अखेर सुवेझ कालव्याचे ग्रहण सुटले

विवेक मराठी    03-Apr-2021
Total Views |

@चंद्रशेखर नेने

एव्हर गिव्हननावाचे एक महाकाय जपानी जहाज सुवेझ कालव्याच्या दक्षिण टोकाच्या जवळ अडकून बसले आणि त्याने संपूर्ण कालवा ब्लॉक केला! सोमवारच्या सकाळी प्रतिपदेला एकदाचे हे जहाज पुन्हा पाण्यावर तरंगू लागले. हा कालवा बंद झाल्याने इजिप्त देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे, शिवाय त्या ट्रॅफिक जॅमच्या काळात 300-350 जहाजे अडकून पडली होती, त्यांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे. हा सगळा गोंधळ निस्तरायला कदाचित 5-6 महिनेसुद्धा सहज लागतील!

 

Suez Canal Traffic Jam_1&

आंतरराष्ट्रीय व्यापारविश्वाला 23 मार्च 2021 रोजी लागलेले ग्रहण सरतेशेवटी 29 मार्च, प्रतिपदेच्या सकाळी सुटले. ‘एव्हर गिव्हन’ नावाचे एक महाकाय जपानी जहाज सुवेझ कालव्याच्या दक्षिण टोकाच्या जवळ अडकून बसले. ह्यामुळे जगप्रसिद्ध सुवेझ कालवा जलवाहतुकीसाठी 23 तारखेला बंद झाला आणि व्यापारविश्वात प्रचंड खळबळ माजली. कारण जगातील एकूण नाविक मालवाहतुकीच्या 12 ते 15 टक्के वाहतूक ह्या जेमतेम 200 किलोमीटर्स लांबीच्या कालव्यातून होते. युरोप आणि आशिया ह्यांच्यातील महत्त्वाची सारी मालवाहतूक वेगाने करण्यात ह्या कालव्याचा मोठाच वाटा आहे. हा कालवा जर बंद झाला, तर युरोपहून येणार्या जहाजाला आशियाकडे येण्यासाठी सुमारे 4000 मैलांचा अतिरिक्त प्रवास करावा लागतो. संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून यावे लागते. त्यामुळे ह्या कालव्यातून होणार्या वाहतुकीवर अनेक राष्ट्रांचे भवितव्य अवलंबून आहे. जेव्हा हा बंद झाला, तेव्हा युरोपात इंधन तेलाची टंचाई जाणवू लागली आणि भाव 4 ते 5 टक्के वाढले. सीरियासारख्या देशात तर तेलाचे रेशनिंग करावे लागले. कोरोनाने आधीच बेजार झालेल्या जागतिक अर्थव्यवस्थेचे प्राण कंठाशी आले. आणि का नाही येणार! रोज ह्या कालव्यातून सुमारे पन्नास अजस्र मालवाहू जहाजे ये-जा करतात. त्यांच्या ह्या प्रवासाच्या ‘टोल टॅक्स’द्वारे इजिप्त ह्या देशाला दर दिवशी सुमारे दीड कोटी अमेरिकन डॉलर्सचे परकीय चलन मिळते! इजिप्त हा पश्चिम आशियातील, (ज्याला पाश्चिमात्य राष्ट्रे ‘मध्य पूर्व’ असे म्हणतात), एक मोठा, पुरातन आणि जास्त लोकसंख्येचा देश आहे. त्या देशाजवळ तेलाचे साठे नाहीतच! इतक्या मोठ्या लोकसंख्येला (दहा कोटीच्या वर) पोसण्यासाठी इजिप्तकडे फक्त पर्यटकांकडून आणि सुवेझ कालव्यातून मिळणारे उत्पन्न हेच मुख्य स्रोत आहेत. बहुतांश देशात वाळवंट असल्याने सर्व लोकसंख्या नाइल नदीच्या काठावरच्या अपुर्या सुपीक जमिनीवरच स्थायिक झालेली आहे, त्यामुळे इथे लोकसंख्येची घनता खूपच जास्त आहे. अगदी मुंबईसारखी म्हणा ना. त्यामुळे इजिप्तलासुद्धा या ट्रॅफिक जॅममुळे घरघर लागली होती!


सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik

 हे सर्व प्रकरण समजून घ्यायचे असेल, तर आपल्याला थोडे मागे जावे लागेल, मुळात हा जॅम कशामुळे झाला, हे आधी पाहू या. पण त्यासाठी सुवेझ कालवा ही काय चीज आहे हे समजून घ्यावे लागेल. इजिप्त देश आफ्रिकेच्या उत्तर किनार्यावर आहे. त्याच्या उत्तरेला सुप्रसिद्ध भूमध्य सागर आहे. जुन्या ग्रीक आणि रोमन दर्यावर्दी खलाशांना केवळ हाच समुद्र ठाऊक होता. त्यामुळे त्यांची कल्पना अशी झाली की त्यांच्या ज्ञात विश्वाच्या मध्यभागी हा समुद्र आहे, म्हणून त्यांनी ह्याचे नावभूमध्य’ (चशवळींशीीरपशरप डशर) असे ठेवले होते! इजिप्त ह्या देशाच्या दक्षिणेला थोड्या अंतरावरसुवेझह्या गावानजीक एक समुद्राची लांब पट्टी आहे, तिलालाल समुद्रम्हणजेच (ठशव डशर) म्हणतात. ह्या लाल समुद्रातून बाहेर पडल्यावर पूर्वेकडे भारताकडे, आणि इतर आशियाई देशांकडे जाण्याचा समुद्री मार्ग खुला आहे. खूप पूर्वीपासून इजिप्त आणि उत्तरेच्या ग्रीस, रोमन इत्यादी देशांना भारत, जावा, सुमात्रा ह्या देशांशी मसाल्याचे पदार्थ आणण्यासाठी व्यापार करायची आवश्यकता होती. त्यासाठी ते देश इजिप्तच्या उत्तरेच्या पोर्ट सईद ह्या बंदराला येऊन पुढे खुश्कीच्या मार्गाने, म्हणजेच जमिनीवरून सुवेझपर्यंत प्रवास केला जाई. मग तिथून पुनः जहाजात बसून आशियाच्या इतर बंदरांकडे प्रवास केला जात असे. पण ह्या खुश्कीच्या मार्गात खूप अडथळे येत, कारण बहुतेक वाळवंटी प्रदेशातून उंटाच्या पाठीवर माल लादून हा प्रवास करावा लागे. त्यामुळे तो खूप हळू आणि शिवाय धोक्याचा असे! त्यामुळे इजिप्तच्या व्यापारात तेव्हा असलेल्या फ्रेंच अधिकार्यांना अशी कल्पना सुचली की, जर पोर्ट सईदपासून सुवेझपर्यंत एक मोठा कालवा खोदला, तर भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र एकमेकांना जोडले जातील आणि त्यानंतर आपली जहाजे थेट भारताच्या किंवा जावा (सध्याचा इंडोनेशिया)च्या किनारी बंदरांपर्यंत नेता येतील!

