आहेत. अशा वेळी आपला माणूसपणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ही साहित्यकृती उपयुक्त ठरेल.

 
Powered By Sangraha 9.0