 
Suez Canal Traffic Jam_3&

सुएझ कालवा परिसराचा नकाशा

ह्याच्या अगोदर वास्को दी गामा ह्या पोर्तुगीज सारंगाने इसवीसन 1498मध्येच संपूर्ण आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोप ते भारतातील कालिकत बंदरपर्यंत सागरी मार्ग यशस्वीपणे शोधला होता. परंतु हा खूपच लांबचा मार्ग होता. त्यात वेळ, पैसा आणि सागरी प्रवासातील विविध धोके खूप होते, ह्यामुळे ह्याहून कमी अंतराच्या आणि सुरक्षित मार्गाची अतिशय गरज होती. जर पोर्ट सईद ते सुवेझ असा कालवा बांधता आला, तर हे प्रवासाचे अंतर सुमारे चार हजार मैल कमी होईल असे लक्षात आले. त्यामुळे असा कालवा बांधण्याचे फ्रेंच व्यापारी सरकार यांनी ठरवले. हे काम करण्यासाठी त्यांनी एक धडाडीच्या हुशार फ्रेंच इंजीनियर फर्डिनांड लेसेप्स याची नेमणूक केली. अथक प्रयत्न करून त्याने हे काम 1869च्या नोव्हेंबर महिन्यात पूर्ण केले. त्यासाठी त्याला सुमारे दहा वर्षे लागली! हा कालवा 164 किलोमीटर्स इतका लांब होता, 61 ते 90 मीटर्स रुंद आणि 8 मीटर्स खोल होता. त्या वेळेस असणार्या जहाजांच्या तुलनेने ही मापे बरोबर होती, कारण ती जहाजे फार मोठी नव्हती, त्यामुळे त्यांचा पाण्याखालील भाग (ज्यालाड्राफ्टअशी नाविक संज्ञा आहे) हा फार तर 6 मीटर्स एवढाच होता. पण पुढे जहाजनिर्मितीतील तंत्रज्ञान अधिक अधिक सुधारत गेले आणि खूप मोठी जहाजे बांधण्यात येऊ लागली. अशी महाकाय जहाजे सामावण्यासाठी ह्या कालव्यात खूप सुधारणा आणि वाढ करण्यात आली. आजमितीस हा कालवा 193 किलोमीटर्स लांब आहे आणि त्याची खोली 24 मीटर्सपर्यंत वाढवली आहे. तशीच ह्याची रुंदीदेखील 205 मीटर्स एवढी केली आहे! त्यामुळे सध्याची खूप मोठी जहाजेदेखील ह्यातून ये-जा करू शकतात. पण विशेष म्हणजे इतकी मोठी आणि रुंद जहाजे असल्यामुळे, कालव्याच्या बहुतेक भागात एक वेळी एकाच दिशेेने जहाजे जाऊ शकतात. म्हणजे वन वे ट्रॅफिक आलटून पालटून सोडण्यात येतो. अशाच अरुंद भागात सुवेझ बंदरापासून 5 मैलांवर दुर्दैवाने हेएव्हर गिव्हनजहाज अडकून बसले. सुवेझ कालवा म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापराचे धडाडते हृदयच! अशा ठिकाणी महत्त्वाची रक्तवाहिनीब्लॉकझाल्यावरहार्ट अटॅक येणार! तसेच झाले.

 

सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा....https://www.facebook.com/VivekSaptahik

 

सुरुवातीला ह्या कालव्याची मालकी एक फ्रेंच कंपनीकडे होती. पुढे ती ब्रिटिश-फ्रेंच संयुक्त कंपनीकडे आणि नंतर पर्यायाने ब्रिटिश-फ्रेंच संयुक्त सरकारकडे आली. हा सगळा काळ इजिप्त हा देश ब्रिटिश आधिपत्याखाली होता. पुढे 1922 साली इजिप्त स्वतंत्र झाला, तरीसुद्धा ब्रिटिश फ्रेंच सरकारांनी कालव्याची मालकी स्वत:च्याच हाती ठेवली होती आणि याचा इजिप्शियन जनतेला खूप राग येत असे. कालांतराने 1954 साली इजिप्तमध्ये सत्तांतर होऊन गमाल अब्दुल नासर ह्या एका लेफ्टनंट कर्नल हुद्द्यावरच्या धडाडीच्या लष्करी अधिकार्याने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली. त्यानंतर त्याने ब्रिटिश-फ्रेंच सरकारच्या हातातून सुवेझ कालवा इजिप्शियन सरकारच्या ताब्यात घेण्याचा चंग बांधला. त्यानुसार नासर ह्याने 26 जुलै 1956 रोजी सुवेझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले आणि त्याची मालकी पूर्णपणे इजिप्त सरकारकडे घेतली. ब्रिटिश-फ्रेंच सरकारांना हे पटणे शक्यच नव्हते. त्यांनी इस्रायलला बरोबर घेऊन इजिप्तविरुद्ध युद्ध पुकारले. पण ह्या वेळेस अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर यांनी नासर यांची बाजू घेऊन ब्रिटिश आणि फ्रेंच लष्कराला माघार घ्यायला भाग पाडले. त्या दिवसापासून सुवेझ कालवा इजिप्तच्या मालकीचा झाला. ह्या युद्धात भारताने इजिप्तची बाजू घेतली होती. नासर आणि नेहरू चांगले मित्र होते. पुढे इथे शांती टिकवण्यासाठी युनोकडून शांतिसेना ठेवण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा भारताने उत्तम शांतिसेना पाठवली, जिचे सार्या जगात कौतुक झाले. हे भारताचे पहिले शांतिसेना मिशन होते!


पुढे 1967 साली इजिप्त आणि इस्रायल यांच्यात युद्ध पेटले. हे युद्धसिक्स डे वॉरम्हणून प्रसिद्ध आहे. ह्या युद्धात इस्रायल या छोट्या देशाने इजिप्त, सीरिया, लेबनॉन आणि जॉर्डन ह्या संयुक्त सैन्याचा दणकून पराभव केला. त्या पराभवानंतर नासर यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. त्या वेळेस त्यांनी सुवेझ कालवा जहाज वाहतुकीला बंद केला, म्हणजे इस्रायल त्याचा वापर करू शकणार नाही असे कारण दिले. अर्थात ह्या बंदीचा इजिप्तलाच खूप तोटा झाला, कारण त्यांचे कालव्याच्याटोल टॅक्सचे उत्पन्न बुडाले! 1970 साली नासर निराश अवस्थेत मरण पावले. त्यांच्यानंतर आलेल्या अन्वर सादात यांनी 1975 साली - म्हणजे 8 वर्षांनी हा कालवा पुनः वाहतुकीस खुला केला. त्यानंतर हा अव्याहत सुरू आहे. पण 23 मार्च 2021 रोजी मात्र हा प्रवास एकदम थांबला!

त्या दिवशी सकाळी साडेसात वाजता एक महाकाय मालवाहू जहाज - कंटेनर शिपएव्हर गिव्हनहे कालव्यातून सुवेझहून उत्तरेला जात असताना उजव्या किनार्याला आपटले अडकले आणि त्याने संपूर्ण कालवा ब्लॉक केला! हे जहाज प्रचंड मोठे होते. त्याची लंबी 400 मीटर्स होती, (सुवेझ कालव्याची रुंदी 200 मीटर्स आहे!) आणि रुंदी 59 मीटर्स. त्यावर 20,000 कंटेनर्स भरलेले होते, ज्यामुळे त्याचे वजन जवळजवळ दोन लाख टन होते! या जहाजाचाड्राफ्टम्हणजे पाण्याखालचा भाग 16 मीटर्स होता. त्या दिवशी त्या भागात वाळूचे वादळ येत होते, आणि वार्याचा वेग ताशी 40 मैल हा खूपच जास्त होता. कंटेनर्स पूर्ण उंचीपर्यंत भरलेले असल्याने त्यांचा वार्याला अवरोध होत होता आणि जणू काही एखाद्या शिडाच्या बोटीसारखाच त्या कंटेनर्सच्या भिंतीचा परिणाम झाला. सुरुवातीला जहाजाचा वेगसुद्धा 13 नॉट्स - म्हणजे वेगमर्यादा 7.5 नॉट्सपेक्षा जास्त होता. सुवेझच्या पश्चिमेकडचा भाग - म्हणजे या जहाजाच्या डावीकडील भाग हा पूर्व भागापेक्षा जास्त खोल आहे. त्यामुळे जहाज थोडे पश्चिमेच्या कडेने नेले जात होते. पण वार्याच्या झोताने ते अधिक पश्चिमेकडे ढकलले गेले आणि थोडे कलू लागले, म्हणून जहाजाच्या चालकाने ते पूर्वेकडे, म्हणजेच उजवीकडे वळवले. पण त्या वळवण्याचा वेग बहुतेक जास्त झाला आणि ते जहाज सरळ होण्याऐवजी आणखी उजवीकडे वळले! इतके अजस्र प्रचंड वजनाचे जहाज इतक्या लवकर सहजपणे वळू शकत नाही. त्यामुळे त्याचे पुढचे टोक पूर्वेकडे असलेल्या कालव्याच्या वाळूच्या भिंतीत घुसले! त्या टोकाचा खालील भाग मुद्दाम फुगीर केलेल्या असतो, तो ह्या जोरदार धडकेने वाळूत जाऊन घुसला आणि अशा प्रकारे हे प्रचंड धूड कालव्यात आडवे अडकले. आता मात्र कालवा पूर्णपणे ब्लॉक झाला. दोन्ही बाजूंचा ट्रॅफिक एकदम ठप्प! एका अतिशय महत्त्वाच्या जागतिक व्यापारमार्गाची पूर्णपणे नाकेबंदीच झाली!


Suez Canal Traffic Jam_1&

हे जहाज एक तैवानच्या कंपनीने भाड्याने घेतलेले आहे. त्यात चीनमधून माल लादलेला आहे आणि तो युरोपच्या नेदरलँड्स देशातील प्रसिद्ध रॉटरडॅम या बंदराकडे निघाला होता. एका जर्मन कंपनीकडे ह्या जहाजाची मॅनेजमेंट आहे. त्यावरचे सगळे खलाशी - अगदी कॅप्टनसकट - भारतीय आहेत. त्या सगळ्या कर्मचार्यांना सुवेझ कालव्यातून प्रवास करण्याचा भरपूर अनुभव आहे. सुवेझ कालव्याच्या नौकानयनासाठीच्या नियमानुसार त्यावर दोन इजिप्शियनपायलटदेखील सुवेझ बंदरावर घेतलेले होते. हे जहाज बांधले आहे जपान येथील इमाबारी या विख्यात, जगातील सर्वात मोठ्या जहाज बांधणी कंपनीने. 2018 सालीच याची बांधणी पूर्ण झाली. म्हणजे तसे हे नवेच आहे. तैवानी कंपनीएव्हरग्रीन मरीन कॉर्पोरेशनजहाजाची चालक आहे, म्हणून त्या जहाजावर ठळक अक्षरातएतएठॠठएएछअसे नाव दिसतेय. जहाजाचे नावएतएठ ॠखतएछहे लहान अक्षरात पुढच्या मागच्या भागावर लिहिलेले आहे! शिवाय टॅक्स वाचविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरात सुरक्षितपणे प्रवास करण्यासाठी, ह्या जहाजाचा मालक देश हापनामाआहे! एकूण बघता हे जागतिकीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे असे म्हणायला हरकत नाही! त्यातून पुनः हे जहाज बाहेर काढण्यासाठी जी कंपनी काम करत होती, ती नेदरलँड्स देशाची आहे. त्यांना जर जमले नसते, तर अमेरिकन कंपनीची मदत घेण्याची योजना तयार होती.

हे जहाज मोकळे करण्यासाठीटग बोट्सनावाच्या लहान पण शक्तिशाली बोटींची मदत घेण्यात आली. ह्या बोटी जहाजाला धक्का मारून सरळ करण्याचा प्रयत्न करीत होत्या, पण तो प्रयत्न तोकडा पडत होता, कारण जहाज फार मोठे आणि वजनदार होते. नंतर दुसर्या स्पेशल ड्रिलिंग बोटी वापरून जहाजाच्या नाकाखालील माती उकरून काढण्यात आली, जेणेकरून ते पाण्यावर तरंगू शकेल आणि मोकळे होईल. त्याशिवाय जहाजावरचा गोड्या पाण्याचा साठादेखील उपसून कालव्यात टाकून दिला, ज्याने जहाज हलके झाले. सर्वात शेवटी रविवारी रात्री पोर्णिमा असल्याने समुद्राला मोठी भरती आली आणि त्याचे पाणी कालव्यात वाढले. त्याची खूप मदत झाली आणि सोमवारच्या सकाळी प्रतिपदेला एकदाचे हे जहाज पुनः पाण्यावर तरंगू लागले. ह्या सगळ्या काळात जहाजावरच्या भारतीय कर्मचार्यांनी अपार मेहनत घेऊन ह्या कठीण प्रसंगी उत्तम काम केले, त्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. त्यानंतर टग बोटीने ते ओढून बाहेर काढले पुढेबिटर लेकनावाचे एक सरोवर आहे, तिथे हे आता नेऊन नांगरले आहे. आता त्याची पूर्ण तपासणी होईल सर्व ठीक असले तर ते पुढे रवाना होईल. पण आता ह्या सगळ्या गोंधळाला जबाबदार कोण? हा मोठा प्रश्न सोडवायला सुवेझ कालव्याचे व्यवस्थापन, जहाजाचे मालक आणि चालक, इंजीनियर्स आणि इतर कायदेतज्ज्ञ एकत्र बसतील; कारण हा कालवा बंद झाल्याने इजिप्त देशाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे, शिवाय त्या ट्रॅफिक जॅमच्या काळात 300-350 जहाजे अडकून पडली होती (ती सर्व मोकळी करायला अजून किमान 10 तरी दिवस जाणार आहेत), त्यांचेदेखील प्रचंड नुकसान झाले आहे, कारण त्यांचा माल कदाचित खराब झाला असेल, शिवाय माल उशिरा पोहोचवला, तर त्याची दंडाची मोठी रक्कम भरावी लागते! हा सगळा गोंधळ निस्तरायला कदाचित 5-6 महिनेसुद्धा सहज लागतील!


Suez Canal Traffic Jam_2&

कालवा बंद पडल्याने भारताच्या निर्यातीच्या मालाची खराबी झाली असणार, उदा. नाशिकची द्राक्षे ह्या काळात युरोपात सुवेझमार्गेच पाठवली जातात. भारतातून शुद्ध केलेले पेट्रोल आणि डिझेल युरोप-अमेरिकेत याच मार्गाने नेले जाते. त्याला उशीर झालेला असेल. युरोपातील देशात इंधन तेल ह्याच मार्गातून येते, तेथे इंधनाचे दुर्भिक्ष झाल्याने भाव मागे लिहिल्याप्रमाणे 4 ते 5 टक्क्यांनी वाढले आहेत.

ह्या घटनेने आपले व्यावसायिक जागतिकीकरण किती ठिसूळ पायावर उभारलेले आहे, हे कळून येते. एका लहानशा अपघाताने या वैश्विक व्यापाराला किती मोठा झटका बसला आहे ह्याचा विचार चक्रावून टाकणारा आहे. ह्या वेळेस हा अपघात होता, पण भविष्यात एखाद्या दहशतवादी संघटनेने अशीच कारवाई केली, तर ते सार्या जागतिक व्यापाराला वेठीस धरू शकतील. युनायटेड नेशन्ससारख्या जागतिक संघटनेने ह्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की सुवेझ, पनामा आणि इतर अशाच अतिमहत्त्वाच्या सागरी मार्गांची देखरेख इजिप्त किंवा पनामा अशा छोट्या आणि अप्रगत देशांच्या ताब्यात असता कामा नये! युनो किंवा एखाद्या आंतरराष्ट्रीय सागरी प्राधिकरणाकडे ही व्यवस्था सोपवायला हवी. भारतासारख्या महत्त्वाच्या देशाने ह्या कार्यात पुढाकार घेऊन अशी व्यवस्था कायम करायला हवी, म्हणजेच भविष्यात असे धोक्याचे प्रसंग उद्भवणार नाहीत!

 
लेखक हे भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांचे संगणक दळणवळण प्रमुख, आयटी आणि टेलिकम्युनिकेशन्स चीफ म्हणून अनेक देशांत काम केलेले तज्ज्ञ आहेत.



सा. विवेकच्या फेसबुक पेजला like करा
....https://www.facebook.com/VivekSaptahik